Wednesday, May 16, 2012

Letter to MWRRA




Annex – A

(Rule – 3 )
Application as per Right to Information Act, 2005 – Sec 3

To,
Information Officer,
Maharashtra Water Resources Regulatory Authority(MWRRA),
World Trade Center, Center -1, 9th Floor,
Cuffe Parade, Mumbai-400005

Name of Applicant: Pradeep Purandare

Address for correspondence:

B-12, Pride Towers, Vedantnagar, Near Tiwari Mangal Karyalaya, MIDC Road, Rly. Station, Aurangabad- 431005

Required information:                                                     

Sub: Special Responsibility of MWRR Authority regarding removal of  
          regional imbalance
Ref:– Sections 11(f), 12(9), 15,16 & 21of  MWRRA Act,2005
                   
With reference to above, it is requested to pl. give me yearwise , regionwise information regarding how exactly MWRRA has carried out its special responsibility in respect of removal of regional imbalance in irrigation sector since its establishment.



Place: Aurangabad                             ( Pradeep Purandare )
Date:  13 April 2012


Letter to Governor


प्रदीप पुरंदरे
स्वेच्छा-सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद.
जलक्षेत्रातील मुक्त अभ्यासक, प्रशिक्षक व समुपदेशक
(सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन व सिंचन कायदे)
दूरध्वनी:०२४०-२३४११४२, मो. ९८२२५६५२३२, ८९८३५२८६४० ई-मेल: pradeeppurandare@gmail.com
बी-१२, प्राईड टॉवर्स, वेदांतनगर, तिवारी मंगल कार्यालयाजवळ, एम.आय.डी.सी. रेल्वे स्टेशन, औरंगाबाद ४३१००५

दिनांक १० एप्रिल २०१२
प्रति,
मा.राज्यपालमहाराष्ट्र शासन,
राज भवन, मलबार हिल, मुंबई-४०००३५
विषय: सिंचनाचा प्रादेशिक अनुशेष व कायदा
संदर्भ: ()"सिंचनाचा अनुशेष व कायदा"-लेख, दै.महाराष्ट्र टाईम्स, औरंगाबाद,  दि.१६मार्च२०१२
      ()"जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने २००५ पासून काय केले?"-पत्र, दै.लोकसत्ता, मुंबई   
         दि.३एप्रिल२०१२
महोदय,
      माझ्या संदर्भीय लेखाची व पत्राची प्रत सोबत सविनय सादर करत आहे. कृपया त्यांची दखल घ्यावी ही नम्र विनंती. विधिमंडळाने नेमलेल्या अधिकृत विशिष्ट यंत्रणेने (म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, राज्य जल परिषद, राज्य जल मंडळ यांनी) सिंचनाच्या प्रादेशिक अनुशेषाबाबत आजवर आपली कायदेशीर जबाबदारी (..नि.प्रा, अधिनियम,२००५ मधील कलम क्र. ११(), १२(), १५, १६, २१ अन्वये) कशा रीतीने पार पाडली याचा तपशील कृपया सत्वर जाहीर करण्याची व्यवस्था करावी ही नम्र विनंती.
धन्यवाद.
                                  आदराने,
आपला विश्वासू,

(प्रदीप पुरंदरे)
सोबत: वरीलप्रमाणे
प्रत माहिती करिता सविनय सादर
() मा. अध्यक्ष, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई
() मा. अध्यक्ष, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, औरंगाबाद
() मा. अध्यक्ष, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपुर
() मा. अध्यक्ष, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबई
() मा. संपादक, दैनिक महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ, लोकमत, दिव्य मराठी 

सूज्ञांस सांगणे नलगे..


 सूज्ञांस सांगणे नलगे..
सिंचनाचा प्रादेशिक अनुशेष, पी. आय. पी. आणि जललेखा या विषयांवर  माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मी केलेला पत्र व्यवहार व त्यातून उपलब्ध झालेली माहिती सर्वांच्या माहितीसाठी ब्लॉगवर टाकत आहे. गोष्टी स्वयंस्पष्ट आहेत!

सिंचनाचा प्रादेशिक अनुशेष व कायदा:
(१) राज्यपालांना लिहिलेले पत्र, १० एप्रिल २०१२
(२) म.ज.नि.प्रा. कडे मागितलेली माहिती, १३ एप्रिल २०१२
(३) म.ज.नि.प्रा.ने दिलेली माहिती, २४ एप्रिल २०१२

पी.आय.पी.:
(१) जल संपदा विभागाकडे मागितलेली माहिती, १३ एप्रिल २०१२
(२) जल संपदा विभागाने दिलेली माहिती, २५ एप्रिल २०१२
(३) जल संपदा मंत्र्यांना लिहिलेले पत्र, ८ मे २०१२
टिप: वरील (२) नुसार जल संपदा विभागाच्या १२ मुख्य अभियंत्यांकडून (१) प्रमाणेच १४ मे २०१२ रोजी माहिती मागवली आहे. १४ जून २०१२ पर्यंत ती मिळणे अपेक्षित आहे.

जललेखा:
(१) जल संपदा विभागाकडे मागितलेली माहिती, १३ एप्रिल २०१२
(२) जल संपदा विभागाने दिलेली माहिती, ४ मे २०१२

जल वास्तव -१:


जल वास्तव -१:
        ‘लाभक्षेत्रे-कुरुक्षेत्रे’ या सदराच्या पहिल्या "विधि"लिखित या भागात आपण आजवर सिंचन कायद्यांचा आढावा घेतला. आता या सदराच्या "जल-वास्तव" नावाच्या दुस-या भागात आपण सिंचना विषयी काही वस्तुस्थिती जाणून घेणार आहोत. वस्तुस्थिती मागच्या कारणांचा मागोवाही अर्थातच घेतला जाईल. दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर सिंचना विषयी श्वेतपत्रिका काढण्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्यातील काही मुद्यांचा उहापोह येथे होणे साहजिक आहे. महाराष्ट्रातील पाण्याची उपलब्धता व वापर, पूर्ण तथा बांधकामाधीन सिंचन प्रकल्पांची संख्या व त्यावरील गुंतवणुक, अंतिम व निर्मित सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष भिजलेले क्षेत्र अशा अनेक महत्वाच्या मुद्यांवर या लेखात मांडणी केली आहे.
भूपृष्ठावरील पाण्याची उपलब्धता:
      महाराष्ट्रातील भूपृष्ठावरील पाण्याची वार्षिक सरासरी उपलब्धता १,६३,८२० दशलक्ष घनमीटर (दलघमी) एवढी आहे. टि.एम.सी.(थाऊजंड मिलियन क्युबिक फीट) म्हणजेच अब्ज घनफुटाच्या भाषेत सांगायचे झाल्यास तो आकडा ५७८७ एवढा येतो. अर्थात, हे सर्व पाणी वापरायची परवानगी आपल्याला नाही. आंतरराज्यीय नद्यांच्या संदर्भातील बंधने लक्षात घेता १,२५,९३६ दलघमी (४४४८ टिएमसी) म्हणजे भूपृष्ठावरील एकूण उपलब्ध पाण्याच्या ७७% पाणी आपण वापरू शकतो. पाण्याच्या उपलब्धतेचे अंदाज विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती आणि गृहितांप्रमाणे बदलतात. उदा. पाऊस व नदीतील प्रवाहाचे मोजमाप जास्त चांगल्या प्रकारे झाल्यास किंवा पाणलोट क्षेत्रातील परिस्थितीत फरक पडल्यास आकडेवारीत सुधारणा होऊ शकतात. आंतरराज्यीय करारांचेही बरे वाईट परिणाम त्या अंदाजांवर होतात.
       २०१०-११ सालापर्यंत पूर्ण झालेल्या राज्यस्तरीय मोठया, मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांमूळे वापरता येण्याजोग्या ४४४८ टिएमसी पाण्यापैकी ११८० टिएमसी (३३३८५ दलघमी) पाण्याकरिता साठवण क्षमता निर्माण झाली आहे.
 सिंचन प्रकल्पांची संख्या व गुंतवणुक:
       ८६ मोठे, २५८ मध्यम व ३१०८ लघु अशा एकूण ३४५२ राज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांमध्ये जून २०१० अखेरीस ४७.३४ लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून त्याकरिता मार्च २०१० पर्यंत रू.४८५०० कोटीची गुंतवणुक करण्यात आली आहे.
        ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे स्थानिकस्तरावरील पाझर तलाव (२३४६०), कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (१२२८३), गाव तलाव व भूमिगत बंधारे (२६४०९), वळवणीचे बंधारे (५४०) व लघु प्रकल्प (२५०७) अशा एकूण ६५१९९ प्रकल्पांद्वारे १४.२० लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.
        ७८ मोठे, १२८ मध्यम व ५४३ लघु असे एकूण ७४९ सिंचन प्रकल्प सध्या बांधकामाधीन असून ते पूर्ण करण्याकरिता  आवश्यक उर्वरित रकमेचा १ एप्रिल २०११ रोजीचा अंदाज रू.७५३६६ कोटी इतका आहे.
पाण्याचा वापर:
        सन २०१०-११ साली संकल्पित प्रकल्पीय पाणी साठा (म्हणजे बांधून पूर्ण झालेली सर्व धरणे पाण्याने पूर्ण भरली तरचा साठा) ३३३८५ दलघमी होता. पण १५ ऑक्टोबर २०१० रोजीचा एकूण प्रत्यक्ष उपयुक्त साठा संकल्पित साठयाच्या ८२% म्हणजे २७३०९ दलघमी इतकाच होता. त्यापैकीचा पाणी वापर दर्शवणारी खालील आकडेवारी बोलकी आहे.(सर्व आकडे दलघमी मध्ये)
(१) एकूण वापर २६७०६
(२) बाष्पीभवन ५३८३ (२०%)
(३) सिंचन १५४४७ (५७%)
(४) बिगर सिंचन ५८७६ (२२%)
बिगर सिंचना करिता जे पाणी वापरले  गेले  त्याचा तपशील खालील प्रमाणे:
(१) पिण्याकरिता ३२६०(५५%)
(२) औद्योगिक वापर ६५६ (११%)
(३) इतर १९६० (३३%)
        बाष्पीभवन व बिगर सिंचनातला ‘इतर वापर’ आटोक्यात ठेवला - किंवा खरा तेवढाच दाखवला - तर औद्योगिक वापराच्या पाण्याची गरज त्या बचतीतून मोठया प्रमाणावर भागवता येऊ शकेल असे सकृतदर्शनी वाटते.
सिंचन क्षमता व सिंचित क्षेत्र:
       सिंचन क्षमता व सिंचित क्षेत्र याबाबतची जून २०१० मधील माहिती खालील प्रमाणे आहे. (सर्व आकडे लक्ष हेक्टर मध्ये दिले आहेत)
(१) अंतिम सिंचन क्षमता:            ८५.००
(२) निर्मित सिंचन क्षमता:
            १. राज्य स्तरीय प्रकल्प:  ४७.३४ ("अंतिम"च्या ५६%)
            २. स्थानिक स्तर प्रकल्प: १४.२०
            ३. एकूण:              ६१.५४ ("अंतिम"च्या ७२%)
(३) सिंचित क्षेत्र (राज्य स्तरीय प्रकल्प):
            १. कालवा:              १८.४१ (४७.३४ च्या ३९%)
            २. विहिर:              ११.१४
            ३. एकूण:              २९.५५ (४७.३४ च्या ६२%)
                     (स्थानिक स्तर प्रकल्पांची माहिती उपलब्ध नाही!!)
      या आकडेवारी वरून वर वर पाहता असे दिसते की एकूण निर्मित सिंचन क्षमता "अंतिम" च्या ७२% आहे. पण स्थानिक स्तर प्रकल्पांची आकडेवारी हिशेबात धरायची का? कारण ‘त्या’ प्रकल्पांच्या सिंचित क्षेत्राबद्दल किंवा एकूण जल व्यवस्थापना बाबत नेहेमीच मौन पाळले जाते.त्याचा तपशील जाहीर होत नाही.
       सिंचित क्षेत्राच्या आकडेवारीत विहिरींवरचे क्षेत्र धरण्याबद्दलही वाद आहेत. कारण शासन विहिरींसाठी असे स्वतंत्र/वेगळे पाणी देत नाही. विहिरींवरचे सिंचन हे नियोजित नसते; तो अपघात असतो.  कालव्यातून होणा-या पाझराचा व काही अंशी प्रवाही सिंचनाचा तो अवांछित परिणाम आहे. सर्व विहिरींना फक्त कालव्यामुळेच सर्व पाणी लागते असेही नाही.  विहिरींखालचे क्षेत्र महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ मधील कलम क्र.३ अन्वये अधिसूचित केलेले नसते. त्याच कायद्याच्या कलम क्र.१०५ नुसार लाभक्षेत्रातल्या विहिरी साध्या रेकॉर्ड वरही घेतल्या जात नाहीत. कलम ५५ अन्वये लाभक्षेत्रातील विहिरींवर जी पाणीपट्टी आकारायला हवी ती ही शासनाने आता माफ केली आहे. विहिरी खोदायचा व त्यातून पाणी उपसायचा खर्च शेतकरी करतात. निर्मित सिंचन क्षमतेच्या आकडेवारीत ‘प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील विहिरींमुळे निर्माण झालेली सिंचन क्षमता’ अशी स्वतंत्र वर्गवारी शासनही करत नाही. मग विहिरींवरील सिंचन क्षेत्राचे पितृत्व जल संपदा विभागाचे मानायचे का? ते न मानल्यास, सिंचित क्षेत्र, निर्मित सिंचन क्षमतेच्या ३९% भरते.
        वरील आकडेवारीतून उभे राहणारे एकूण चित्र खरे आहे का? पाणी व क्षेत्र न मोजता आकडेवारीची निर्मिती कशी काय होऊ शकते? हे काय चालले आहे? प्राप्त दुष्काळ व संभाव्य श्वेतपत्रिकेच्या पार्श्वभूमिवर हे प्रश्न आता विचारायला हवेत.
        अंतिम व निर्मित सिंचन क्षमता आणि सिंचित क्षेत्र या संज्ञा दिसतात तेवढया साध्या, सरळ व सोप्या नाहीत. त्यामागे बरीच गुपिते दडलेली आहेत. ‘त्याचे रहस्य कधी कोणाला कळणार नाही’ ही परिस्थिती आता यापुढे राहू नये. सिंचन क्षमते बाबत शासन श्वेतपत्रिका काढेल का नाही आणि त्यात काय असेल याची वाट न पाहता या सदरात आपण सिंचन-सत्य मांडायचा प्रयत्न करू.
संदर्भ: सिंचन स्थिती दर्शक अहवाल (२०१०-११), जल संपदा विभाग, महाराष्ट्र शासन, सप्टेंबर २०११
(हा लेख साप्ताहिक "आधुनिक किसान", औरंगाबाद च्या (१७ ते २३ मे २०१२) अंकात प्रसिद्ध झाला आहे)

