Tuesday, November 5, 2013

Preliminary Irrigation Program

पी.आय.पी.

पी.आय.पी. म्हणजे प्राथमिक सिंचन कार्यक्रम. पाण्याचे अंदाजपत्रक. सिंचन प्रकल्पातील पाणी वापर दर हंगामात कसा करायचा याचे नियोजन म्हणजे पी.आय.पी. जलाशयात प्रत्यक्ष पाणीसाठा किती आहे, त्यापैकी सिंचनाकरिता नक्की किती पाणी उपलब्ध होईल, या हंगामात कोणती पिके घेता येतील, किती पाणी-पाळ्या मिळतील, दोन पाणी-पाळ्यातील अंतर किती दिवसांचे असेल, इत्यादी माहिती पी.आय.पी.मूळे मिळते. शेतक-यांसाठी ती अतिशय महत्वाची आहे. उपयुक्त आहे. कारण शेतक-यांना त्यामूळे प्रत्येक हंगामात पिकांचे नियोजन करता येते. पी.आय.पी.त जाहीर केल्याप्रमाणे सगळा सिंचन कार्यक्रम प्रत्यक्षात खरेच होतो आहे ना यावर लक्ष ठेवता येते. त्यासाठी आग्रह धरता येतो. पाठपुरावा करता येतो. सिंचन हंगाम सुरळित पार पडणे आणि सर्व पाणी-पाळ्या वेळेवर मिळणे याला शेतक-यांच्या दृष्टिने किती महत्व आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही. त्यामूळे पिक चांगले येते. उत्पादन वाढते. आणि मुख्य म्हणजे उत्पनात भर पडते. म्हणून तर पी.आय.पी.ला लाभधारकांचा मित्र म्हणायचे!

जल संपदा विभागाने पी.आय.पी.संदर्भात एक चांगला शासन निर्णय (मार्गदर्शक सूत्रे - एकत्रित शासन निर्णय क्र. संकीर्ण १०.००/(१९/२०००)/ सिं.व्य.(धो) दि.७.३.२००१) काढला आहे. आणि सर्व अधिका-यांना उद्देशून एक तपशीलवार पत्रसुद्धा ( क्र. सीडीए १००४/(३६५/२००४)लाक्षेवि (कामे) दि.२६.१०.२००४) लिहिले आहे. लाभधारक, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी व सचिव, कालवा सल्लागार समितीचे सदस्य आणि पाणी वाटपात रस असणा-या सर्वांकडे हा जी.आर. व ते पत्र असले पाहिजे. त्याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. त्या आधारे शासकीय बैठकांमध्ये भाग घेतला पाहिजे.

पी.आय.पी.सर्वसाधारणत: कार्यकारी अभियंत्याने दर हंगामापूर्वी करणे अपेक्षित आहे. रब्बी व उन्हाळी हंगामांचा एकत्रित पी.आय.पी.१५ सप्टेंबर पूर्वी अधीक्षक अभियंत्याने मंजूर केला पाहिजे.  हे ठरविण्यामागे शासनाचा हेतू असा आहे की, रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी साधारण एक महिना अगोदर नियोजन तयार असावे. त्या महिन्यात मग जाहीर प्रकटन काढून लाभधारकांना पी.आय.पी.तला तपशील सांगणे, पाणीपट्टी व देखभाल-दुरूस्तीबाबत सूचना देणे, पाणी अर्ज मागवणे, पाणी अर्जांची छाननी करणे व ते मंजूर अथवा नामंजूर करणे, आलेल्या पाणीअर्जां आधारे पहिल्या पाणी-पाळीचे नियोजन व तयारी करणे आणि या सर्वां आधारे सिंचन हंगाम वेळेवर सुरु करणे ही प्रक्रिया अभिप्रेत आहे.

१५ सप्टेंबर पर्यंत सर्वसाधारणत: त्या वर्षीच्या पर्जन्यमानाची स्थिती पुरेशी स्पष्ट झालेली असते. धरण भरायला सुरूवात झालेली असते. १५ ऑक्टोबरला (रब्बी हंगामाचा पहिला दिवस) धरणात किती साठा असु शकेल याबाबत ब-यापैकी अंदाज बांधता येतो. सर्वसामान्य पावसाचे वर्ष असेल तर धरण पूर्ण भरेल असे गृहित धरून पी.आय.पी. करा आणि पाण्याच्या प्रत्यक्ष उपलब्धतेनुसार दर आठवडयाला आढावा घेत पी.आय.पी.त निश्चित केलेल्या कार्यक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करा. जरूर असेल तर सुधारित पी.आय.पी. करा अशा शासनाच्या सूचना आहेत. एवढेच नव्हे तर  पाणी उपलब्धतेच्या टक्केवारीनुसार अमुक टक्के पाणी असेल तर काय करायचे असे तपशीलवार मार्गदर्शन उपरोक्त जी.आर. मध्ये करण्यात आले आहे. सर्वसामान्य पर्जन्यमानाचे वर्ष नसेल/दुष्काळाचे सावट असेल तर काय करायचे याबाबतही त्या जी.आर.मध्ये तपशीलाने सूचना देण्यात आल्या आहेत.या वर्षी त्या जास्त उपयोगी पडतील.


वरील विवेचना वरून एक महत्वाची गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे पी.आय.पी. हा प्रकार गतिशील (डायनामिक) आहे. एकदा केला आणि संपला असे त्यात नसते. प्रत्यक्ष परिस्थितीनुसार वेळोवेळी त्यात सुधारणा करणे अपेक्षित आहे. विज्ञान व व्यवस्थापन यांचा संगम त्यात आहे. व्यवस्थापनाची ती एक कला आहे. प्रयत्नाने ती जमली तर सगळे सुरळित पार पडते. व्यवस्थापनाची घडी बसते. अधिकारी व लाभधारक दोघांना शिस्त लागते.

[Published in Jaldoot, Sakal, 6.11.2013]

1 comment: