Monday, June 27, 2016

पाणी वाटपाचे नियोजन - प्रदीप पुरंदरे


 पाणी वाटपाचे नियोजन म्हणजे खरे तर पाण्याचे अंदाजपत्रक तयार करणे! सिंचन प्रकल्पातील पाण्याचा वापर दर हंगामात कसा करायचा याचे नियोजन त्यात केले जाते. जलाशयात प्रत्यक्ष पाणीसाठा किती आहे, त्यापैकी घरगुती व औद्योगिक वापरासाठी तसेच सिंचनाकरिता नक्की किती पाणी उपलब्ध होईल, इत्यादी माहिती त्यामूळे मिळते. सर्व पाणीवापरकर्त्यांसाठी ती अतिशय महत्वाची आहे. उपयुक्त आहे. म्हणून तर पाण्याच्या अंदाजपत्रकाला पाणी वापरकर्त्यांचा मित्र म्हणायचे! शेतक-यांना त्यामूळे प्रत्येक हंगामात पिकांचे नियोजन करता येते. हंगामात कोणती पिके घेता येतील, किती पाणी-पाळ्या मिळतील, दोन पाणी-पाळ्यातील अंतर किती दिवसांचे असेल हे अधिकृतरित्या कळते. जाहीर केल्याप्रमाणे सगळा पाणी वाटप कार्यक्रम प्रत्यक्षात खरेच होतो आहे ना यावर लक्ष ठेवता येते. त्यासाठी आग्रह धरता येतो. पाठपुरावा करता येतो. पाणी वाटप सुरळित पार पडणे आणि  पाणी वेळेवर व पुरेसे मिळणे याला  किती महत्व आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही.

पाणी वाटपाचे नियोजन हा प्रकार गतिशील (डायनामिक) आहे. एकदा केला आणि संपला असे त्यात नसते. प्रत्यक्ष परिस्थितीनुसार वेळोवेळी त्यात सुधारणा करणे अपेक्षित आहे. विज्ञान व व्यवस्थापन यांचा संगम त्यात आहे. व्यवस्थापनाची ती एक कला आहे. प्रयत्नाने ती जमली तर सगळे सुरळित पार पडते. व्यवस्थापनाची घडी बसते. अधिकारी व पाणीवापरकर्ते या दोघांनाही शिस्त लागते.

 पाणी वाटपाचे अग्रक्रम बघितले तर पहिला अग्रक्रम पिण्याच्या पाण्याला(घरगुती पाणी वापरासह) पहिला प्राधान्यक्रम मिळणे स्वाभाविक आहे. त्याबद्दल दूमत अथवा वाद नाही. दूस-या क्रमावर उद्योग असावेत का शेती याबद्दल मात्र वाद आहे. सध्या क्रमवार अग्रक्रम ही संकल्पना अंमलात आहे. म्हणजे क्रमाने एक एक अग्रक्रम पूर्णपणे मार्गी लागल्यावर मगच पुढचा अग्रक्रम हाती घेणे. व्यवहारात असे होत नाही. उपलब्ध पाणी सर्व वापरांकरिता  प्रमाणशीर पद्धतीने द्यावे लागते. आणि तेच योग्य आहे. तीव्र पाणी टंचाईचा अपवाद वगळता सर्व पाणी वापरकर्त्यांना त्यांच्या किमान गरजांसाठी पाणी मिळालेच पाहिजे. समाजाला पेयजलाबरोबर शेती व उद्योगही आवश्यक आहेत

