Thursday, June 28, 2012

कालवा देखभाल-दुरूस्ती


जल वास्तव-
कालवा देखभाल-दुरूस्ती
प्रास्ताविक:
माणसाची तब्येत चांगली रहाणे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. खाणे-पिणे, झोप-विश्रांती, फिरणे-व्यायाम, विचार-कृति, इत्यादि बाबी नियमित व पथ्ये सांभाळून झाल्यास प्रकृती चांगली राहण्याची शक्यता वाढते. काळजी घेण्याने काही आजार टाळता येतात. सिंचन प्रकल्पांचेही तसेच आहे. नियमित व व्यवस्थित देखभाल-दुरूस्ती झाल्यास सिंचन प्रकल्पांची कार्यक्षमता टिकून राहते. त्यांचे उपयुक्त आयुष्य वाढते. अपेक्षित फायदे जास्त काळ संकल्पित क्षेत्र व लोकांना मिळत राहतात.
कालवा देखभाल-दुरूस्तीचे महत्व:
कालवे धडधाकट राहिले तर सिंचन प्रकल्पांत खालील बाबी शक्य होतात:
) कालव्यांची प्रत्यक्ष वहनक्षमता संकल्पित वहनक्षमतेच्या जवळपास राहते.
) कालव्यातून होणारी गळती, पाझर व झिरपा इत्यादि व्यय/पाणीनाश (लॉसेस) मूळ संकल्पनेतील गृहितांच्या मर्यादेत राहतात.
) कालव्यांची वहनक्षमता चांगली राहिली, कालव्यातून होणारा पाणीनाश मर्यादेत राहिला आणि पाणीचोरी झाली नाही तर पाणी टेल पर्यंत ठरलेल्या वेळेत पोहोचते. नियोजनाप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत (फ्लो पिरियड) पाणीपाळी पूर्ण होते. त्यामूळे पुढची पाणीपाळी वेळेवर सुरू होते. दोन पाणीपाळीतील अंतर वाढत नाही. पिकांना पाण्याचा ताण बसत नाही. कालवा वाहण्याचे दिवस मर्यादित राहिल्यामूळे कालवा बंद राहण्याचे दिवसही (क्लोझर पिरियड) योग्य तेवढे मिळतात. दोन पाणीपाळ्यांमध्ये कालवा देखभाल-दुरूस्तीला पुरेसा वेळ मिळतो. प्रत्येक पाणीपाळीत नियोजनाप्रमाणे वेळेत भरणे झाले की हंगामातील एकूण पाणीपाळ्यांची संख्या (रोटेशनस/आवर्तने) योग्य तेवढी राहते. ज्यांना विहिरीचा आधार नाही त्यांचे सुद्धा पिक चांगले येते. उत्पादकता वाढते. पाण्यावरून होणारे संघर्ष कमी होतात. पाणी वाटपात समन्याय वाढीस लागतो. शेतक-यांत समाधानाची भावना निर्माण होते. त्यामूळे पाणीपट्टी देण्याची वृत्ती वाढते. वसुली वाढते. पाणी पट्टीची वसुली वाढल्यामूळे कालवा देखभाल-दुरूस्तीसाठी शासन योग्य तो निधी देऊ शकते. निधी पुरेसा मिळाला की कालव्यांची आवश्यक ती कामे होतात. देखभाल-दुरूस्ती व्यवस्थित झाली तर वर नमूद केलेले फायदे मिळतात. एक इष्टचक्र प्रस्थापित होते. सिंचन प्रकल्प यशस्वी होतो. समाजाने केलेली सर्व प्रकारची गुंतवणूक फलदायी ठरते. विस्थापित व पर्यावरण याबाबत काही अंशी तरी पापक्षालन होते.
ही  सर्व चर्चा लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतक-यासाठी महत्वाची आहे. त्याच्या जीवनातील ओल व सुखचैनकी निंद त्यावर अवलंबून आहे. पण व्यवहारात असे खरेच होते का? वास्तव काय आहे? इष्टचक्रा ऎवजी दुष्टचक्र तर प्रस्थापित झाले नाही ना? देखभाल-दुरूस्तीचे प्रश्न मूळात निर्माण का होतात? ते अक्राळविक्राळ रूप का धारण करतात?
देखभाल-दुरूस्तीचे प्रश्न निर्माण होण्याची कारणे:
देखभाल-दुरूस्तीचे प्रश्न निर्माण होण्याची महत्वाची कारणे उदाहरणासह खाली दिली आहेत.
) संकल्पन व नियोजनातील चूका व त्रुटींमूळे देखभाल-दुरूस्तीच्या प्रश्नांचे बीजारोपण होते. उदाहरणार्थ, कालवा, वितरिका व लघुवितरिकांमध्ये पाणी पातळी राखणे व पाणी योग्य प्रकारे वळवणे (वॉटर लेव्हल व क्रॉस रेग्युलेशन) याकरिता उचित/अधिकृत अभियांत्रिकी व्यवस्था बहुसंख्य ठिकाणी नसल्यामूळे शेतकरी त्यांना हवे त्या ठिकाणी तुंब घालतात. पाणी पातळी वाढवतात व पाणी हवे तसे वळवतात. तुंब अर्थातच कालव्याच्या भरावाची माती घेऊन आणि कालव्यावरील विविध बांधकामातील दगड वापरून घातले जातात. त्यामूळे कालव्यांना असंख्य ठिकाणी जखमा होतात. त्या कधीच भरून येत नाहीत. दुसरीकडे, कालव्यात घातलेला अनअधिकृत  तुंब हा प्रवाहाला अडथळा बनतो. त्याच्या वरच्या बाजूला गाळ साठतो तर खालच्या अंगाला खड्डा पडतो. कालव्यात पाणी साठून रहायला लागते. कालव्याची वहनक्षमता कमी होते. प्रवाहाचा वेग मंदावतो. तुंब आपणहून कोणीच काढत नाही. शासनाने कधी काढलाच तर तो पुन्हा घातला जातो. कारण पाणी पातळी राखणे व पाणी वळवणे हे मुख्य प्रश्न अभियांत्रिकी पद्धतीने सोडवले जात नाहीत. (विमोचकाचे स्थान व तलांक चूकणे, कालवा अति खोदाई/भरावातून नेणेबांधकामाचा प्रकार चूकीचा निवडणे, वगैरे अन्य उदाहरणेही सर्वत्र आढळतात.)
) संकल्पन व ड्रॉईंगप्रमाणे प्रत्यक्ष बांधकाम न होणे आणि बांधकामाचा दर्जा कमी प्रतीचा असणे हे कारण कुप्रसिद्ध असून त्याची असंख्य उदाहरणे प्रकल्पा-प्रकल्पात पावलोपावली दिसतात.