Wednesday, May 9, 2012

समन्यायी पाणीवाटपाचा किमान समान कार्यक्रम


 समन्यायी पाणीवाटपाचा किमान समान कार्यक्रम 
प्रास्ताविक:
                 लाभक्षेत्रे-कुरुक्षेत्रे या सदराच्या "विधि"लिखित या पहिल्या भागातील हा शेवटचा लेख. "विधि"लिखित मध्ये महाराष्ट्रातील विविध सिंचन कायद्यांची आपण तोंडओळख करून घेतली. त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बलस्थाने जशी बघितली तशा अनेक त्रुटीही पाहिल्या. बलस्थाने सांभाळत त्रुटी दूर करण्यानेच प्रश्न हळूहळू मार्गी लागणार आहेत. कायद्याबद्दल ‘प्रथम’ चर्चा व त्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरण्यामागे विशिष्ट हेतू आहे. ‘कायद्यासाठी कायदा’ असे नव्हे तर समन्यायासाठी कायदा ही ती भुमिका आहे. टेलला पाणी पोहोचायचे असेल आणि निदान दोन हंगामात किमान भुसार पिकाला तरी पाण्याची हमी पाहिजे असेल तर शेवटी कायदाच उपयोगी पडणार आहे.
         पाणी वाटपात समन्याय आणणे ही या युगातील टॉप टेन मध्ये गणली जाणारी एक संकल्पना असायला हवी. एक महान स्वप्नच आहे ते! ते प्रत्यक्षात आणायचे असेल तर तसेच महान प्रयत्न करावे लागतील. सालाबादप्रमाणे फक्त उन्हाळ्यात पाणी प्रश्नावर उबळ येणे हे काही फार चांगले लक्षण नाही. स्वप्न पाहायचे का मृगजळ हे ही एकदा नीट तपासायला हवे. स्वप्न प्रत्यक्षात आणणे ही मोठी जबाबदारी आहे. नुसतेच मृगजळामागे धावत सुटणे हा वेडेपणा आहे. समन्यायी पाणीवाटपाचे "स्वप्न" प्रत्यक्षात आणण्याकरिता एक लांब पल्ल्याची लढाई लढावी लागेल. कदाचित कैक पिढया ती चालेल. त्या करिता प्रथम "लंबे रेसके घोडे" एकत्र यायला हवेत. त्यांनी किमान समान कार्यक्रम विकसित करायला हवा. या लेखात त्या दृष्टीने फक्त एक प्राथमिक मसुदा मांडला आहे. तो सामुदायिक शहाणपण व कृतिद्वारे अजून विकसित करण्याची गरज आहे.
व्याप्ती:
         प्रस्तुत मसुदा हा म्हटले तर राज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांपुरता मर्यादित आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय सिंचन प्रकल्प हा प्रस्थापित विकास नीतीचा ग्रामीण व शहरी भागांना जोडणारा बालेकिल्ला आहे. तेथे पाणी वाटप व वापराबद्दलच्या मुद्यांना टोक येत आहे. अस्वस्थता व असंतोष आहे. विसंगती तीव्र होता आहेत. अशावेळी पाणी प्रश्नाबाबत तेथे काही नवीन मांडणी केली तर प्रतिसाद मिळण्याची शक्यता तुलनेने जास्त आहे. सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात जाणीव जागृती झाली, जलवंचितांचे संघटन झाले आणि काही तपशीला आधारे प्रश्न विचारण्याची प्रक्रिया सुरू झाली तर एकूण जलक्षेत्रावर त्याचे चांगले व दूरगामी परिणाम संभवतात. सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय सिंचन प्रकल्प म्हणजे जलक्षेत्रातील "संघटीत क्षेत्र" आहे. तर जलक्षेत्रातील इतर भाग म्हणजे "असंघटीत क्षेत्र". असंघटीत क्षेत्राबद्दल संवेदनशील राहूनही संघटीत क्षेत्रातील लढा महत्वाचा मानण्यामागे जे तर्कशास्त्र आहे ते जलक्षेत्राबाबतही खरे आहे - त्यातील दृष्य विसंगती व अदृष्य सुसंगतींसह! प्रकल्पा-प्रकल्पात पाणी आहे. ते ज्यांना आज मिळाले आहे त्यांना त्याचा नक्कीच फायदा झाला आहे. त्याच प्रकल्पातील जलवंचितांना तो फायदा समोर दिसतो आहे. पाण्याचे महत्व त्यांना वेगळे सांगायची गरज नाही. गोष्टी सूस्पष्ट आहेत. लक्ष्य डोळ्यासमोर आहे. आज ते आवाक्यात नाही; पण येऊ शकते. त्यासाठी समन्यायी पाणीवाटपाचा किमान समान कार्यक्रम! राज्याची जलनीती, सिंचन विषयक कायदे, व म.ज.नि.प्रा.सारखे व्यासपीठ यामुळे एक संदर्भ उपलब्ध आहे. चौकट तयार आहे. पाणी वापर संस्था आज कार्यरत नाहीत. यशस्वी नाहीत. त्यांच्या ताकदीची जाणीव आज त्यांना नाही. त्यांची सुप्त शक्ती जागृत केली जाऊ शकते. सहकार क्षेत्राबाबत असे म्हणतात की, "सहकारी चळवळ पराभूत झालेली आहे, मात्र सहकार यशस्वी झालाच पाहिजे"(Co-operation has failed,but co-operation must succeed). हे सूत्र पाणी वापर संस्थांनाही लागू पडते. "शेतीला पाणी व शेतमालाला भाव मिळाला पाहिजे" या मागणी आधारे लक्षणीय गुणात्मक बदल होऊ शकतात. फेरमांडणी व नवीन जुळवाजुळव याची आज गरज आहे. या दृष्टिकोनातून समन्यायी पाणीवाटपाच्या खालील किमान समान कार्यक्रमाकडे पाहिले जावे.
समन्यायी पाणीवाटपाचा किमान समान कार्यक्रम:
(१) समविचारींचा ‘सिंचन कायदा गट’ स्थापन करणे.
(२) सिंचन कायद्यांचा प्रचार व प्रसार करणे.
(३) समाजातील मान्यवरांना भेटून त्यांना सिंचन कायदे विषयक सद्यस्थिती सांगणे.
(४) कायदे, नियम, करारनामे, जल व्यवस्थापनात वापरले जाणारे नमुने, हस्तपुस्तिका, इत्यादि मराठीत छापून मोठया वितरण व्यवस्थेमार्फत शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाकडे आग्रह धरणे. पर्याय उभा करणे. जन-जल संकेतस्थळ सुरू करणे.
(५) नुकसान भरपाई, तक्रार, तंटा, इत्यादि प्रकरणी सिंचन प्रकल्पातील शेतक-यांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन सुरु करणे.
(६) सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात शेतीची पार्श्वभूमि असणा-या पत्रकार, वकील, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, प्राध्यापक, कलाकार, माहिती अधिकार कार्यकर्ते, एन.जी.ओ. इत्यादिना सिंचन प्रकल्पातील विविध प्रक्रियांबद्दल प्रशिक्षण देणे. संदर्भ साहित्य उपलब्ध करून देणे.
(७) शासन, जल संपदा विभाग, म.ज.नि.प्रा., राज्य जल परिषद, राज्य जल मंडळ, वैधानिक विकास मंडळे, पाटबंधारे महामंडळे, इत्यादि ठिकाणी सिंचन कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी सतत पाठपुरावा करणे.
(८) प्रारंभिक सिंचन कार्यक्रम, पाणी-पाळी नियोजन, पाणीपट्टी आकारणी व वसुली, पाणी चोरी, जललेखा, बेंचमार्किंग, सिंचन स्थितीदर्शक अहवाल, इत्यादिंवर जाहीर चर्चा घडवून आणणे
.(९)  जल व्यवस्थापन व देखभाल-दुरूस्तीचा सकस लोकपर्याय निर्माण करण्यासाठी प्रकल्प/पाणी वापर संस्था स्तरावर अशासकीय जलव्यवस्थापक व जलकर्मी तयार करुन शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचेवरील अवलंबत्व कमी करण्याचा प्रयत्न करणे ( अनवाणी डॉक्टर ही संकल्पना मराठवाडयात अणदुरला यशस्वी झाली आहे! त्याधर्तीवर सिंचन प्रकल्पात प्रयत्न करणे).
(१०) जल संपदा विभागातील सर्व स्तरांवरील अधिकारी, अभियंते व कर्मचारी यांचेकरिता अनौपचारिक सल्लासेवा सुरू करणे.
(११)  स्थानिक स्तरावर उत्तम दर्जाची विमोचक-दारे व प्रवाह मापक यांचे उत्पादन करणे व त्यांची देखभाल-दुरूस्ती करणे याकरिता लघू उद्योजकांना प्रोत्साहन देणे.
हा कार्यक्रम सोपा नाही. पण आवश्यक आहे. त्याची गरज पटली तर जलक्षेत्रात एक नवीन सुरुवात होऊ शकते. सर्व मोठया नद्या उगमापाशी छोटयाच असतात. अपयश नव्हे तर चिल्लर ध्येय बाळगणे हा गुन्हा आहे.(Not failure but low aim is crime)
     
