Thursday, March 28, 2013

"सिंचन सहयोग" या चितळेंशी संबंधित संस्थेस फार मोठा राजाश्रय


औरंगाबाद
दि.२६.३.२०१३
प्रति,
मा. संपादक,
दै.लोकसत्ता,
मुंबई,

महोदय,

"माधव चितळे यांची भूमिका पलायनवादी" (दै.लोकसत्ता, २६.३. २०१३) या श्री. विजय पांढरे यांच्या आरोपानिमित्ताने काही अन्य मुद्देही विचारात घेणे उचित होईल. "सिंचन सहयोग" या चितळेंशी संबंधित संस्थेस फार मोठा राजाश्रय प्रथमपासून लाभला आहे. शासकीय अधिका-यांना सिंचन सहयोगच्या कार्यक्रमात सहभागी होता यावे म्हणून विशेष शासन निर्णय काढण्यात आला आहे. संस्थेचे कार्यालय औरंगाबाद येथे शासकीय जागेत आहे. संस्थेचा पत्र व्यवहार गोदावरी खोरेच्या ई-मेल खात्याद्वारे होतो. अनेक शासकीय अधिकारी संस्थेचे पदाधिकारी व क्रियाशील सदस्य आहेत. सिंचन सहयोगच्या कार्यक्रमात त्यांच्या कार्यालयीन सुविधा व वाहने वापरली जातात का? विविध सिंचन घोटाळ्यातील अधिकारी सिंचन सहयोगचे सदस्य व पदाधिकारी आहेत / होते का? तसेच सिंचन सहयोग संस्थेस शासकीय अनुदान मिळते का? हे सर्व तपासले जाणे आवश्यक आहे असे वाटते.


-प्रदीप पुरंदरे
सेवानिवृत्त प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद
९८२२५६५२३२

Letter published in Loksatta, Mumbai on 28 Mar 2013

Monday, March 25, 2013

जलक्षेत्रात पुनर्विचार व पुनर्रचना अत्यावश्यक


जलक्षेत्रात पुनर्विचार व पुनर्रचना अत्यावश्यक

 दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर जलक्षेत्रात पुनर्विचार व पुनर्रचना होणे अत्यावश्यक आहे. नव्हे, त्यांस उशीरच झाला आहे. लक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टि.एम.सी. पाणी आणि कोट्यावधी शहरी व ग्रामीण लाभधारक या भल्या मोठ्या एकत्र कुटुंबाचा प्रपंच नेटका करण्यासाठी घरातील नवीन पिढीने आता सूत्रे हातात घेतली पाहिजेत. कुटुंबातील सर्व सदस्यांना सन्मानाने वागवले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित व्यवस्थापन, लोकाभिमुख जलनीती आणि समन्यायाचा आग्रह धरणारे काल-सुसंगत कायदे या आधारे बदल होऊ शकतात.

पेयजल, सिंचन व औद्योगिक पाणी वापर हे जलक्षेत्रातील एकत्र कुटुंबाचे सदस्य आहेत. जलक्षेत्रात निसर्गत:च एकत्र कुटुंब पद्धतीला पर्याय नाही. प्रत्येकाने स्वतंत्र राहतो म्हटले तर ते शक्य नाही. पण आजवर या कुटुंबात सिंचन दादाच्या मर्जीनुसार निर्णय झाले. पेयजल, भूगर्भातील पाणी, मृद व जलसंधारण आणि लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) ही मंडळी ‘गावाकडची अडाणी भावंडं’ ठरली. त्यांना दुय्यम वागणूक मिळाली. तर औद्योगिक पाणी वापर हा शहरात वा परदेशात स्थायिक झालेला पण शेतीच्या उत्पनाची आशा असणारा आणि म्हणून सिंचनदादाच्या कलाने घेणारा ‘हुशार भाऊ’ निघाला. सिंचनदादा मात्र तमाशाप्रधान मराठी सिनेमातल्या पाटलासारखा आपल्याच गुर्मीत वागत राहिला. कौटुंबिक जबाबदारीकडे पूर्ण दुर्लक्ष करुन उसावर दौलतजादा करण्यात त्याला नेहेमीच पुरूषार्थ वाटला. हा कौटुंबिक विसंवाद टाळून प्रगती करण्यासाठी एक कार्यक्रम-पत्रिका विचारार्थ मांडण्याचा एक प्रयत्न या टिपणात केला आहे.