) कालवा चालवताना त्यात  भसकन पाणी सोडणे, तो अचानक बंद करणे, वहनक्षमतेपेक्षा फार कमी अथवा जास्त प्रवाह सोडणे, पाणी पातळीत एकसारखे मोठे बदल होणे अशा प्रचालनसंबंधी कारणांमूळेही कालव्याची धूप होणे, गाळ साठणे, भराव ढासळणे, वगैरे प्रश्न निर्माण होतात.
) देखभाल-दुरूस्ती करताना ती व्यवस्थित न करणे, थातुरमातुर स्वरूपाची कामे करणे, इत्यादि प्रकारही गंभीर प्रश्न निर्माण करतात. उदाहरणार्थ, कालव्याच्या तळातून काढलेला गाळ कालव्याच्या भरावावर (आतल्या बाजूवर)टाकल्याने तो परत पावसाने/पाण्याने कालव्यात येतो. खड्डे भरताना व ढासळलेले भराव दुरूस्त करताना  माती/मुरूम फक्त वरून ओतल्यामूळे कामे पक्की होत नाहीत.
) कालवा व वितरण व्यवस्थेत असलेल्या असंख्य दारांच्या देखभाल-दुरूस्तीकरिता स्वतंत्र/विशिष्ट यंत्रणा नसल्यामूळे हजारो दारे एकदा बिघडली की परत ती सहसा दुरूस्तच होत नाहीत. साधे तेलपाणी व वंगणसुद्धा दारांना दिले जात नाही. त्यामूळे दारे जाम होतात. गंजतात. त्यांना छिद्रे पडतात. ती वरखाली करणे अवघड होऊन बसते. दारे वापरात नसली की  त्यांची मोडतोड होते. भंगार म्हणून त्याची सरळ चोरी व विक्री होते. दारांच्या अभावी पाण्याचे नियंत्रण व नियमन अशक्य होते. मोजून मापून पाणी देतो म्हणण्याला काहीही अर्थ राहत नाही.
) कालवे व वितरण व्यवस्था अक्षरश: उघडयावर पडलेली असते. ऊन, वारा, पाऊस, कृमि, किटक, उंदिर, घुशी, खेकडे, विविध प्राणी, वनस्पती, इत्यादिंपासून कालव्यांचे संरक्षण करणे मूळातच अवघड काम आहे. लोक सहभागाचा अभाव आणि शासकीय यंत्रणेचे दूर्लक्ष यामूळे ते अजून अवघड होऊन जाते.
) पाणी चोरी करणे व आपसातील हेवेदावे याकरिता काही शेतकरी कालव्याची फार मोठी तोडफोड व नासधूस करतात. कालव्यांचा वापर कचराकुंडी वा ड्रेनेज सारखा करतात. कालव्यांवर अतिक्रमण करतात. कालव्यात अनधिकृत बांधकामे करतात. प्रवाहाला अडथळा निर्माण करतात.
) देखभाल-दुरूस्ती करिता जो निधी लागतो तो निश्चित करण्याचे मापदंड कालबाह्य, अशास्त्रीय व अव्यवहार्य असतात. महागाई/भाववाढ झाली तरी वर्षानुवर्षे त्या मापदंडात सुधारणा होत नाहीत. प्रदेश व प्रकल्पनिहाय स्थानिक परिस्थितीचा (पाऊस, हवामान, जमीन/मातीचे प्रकार, प्रकल्प जुना का नवीन, इत्यादी) विचार न करता सब घोडे बारा टक्के प्रकार बिनदिक्कत चाललेला असतो. निधी न मिळणे, अपुरा मिळणे, फार उशीरा मिळणे, निवडक प्रकल्पांना/अधिका-यांनाच फक्त मिळणे, इत्यादि प्रकार नित्यनेमाने चालतात. देखभाल-दुरूस्तीच्या प्रत्यक्ष गरजेप्रमाणे येणारी आवश्यक निधीची रक्कम, मापदंडाप्रमाणे येणारी निधीची रक्कम, अधिका-यांनी शासनाकडे मागितलेला निधी, शासनाने प्रत्यक्ष दिलेला निधी आणि प्रत्यक्ष कामावर झालेला खर्च यांचा कोणताही ताळमेळ कोठेही लागत नाही. तो ताळमेळ लागावा याकरिता यंत्रणा व पद्धतच नाही. किंबहुना, ताळमेळ लागू नये अशीच एकूण व्यवस्था जाणीवपूर्वक विकसित करण्यात आली आहे. देखभाल-दुरूस्तीवर जो काही प्रत्यक्ष खर्च झाला त्यातून खरेच कामे झाली का? कालव्यांची वहनक्षमता वाढली का? लॉसेस कमी झाले का? टेल पर्यंत पाणी जायला लागले का? सिंचन क्षेत्रात वाढ झाली का? पाणीपाळ्यांची संख्या वाढली का? पूर्वीपेक्षा जास्त शेतक-यांना पाणी मिळाले का? असे प्रश्न संबंधितांना आपणहून अर्थातच कधी पडत नाहीत. इतरे जनांना तपशील माहित नसतो. त्यांना व्यवस्थित गुंडाळले जाते. परतीचा पाऊस टाईप उत्तरे ही त्याकरिता पुरेशी असतात.
सिंचन प्रकल्पांच्या निर्मितीवर आजवर हजारो कोटी रूपये खर्च झाला. अजून हजारो कोटी होईल. पण त्या व्यतिरिक्त दरवर्षी देखभाल-दुरूस्तीवरही अमाप खर्च होतो आहे. तो तर अजून चर्चेतही नाही. कोण आहेत त्याचे लाभार्थी? विस्थापित व पर्यावरणाचा बळी देऊन अट्टाहासाने मोठे सिंचन प्रकल्प उभे करण्यात आले. मग आता त्यांच्या देखभाल-दुरूस्तीकडे अक्षम्य दूर्लक्ष का? काय आहे या वेडेपणा मागची पद्धत? मेथड बिहांईड मॅडनेस? या व अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता सिंचन प्रश्नाचा साकल्याने व समग्रतेने अभ्यास होणे ही काळाची गरज आहेश्वेत पत्रिके संदर्भातील मुख्यमंत्र्यांची विधाने त्या दृष्टीने आश्वासक आहेत. सिंचनाचा सर्वसमावेशक व प्रसंगी कठोर लेखाजोखा त्वरित घेतला गेला पाहिजे. पण हे खरेच होईल? का श्वेत पत्रिकेचीच भ्रूणहत्या केली जाईल? सिंचन क्षेत्रातील मा.रा.रा.सुदामरावांचा पत्ता फक्त मुक्काम पोष्ट परळी एवढाच नाही!
 {Published in Weekly "Aadhunik Kisan", Aurangabad (28June to 4July 2012)