 (हा लेख साप्ताहिक "आधुनिक किसान", औरंगाबाद [१० ते १६ मे २०१२] मध्ये प्रसिद्ध झाला आहे)

Monday, May 7, 2012

शास्त्रीय जल व्यवस्थापना ऎवजी बंदोबस्त व जुगाड


शास्त्रीय जल व्यवस्थापना ऎवजी बंदोबस्त व जुगाड
पाणी टंचाईचे एक महत्वाचे कारण 
            भूकंप अचानक होतो. सुनामीची थोडी अगोदर चाहूल लागते. पण पाणी टंचाई म्हणजे काही भूकंप अथवा सुनामी नव्हे! पुरेशा विश्वासार्हतेने, खूपसे आधी, पाणी टंचाईबद्दल अंदाज बांधता येऊ शकतात. राज्यस्तरीय मोठया, मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांच्या जलाशयातील पाणी उपलब्धतेबाबत हे विधान जास्तच खरे आहे. जलाशयातील पाण्याचे नियोजन करण्यासंबंधी जल संपदा विभागाची खालील मार्गदर्शक तत्वे व प्रक्रिया अभ्यासल्या तर ते कोणालाही पटेल.
            रब्बी हंगामाच्या सुरुवातीला रब्बी व उन्हाळी हंगामांकरिता प्रारंभिक सिंचन कार्यक्रम करणे अपेक्षित असते. त्याला इंग्रजीत प्रिलिमिनरी इरिगेशन प्रोग्रॅम (पी.आय.पी.) असे म्हणतात. पी आय पी म्हणजे पाण्याचे अंदाजपत्रक. जलाशयातील पाण्याची प्रत्यक्ष उपलब्धता (जमा) आणि त्या पाण्याचा प्रस्तावित वापर(खर्च) याचा शास्त्रीय तपशील या अंदाजपत्रकात दिलेला असतो. पाऊस किती पडेल व जलाशय पूर्ण भरेल की नाही हे सांगणे अवघड आहे. पण १५ ऑक्टोबरला (रब्बी हंगाम या तारखेला सुरु होतो) जलाशयात उपयुक्त साठा नक्की किती हे निश्चित कळते. उपयुक्त साठयापैकी प्रत्यक्ष वापरासाठी किती पाणी मिळेल हे मग ठरविण्यात येते. त्या करिता उपयुक्त जल साठा, मान्सुनोत्तर येवा, उपयुक्त साठयातील गाळाचे अतिक्रमण, जलाशयातून होणारे बाष्पीभवन व गळती, इत्यादि बाबी विचारात घेतल्या जातात. एकदा प्रत्यक्ष वापरा करिता पाणी किती उपलब्ध आहे हे कळले की मग पुढे त्यातून बिगर सिंचनाचे आरक्षित पाणी वजा केले जाते. राहिलेले पाणी सिंचना करिता वापरता येते.(प्राधान्यक्रम व्यवहारात आजही बदलले नाहीत!) त्यातही परत उपसा व प्रवाही अशी वर्गवारी केली जाते. रब्बी व उन्हाळी हंगामातला सिंचनाचा पाणी वापर प्रस्तावित करणे; पिके, पिकनिहाय क्षेत्र/पाणीपाळ्या/दोन पाणीपाळ्यातील अंतर या बाबी कालव्यांची प्रत्यक्ष वहनक्षमता व वहन व्यय लक्षात घेऊन ठरविणे; जाहीर प्रकटन काढून शेतक-यांना नियोजनाचा तपशील सांगणे; प्रत्येक पाणीपाळी नंतर खरेच किती पाणी वापरले गेले याचा आढावा घेणे; अंमलबजावणीतल्या त्रुटी पुढच्या पाणीपाळीत दुरूस्त करणे; प्रत्येक पाणीपाळी तसेच हंगामानंतर पाण्याचे हिशेब ठेवणे; पुढच्या हंगामाकरिता किती पाणी प्रस्तावित होते आणि आता प्रत्यक्ष किती उपलब्ध आहे हे तपासून पुढील पी आय पी सुधारणे, वगैरे वगैरे ही झाली अपेक्षित कार्यवाही-थिअरी! ही थिअरी ज्या प्रकल्पात काटेकोरपणे अंमलात येईल तेथे फेब्रुवारीच्या अखेरीसच उन्हाळ्यात पाण्याची परिस्थिती काय असेल हे स्पष्ट होईल. पाऊस कमी पडला, जलाशयात अन्य काही कारणामूळे पाणी मूळातच कमी आहे, एखाद्या पाणीपाळीत पाणी जास्त वापरले गेले किंवा पाण्याची फार मोठया प्रमाणावर चोरी झाली तर त्या त्या वेळी परिस्थिती लक्षात यायला हवी. थोडक्यात, प्रकल्पांमधील पाणी उपलब्धते बद्दलचे अंदाज १५ ऑक्टोबर पासून दर आठवडयाला - नव्हे, म्हटले तर दर दिवशीसुद्धा - अद्ययावत होऊ शकतात.