१) राज्य जल परिषद व राज्य जल मंडळ त्वरित कार्यरत करावे. (या दुष्काळात त्यांच्या किमान एक एक तरी बैठका व्हाव्यात.)
२) म.ज.नि.प्रा. कायद्यानुसार अभिप्रेत एकात्मिक राज्य जल आराखडा विशिष्ट मुदतीत पारदर्शक व सहभागात्मक पद्धतीने तयार व्हावा.
३) म.ज.नि.प्राधिकरणाची पुनर्रचना करावी. निवृत्त न्यायाधीश त्याचे अध्यक्ष असावेत.
४) नदीखोरे अभिकरणे प्रत्यक्षात कार्यरत व्हावीत. सर्व पाणी वापरकर्त्यांचे  प्रतिनिधी प्राधिकरणावर  असावेत. अध्यक्षपदासाठी रोटेशन असावे.
५) वीज मंडळाच्या धर्तीवर जल संपदा विभागाचे विभाजन करावे. अन्वेषण, बांधकाम, प्रचालन, देखभाल-दुरूस्ती व पाणीपट्टी आकारणी / वसुली या करिता स्वतंत्र कायम स्वरूपी आस्थापना असाव्यात. अन्वेषण व प्रचलनात आंतरशाखीय तज्ञ असावेत. पाणीपट्टी आकारणी व वसुलीचे काम अभियंत्यांना देऊ नये. त्या त्या विभागात पदोन्नतीसाठी संबंधित विद्याशाखेचे किमान पदव्युत्तर शिक्षण बंधनकारक असावे.
६) विशिष्ट मुदतीत जल व सिंचन कायदेविषयक सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात. कायद्यांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी.
७) एन आय एच आणि आय आय टी सारख्या संस्थांच्या नेतृत्वाखाली पाण्याच्या उपलब्धतेचा खोरेनिहाय व प्रकल्पनिहाय काटेकोर आढावा घ्यावा. त्यानुसार जल नियोजनात बदल करावेत.
८) गोखले अर्थशास्त्र संस्था  आणि टि.आय.एस.एस. सारख्या संस्थांकडून सिंचन प्रकल्पांचे नियतकालिक मूल्यमापन करावे. त्यावर विधान मंडळात चर्चा व्हावी.
९) नवीन प्रकल्पांची आखणी करताना तसेच जुन्या प्रकल्पांची पुनर्स्थापना करताना आता आधुनिक तंत्रज्ञान बंधनकारक असावे.
१०) जल व सिंचन विषयक सर्व विभागांचे संगणीकरण व्हावे. पाणी व भिजलेले क्षेत्र याची मोजणी कायद्याने बंधनकारक व्हावी.
११) ठिबक सिंचन स्वस्त व्हावे आणि त्याची आखणी, संकल्पन, जोडणी व देखभाल-दुरूस्ती सुलभ व सुव्यवस्थित होण्याकरिता शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावेत. ठिबकचे उत्पादन व त्यासंबंधी सर्व सेवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी मार्फतही उपलब्ध करून द्याव्यात.
१२) ठिबक प्रमाणेच बंद नलिकेतून (उघड्या कालव्याऎवजी) पाणी देण्यास प्रोत्साहन द्यावे

 [ Published in Weekly "Aadhunik Kisan", Aurangabad on 21.3.2013]

Jayakwadi-facts & figures speak volumes or confuse?


औरंगाबाद
दि. १० मार्च २०१३
प्रिय संपादक,
दै.सकाळ,
औरंगाबाद
     डी.एम.आय.सी. करिता पाण्याची उपलब्धता या विषयावर दै.सकाळने (१०.३.२०१३)जाहीर चर्चा सुरु केली हे चांगले झाले. विविध उपलब्ध शासकीय अहवालातून जायकवाडीबाबत पुढे येणारी माहिती गंभीर व प्रसंगी संभ्रम निर्माण करणारी आहे हे सोबतच्या तक्त्यावरून दिसते. त्याबाबत अधिकृत खुलासा होणे आवश्यक आहे.
अनु.
तपशील
मूळ नियोजन
(टिएमसी)
सद्य:स्थिती
(टिएमसी)
गोदावरी खो-यात जायकवाडी पर्यंत उपलब्ध पाणी
१९६
१५६
जायकवाडी प्रकल्पाच्यावरील प्रकल्पांकरिता पाणी
११५
१५०
जायकवाडी करिता ७५% विश्वासार्हतेचा येवा
९४
२८
जलाशयातील एकूण साठा
१०३
८९
गाळाचे अतिक्रमण
                                             मृत साठा
                                             उपयुक्त साठा

२६
निरंक

मृत साठा
२६
२०
उपयुक्त साठा
७७
६९
निभावणीचा साठा
३८२
निरंक
बाष्पीभवन
२३
?
१०
बिगर सिंचन
                  पिण्याचे पाणी व घरगुती वापर
                  औद्योगिक
                  परळी वीज केंद्र
                  एकूण

निरंक
निरंक
निरंक
निरंक

३.७
१.२
६.६
११.५
११
उपसा सिंचन
निरंक
८.२३
१२
माजलगाव प्रकल्पाकरिता
१२.४
निरंक
१३
५०टक्के वर्षात न वापरता शिल्लक राहिलेले पाणी
निरंक
०.४५ ते २९
१४
एकूण प्रकल्पीय क्षमता (टक्के)
४९
२० - २५

निभावणीचा साठा (कॅरी ओव्हर) न ठेवणे आणि माजलगाव प्रकल्पाची गरज भागवता न येणे (ही चर्चेत नसलेली) लक्षणे चांगली नाहीत. वरच्या धरणांतून सोडलेल्या पाण्यावर अवलंबून असताना जायकवाडीने आपल्या गरजा अजून वाढवायच्या का? शहरी मध्यमवर्ग व उद्योजकांना जायकवाडी प्रकल्पातील शेतक-यांचा विसर तर पडला नाही ना?

इमारतींच्या छतावरील पाणी साठवणे, पाण्याचा पुनर्वापर करणे व पाणी वापराची कार्यक्षमता वाढवणे हे उपाय स्तुत्य असले तरी आपली एकूण "तयारी" पाहता ते प्रत्यक्षात येतील व टिकून राहतील असे मानणे धाडसाचेच होईल.

आपल्या परिस्थितीबाबत व विशेषत: विजेच्या उपलब्धतेबाबत वेळीच स्पष्ट न बोलल्यामूळे माजलगाव प्रकल्पातील कालवा स्वयंचलितीकरणाचा एक चांगला आंतरराष्ट्रीय प्रयोग फसला हे उदाहरण कसे विसरता येईल?

- प्रदीप पुरंदरे
निवृत्त प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद
९८२२५६५२३२

 [Published as news item in Daily Sakal, Aurangabad on 11.3.2013]

आता गरज आहे मराठवाडा विकास आंदोलनाची व नव्या सामुदायिक नेतृत्वाची


आता गरज आहे मराठवाडा विकास आंदोलनाची व नव्या सामुदायिक नेतृत्वाची

राज्यात गंभीर दुष्काळ असतानाही राज्याच्या अर्थसंकल्पात दुष्काळ निर्मूलनासाठी काहीही नावीन्यपूर्ण व दूरगामी स्वरूपाच्या तरतुदी नाहीत. मराठवाड्यावर नेहेमीप्रमाणे परत एकदा अन्याय झाला आहे. यात खरेतर धक्कादायक किंवा अनपेक्षित असे काहीही नाही. "दुष्काळ आवडे सर्वांना" हे सत्ताधा-यांचे अघोषित धोरण आहे. त्यामूळे दुष्काळ निवारणावर थातुरमातुर उपाययोजना आणि दुष्काळ निर्मूलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हे कटू असले तरी आजचे वास्तव आहे. मराठवाड्यावर अन्याय होण्यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे मराठवाडा पाण्याच्या राजकारणात आता मागे पडला हे आहे.(तपशीलासाठी कृ. चौकट पहावी) 

पाण्याचे राजकारण: मराठवाडा खालीलबाबतीत कमी पडला
·        चितळे आयोगाने मराठवाड्याबद्दल केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी
·        प्रादेशिक अनुशेषाबाबत राज्यपालांनी दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करण्याबाबत आग्रह
·        पुरेसा विकास-निधी वेळेवर मिळवणे, तो अन्यत्र पळवु न देणे आणि पूर्णरित्या वापरणे
·        वैधानिक विकास मंडळातून "वैधानिक" तत्व गायब होणे
·        विधान मंडळात मराठवाड्याची भूमिका निकराने लावून धरणे
·        महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियमातील प्रादेशिक अनुशेष व पाणी वाटपाबाबतच्या तरतुदींची अंमलबजावणी
·        एकात्मिक राज्य जलसंपत्ती आराखडा
·        गोदावरी मराठवाडा नव्हे "मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ" मिळवणे
·        नाशिक व नगर जिल्ह्यातील पुढारी व अधिकारी यांच्या प्रभावाखालून मुक्तता
·        जायकवाडीच्या वर प्रमाणाबाहेर पाणी अडवले जाणे
·        माजलगाव प्रकल्पाकरिता कबूल केलेल्या पाण्यासकट जायकवाडी करिता वरून पाणी मागणे
·        जलनीतीनुसार खोरेनिहाय पाणीवाटप व अग्रक्रमांची अंमलबजावणी
·        प्रदेशांतर्गत पाण्याचे समन्यायी वाटप व कार्यक्षम वापर
·        कालवा सल्लागार समित्या आणि पाणी वापर संस्था या व्यासपीठांचा दबावगट म्हणून वापर
·        सर्व प्रकारच्या पाणी योजना वेळेत पु-या करणे आणि त्यांची देखभाल-दुरूस्ती
·        परळीचे औष्णिक वीज केंद्र कार्यरत ठेवणे
·        मराठवाड्याच्या हक्काचे २५ टिएमसी पाणी कृष्णा खो-यातून मिळविण्यासाठी व्यवहार्य योजना आखणे