Tuesday, June 19, 2012

सत्यमेव जयते


जल वास्तव -
सत्यमेव जयते
             मान्सून आला. थबकला. पुढे सरकला. केरळात धडकला. कोकणात बरसला. विदर्भात ढगाळ वातावरण. मराठवाडयात काही ठिकाणी पावसाची शक्यता. अशा ओल्या   बातम्यांनी वर्तमानपत्रे व टिव्ही भिजायचे हे दिवस. हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत कदाचित महाराष्ट्रात सर्वत्र सर्वदूर पाऊस सुरुही झाला असेल. आषाढस्य प्रथम दिवसे या टाईपचे लेख रविवारच्या पुरवण्यांमध्ये आले असतील. गरम भजी व वाफाळलेला चहा असा तद्दन मध्यमवर्गीय उपभोग घेताना अरेरे, काय हा पूर! म्हणून म्हणतो नद्या जोडा अशी उथळ व खळखळाटी चर्चा उच्चभ्रूंच्या दिवाणखान्यात सुरु झाली असेल. थोडक्यात, रिमझिमके तराने लेके आयी बरसात या माहोल मध्ये दुष्काळाची चर्चा अर्थातच वाहून जाईल. पण काही अरसिक, नतद्रष्ट, शुभ बोल की रे ना-या प्रवर्गातील मंडळी रंगाचा बेरंग करतील आणि आपल्याला नको त्या वेळी नको ती आठवण करून देतील. अहो, मागच्या वर्षी नेमके असेच घडले होते. आणि तरीही दुष्काळ पडला". दूर्दैवाने, तथाकथित अरसिक मंडळी कटू असले तरी सत्य सांगता आहेत. पाणी प्रश्नाची चर्चा फक्त उन्हाळ्यात आणि ती ही कोणी जाणत्या राजाने सुरु केली तर! हे काही योग्य नाही. आपल्याकडे पावसाळ्यातले काही दिवस-खरे तर काही तासच- पाऊस पडतो. आणि म्हणूनच पाण्याबद्दलची चर्चा व उपाय योजना आता बारमाही व्हायला पाहिजे. त्यात खंड पडून चालणार नाही. त्यातून सध्याचे दिवस सिंचनावरील श्वेत पत्रिकेचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी चांगले लावून धरले आहे. आपण त्यांना काही मुद्दे सूचवले तर? योगायोगाने "आधुनिक किसान"मध्ये आपण सध्या सिंचन क्षमतेबाबतच चर्चा करतो आहोत. तेव्हा या लेखात आपण असे काही मुद्दे मांडू की जे श्वेत पत्रिकेत पारदर्शक पद्धतीने आले तर सिंचनात सत्यमेव जयते होईल. (आमीर खान आगे बढो, हम तुम्हारे साथ है!)
      सिंचन प्रकल्पांवर खर्च किती झाला अथवा यापुढे किती होईल यावरच फक्त भर न देता लाभक्षेत्रे-कुरूक्षेत्रे या सदरात यापूर्वी मांडलेल्या मुद्यांसह श्वेत पत्रिकेत खालील मुद्यांवरही विशेष प्रकाश टाकण्यात यावा/माहिती द्यावी:
() पाणी उपलब्धता प्रमाणपत्रा आधारे प्रकल्पवार पाणी उपलब्धतेचा तपशील
() केवळ बांधकामे नव्हे तर म..व सिं.आयोगाच्या (चितळे आयोग) व्याख्येनुसार तांत्रिक-सामाजिक-आर्थिक-कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ख-या अर्थाने पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पांची यादी
(राज्यस्तरीय तसेच स्थानिक स्तरावरील बांधकामाधीन प्रकल्प पूर्ण झाल्यास त्यातून निर्माण होणारी वाढीव साठवण क्षमता
(गाळाचे उपयुक्त साठयावरील अतिक्रमण लक्षात घेता पूर्ण झालेल्या राज्यस्तरीय मोठया, मध्यम व लघू प्रकल्पांची तसेच स्थानिक स्तरावरील सर्व प्रकारच्या प्रकल्पांची एकूण शिल्लक संकल्पित साठवण क्षमता व गाळामूळे सिंचन क्षमतेत झालेली घट
