Wednesday, August 15, 2012

जलक्षेत्राला खालील वस्तुस्थितीचा विसर न पडो!!!


स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!
जलक्षेत्राला खालील वस्तुस्थितीचा विसर न पडो!!!

                 १) जलक्षेत्रात कायद्याचे राज्य नाही

   () महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम,१९७६(.पा..७६) चे नियम ३६ वर्षे झाली तरी अद्याप  
      तयार नाहीत. नदी-नाले, लाभक्षेत्र, उपसा सिंचन, इत्यादिच्या अधिसूचना काढण्याची   
      प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. पाणी चोरी व पाणीनाशाबद्दल गुन्हे दाखल होत नाहीत.
      .पा..७६ ख-या अर्थाने अंमलात नाही.

   () .पा..७६ अंमलात आहे असे गृहित धरून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण
       अधिनियम, २००५ (मजनिप्रा) आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-यांकडून व्यवस्थापन
       अधिनियम,२००५ (मसिंपशेव्य) हे कायदे अंमलात आहेत असा दावा करणे ही केवळ
       आत्मवंचनाच नव्हे तर फसवणूक आहे.

   () ..नि.प्रा. कायद्यातील खालील मूलभूत तरतुदींकडे गेली ७ वर्षे दूर्लक्ष झाले आहे

    ) नदीखोरे अभिकरणे, राज्य जल मंडळ, व राज्य जल परिषद कार्यान्वित करणे;   
      एकात्मिकृत राज्य जल आराखडा तयार करणे; आणि जल आराखडयान्वयेच फक्त
      नवीन प्रकल्पांना मंजू-या देणे
) नदीखो-यातील पाण्याची तूट समप्रमाणात विभागणे
) बारमाही पिकांना ठिबक किंवा तुषार सिंचन बंधनकारक करणे
) तुटीच्या वर्षात लाभक्षेत्रातील जमीनधारकांना किमान एक एकर जमिनीसाठी पाणी देणे
.) सिंचन-अनुशेषग्रस्त जिल्हे व विभागाच्या बाबतीत विशेष जबाबदारी पार पाडणे
) सर्वसमावेशक जलहवामानशास्त्रीय माहिती यंत्रणा राबविणे
) पाण्याचे सूयोग्य संधारण व व्यवस्थापन करण्याच्या पद्धतींचे प्रचालन व
   अंमलबजावणी करणे
) पाणी वापरासंबंधीची आधारसामग्री निर्माण करणे
) पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी आणि औद्योगिक पाणी पुरवठा यांचे नियमन करणे
   व त्याकरिता विनियामक व प्राथमिक विवाद निवारण अधिकारी नेमणे.

   () मसिंपशेव्य कायद्यानुसार उपसा सिंचन योजनांकरिता पाणी वापर संस्था स्थापन केलेल्या
       नाहीत. आणि तरीही प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था मात्र स्थापन करण्यात येत
       आहेत.

   () मसिंपशेव्य कायद्यानुसार स्थापन झालेल्या प्रवाही सिंचन पाणी वापर संस्थांच्या अडचणी
       वर्षानुवर्षे दूर केल्या गेलेल्या नाहीत.

) प्राथमिक सिंचन कार्यक्रम व पाणी-पाळ्यांचे नियोजन आणि एकूणच सिंचन व्यवस्थापनाकडे गुन्हेगारी स्वरूपाचे दूर्लक्ष होत आहे.

) प्राथमिक सिंचन कार्यक्रम (पाण्याचे अंदाज-पत्रक) न करता आणि जलाशयातील गाळ, बाष्पीभवन, गळती; कालव्यातील प्रवाह व वहनव्यय; आणि भिजलेले क्षेत्र प्रत्यक्ष न मोजता जललेखा व बेंचमार्किंग करण्यात येत आहे. हा तद्दन खोटेपणा व चक्क फसवणूक आहे. आणि असली दिव्य आकडेवारी शासन व म..नि.प्रा. ग्राह्य धरत आहेत. केळकर समितीलाही कदाचित हीच आकडेवारी देण्यात आली असण्याची शक्यता आहे.