पाण्याच्या सक्षम राजकारणाबाबत खरेतर मराठवाडा राज्यात एकेकाळी अग्रेसर होता. मा.शंकरराव चव्हाणांनी त्याबाबत मराठवाड्याला कुशल व खंबीर नेतृत्व दिले. राजकीय इच्छाशक्ती म्हणजे काय चीज असते हे त्यांनी उदाहरणासह दाखवून दिले. मराठवाड्याचा जल विकास शंकररावांनी घडवून आणला. त्यासाठी त्यांनी टगेगिरी केली नाही, अभ्यास केला. पाटबंधारे खात्यातील विविध प्रक्रिया नीट समजावून घेतल्या. प्रशासनाबाबत ते हेडमास्तर तर होतेच, पण त्यांनी पाटबंधारे प्रकल्पांचा अभियांत्रिकी तपशीलही आत्मसात केला. त्यासाठी अधिका-यांना विश्वासात घेतले. त्यांना बळ दिले. लढ म्हटले. संरक्षण दिले. निधी कमी पडू दिला नाही. समाजातील इतर घटकांनाही बरोबर घेतले. विभागासाठी नक्की काय करायचे आहे हे त्यांना स्वत:ला स्पष्ट होते. गोष्टी घडवून आणण्यासाठी जी योजकता लागते ती त्यांच्याक्डे पुरेपुर होती. प्रसंगी विरोध पत्करून त्यांनी पाण्याचे राजकारण यशस्वी केले. आठमाही सिंचनाची संकल्पना मांडून त्यांनी सिंचन क्षेत्रात स्वत:ची कार्यक्रम पत्रिका राबवली. पुढाकार घेतला. हा इतिहास सांगायचे कारण असे की मराठवाड्यातील आजची राजकीय मंडळी (सन्माननीय अपवाद वगळता) शंकररावांचा वारसा विसरली आहेत. तत्व, अभ्यास, परिश्रम आणि विभागाबाबतची आस्था याऎवजी प. महाराष्ट्रातील नेते मंडळींचे भ्रष्ट अनुकरण ते करता आहेत. त्यांच्या दहशतीखाली वावरता आहेत. साहजिकच आश्रितांना जी वागणूक मिळते ती त्यांना आज मिळते आहे. त्याचा वाईट परिणाम मात्र मराठवाडयातील सर्व सामान्य नागरिकांवर होतो आहे. उदाहरणार्थ, जायकवाडीसाठी वरच्या धरणातून पाणी हक्क म्हणून नव्हे दयेपोटी सोडले गेले. गंगापूर व वैजापुर येथील लाभधारक शेतक-यांना पाण्यासाठी तंगवत ठेवले गेले. ज्यांच्यासाठी मूळ धरण बांधले ते शेतकरीच चोर ठरले. ही खेदजनक परिस्थिती बदलायची असेल तर आज दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा मराठवाडा विकास आंदोलन केले पाहिजे. त्याला व्यवस्थापन विषयक मुद्यांची जोड दिली पाहिजे. त्यासाठी अर्थातच नव्या व सामुदायिक नेतृत्वाची गरज आहे. पण तेवढे पुरेसे नाही. विचारामागे शक्ती उभी करण्यासाठी सर्वसामान्यांचे प्रश्नही खरेच हाती घ्यावे लागतील. विभागस्तरावर समन्याय हवा असेल तर विभागांतर्गतही तो द्यावा लागेल. मराठवाड्यातील नवीन पिढी हे आव्हान स्वीकारेल का? मला  वाटते स्वीकारेल. कारण परिस्थिती नवीन मानसिकता घडवते व नवीन नेतृत्वाला जन्म देते!
- प्रदीप पुरंदरे
सेवानिवृत्त प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद
९८२२५६५२३२
 [Edited version published on front page in Divya Marathi, Aurangabad on 24.3.2013 ]