() बिगर सिंचनाकरिताचे अधिकृत आरक्षण लक्षात घेता पूर्ण झालेल्या राज्यस्तरीय मोठया, मध्यम व लघू प्रकल्पांत तसेच स्थानिक स्तरावरील सर्व प्रकारच्या प्रकल्पांत सिंचनासाठीचे एकूण शिल्लक संकल्पित पाणी व बिगर सिंचनामूळे सिंचन क्षमतेत झालेली घट
() नदी, जलाशय व कालवा अशा विविध स्त्रोतातून शासनाने कायदेशीर परवानगी दिलेल्या शासकीय, सहकारी व खाजगी उपसा सिंचन योजनांचा तपशील (उदा. उपसा सिंचन योजनांचे अनुज्ञेय पाणी व क्षेत्र, अधिकृत/अनधिकृत उपसा योजनांचा प्रत्यक्ष पाणी वापर व सिंचित क्षेत्र, उपसा सिंचनातील वाढीमूळे प्रवाही सिंचनाचे घटलेले क्षेत्र, इत्यादि)
() महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम,१९७६ अन्वये रितसर अधिसूचित झालेल्या उपसा सिंचन योजनांची यादी
() प्रत्यक्ष सर्वेक्षणा आधारे तयार केलेल्या सुधारित नकाशांनुसार प्रकल्पवार प्रत्यक्ष लाभक्षेत्र (सी.सी..)
() ..व सिं.आयोगाचा (चितळे आयोग) अहवाल शासनाने अधिकृतरित्या स्वीकारला असल्यास त्यातील शिफारशींबाबत शासनाने आजवर काय कार्यवाही केली याचा शिफारस निहाय तपशील
(१०) खरीप व रब्बी अशी कमीत कमी दोन हंगामी पिके घेण्या इतपत सिंचन व्यवस्था केली तरच त्या क्षेत्रास सिंचन क्षेत्र म्हणावे अशी शिफारस (क्रमांक१७०) ..व सिं. आयोगाने (चितळे आयोग)केली आहे. त्या अर्थाने राज्यातील खोरे-उपखोरे निहाय सिंचन क्षेत्र
(११) आठमाही सिंचन प्रकल्प/आठमाही पिक रचना या संकल्पनेचा शासनास अभिप्रेत अर्थ व "आठमाही" म्हणून घोषित झालेल्या प्रकल्पांची यादी
(१२) सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात व राज्यात अन्यत्र आधुनिक सिंचन पद्धतीखाली आलेले क्षेत्र, त्यामूळे पाण्याची झालेली बचत व सिंचन क्षेत्रात झालेली वाढ
(१३) स्थानिक स्तरावरील सर्व प्रकल्पांचे प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र; त्या प्रकल्पांचे दैनंदिन व्यवस्थापन, देखभाल-दुरुस्ती, संनियंत्रण व नियतकालिक मूल्यमापन करणा-या यंत्रणेचा तपशील; आणि त्या प्रकल्पांच्या सिंचनाबाबत (कार्यक्षमता, समन्याय, उत्पादकता, वगैरे) संबंधित यंत्रणेचे/अन्य शासकीय अभ्यासाचे निष्कर्ष
(१४) जलसंधारणातून निर्माण झालेली सिंचन क्षमता; त्या क्षमतेचे दैनंदिन व्यवस्थापन, देखभाल-दुरुस्ती, संनियंत्रण व नियतकालिक मूल्यमापन करणा-या यंत्रणेचा तपशील;आणि जलसंधारणातून होणा-या सिंचनाबाबत (कार्यक्षमता, समन्याय, उत्पादकता, वगैरे) संबंधित यंत्रणेचे/अन्य शासकीय अभ्यासाचे निष्कर्ष

      वर नमूद केलेले मुद्दे शासन कदाचित विचारात घेणार नाही. काय सांगावे? श्वेत पत्रिकाही निघणार नाही! पण पाणीप्रश्नाबाबतचे आकलन व समज वाढायची असेल आणि त्या प्रश्नाला खरेच प्रामाणिकपणे भिडायचे असेल तर हे व तत्सम मुद्दे गांभीर्याने घ्यायला हवेत हे मात्र खरे. "सत्यमेव जयते" मूळे लगेच सर्वत्र सत्य प्रस्थापित होते असे नव्हे. पण निदान सत्य काय आहे ते तरी कळते! असो!!
 [Published in Weekly "Aadhunik Kisan", Aurangabad,21-27 June 2012]