) वाल्मीने प्रस्तावित केलेले आणि म..नि.प्रा.ने वापरलेले कालवा देखभाल-दुरूस्ती निधी संदर्भातील सुधारित निकष ४ वर्षे झाली तरी अद्याप शासनाने अधिकृतरित्या स्वीकारलेले नाहीत.त्यानुसार प्रत्यक्ष निधी दिलेला नाही.

) कालवा देखभाल-दुरूस्तीकरिता जल संपदा विभागाकडे मॅन्युअल उपलब्ध नाही.

) पाणीपट्टी आकारणी व वसुलीची यंत्रणा कमकुवत आहे. थकबाकी १००० कोटीच्या घरात आहे.

) पाणी वापर संस्था व बिगर सिंचना करिता करारनामे करण्याची प्रक्रिया अर्धवट आहे.

) विविध उद्योगांकरिता करण्यात आलेले जल-आरक्षण त्या त्या उद्योगांना लागणा-या प्रक्रिया-जलाच्या (प्रोसेस-वॉटर) प्रमाणात नाही.

) पाणी मोजण्याची व्यवस्था बहूतेक ठिकाणी उपलब्ध नाही.

१०) प्रवाह व पाणी पातळीचे नियमन करण्यासाठी अभियांत्रिकी व्यवस्था/यंत्रणा उपलब्ध नाही.

११) सिंचन व्यवस्थापन प्रक्रियेचे संगणकीकरण झालेले नाही.

१२) महाराष्ट्र जलसंपत्ती विकास केंद्रातर्फे (..वि.कें.) झालेल्या तपासणीचा/पाहणीचा तपशील
    जाहीर होत नाही. ..वि.कें. च्या अहवालाची/शिफारशींची कोणीही दखल घेत नाही.
    कशातही प्रत्यक्ष सुधारणा होत नाही.

१३) जलक्षेत्रात कायद्याचे राज्य नसले आणि एकूण परिस्थिती वरील प्रमाणे असली तरी त्याबद्दल फारसे काहीही न करता जलदर निश्चिती आणि पाण्याचा व्यापार यावर मात्र अनाठायी व अवास्तव भर देण्यात येत आहे. अनावश्यक व अशोभनीय घाई (ती ही दुष्काळाचे सावट असताना) करण्यात येत आहे

१४) भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बदनाम झालेला जल संपदा विभाग जल व्यवस्थापनाबाबत
    कोणत्याही तात्विक/सैध्दांतिक चर्चा करण्याचा नैतिक अधिकारच गमावून बसला आहे.
    आणि आता तो म..नि.प्रा.ला फक्त ढाल म्हणून वापरतो आहे.

१५) वरील खेदजनक परिस्थितीत जाणीवपूर्वक व कठोर  सुधारणा तातडीने झाल्या नाहीत तर
    कितीही नवीन प्रकल्प आणले आणि पॅकेजेसची खैरात केली तरीही उपयोग होणार नाही.
    जल संपदा विभागाची वाटचाल बहू अवयव विकलांगिता(मल्टी ऑर्गन फेल्युअर) याकडे
    झपाटयाने होत असताना व्हेंटिलेटर (कृत्रिम श्वासोच्छवास) फार काळ उपयोगी पडणार नाही.


Saturday, August 11, 2012

पाण्याशप्पथ, खरे सांगेन!


पाण्याशप्पथ, खरे सांगेन!
 - प्रदीप पुरंदरे, औरंगाबाद मो.९८२२५६५२३२
          सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्प महाराष्ट्राच्या जलक्षेत्रात (वॉटर सेक्टर) एक कळीची भूमिका बजावतात. पाण्याच्या संदर्भात सार्वजनिक वितरण व्यवस्था असे या प्रकल्पांचे स्वरूप आहे. पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी, औद्योगिक पाणी पुरवठा व शेतीचे पाणी या सर्वाकरिता राज्य या सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर मोठया प्रमाणावर अवलंबून आहे. राज्यातील लोकसंख्येच्या लक्षणीय टक्क्याचे दैनंदिन जीवन या प्रकल्पांशी निगडीत आहे. जलसंकट अंधारून आले असताना जलक्षेत्राच्या या महत्वाच्या भागाचा गंभीर व प्रसंगी कठोर आढावा घेण्याची गरज आहे. तसा एक मर्यादित प्रयत्न, विस्तारभयास्तव, फक्त सूत्ररूपाने या लेखात केला आहे. त्यावरून असे दिसते की, पाऊस कमी पडणे आणि जलाशयात पुरेसा जलसाठा नसणे हा संकटाचा केवळ एक भाग आहे. सुलतानी संकट जास्त गंभीर आहे आणि ते गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र होत चालले आहे.