पाण्याचे अंदाजपत्रक करताना विविध  पाणी वापरकर्त्या संस्थांवर काही अंशी निर्बंध आणणे व त्यांस शिस्त लावणे शक्य आहे.  पाणी मागणी करणा-या प्रत्येक कारखान्याची/एजन्सीची  पुढील  माहिती संकलित करून पाणी कपातीबाबत  निर्णय घेता येतात. १) करारनामा केला आहे का? नुतनीकरण केले आहे का? २) पाणीपट्टीची थकबाकी आहे का? ३) प्रवाहमापक वॉटर मीटर आहे का? ४) शासनमान्य आरक्षण किती आहे? ५) गेल्या पाच वर्षातील सरासरी पाणी मागणी व प्रत्यक्ष पाणी वापर किती आहे? करारनामा न करणे / त्याचे नुतनीकरण न करणे वा थकबाकीदार असणे ही कारणे पाणी पुरवठा बंद करण्यासाठी पुरेशी आहेत. सामान्य शेतक-याला जो नियम लावला जातो तो उद्योजकांनाही लावला गेला पाहिजे. कायद्यापुढे सर्व समान असतात! पाणी टंचाई असेल तर कायदेकानू न पाळणा-यांना पाणी नाकारणे वैध ठरू शकते. नव्हे ते केलेच पाहिजे. अन्यथा, नियम पाळणा-यांवर अन्याय होईल. वरील प्रमाणे संकलित केलेली माहिती दर वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध झाल्यास आवश्यक तो सामाजिक दबाव निर्माण होईल.

सर्वसामान्य पर्जन्यमानाच्या वर्षात १५ ऑक्टोबर रोजी जलाशय पूर्ण भरला असेल असे गृहित धरले जाते. जलाशयातील एकूण पाण्यातून (ग्रॉस स्टोरेज) प्रथम मृत-साठा (डेड स्टोरेज) वजा केला जातो. राहिलेल्या जलसाठयास उपयुक्त जलसाठा (लाईव्ह स्टोरेज) असे म्हणतात. १५ ऑक्टोबर नंतर येणारा मान्सूनोत्तर येवा (पोस्ट-मान्सून फ्लो); गाळाचे अतिक्रमण; जलाशयातून होणारे बाष्पीभवन व धरणातून होणारी गळती हा पाण्याचा व्यय (लॉसेस); निभावणीचा साठा (कॅरी ओव्हर), घरगुती व औद्योगिक वापराचे आणि उपसा सिंचनाचे पाणी या व तत्सम बाबींचा विचार करून शेवटी प्रवाही सिंचना करिता किती पाणी उपलब्ध होईल याचा अंदाज बांधला जातो. त्या मर्यादेत मग हंगामातील पिकांचे नियोजन (विविध पिके, पिकांखालचे क्षेत्र, एकूण पाणी-पाळ्या, दोन पाणी-पाळ्यातील अंतर, वगैरे) केले जाते. पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी व कालवा सल्लागार समितीचे सदस्य यांनी हा तपशील समजावून घेतला आणि बैठकांतून का?, किती?, कशासाठी?, कोणासाठी?, केव्हा? असे प्रश्न विचारायला सुरूवात केली तर त्या जागृत लोकसहभागामूळे जल व्यवस्थापन जास्त चांगले होऊ शकते. अधिका-यांनीही पारदर्शकतेचे धोरण स्वीकारून सर्व प्रश्नांना व्यवस्थित उतरे दिली तर विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. त्यांच्या व्यावहारिक अडचणी व तांत्रिक मर्यादा पाणीवापरकर्त्यांनाही कळतील. गैरसमज दूर होऊन पाणी वाटपाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडायला मदत होईल.

पाण्याची गरज व मागणी या दोन भिन्न बाबी आहेत. पाणी वापरकर्त्यांनी त्यांच्या पाण्याच्या गरजेचे रूपांतर जाणीवपूर्वक पाणी मागणीत करावे लागते. ही गोष्ट म्हटली तर सोपी आणि म्हटली तर तितकीच अवघड आहे. पाणी - अर्ज करणे, मागील थकबाकी भरणे, चालू  हंगामाची अग्रिम पाणीपट्टी देणे वगैरे बाबी वेळीच केल्या  तर गरजेचे रूपांतर पाणी मागणीत होऊ शकते. समन्यायी पाणी वाटपाचा आग्रह धरणा-यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत.