प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र


जल वास्तव -:
प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र
पूर्ण व बांधकामाधीन सिंचन प्रकल्प, अंतिम सिंचन क्षमता व निर्मित सिंचन क्षमता असा तपशील आपण आत्तापर्यंत पाहिला. त्याच्या तुलनेत प्रत्यक्ष सिंचित क्षेत्राची वस्तुस्थिती आपण या लेखात समजाऊन घेऊ१९९७-९८ ते २०१०-११ या चौदा वर्षातील सिंचित क्षेत्राच्या आकडेवारी आधारे काढलेले दोन आलेख सोबत दिले आहेत. पहिल्या आलेखात उपयुक्त जलसाठा व विविध प्रकारे भिजलेले क्षेत्र दाखवले आहे. तर दुस-य़ा आलेखात सिंचित क्षेत्राची तुलना निर्मित सिंचन क्षमतेशी तसेच एकूण लागवडीलायक क्षेत्राशी केली आहे. उपयुक्त जलसाठयातील वार्षिक चढ उतार व सिंचित क्षेत्रातील बदल यांचा एकमेकांशी मेळ लागत नाही असे पहिल्या आलेखावरून दिसते. तर प्रत्यक्ष भिजलेले क्षेत्र हे अपेक्षेपेक्षा किती कमी आहे हे दुस-या आलेखात स्पष्ट होते. विस्तारभयास्तव मूळ तपशीलवार तक्ता येथे दिलेला नाही. गेल्या चौदा वर्षातील सिंचित क्षेत्राचे फक्त सरासरी चित्र तक्ता क्र.१ मध्ये मांडले आहे. ते स्वयंस्पष्ट व बोलके आहे.

    तक्ता क्र.: सिंचित क्षेत्राचे सरासरी चित्र (१९९७-९८ ते २०१०-११)
तपशील
सरासरी
निर्मित सिंचन क्षमता    (लक्ष हेक्टर)
३९.
उपयुक्त जलसाठयाची टक्केवारी
७४
सिंचित क्षेत्र (कालवा)    (लक्ष हेक्टर)
१४.८२
सिंचित क्षेत्र (विहिर)    (लक्ष हेक्टर)
.४८
एकूण सिंचित क्षेत्र (कालवा + विहिर)   (लक्ष हेक्टर)
२१.३०
एकूण सिंचित क्षेत्राची निर्मित सिंचन क्षमतेशी टक्केवारी
५३.
कालव्यावरील सिंचित क्षेत्राची निर्मित सिंचन क्षमतेशी टक्केवारी
३७.
एकूण सिंचित क्षेत्राची एकूण लागवडीलायक क्षेत्राशी (२२५.४८ लक्ष हेक्टर) टक्केवारी
.
कालव्यावरील सिंचित क्षेत्राची एकूण लागवडीलायक क्षेत्राशी (२२५.४८ लक्ष हेक्टर) टक्केवारी
.

 तक्ता क्र.१ वरून असे दिसते की, गेल्या चौदा वर्षात सरासरीने एकूण सिंचित क्षेत्र हे निर्मित सिंचन क्षमतेच्या ५३.७ टक्के आहे. निर्मित सिंचन क्षमतेत विहिरी वरील क्षेत्राचा विचार झालेला नाही. त्यामूळे प्रत्यक्ष सिंचित क्षेत्रातूनही विहिरी वरचे क्षेत्र वगळणे योग्य होईल. तसे केल्यास, कालव्यावरील सिंचित क्षेत्र हे निर्मित सिंचन क्षमतेच्या फक्त ३७.३ टक्के एवढेच भरते. याच तर्काने कालव्यावरील सिंचित क्षेत्राची राज्यातील एकूण लागवडी लायक क्षेत्राशी सरासरी टक्केवारी जेमतेम ६.६ टक्के येते. सिंचन प्रकल्पांची भलीमोठी संख्या आणि त्यावर झालेला हजारो कोटी रूपयांचा खर्च पाहता वरील चित्र अर्थातच धक्कादायक व निराशाजनक आहे. विस्थापितांचा व पर्यावरणाचा बळी देऊन शेवटी आपण साध्य तरी काय केले असा प्रश्न त्यातून साहजिकच निर्माण होतो. हे असे का झाले याची काही कारणे खाली दिली आहेत.
) सिंचन प्रकल्पातील पाणी फार मोठया प्रमाणावर उसाला दिले जाते हे सर्वांनाच माहित आहे. त्याचा अधिकृत पुरावा सिंचन स्थिती दर्शक अहवालात मिळतो. तक्ता क्र.२ मध्ये तपशील दिला आहे. "दुष्काळी वा-यावर डोलणारे सत्तेचे हिरवे सागर" त्यात अधिकृत व स्पष्ट दिसतात. राज्यातील उसाच्या एकूण क्षेत्रापैकी सरासरी ५४ टक्के क्षेत्र सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात आहे! उसासारखे बकासुरी पिक घेतले तर एकूण सिंचित क्षेत्र आक्रसणार यात नवल ते काय?
    
      तक्ता क्र.: राज्यातील उसाचे क्षेत्र (लक्ष हेक्टर)

वर्ष
राज्यातील उसाचे एकूण क्षेत्र
सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील उसाचे क्षेत्र
सिंचन प्रकल्पातील उसाच्या क्षेत्राची राज्यातील एकूण उसाच्या क्षेत्राशी टक्केवारी
२००५-०६
.०१
.०९
८१.
२००६-०७
.४९
.९४
५८.
२००७-०८
१०.८८
.०२
३७.
२००८-०९
.७०
.८३
५०.
२००९-१०
.३६
.९८
५४.
२०१०-११
.५६
.६८
६१.
सरासरी
.८३
.२६
५४.४१