() चितळे आयोगाने केलेल्या व्याख्येनुसार पाहिले तर तथाकथित "पूर्ण" प्रकल्प हे ख-या अर्थाने पूर्ण नाहीत. फक्त बांधकामे नव्हे तर प्रकल्पांशी संबंधित सर्व तांत्रिक-सामाजिक-आर्थिक-कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असते. त्या मूलभूत प्रक्रिया बहूसंख्य प्रकल्पात पूर्ण झालेल्या नाहीत. म्हणून बांधकामे झाली पण प्रकल्प पूर्ण नाहीत अशी अवस्था आहे.

() कालवा व वितरण व्यवस्थेची कामे मोठया प्रमाणावर अर्धवट असताना देखील अमूक एवढी सिंचन क्षमता निर्माण झाली असे घोषित करण्यात येते. प्रत्यक्षातील निर्मित सिंचन क्षमता लक्षणीयरित्या कमी असण्याची शक्यता आहे.

() दैनंदिन सिंचन व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने व कायदेशीरपणे करण्यासाठी ज्या दर्जाचे तपशीलवार आणि अद्ययावत नकाशे आवश्यक असतात तसे नकाशे बहूसंख्य प्रकल्पात उपलब्ध नाहीत.

 () जल संपदा विभागातर्फे दरवर्षी प्रकाशित होणा-या सिंचन स्थितीदर्शक, जल-लेखा व बेंचमार्किंग इत्यादि अहवालातून जलक्षेत्राचे पूर्ण व खरे चित्र उभे राहत नाही. त्यामागची धक्कादायक व दूर्दैवी कारणे पुढील प्रमाणे आहेत. उपलब्ध व विविध हेतूंकरिता वापरलेले पाणी, बाष्पीभवन व कालव्यातील वहनव्यय, आणि भिजलेले  क्षेत्र  प्रत्यक्ष मोजले जात नाही. काही जलाशयातील गाळाच्या अतिक्रमणाचा अभ्यास झाला असला तरी त्याची दखल घेण्यात येत नाही. पाणी चोरीचे प्रमाण भयावह असूनही त्याची अधिकृत नोंद होत नाही.

() लाभक्षेत्रातील जमीनी अ-कृषि ( एन..) होण्याचे आणि सिंचनाचे पाणी बिगर सिंचनाकडे वळवण्याचे (खरे तर पळवण्याचे!) प्रकार मोठया प्रमाणावर होत असले तरी सिंचन क्षमतेचे वास्तववादी पुनर्विलोकन केले जात नाही.

() महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ चे नियम अद्याप केले गेलेले नाहीत. त्या कायद्यान्वये नदीनाल्यांचे व लाभक्षेत्राचे तसेच उपसा सिंचन योजनांचे अधिसूचितीकरण सर्वत्र पूर्ण झालेले नाही. कालवा अधिकारी म्हणून अभियंते कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत. पाणीचोरी हाच नियम असताना कोठेही रितसर गुन्हे दाखल होत नाहीत. उपसा व बिगर सिंचना संदर्भात जे करारनामे केले पाहिजेत ते अनेक प्रकल्पात केले गेलेले नाहीत. जेथे केले आहेत तेथे त्यांची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ आज ख-या अर्थाने अंमलात नाही. त्यामूळे सिंचन व्यवस्थापन करण्याच्या जल संपदा विभागाच्या कायदेशीर अधिकारासच आव्हान दिले जाऊ शकते. तसे झाल्यास, जलक्षेत्रातील  अनागोंदी व यादवीस अधिकृत स्वरूप प्राप्त होईल.

() महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ बाबत वरील प्रमाणे उद्वेगजनक परिस्थिती असताना तो अंमलात आहे असे गृहित धरून व त्याचे बिनदिक्कत संदर्भ देऊन जलक्षेत्राची पुनर्रचना करण्याच्या "महान" हेतूने अजून दोन नवीन कायदे करण्यात आले आहेत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम,२००५ (..नि.प्रा.) आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम,२००५ (मसिंपशेव्य) हे ते दोन कायदे. मजनिप्रा कायद्यानुसार २००५ साली राज्य जल परिषद व राज्य जल मंडळ अस्तित्वात आले आहे. त्यांनी म..नि.प्रा. अधिनियम अंमलात आल्या पासून (जून२००५) ६ महिन्यात एकात्मिकृत राज्य जल आराखडा तयार करणे आणि म..नि.प्रा.ने त्या चौकटीत प्रकल्पांना मान्यता देणे कायद्याने अपेक्षित आहे. आज ७ वर्षांनंतर देखील एकात्मिकृत राज्य जल आराखडा तयार नाही. राज्य जल परिषद व राज्य जल मंडळ यांची स्थापनेपासून बैठकच झालेली नाही. अणि तरीही म..नि.प्रा. नवीन प्रकल्पांना मान्यता देत आहे. वर म्हटल्याप्रमाणे जसे जल संपदा विभागाच्या कायदेशीर अधिकारासच आव्हान दिले जाऊ शकते तसे म..नि.प्रा.बाबतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

() कालवा देखभाल-दुरूस्तीच्या निधीचे सुधारित मापदंड २००८ साली वाल्मीने नेमलेल्या समितीने प्रस्तावित केले होते. जल-दर निश्चितीचे निकष ठरवताना म..नि.प्रा.ने त्यांचा वापरसुद्धा केला आहे. पण जल संपदा विभागाने ४ वर्षे झाली तरी अद्याप सुधारित निकष अधिकृतरित्या स्वीकारलेलेच नाहीत. तेव्हा त्या निकषांप्रमाणे प्रत्यक्ष निधी मिळण्याचा प्रश्नच येत नाही. पुरेशा व नियमित देखभाल-दुरूस्ती अभावी कालवे व वितरण व्यवस्थेची पार वाट लागली आहे. कालव्यांच्या प्रत्यक्ष वहन क्षमता कमी झाल्या आहेत. वहन व्यय प्रमाणाबाहेर वाढले आहेत. प्रकल्पांची कार्यक्षमता २०-२५ टक्क्यांवर आली आहे.

() मसिंपशेव्य अधिनियमान्वये उपसा सिंचना करिता पाणी वापर संस्था स्थापन करणे आवश्यक असताना कायदा होऊन ७ वर्षे झाली तरी त्या संस्था स्थापन झालेल्या नाहीत. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ अन्वये देखील गेल्या ३६ वर्षात उपसा सिंचन योजनांच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामूळे राज्यातील उपसा सिंचन हे सिंचन-कायद्याच्या कक्षेत ख-या अर्थाने अद्याप आलेलेच नाही. प्रवाही विरूद्ध उपसा सिंचन या प्रकल्पा प्रकल्पातील संघर्षात त्यामूळे प्रवाही सिंचनावर अवलंबून असलेले शेतकरी व त्यांच्या पाणी वापर संस्था जलाशयात पुरेसे पाणी असलेल्या वर्षातही पाण्यापासून वंचित राहतात. दुष्काळी वर्षात तर त्यांना कोणीच वाली राहणार नाही.