             आता वर नमूद केलेली थिअरी शास्त्रीय काटेकोरपणे अंमलात आणायची असेल तर त्यासाठीची माहिती (डाटा), अभियांत्रिकी गृहिते, आधारभूत कागदपत्रे, इत्यादि परिपूर्ण, अद्ययावत व विश्वासार्ह असायला हवीत. उदाहरणार्थ, जलाशयाचे गेजबुक (पाणी पातळीच्या दैनंदिन नोंदी), टॅंकचार्ट (जलाशयात आलेले पाणी, त्याचे नियोजन व प्रत्यक्ष वापर यांचा महिनावार तपशील दर्शवणारा आलेख), कपॅसिटी टेबल (गाळाचे अतिक्रमण लक्षात घेऊन जलाशयात अमूक पातळीला अमूक येवढे पाणी आहे हे दर्शवणारा तक्ता), बाष्पीभवन व गळती यांचे प्रत्यक्ष मोजमाप व त्यावर आधारित नोंदी, इत्यादि बाबी अत्यावश्यक आहेत.
             लेक टॅपिंग सारखा अभिमानास्पद प्रयोग यशस्वी करणा-या आणि घनमापन पद्धतीने जल व्यवस्थापन करतो म्हणणा-या जल संपदा विभागाच्या बहुसंख्य सिंचन प्रकल्पात आज विश्वासार्ह व अद्ययावत गेजबुक, टॅंकचार्ट, कपॅसिटी टेबल आणि प्रत्यक्ष मोजमापावर आधारित बाष्पीभवन, गळती व प्रवाहमापन याच्या नोंदी नसतात हे दूर्दैवाने उघड गुपित आहे. वर नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार काटेकोरपणॆ पी. आय.पी. केले जात नाहीत. केलेला पी.आय.पी.सक्षम अधिकारी रितसर मंजूर करत नाही. आणि पी.आय.पी. प्रमाणे प्रत्यक्ष अंमलबजावणी कोठेच होत नाही. कालव्यांची दूर्दशा, कायद्याकडे दूर्लक्ष, उपश्याची बेबंदशाही आणि पाणीचोरीचा अतिरेक यामूळे पाणी वाटप व वापरावर नियंत्रण राहत नाही. जल नियमन अशक्य होते. हे सर्व म्हणजे अतिशयोक्ती नाही. वर्षानुवर्षे हे असे होत आहे याचे पुरावे अधिकृत जललेखात उपलब्ध आहेत. विस्तारभयास्तव बाकीचा तपशील व पुरावे देण्याचे येथे टाळले आहे. मार्गदर्शक तत्वानुसार शास्त्रीय पद्धतीने ज्या प्रकल्पात रब्बी,२०११-१२ व उन्हाळा,२०१२ मध्ये पी.आय.पी. केले आहेत त्या प्रकल्पांची यादी प्रस्तुत लेखकाने माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली आहे. १५ मे २०१२ पर्यंत ती मिळेल अशी आशा आहे.
            सार्वजनिक क्षेत्रातील सिंचन प्रकल्प ही एक जलक्षेत्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्था [पी.डी.एस.] आहे. या सिंचन प्रकल्पांच्या जलाशयातील सार्वजनिक मालकीच्या पाण्यावर राज्यातील बागायती शेती, पिण्याच्या पाणी पुरवठा योजना आणि औद्योगीक क्षेत्राकरिताचा पाणीपुरवठा मोठया प्रमाणावर अवलंबून आहे. ग्रामीण तसेच शहरी लोकसंख्येचा लक्षणीय टक्का या सार्वजनिक पाण्याशी संबंधित आहे. या प्रकल्पांचे जल व्यवस्थापन जबाबदारीने व शास्त्रीय पद्धतीने झाले तर परिस्थितीत लक्षणीय फरक नक्की पडेल असा विश्वास वाटतो. हुषार, कार्यक्षम व जबाबदार अभियंत्यांवर विश्वास ठेवला आणि त्यांना त्यांचे शास्त्र अंमलात आणायला संधी दिली तर काय होते याचे उत्तम उदाहरण एकूणच "कोयना विद्यापीठ" व लेक टॅपिंगच्या रूपाने महाराष्ट्रासमोर आहे. त्या धर्तीवर सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन न करता बेसुमार राजकीय हस्तक्षेप व दडपणाखाली केवळ "बंदोबस्त व जुगाड" चालू राहणार असेल तर महाराष्ट्राचे जल-भविष्य उजाड व कोरडे ठणठणीत होणार हे निश्चित. पाणी टंचाई हे अर्धसत्य आहे. जल-व्यवस्थापनाकडे गुन्हेगारी स्वरूपाचे दूर्लक्ष हे मात्र पूर्ण व कटू सत्य आहे. जल संपदा विभागाला म्हणूनच सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तातडीने घेणे ही काळाची गरज आहे.
- प्रदीप पुरंदरे
९८२२५६५२३२          
 (हा लेख मटा विशेष, महाराष्ट्र टाईम्स, मुंबई, मध्ये ६ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाला आहे)        


