Monday, March 28, 2016

नदी माहेराला जाते, म्हणून हे जग चाले



    अभियंता श्री. अरुण घाटे वैतरणेच्या पाण्याबद्दल सदहेतूने सतत प्रबोधन व प्रामाणिक प्रयत्न करत असतात. त्यांच्या ब्लॉगवर तपशील उपलब्ध आहे. या व एकूणच आंतरखोरे पाणी स्थलांतराबाबत खालील काही मुद्दे ही विचारात घेतले जाणे आवश्यक आहे.

१) वैतरणेचे पाणी मराठवाड्यालाच मिळावे या करिता एकात्मिक राज्य जल आराखड्यात सूस्पष्ट तरतुद केली जाईल का?

२) गोदावरी खो-यात आज उपलब्ध असलेल्या पाण्याचे समन्यायी वाटप हे झालेच पाहिजे. त्याला बगल देण्यासाठी  "वैतरणेचे पाणी आले तर ते मराठवाड्याला" हा कात्रजचा घाट असू शकतो. "असलेले" पाणी नाशिक-नगरला आणि (आजतरी गोदावरी खो-यात)  "नसलेले" पाणी मराठवाड्याला ही खेळी तर नाही?

३)  वैतरणेचे पाणी आज मुंबईला जाते. ते पाणी मराठवाड्यातील "मराठी माणसाला" देण्यासाठी मुंबईकर "मराठी माणूस" तयार होईल?

 ४) समुद्राला वाहून जाणारे पाणी ‘वाया जाते’ असे म्हणणे योग्य नाही. जलचक्राचा तो एक आवश्यक भाग आहे. पाणी अडविण्यात /वळविण्यात अतिरेक झाला तर काय होते ते रशियातील अरल समुद्र अटून उदभवलेल्या पर्यावरणीय संकटावरून  लक्षात येते.

५) आपल्या बहूसंख्य स्थापत्य अभियंत्यांनी पाण्याच्या पर्यावरणीय पैलूंशी विनाकारण शत्रूत्व पत्करले आहे. ते ही अभ्यास न करता! आजही ते "अंकगणिती जलविज्ञान" (Arithmetical hydrology ) मानतात. म्हणजे अमूक खो-यात इतके जास्त पाणी उपलब्ध आहे. ते तमूक तुटीच्या खो-यात नेता येते. ही बघा लेव्हल. एवढेच ते म्हणतात. जमाना आता बदलला आहे. दिवस आता पर्यावरण-स्नेही जलविज्ञानाचे ( Eco - hydrology) आहेत. या नव्या संकल्पने प्रमाणे तूटीची वा विपुलतेची खोरी असा काही प्रकार नसतो. जे काही पाणी   नदीखो-यात उपलब्ध आहे तीच त्या खो-याची नैसर्गिक रचना आहे. त्यात फार मोठे कृत्रिम बदल करणे हे अंतिमत: घातक ठरते. जे आहे त्यातच भागवायला शिकले पाहिजे. मागणी-व्यवस्थापन (Demand side management) व अनुरूप हरित तंत्रज्ञानाआधारे(Green Technology) प्रश्न सुटू शकतात.

६) पुरेसे पाणी नसताना किंवा वट्टात पाणीच नसताना केवळ ठेकेदारांकरिता  अधिकाधिक धरणे बांधता यावीत म्हणून शासकीय जलविज्ञानात अलिकडे फार मोठा खोटेपणा होतो आहे. अनेक पाणी उपलब्धता प्रमाणपत्रांची विश्वासार्हता  संशयास्पद आहे.याची काही उदाहरणे सिंचन घोटाळा विषयक चौकशी (चितळे) समितीच्या अहवालात मौजुद आहेत.

 शेवटी, या संदर्भात (सुदैवाने) जल-तज्ञ नसलेल्या गदिमांची खालील कविता सर्वानी आवर्जून वाचावी

नदी सागरा मिळता, पुन्हा येईना बाहेर
अशी शहाण्याची म्हण, नदीला नाही माहेर
काय सांगू रे बाप्पांनो, तुम्ही अंधाराचे चेले
नदी माहेराला जाते, म्हणून हे जग चाले

डोंगराच्या मायेसाठी, रूप वाफेचे घेऊन
नदी तरंगत जाते, पंख वा-याचे लावून
पुन्हा होऊन लेकरू, नदी वाजवते वाळा
पान्हा फुटतो डोंगरा, आणि मग येतो पावसाळा