(१०) पाण्याचे अंदाज पत्रक म्हणजे प्राथमिक सिंचन कार्यक्रम (पी.आय.पी.), पाणी-पाळ्यांचे नियोजन, पाणी वाटपाचे कार्यक्रम व वेळापत्रके, संनियंत्रण व मूल्यमापन आणि पाण्याचे हिशेब/जल-लेखा याकडे सातत्याने अक्षरश: गुन्हेगारी स्वरूपाचे दूर्लक्ष झाले आहे. सर्वसामान्य पर्जन्यमानाच्या वर्षात जलाशय पूर्ण भरले असतानाही लाभक्षेत्रातील ५०-६० टक्के भागाला धड पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. जल संकटाच्या काळात त्यांचे काय होईल याची कल्पनाही करवत नाही.

(११) वर नमूद केलेल्या एकूण विदारक स्थितीमूळे, मोजके अपवाद वगळता, बहूसंख्य पाणी वापर संस्था अयशस्वी ठरल्या आहेत. "मोजून मापून, पाणी-वापर-हक्कांनुसार, घनमापन पद्धतीने वेळेवर पाणी पुरवठा" हास्यास्पद ठरला आहे. पाणी वापर संस्थांना पाण्याऎवजी मोठ्ठे पुरस्कार देऊन गप्प केले जात आहे. जलक्षेत्रात लोकसहभाग वाढावा म्हणून गेली २-३ दशके प्रामाणिक व मूलभूत स्वरूपाचे काम करणा-या एका महत्वाच्या संस्थेने अलिकडेच राज्यातील पाणी वापर संस्थांचा एक व्यापक अभ्यास केला. तो बोलका आहे. त्यातून वस्तुस्थिती पुरेशी स्पष्ट झाली आहे. ..नि.प्रा.ला तो अहवाल सादर करून पाणी वापर संस्थांची संयुक्त पाहणी करण्याचे उघड आव्हानही देण्यात आले आहे. त्याचे पुढे काय होते हे लवकरच स्पष्ट होईल अशी आशा आहे.
      सिंचन व्यवस्थापनाची राज्यात अशी एकूण दारूण अवस्था असताना आणि दुष्काळाचे सावट असताना म..नि.प्रा.मात्र पाण्याचा व्यापार करण्याच्या मागे लागले आहे. "काय करणार? कायद्यात आहे ना - पाण्याचा व्यापार! आमचा नाईलाज आहे. आम्ही कायद्याप्रमाणे जाणार" अशी म..नि.प्रा.ची भूमिका दिसते. ..नि.प्रा. कायद्यात समन्यायी पाणी वाटप व सिंचनाच्या प्रादेशिक समतोलासाठीही तरतुदी आहेत! त्यांचे काय? स्वायत्त नियमन प्राधिकरणाने राजकीय संवेदनशीलता न दाखवणे आणि पाण्याच्या व्यापारासंदर्भात राजाहूनही राजनिष्ठ भूमिका घेणे जागतिक बॅंकेच्या सौजन्याने एकवेळ समजू शकते. पण राज्यात दुष्काळ येऊ घातला असताना पाण्याच्या व्यापारीकरणाची चर्चा व प्रयत्न चालू ठेवणे महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वास मान्य आहे काय?
      जल संकटाला सामोरे जायचे असेल आणि काही मूलभूत कायम स्वरूपी उपाय योजना करायची असेल तर जल संपदा विभागातील भ्रष्टाचाराच्या महापुराबद्दल फक्त बोलत राहणे योग्य नाही. कारण तो समजा जादूने नाहीसा झाला तरी सिंचन व्यवस्थापनात आपोआप सुधारणा संभवत नाही. जल धोरण व कायदे यांच्या तपशीलात जाऊन त्यांच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारावरील आवश्यक पण बेसुमार चर्चेमूळे पाणी वाटपातील अव्वल दर्जाच्या मुद्यांकडे दूर्लक्ष होऊ नये.

     महाराष्ट्रात पाणी प्रश्नावरच्या चर्चेत आजवर पर्यावरण व जल संधारण याबाबतीतला तपशील पुढे आला आहे. त्यामूळे त्या त्या क्षेत्रात काही चांगली कामे उभी राहिली आहेत. हे निश्चितच स्वागतार्ह व अनुकरणीय आहे. आता मोठया सिंचन प्रकल्पांच्या जल व्यवस्थापनाबाबत समाजाने व विशेषत: सुजाण नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांनी तपशीलात जायला हवे कारण प्रस्थापित जल धोरणाचा व त्यावर आधारित राजकारणाचा तो बालेकिल्ला आहे. दुष्काळ निर्मूलन आणि जल-व अन्न-सुरक्षा यासंदर्भात सिंचित शेतीचे महत्व अनन्य साधारण आहे याचा विसर पडू नये.