Thursday, May 3, 2012

वॉटर टेरिफ अर्थात पाणीपट्टी


वॉटर टेरिफ अर्थात पाणीपट्टी
      पाणीपट्टी आकारणीचे नव्या जमान्यातील नाव आहे वॉटर टेरिफ. लाभक्षेत्रे-कुरूक्षेत्रे या सदरात "विधि"लिखित या पहिल्या भागात आपण आजवर सिंचन विषयक विविध कायद्यांची तोंडऒळख करुन घेतली. त्या कायद्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. कायद्यांची अंमलबजावणी न होण्याचा फार मोठा फटका पाणीपट्टी आकारणी व वसुलीला आणि पर्यायाने कालवा देखभाल-दुरूस्तीला बसला आहे. त्याबद्दल व नवीन जल दर निश्चितीबाबत काही तपशील आपण या लेखात पाहू.
      ज.सं.वि. तर्फे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात "सिंचन स्थिती दर्शक अहवाल" प्रसिद्ध केला जातो. सन २०१०-११ चा अहवाल आता उपलब्ध आहे. त्यात "पाणीपट्टी आकारणी व वसुली" बाबत दिलेली माहिती खालील प्रमाणे:  
                                                       (आकडे रू. कोटी मध्ये)

तपशील
सिंचन
बिगर सिंचन
एकूण
मागील थकबाकी व चालू आकारणी धरून एकूण वसूल करावयाची रक्कम
  ६५८.३१
 ११३५.४९
 १७९३.
प्रत्यक्ष वसूली
  ७९.०३
  (१२%)
६६६.८८   (५८.%)
७४५.(४१.%)
मार्च २०११ अखेर थकबाकी
 ५७९.२८
 ४६८.६१
 १०४७.८९
परिरक्षण व दुरुस्तीचा खर्च (आस्थापनेसह)
        -
       -
 ७४५.