)  "सिंचनासाठी वार्षिक पाणी पुरवठा ७६९२ घन मीटर प्रति हेक्टर" असा एक निकष बेंचमार्किंग करिता मोठया प्रकल्पांच्या संदर्भात राज्यपातळीवर स्वीकारण्यात आला आहेबेंच मार्किंगच्या सन २००९-१० च्या अहवालातील आकडेवारी पाहता आपल्या अनेक मोठया प्रकल्पात त्यापेक्षा किती तरी जास्त (दिड ते चार पट !) पाणी वापर होत आहे. जिज्ञासूनी उपरोक्त अहवालातील पृष्ठ क्र.२७ वरील तक्ता कृपया पहावा. दर हेक्टरी अति पाणी वापरामूळे एकूण सिंचित क्षेत्र कमी भरते.
) जलाशय, नदी व कालव्यावरून उपसा सिंचन फार मोठया प्रमाणावर होते. ते सगळेच हिशेबात येत नाही. उपसा सिंचनाला आज कोणताच कायदा ख-या अर्थाने लागू नाही. (जायकवाडी प्रकल्पात जलाशया वरील उपसा सिंचनाचे क्षेत्र कालव्यावरील सिंचित क्षेत्राच्या ४५% आहे. संदर्भ:२००९-१० सालचा बेंचमार्किंगचा अहवाल, पृष्ठ क्र.३४)
) पाणीपट्टी बुडवण्याकरिता मूळ कालव्यावरील क्षेत्र विहिरीवरील क्षेत्र म्हणून दाखवण्यात येते. कारण विहिरीवरील  पाणीपट्टी शासनाने माफ केली आहे. (जायकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील ६०% सिंचित क्षेत्र हे विहिरीवर आहे. त्यातील ५५% क्षेत्र बारमाही पिकाखाली आहे. संदर्भ:२००९-१० सालचा बेंचमार्किंगचा अहवाल, पृष्ठ क्र.४४)
) सिंचनाचे पाणी बिगर सिंचनाकडे वळवण्याचे अधिकृत / अनधिकृत प्रकार व प्रमाण वाढले आहे.
) पाणी व सिंचित क्षेत्र प्रत्यक्षात मोजले जात नाही. सिंचन कायद्याची अंमलबजावणी होत नाही. पाणी व भिजलेल्या क्षेत्राची चोरी भयावह आहे. ती हिशेबात येत नाही. जल संपदा विभागाची आकडेवारीच त्यामूळे सकृतदर्शनी विश्वासार्ह वाटत नाही.
सर्व प्रकारचा पाणी वापर आणि सर्व प्रकारे भिजलेले क्षेत्र याचा अभ्यास सी..जी. सारख्या एखाद्या यंत्रणेमार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञानाआधारे झाला आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता पारदर्शक पद्धतीने तो खरेच कधी मांडला गेला तर जलक्षेत्राचे फार वेगळे चित्र पुढे येईल.
 [Published in Weekly "Aadhunik Kisan", Aurangabad, 14-20 June 2012]
     
(Graphs could not be given due to technical reasons)
    




Thursday, June 7, 2012

निर्मित सिंचन क्षमता


जल वास्तव-

निर्मित सिंचन क्षमता
       एखाद्या  प्रकल्पात सिंचन क्षमता निर्माण करणे ही सहजसाध्य गोष्ट नव्हे. त्यासाठी मूळात प्रकल्प पूर्ण व्हायला हवा. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अपेक्षित सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पाडायला हव्यात. केवळ बांधकामे पूर्ण करणे पुरेसे नाही. प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे नक्की काय ते चौकट क्र.-१ मध्ये दिले आहे.
_____________________________________________________
चौकट -: केवळ बांधकामे नव्हे तर प्रकल्प पूर्ण करणे महत्वाचे
प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे:
) बांधकाम व्यवस्थेकडून परिचालन व्यवस्थेकडे हस्तांतरण काटेकोरपणे प्रत्यक्षात पूर्ण होणे
) कालव्याच्या संकल्पित वहनक्षमतेबाबत प्रत्यक्ष प्रयोगावर आधारित अधिकृत प्रमाणपत्र दिले जाणे
) प्रकल्पाचे परिचालन सूयोग्य पद्धतीने होण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक-सामाजिक-आर्थिक-कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे
) प्रकल्प पूर्णत्व अहवाल शासनस्तरावर अधिकृतरित्या स्वीकारला जाणे
) वरील प्रकारे प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल पाटबंधारे विभागाने रितसर अधिसूचना काढणे व प्रकल्प समारंभपूर्वक राज्याला अर्पण करणे
एखादा पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाला याचा व्यापक दृष्टिकोनातून अर्थ असा घ्यायचा की, त्या प्रकल्पाची जी संकल्पित उद्दिष्टे होती ती पूर्णांशाने साध्य झाली. प्रकल्प नियोजनाचे वेळी प्रकल्प अहवालामध्ये आर्थिक व्यवहार्यतेच्या पुष्टयर्थ जी गृहिते/भाकिते धरलेली/केलेली असतात त्यांची पूर्तता झाल्यानंतरच प्रकल्पाचे इप्सित साध्य झाले असे म्हणता येईल.
संदर्भ: ..व सिं.आयोगाचा अहवाल, जून १९९९, खंड-, परिच्छेद ५.अपूर्ण प्रकल्पांची पूर्तता
__________________________________________________________________

     वरील चौकटीतील अर्थाने आपले बहुसंख्य सिंचन प्रकल्प आज अपूर्ण आहेत हे दूर्दैवाने कटू सत्य आहे. राजकीय कारणास्तव चक्क अपूर्ण प्रकल्प पूर्ण झाला असे जाहीर केले जाते. आणि अशा पूर्ण प्रकल्पाची ख-या अर्थाने अस्तित्वात न आलेली सिंचन क्षमता बिनदिक्कतपणे निर्मित म्हणून घोषित केली जाते. वितरण व्यवस्थेची कामे अर्धवट असतात. शेतचा-या काढलेल्या नसतात. पाणी लाभक्षेत्रात सर्वत्र पोहोचलेले नसते. इतर प्रक्रियांच्या नावाने तर बोंबच असते. तरीही जे अस्तित्वात आलेच नाही ते आले असे रेटून सांगण्यात येते. निर्मित सिंचन क्षमतेच्या जादुई आकडेवारीची निर्मिती ही अशी होते! हे उघड  गुपित आहे. प्रकल्पिय (संकल्पित) पाणीसाठा व निर्मित सिंचन क्षमता यांची १९९७-९८ ते २०१०-११ या १४ वर्षातील शासकीय घोषित आकडेवारी तक्ता क्र. १ मध्ये दिली आहे.