संदर्भ: )"लाभक्षेत्रे-कुरूक्षेत्रे"या सदरात "आधुनिक किसान, औरंगाबाद" या साप्ताहिकात प्रसिद्ध  
        झालेले लेख, फ़ेब्रुवारी ते ऑगस्ट २०१२.
      ) लेखकाचा ब्लॉग jaagalyaa-the whistleblower.blogspot.in  

 [Published in Maharashtra Times, Mumbai, 12 Aug 2012 & at other places on 19 Aug 2012]




Friday, August 10, 2012

पी. आय. पी. - बिगर सिंचनाचे पाणी


जल वास्तव - १३
पी. आय. पी. - बिगर सिंचनाचे पाणी
     मागील लेखात आपण पी.आय.पी.(पाण्याचे अंदाजपत्रक) संदर्भात पाण्याची उपलब्धता या विषयावर चर्चा केली. आता उपलब्ध पाण्यातून (जमा) विविध वापरांसाठी पाणी वाटपाचे (खर्च) नियोजन कसे केले जाते याबद्दल या सदरात चर्चा सुरु करू. उपलब्ध पाण्यात वाटा मागणारा पहिला एक मोठा तालेवार गडी म्हणजे "बिगर सिंचन"! त्याबद्दल या लेखात मांडणी केली आहे.

        बिगर सिंचनात पिण्याचे, घरगुती वापराचे, औद्योगिक वापराचे तसेच इतर वापराच्या पाण्याचा समावेश होतो. पाणी वाटपाचे महाराष्ट्रातील पहिल्यापासूनचे प्राधान्यक्रम बघितले तर पहिला प्राधान्यक्रम पिण्याच्या पाण्याला( घरगुती पाणी वापरासह), दूसरा औद्योगिक वापराला तर तिसरा प्राधान्यक्रम शेतीला होता. पिण्याच्या पाण्याला पहिला प्राधान्यक्रम मिळणे स्वाभाविक आहे. त्याबद्दल दूमत अथवा वाद नाही. दूस-या प्राधान्यक्रमावर उद्योग असावेत का शेती याबद्दल मात्र वाद आहे. महाराष्ट्रात उद्योगांना पाणीवाटपात प्रथमपासूनच जो दूसरा प्राधान्यक्रम होता त्यामागची कारणे खालील प्रमाणे:

() शेतीच्या तूलनेत उद्योगांकरिता लागणारे पाणी खूप कमी असते. औद्योगिक पाणी वापराच्या मागणीचे स्वरूप तूलनेने काटेकोर असते. त्यात अचानक व मोठे बदल होत नाहीत. हवामान, पिकरचना, शेतीखालील क्षेत्र यात नेहेमी मोठे बदल होतात. त्याबदलांनुसार येणारी पाण्याची मागणी (ती निश्चित करण्याचे मार्ग अनेक आहेत व येणारी उत्तरेही खूप वेगवेगळी आहेत) प्रथम पूर्ण करून मगच उरलेले पाणी उद्योगांना द्यायचे म्हटले तर अभूतपूर्व गोंधळ होईल. महाराष्ट्र हे औद्योगिक दृष्टया पुढारलेले राज्य आहे. आपल्या औद्योगिक क्षेत्राचा विस्तार फार मोठा आहे. पाण्याबाबत तेथे अनिश्चितता ठेवणे घातक हॊईल.

() अनेक कारखान्यातील विविध औद्योगिक प्रक्रिया खंड न पाडता सतत/अव्याहत चालू ठेवाव्या लागतात. पाणी पुरवठयातील अनिश्चितता औद्योगिक उत्पादनात गंभीर बाधा आणू शकते. त्याचे परिणाम शेतीसह सर्व व्यवस्थेवर होतील.