       
          सिंचनाची वसूली फक्त १२% तर बिगर सिंचनाची वसूली तुलनेने बरी म्हणजे ६०%. दोन्ही वसूल्यांची एकत्रित टक्केवारी भरते जेमतेम ४२%. मागील वर्षांशी तुलना करता ही आकडेवारी "प्रगती" दर्शवते असे अहवालात ध्वनित केले आहे. फक्त ४२% वसूली असूनही परिरक्षण व दुरुस्तीचा खर्च (आस्थापनेसह) त्यातून भागतो असा दावा करण्यात आला आहे.हे जर खरे असेल तर शासन जादा आकारणी करते आहे का? मग पाणीपट्टीचे दर आता कमी करायचे का? एक हजार कोटीची थकबाकी उदार अंत:करणाने माफ करायची का?  का अधिकारी, कंत्राटदार व पुढारी या प्रामाणिक आघाडी / युतीने काटकसरीने संसार करुन परिरक्षण व दुरुस्तीचा खर्च  (आस्थापनेसह) मोठया कर्तव्य भावनेने अगदी आटोक्यात ठेवला म्हणून हा चमत्कार झाला? आणि त्यामूळे आपले कालवे मग आता एकदम तंदुरूस्त झाले का? खरा प्रकार काय आहे?
      परिरक्षण व दुरुस्तीचा खर्च (आस्थापनेसह) यापोटी दाखवण्यात आलेली रक्कम ही कालव्यांच्या  प्रत्यक्ष गरजे प्रमाणे आलेली रक्कम नाही. तो शासनाने उपलब्ध करून दिलेला निधी आहे. निधीच दिला नाही तर खर्च "आटोक्यात" राहणार हे उघडच आहे. आम्ही वसूलीतून आमचा खर्च भागवतो असे जगाला दाखवण्याच्या अट्टाहासापोटी केलेली ही एक आयडिया आहे एवढेच. वसूली व खर्चाचे आकडे तंतोतंत जुळता आहेत! आस्थापना व प्रत्यक्ष कामे यावर प्रत्येकी किती खर्च झाला(आणि तो खरेच झाला का?) ही फोड मात्र अहवालात दिलेली नाही.
     कायदे, पाणीपट्टी वसुली व देखभाल-दुरुस्ती याकडे दूर्लक्ष झाल्यामूळे पुढचे पाठ मागचे सपाट अशी आज कालव्यांची दशा झाली आहे. वहन व्यय प्रमाणाबाहेर वाढले आहेत. वहनक्षमता निम्म्यावर आल्या आहेत. पाणी-पाळीचा कालावधी महिना दिड महिना एवढा वाढला आहे. पूर्वी रब्बी हंगामात ५-६ पाणी-पाळ्या मिळायच्या. आता मोठया मुश्किलीने २-३ मिळतात. ज्यांच्याकडे विहिर आहे त्यांनाच फक्त त्याचा फायदा होतो आहे. कालवा फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. टेलला पाणी जात नाहीये. कालवे वाईट म्हणून सिंचन सेवा खराब. सिंचन सेवा खराब म्हणून शेतकरी नाराज. शेतकरी नाराज म्हणून वसूली कमी. येनकेन प्रकारे पाणी मिळविण्या करिता शेतक-यांना पाटक-याला पैसे मोजावे लागतात. ते पुन्हा कशाला पाणीपट्टी भरतील? उलट प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरणाराच आजच्या व्यवस्थेत मूर्ख ठरतो.कारण निवडणुका आल्या की राजा थकबाकी माफ करतो. कायद्यात असूनही ३५ मीटरच्या आतील विहिरींवरील पाणीपट्टी का माफ झाली? पैसा नाही म्हणून सदैव तोंड वेंगाडणा-या शासनाने आपल्या उत्पन्नाचा हा स्त्रोत का बंद केला? कुठल्या आर्थिक शिस्तीत बसते हे? म.ज.नि.प्रा.ला विचारले तरी का? ‘तुम्ही लिहित बसा दृष्टीनिबंध, करा घनघोर चर्चा जल दराबद्दल, आम्ही करतो काय करायचे ते’ असा एकूण ज.सं.वि.चा खाक्या आहे.
      आजवर अनेक अहवालातून हे लक्षात आले आहे की, शासनाच्या कायदेकानू प्रमाणे सर्व प्रकारच्या आकारण्या केल्या जात नाहीत. भिजलेले सर्व क्षेत्र व वापरलेले सर्व पाणी हिशेबात येत नाही. भिजलेले क्षेत्र व वापरलेले पाणी मूळात प्रत्यक्ष मोजलेच जात नाही. आकारण्या अचूक नसतात. फार उशीराने होतात. पंचनामे केलेच तर वेळेत मंजूर होत नाहीत. खतावण्या अद्ययावत नसतात. थकबाकीदार नक्की कोण हे देखील काटेकोरपणे सांगणे अवघड होऊन जाते. शेतक-यांना बिले दिली जात नाहीत. शासनाने घालून दिलेल्या वेळापत्रकाची व पाणी पुरवठयासाठी केलेल्या करारांची अंमलबजावणी होत नाही. व्यवस्थापनाची घडी बसलेली नाही. अधिकारी लक्ष देत नाहीत. तपासणी करत नाहीत. अनेक प्रकल्पांवर हे सर्व करण्याकरिता व्यवस्थापनाचा अधिकृत कर्मचारी-वर्गच नाही. असला तर पुरेसा व प्रशिक्षित नाही. राजकीय दडपणे व हस्तक्षेप याचा मात्र महापूर आहे. असा थोडक्यात प्रकार आहे. त्याबद्दल काहीही न करता केवळ जलदर नव्याने ठरविण्यामूळे परिस्थितीत काय फरक पडणार आहे? वसूलीचे नगण्य प्रमाण व म्हणून थकबाकी राहणारच आहे. फक्त त्यांचे नवे आकडे नव्या जलदराने निश्चित केले जातील एवढेच! जलदर हे एकूण जलव्यवस्थापनाचा केवळ एक भाग आहेत. व्यवस्थापनाच्या अन्य महत्वाच्या अंगांकडे दूर्लक्ष झाल्यास जलदर निश्चितीचे नवीन निकष हे जललेखा व बेंचमार्किंग प्रमाणे ज.सं.वि.च्या आलिशान विश्रामगृहातील अजून एक शो पिस ठरण्याचाच धोका जास्त आहे.