तक्ता-: प्रकल्पिय (संकल्पित) पाणीसाठा व निर्मित सिंचन क्षमता
       (राज्यस्तरीय मोठे, मध्यम व लघु प्रकल्प)
                                      (पाणीसाठा: दलघमी, सिंचन क्षमता: लक्ष हेक्टर)
वर्ष
पाणीसाठा
मोठे व मध्यम
लघु
एकूण
१९९७-९८
२५५२८
२४.६६
.६२
३२.२८
१९९८-९९
२६७१२
२६.३२
.८४
३४.१६
१९९९-००
२६७१६
२६.६५
.३५
३५.००
२०००-०१
२६७४८
२८.१३
.९३
३७.०६
२००१-०२
२८०६२
२८.५६
.१३
३७.६९
२००२-०३
२८७१५
२८.८२
.३०
३८.१२
२००३-०४
२८८४०
२९.०७
.५६
३८.६३
२००४-०५
२८८८९
२९.५२
.६१
३९.१३
२००५-०६
२९११०
३०.१९
.८४
४०.०३
२००६-०७
२९५३१
३०.७२
१०.६०
४१.३२
२००७-०८
(२९११५)
३०१५३
३१.९६
११.३५
४३.३१
२००८-०९
३३०७१
३३.००
११.८६
४४.८६
२००९-१०
३३२११
३४.१७
१२.१७
४६.३४
२०१०-११
३३३८५
३४.७८
१२.५९
४७.३७

टीप:
) सप्टेंबर,२००७ ते सप्टेंबर,२०११ अशा ५ सिंचन स्थितीदर्शक अहवालातील माहिती संकलीत करून वरील तक्ता बनवला आहे.
) प्रकल्पिय (संकल्पित) पाणीसाठा हा एकूण का उपयुक्त हे संदर्भीय अहवालांत स्पष्ट नाही.
) सप्टेंबर,२००८ ते सप्टेंबर २०१० अशा तीन अहवालात २००७-२००८ सालचा पाणीसाठा २९११५ असा दाखवण्यात आला आहे. प्रकल्पीय (संकल्पित) पाणीसाठा असा मध्येच कमी होणे अपेक्षित नाही. सप्टेंबर,२०११ च्या अहवालात तो आकडा आता ३०१५३ असा दाखवण्यात आला आहे.
) प्रकल्पिय (संकल्पित) पाणीसाठा व निर्मित सिंचन क्षमता यात दरवर्षी किती वाढ झाली ते तक्ता-२ मध्ये दिले आहे.

परिस्थिती अजून सूस्पष्ट व्हावी म्हणून तक्ता क्र.२ मध्ये प्रकल्पिय (संकल्पित) पाणीसाठा व निर्मित सिंचन क्षमतेतील वार्षिक वाढ फक्त मुद्दाम दाखवली आहे. तक्त्याखालील टीपा स्वयंस्पष्ट आहेत. दोन आलेखातील -याखो-या सिंचन विकासातील "सातत्य व प्रगती"वर बोलके भाष्य करतात.


तक्ता-: प्रकल्पिय (संकल्पित) पाणीसाठा व निर्मित सिंचन क्षमतेतील वार्षिक वाढ
                                       (पाणीसाठा: दलघमी, सिंचन क्षमता: हेक्टर)
वर्ष
पाणीसाठा
मोठे व मध्यम
लघु
एकूण
१९९७-९८




१९९८-९९
११८४
,६६,०००
२२,०००
,८८,०००
१९९९-००
३३,०००
५१,०००
८४,०००
२०००-०१
३२
,४८,०००
५८,०००
,०६,०००
२००१-०२
१३१४
४३,०००
२०,०००
६३,०००
२००२-०३
६५३
२६,०००
१७,०००
४३,०००
२००३-०४
१२५
२५,०००
२६,०००
५१,०००
२००४-०५
४९
४५,०००
,०००
५०,०००
२००५-०६
२२१
६७,०००
२३,०००
९०,०००
२००६-०७
४२१
५३,०००
७६,०००
,२९,०००
२००७-०८
६३२
,२४,०००
७५,०००
,९९,०००
२००८-०९
२९१८
,०४,०००
५१,०००
,५५,०००
२००९-१०
१४०
,१७,०००
३१,०००
,४८,०००
२०१०-११
१७४
६१,०००
४२,०००
,०३,०००