पाणी वाटपाचे नियोजन केवळ प्रकल्पवारच नव्हे तर नदीखोरेनिहाय करणे हा जलव्यवस्थापनाचा (Water Management) भाग आहे. तो व्यवस्थित अंमलात आणण्यासाठी जलविषयक कायदे, नियम, करारनामे आणि विहित कार्यपद्धती (Standard Operating Procedures) म्हणजे  जल-सुशासनाची (Water Governance) गरज असते. एवढेच नव्हे तर, विविध पाणीवापरकर्त्यांत,  प्रकल्पात, नदीखॊ-यात  आणि प्रदेशात पाणी वाटप सुरळित होण्यासाठी जल-नियमन ( Water Regulation) आवश्यक असते. जल व्यवस्थापन, सुशासन आणि नियमन या बाबी सहज-साध्य नाहीत. त्यासाठी जागृत लोकसहभाग, संवेदनशील नोकरशाही आणि जबाबदार व विवेकी लोकप्रतिनिधी ही त्रिसूत्री असणे ही पूर्वअट आहे.  पाणी विषयक यशोगाथा त्यातून साकारतात. जल व्यवस्थापन, सुशासन आणि नियमन वेळीच व योग्य प्रकारे झाले नाही तर मात्र जल- व्यवस्थापनाच्या प्रश्नांचे रूपांतर आपत्ती व्यवस्थापनात ( Disaster Management)  होते. जल-संघर्ष वाढतात. कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. समाज-स्वास्थ्य धोक्यात येते.

पाणी वाटपाचे नियोजन हा आंतरविद्याशाखीय (Interdisciplinary) प्रकार आहे. त्याकरिता फक्त कृषीतज्ञ व अभियंतेच नव्हे तर सामाजिक-आर्थिक-राजकीय क्षेत्रातील तज्ञांचे ही योगदान आवश्यक आहे. जलसाक्षरतेच्या माध्यमातून पाण्याबद्दल आपण आता प्रौढ व्हायला हवे. पाणी वाटपाचे नियोजन व अंमलबजावणी ही गांभीर्याने घ्यायची सामुदायिक  बाब आहे हे विसरून चालणार नाही.

*********
* सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद
 सदस्य, "एकात्मिक राज्य जल आराखडा" समिती
माजी तज्ञ-सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ 
[Article published in Sakal, Belgaon on 28 June 2016]















Sunday, June 5, 2016

मराठवाड्याचा पाणीप्रश्न आणि उपाय


‘सकाळ’ मराठवाडा आवृत्ती, वर्धापन दिन दि.१जून२०१६
‘चला, मात करूया’ विशेषांक


मराठवाड्याचा पाणीप्रश्न आणि उपाय
-प्रदीप पुरंदरे

प्रश्नाचे अतिसुलभीकरण करणे किंवा मूळात प्रश्न काय आहे हेच नीट न कळणे घातक असते. ज्यात साक्षात जीवनाचे प्रतिबिंब पडले आहे त्या पाणीप्रश्नाला अनेक बाजू आहेत. धारदार कंगोरे आहेत. एकूण व्यवस्थेचे परिमाण आहे.

फार काळ पारतंत्र्यात रहावे लागल्यामुळे  निर्माण झालेली मानसिकतासंतांच्या संस्कारांचा पगडा, अजून न संपलेली सरंजामशाही, भांडवली लोकशाहीतून जे काही किमान बदल व्हायला पाहिजेत ते ही बदल  विकासाच्या प्रादेशिक असमतोलामुळे  न होणेचेल्याचपाट्यांची भांडवलशाही (क्रोनी कॅपिटॅलिझम) वाढणे, पाण्याचे हक्क जमीनीच्या वैयक्तिक मालकीशी निगडीत असणे, मराठवाड्यातील सत्ताधारी वर्गाचे तथाकथित नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या प्रभावाखाली असणे  आणि पुरोगामी राजकीय पक्ष व जनसंघटनांची क्षीण उपस्थिती या व्यापक पटावर मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाचा विचार केला पाहिजे.

कायम स्वरूपी दुष्काळी भाग, अतितुटीची नदीखोरी, अनंत काळ रखडलेले असंख्य सिंचन प्रकल्प, दरडोई व दरहेक्टरी पाणी उपलब्धता फार कमी असल्यामूळे पाण्यावर आधारित विकासाला पडलेल्या स्वाभाविक मर्यादा, वाळू व भूजलाचा बेबंद उपसा, नदी-नाल्यांवर अतिक्रमण व त्यांचे भयावह प्रदुषण, नैसर्गिक परिस्थितीशी मेळ न खाणारी पिकरचनापाण्याचा उपयोग आता एक  राजकीय शस्त्र म्हणून केला जात असल्यामुळे बांधून पूर्ण झालेली मोठी धरणे सामान्य पावसाच्या वर्षात देखील पुरेशा प्रमाणात न भरणेदेखभाल-दुरूस्ती व जल-व्यवस्थापना अभावी  सिंचन प्रकल्पांची कार्यक्षमता लक्षणीयरित्या घटणे, पाणी वाटपातील भयावह विषमता,शासकीय यंत्रणेकडून आपल्याला पाणी मिळणार नाही याची खात्री पटल्यामुळे लोकांनी महागड्या बाटलीबंद पाण्याच्या रूपात पाण्याचे खाजगीकरण स्वीकारणे आणि संतांचा वारसा सांगणा-या भूमित विहिर व बोअरमधून पाण्याचा व्यापार वाढणे हे मराठवाड्याचे जल-चित्र मन विषण्ण करणारे आहे. त्याला सामोरे जायचे असेल आणि मूळ प्रश्नांना भिडायचे असेल तर काही किमान गोष्टी आता विनाअट मराठवाड्याने किंबहूना, संयुक्त राहू इच्छिणा-या महाराष्ट्राने देखील आवर्जून केल्या पाहिजेत. त्या सूत्र रुपाने खालील प्रमाणे:

१) महाराष्ट्र जल व सिंचन आयोग १९९९ आणि सिंचन विषयक विशेष चौकशी समितीचा अहवाल २०१४ या दोन ऎतिहासिक अहवालांच्या आधारे राज्याने आपल्या जलनीतीचा व जल-कायद्यांचा गंभीर, सखोल व समग्र आढावा घ्यावा आणि कालानुरूप त्यात बदल करावेत. सुधारित जलनीती व जल-कायदे नियमांसह अंमलात आणावेत. या दोन्ही अहवालात उपलब्ध असलेला माहिती व जल विषयक ज्ञानाचा आणि सामुदायिक अनुभवाचा खजिना न वापरणे हा करंटेपणा आहे . तो खजिना वेळीच वापरला गेला असता तर दुष्काळाला आपण जास्त चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकलो असतो.

२) राज्याचे जल - अभियान अद्याप पूर्ण झालेले नाही हे लक्षात घेता मागास भागातील व सर्व दुष्काळग्रस्त  तालुक्यातील ‘खरे’ बांधकामाधीन प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी चाकोरी बाहेरची योजना हाती घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण होत नाहीत तो पर्यत नवीन प्रकल्प  घेऊ नयेत. आता वेळ व आत्यंतिक गरज आहे ती असलेल्या प्रकल्पांची देखभाल-दुरूस्ती करून तेथे शास्त्रीय जल-व्यवस्थापन, कठोर जल-सुशासन व एकात्मिक जल- नियमन करण्याची. त्यासाठी हवा एकात्मिक राज्य जल आराखडा. त्यासाठी शासनाने नव्याने समिती नेमली आहे. ती २७ मे २०१६ रोजी आपल्या कामास  सुरूवात करत आहे. (प्रस्तुत लेखक त्या समितीचा सदस्य आहे)

३) वरील गोष्टी करायच्या असतील तर पाटबंधारे महामंडळांचे रुपांतर लवकरात लवकर नदीखोरे अभिकरणात करणे आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कायद्यात सुधारणा करून त्या प्राधिकरणाची पुनर्रचना करणे व त्याला क्रियाशील करणे हे कळीचे मुद्दे आहेत. ( कायद्यात सुधारणा करणे आणि मजनिप्राची पुनर्रचना करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत दि.१७मे २०१६ रोजी घेण्यात आला आहे)

४) वीज नियमनाआधारे नदीनाले, जलाशय, कालवे, सर्व प्रकारच्या विहिरी आणि अन्य जलस्त्रोतातून होणारा बेबंद पाणी उपसा परिणामकारकरित्या रोखण्यासाठी शासनाने प्रसंगी एम.ई.आर.सी. द्वारे योग्य तो आदेश प्राप्त करून घ्यावा किंवा त्वरित अध्यादेश काढावा. तसेच महाराष्ट्र भूजल ( विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ ची अंमलाबजावणी करावी.

५) माती अडवणे आणि पाणी मुरवणे (पाणी दिसणे नाही!) या कार्यक्रमाला मराठवाड्यात अनन्य साधारण महत्व द्यावे. त्यासाठी रु २५००० प्रति हेक्टरची तरतुद करावी. या कामांची देखभाल-दुरूस्ती व संनियंत्रण याची व्यवस्था बसवावी. अशा कामांचे आयुष्य ५ ते २३ वर्षे  असते. त्यामूळे ही कामे विशिष्ट कालावधीने पुन:पुन्हा करावीत. त्याकरिता एका मोठ्या स्वतंत्र निधीची ( corpus) उभारणी करावी.

६) दुष्काळग्रस्त भागातील ग्रामीण पाणी पुरवठा, मृद व जलसंधारण, लघू प्रकल्प (स्थानिक स्तर) आणि सर्व राज्यस्तरिय सिंचन प्रकल्पांचे कालवे व वितरण व्यवस्था योजनांच्या देखभाल-दुरूस्तीसाठी मनरेगा आणि सी.एस.आर.अंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्या योजना पूर्ण क्षमतेने कार्यरत कराव्यात.

७) मराठवाड्यात जंगलाचे प्रमाण फार कमी आहे. ते वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.

 ८) आठमाही सिंचन, सर्व लाभधारकांना खरीप हंगामी पिकांसाठी किमान एक पाणी-पाळी(संरक्षित सिंचन / प्रोटेक्टिव्ह इरिगेशन) आणि रब्बी हंगामी पिकांसाठी किमान तीन पाणी-पाळ्या देणे, तुटीच्या व अति तुटीच्या नदी खो-यातील साखर कारखान्यांचे पाण्याची विपुलता असलेल्या खो-यात स्थलांतर करणे अशा व तत्सम शिफारशी चितळे आयोगाने १९९९ साली केल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी व्हावी.

९) अस्तित्वात असलेले छोटे मोठे सिंचन प्रकल्प पाण्याअभावी निकामी होणार नाहीत याची काळजी घेत आणि शिरपूर पॅटर्न संदर्भात शासनाने नदीनाल्यांचे खोलीकरण व रूंदीकरण करण्याबाबत जो संयमी निर्णय घेतला आहे त्यातील पथ्ये पाळत जलयुक्त शिवार प्रकल्पातील कामे  करावीत. नद्यांचे पुनरुज्जीवन होण्यासाठी त्यांच्या पाणलोटातील  पाण्याचा उपसा कमी होणे गरजेचे असते. तसे झाले तर भूजला मार्गे पावसाळ्यानंतर नदीनाले वाहतील. वरचा उपसा कमी झाला नाही तर नुसत्या नाला खॊलीकरण व  रुंदीकरणाने आणि असंख्य बंधारे बांधण्याने फारसे काही साध्य होणार नाही. उलट दुष्परिणाम होतील.


        दुष्काळाच्या निमित्ताने अनेक व्यक्ती व संस्था आज स्वयंस्फुर्तिने पाण्याचे काम करत आहेत.अगदी तन, मन व धनाने देखील. त्यांचा हेतू अर्थातच चांगला आहे. उत्साह स्वागतार्ह आहे. त्यांनी वर नमुद केलेले व तत्सम मुद्दे अभ्यासले व समजून घेतले तर ते जास्त चांगल्या प्रकारे योगदान देऊ शकतील. सगळ्यांनी एकाच प्रकारचे काम करण्याची गरज नसते. अन्य अनेक कामेही जलक्षेत्रात आवश्यक असतात.
.........................................................................................................................................