      या एकूण खेदजनक पार्श्वभूमिवर आता आपण म.ज.नि.प्रा.च्या जलदर निश्चित करण्याच्या नवीन प्रक्रियेबद्दल काही मुद्दे मांडु. प्रस्तुत लेखकाचा या प्रक्रियेत प्रथमपासून वाल्मीच्या माध्यमातून सहभाग होता. औरंगाबादहून प्रसिद्ध होणा-या ‘जलसंवाद’ मासिकात त्याने "महाराष्ट्रातील पाणीपट्टी आकारणी व वसूलीबाबत थोडेफार किंवा बरेच काही" हा लेख (एप्रिल,२०१०) लिहिला होता. तसेच ९ मे २०१० रोजी म.ज.नि.प्रा.स अधिकृत लेखी निवेदनही उपरोक्त लेखासह सादर केले होते. सर्व तपशील न देता येथे फक्त काही महत्वाचे मुद्दे तेवढे मांडले आहेत.
           म.ज.नि.प्रा. अधिनियम,२००५च्या कलम ११ (घ), (द) व (प) अन्वये म.ज.नि.प्रा.स जलदर निश्चितीचे अधिकार प्राप्त झाले आहेत.पैकी उपकलम (घ) अन्वये म.ज.नि.प्रा.ने जलदर निश्चितीचा एक टप्पा जून २०११ मध्ये पूर्ण केला असून रब्बी हंगाम २०१०-११ पासून नवीन जलदर अंमलात आले आहेत. ते उन्हाळी हंगाम २०१२-१३ पर्यंत वैध राहतील. २०१३-१६ या कालावधीत  जलदर काय असावेत याची प्रक्रियाही उपकलम (प) नुसार सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्य शेतक-यांसाठीच नव्हे तर एकूणच प्रवाही सिंचनाच्या भवितव्याच्या दृष्टीने उपकलम (द) जास्त मूलभूत व महत्वाचे आहे. उपकलम (घ) व (प) ची काळजी घेणारे उपकलम (द) बद्दल किती आग्रही राह्तील याबद्दल मात्र शंका घ्यायला वाव आहे. कारण त्या कलमानुसार "राज्यातील जल व्यवस्थापनाचे कायमस्वरूपी प्रचालन व परिरक्षण तसेच वितरणव्यवस्था यांना कोणत्याही प्रकारे धोका पोहोचू नये याची खातरजमा करण्यासाठी" म.ज.नि.प्रा. व पर्यायाने शासनावर विशिष्ट जबाबदारी टाकण्यात आली आहे. कालव्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल वरील परिच्छेदात जी वस्तुस्थिती मांडण्यात आली त्या पार्श्वभूमिवर ती जबाबदारी खरेच पार पाडली जाणार का? असा प्रश्न पडतो. कारणे खालील प्रमाणे:
(१) आस्थापना खर्चाचा अभ्यास शासनाने वाल्मीस करण्यास सांगितला. वाल्मीने तो संस्थेतल्या अशा प्राध्यापकांना दिला की ज्यांचा त्या विषयाशी संबंधच नव्हता.त्यांनी एक दिव्य अहवाल तयार केला. वाल्मीच्या सचिव दर्जाच्या महासंचालकांनी तो न तपासता शासनाकडे पाठवला. प्रस्तुत लेखकाने १४ सप्टेंबर २००९ साली त्यास आक्षेप घेतला व शासनाच्या निदर्शनास सर्व प्रकार आणून दिला. तो दिव्य अहवाल जलदर निश्चितीचा एक टप्पा पूर्ण झाला तरी अद्याप शासनाच्या "विचाराधीन" आहे.
(२) देखभाल-दुरूस्तीचे सुधारित मापदंड निश्चित करण्याचे कामही शासनाने वाल्मीस दिले. पण अभ्यास योग्य समितीमार्फत तसा बरा झाला. जुलै २००८ मध्ये तो अहवाल वाल्मीने शासनास सादर केला. आजतागायत शासनाने त्या अहवालाबाबतही काही केले नाही. वाल्मीने त्या अहवालात नवीन मापदंड अंमलात आणण्याकरिता एक वेळापत्रक दिले होते.सुधारित मापदंडानुसार काही विशिष्ट दस्तवेज तयार करायचे होते. ते झाले असते तर देखभाल-दुरुस्तीबाबत काही अधिकृत आकडेवारी तयार झाली असती. त्या आधारे मग जास्त काटेकोरपणे जलदर ठरवता आले असते. ते न झाल्यामूळे आज सर्वच मोघम आहे. नव्हे काल्पनिक आहे.
(३) कालव्यातील वहनव्यय मोजायचे कामही वाल्मीच करते आहे. वाल्मीची सद्यस्थिती पाहता त्याचे काय होणार हे सांगणे अवघड आहे.(वाल्मीच्या शेतातील पिकांची उत्पादकता वाढविण्याकरिता सध्या प्रजापिता ब्रम्हकुमारींची मदत घेतली जात आहे हे खरे असेल तर आनंद आहे.)
(४) पाणी व क्षेत्र प्रत्यक्ष न मोजता जललेखा व बेंचमार्किग केले जाते. ते फसवे अहवाल म.ज.नि.प्रा. ग्राह्य धरत आहे.
आस्थापना व देखभाल-दुरूस्तीचा खर्च, वहन व्यय आणि पाण्याच्या हिशेबाबाबत अशी परिस्थिती असताना जलदर निश्चितीचे काम जर "चांगले" चालले असेल तर आपण जलक्षेत्रात "निशाणी डावा अंगठा" चा खेळ तर पाहत नाही ना?
( हा लेख साप्ताहिक "आधुनिक किसान", औरंगाबाद (३ ते ९ मे २०१२) मध्ये प्रसिद्ध झाला आहे)