टीप: ) उपलब्ध माहिती १९९७-९८ या वर्षापासून असल्यामूळे व या तक्त्यात फक्त वार्षिक वाढ घेतल्यामूळे १९९७-९८ या वर्षात आकडे दिसत नाहीत.
) प्रकल्पिय (संकल्पित) पाणीसाठयातील वाढ १९९९-००, २०००-०१, २००४-०५ या तीन वर्षात नगण्य; २००३-०४, २००५-०६, २००९-१०, २०१०-११ या चार वर्षात कमी; २००२-०३, २००६-०७, २००७-०८ या तीन वर्षात मध्यम; आणि १९९८-९९, २००१-०२, २००८-०९ या तीन वर्षात भरीव स्वरूपाची आहे.
) मोठया व मध्यम प्रकल्पांमूळे निर्मित सिंचन क्षमतेत झालेली वाढ १९९९-००, २००१-०२, २००२-०३, २००३-०४, २००४-०५ या पाच वर्षात २५ ते ५० हजार हेक्टर; २००५-०६, २००६-०७, २०१०-११ या तीन वर्षात ५० हजार ते १ लाख हेक्टर; आणि १९९८-९९, २०००-०१, २००७-०८ ते २००९-१० अशा पाच वर्षात १ लाख हेक्टर पेक्षा जास्त आहे.
) लघु प्रकल्पामूळे निर्मित सिंचन क्षमतेत झालेली वाढ २००४-०५ या वर्षात नगण्य; १९९८-९९, २००१-०२ ते २००५-०६, २०१०-११ या ७ वर्षात ५० हजार हेक्टर पेक्षा कमी तर उर्वरित ५ वर्षात ५० हजार हेक्टर पेक्षा जास्त आहे.
) १९९९-००, २००३-०४, २००६-०७ या तीन वर्षात लघु प्रकल्पामूळे निर्मित सिंचन क्षमतेत झालेली वाढ ही मोठया व मध्यम प्रकल्पांपेक्षाही जास्त आहे.
) पाणीसाठयातील वाढ आणि निर्मित सिंचन क्षमतेतील वाढ यांचा एकमेकांशी मेळ लागत नाही. आकडेवारी त्यामूळे सकृतदर्शनी सुसंगत वाटत नाही. विसंगतींबद्दल संदर्भीय अहवालात खुलासे नाहीत.

            अविश्वसनीयरित्या नगण्य अथवा अति वाढ आकडेवारी बद्दल संशय उत्पन्न करते. राज्यस्तरीय मोठया, मध्यम व लघु सिंचन प्रकल्पात १९९९-०० सालात पूर्ण राज्यात फकस्त ४ दलघमी (म्हणजे एखाद-दुसरा लघु तलाव!) एवढाच वाढीव पाणीसाठा निर्माण झाला? लघु प्रकल्पांमुळे निर्मित सिंचन क्षमतेत झालेली वाढ तीन वर्षे मोठया व मध्यम प्रकल्पांमूळे झालेल्या वाढी पेक्षाही जास्त आहे? पाणीसाठयातील वाढ व निर्मित सिंचन क्षमतेतील वाढ यांचा एकमेकांशी बहुतांशी वर्षात मेळ लागू नयेथिअरी व वास्तव यात फरक असतो हे मान्य! पण त्या फरकाबद्दल योग्य ते स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी कोणाची? घ्या आकडेवारी! या प्रकारास पारदर्शकता म्हणायचे काय?
       सिंचन क्षमता खरेच किती निर्माण झाली हे सांगणे जसे अवघड आहे तसेच जी काही सिंचन क्षमता निर्माण झाली ती कितपत टिकून आहे या प्रश्नाचे उत्तर तर त्याहून अवघड आहे. निर्मित सिंचन क्षमता हे काही त्रिकालाबाधित सत्य नव्हे! निर्माण झाल्यावर ती अनेक कारणांमूळे बदलू शकते. त्याचा तपशील चौकट क्र.-२ मध्ये दिला आहे.
_______________________________________________________
चौकट - : निर्मित सिंचन क्षमता हे त्रिकालाबाधित सत्य नव्हे!
प्रकल्प निहाय निर्मित सिंचन क्षमता खालील कारणांमूळे बदलते:
) प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात नवीन प्रकल्प झाल्यामूळे मूळ प्रकल्पातील येवा (यिल्ड) कमी होणे
) जलाशयातील मृत तसेच उपयुक्त साठयातही गाळाचे अतिक्रमण झाल्याने साठवण क्षमता कमी होणे
) मूळ सिंचनासाठी असलेले पाणी बिगर सिंचनाकरिता वळवणे/पळवणे
) जलाशय तसेच कालवा व वितरण व्यवस्थेतील व्यय (बाष्पीभवन, पाझर, झिरपा, गळती, वगैरे) प्रमाणाबाहेर वाढणे
) लाभक्षेत्रातील कृषि क्षेत्राचे अकृषिकरण (एन..) होणे
) लाभक्षेत्रातील  अधिकृत प्रवाही सिंचनाचे पाणी जलाशय, कालवे व नदीवरून मोठया प्रमाणात अधिकृत (पण वाढीव) / अनधिकृत उपसा सिंचनाला देणे
) पिक रचनेत बदल होऊन खरीप व रब्बी पिकांऎवजी उन्हाळी व बारमाही पिके घेतली जाणे
निर्मित सिंचन क्षमतेचे म्हणूनच नियतकालिक वास्तववादी पुनर्विलोकन व्हायला हवे!
_________________________________________________________________
       प्रकल्प ख-या अर्थाने पूर्ण होणे, निर्मित सिंचन क्षमतेबद्दल विश्वासार्ह दस्तावेज असणे आणि पूर्ण प्रकल्पांच्या सिंचन क्षमतेचे वास्तववादी पुनर्विलोकन होणे या  मुख्य अटी पूर्ण झाल्या तरच राज्यातील सिंचन विकासाबद्दल काही निश्चित निष्कर्ष काढता यॆतील. त्या अटी पूर्ण न करता बांधलेले अंदाज हे देशातील किती काळा पैसा स्विस बॅकेत आहे या बद्दलच्या अंदाजांसारखे काटेकोर असतील! अर्थात, स्विस बॅंकेतील काळ्या पैशाचा येथील उल्लेख हा अंदाजांच्या गुणवत्तेबाबत तुलना करण्यापुरता मर्यादित आहे हे मुद्दाम सांगण्याची गरज नसावी. पब्लिक है; सब जानती है!
[Article published in Weekly "Aadhunik Kisan", Aurangabad (7-13June 2012)]
Note:Graphs could not be posted due to technical difficulty.