() वीज निर्मिती व कृषि-उद्योग सतत चालू राहणे हे कृषि-क्षेत्रासही फायद्याचे असते. उपसा सिंचन योजना व विहिरींवरील सिंचनास तसेच कोल्ड स्टोरेजेस इत्यादीसाठी वीज आवश्यक आहे. शेतीमालावर प्रक्रिया झाली तर शेतीमालाचे मूल्य वाढते.
() औद्योगिक पाणी वापराची पाणीपट्टी शेतीच्या तूलनेत खूप जास्त आहे. सिंचन प्रकल्पांच्या व्यवस्थापन व देखभाल-दुरूस्तीकरिता जो निधी लागतो तो प्रामुख्याने "त्या" पाणीपट्टीतून येतो. ती क्रॉस सबसिडी जलक्षेत्रासाठी महत्वाची आहे.

() शेतीच्या तूलनेत औद्योगिक क्षेत्रातील पाण्याची उत्पादकता खूप जास्त आहे
वरील कारणे व तर्क खरे तर कोणाही सूज्ञांस पटण्यासारखा आहे. मग तरीही प्राधान्यक्रमावरून हलकल्लोळ का झाला? शासनाने इतक्या वर्षांचा प्राधान्यक्रम इतक्या सहजासह्जी कसा काय बदलला?

     २००२ सालच्या राष्ट्रीय जलनीतीत केंद्राने शेतीला दूसरा प्राधान्यक्रम दिला आहे. २००३ सालच्या महाराष्ट्राच्या जलनीतीत राज्यातील प्रथेनुसार शेतीला  तिसरा प्राधान्यक्रम देण्यात आला होता. जलक्षेत्रा बाबत (अनेक रास्त कारणांमूळे!) गेली अनेक वर्षे जो असंतोष व असमाधान सर्वत्र वाढीस लागले आहे त्या पार्श्वभूमिवर जलक्षेत्रातील बिगर शासकीय अभ्यासकांना ही विसंगती लगेच व तीव्रतेने जाणवली. त्यांनी तो मुद्दा लावून धरला. तेव्हा अमरावतीला सोफिया व नाशिकला इंडिया बुल्स अशी प्रकरणे चालू होती. उच्चाधिकार समितीने बिगर सिंचनाला दिलेले पाणी वादग्रस्त झाले होते. प्रसार माध्यमात व विधान मंडळात सतत चर्चा होती. न्यायालयीन प्रकरणांचा दबाव होता. शासनाला म..नि.प्रा.कायद्यात सुधारणा करायची होती. अशा सर्व बाबींच्या एकत्रित परिणामामूळे शासनाने चलाखी केली आणि प्राधान्यक्रम बदलण्याची घोषणा केली. विरोधातील हवा काढून टाकणे एवढाच फक्त त्यामागे हेतू होता. ती घोषणा अद्याप अंमलात आलेली नाही. वर नमूद केलेल्या कारणांमूळे भविष्यातही येणार नाही. तेव्हा जलाशयातील एकूण उपलब्ध पाण्यातून पिण्याचे व औद्योगिक वापराचे पाणी वजा केल्यावर शिल्लक राहिलेले पाणी शेतीला देण्याचे नियोजन पी.आय.पी.त आजही केले जात आहे.

       पी.आय.पी. करताना औद्योगिक पाणी वापरावर काही अंशी निर्बंध आणणे व त्यांस शिस्त लावणे मात्र शक्य आहे. ते खालील प्रकारे करता येईल:

पाणी मागणी करणा-या प्रत्येक कारखान्याची/एजन्सीची माहिती खालील नमून्यात संकलित करून पाणी कपातीबाबत निर्णय घेता येतील.

कारखाना / एजन्सी
करारनामा केला आहे का? नुतनीकरण केले आहे का?
पाणीपट्टीची थकबाकी आहे का?
प्रवाहमापकवॉटर मीटर आहे का?
शासनमान्य आरक्षण
(दलघमी)
गेल्या पाच वर्षातील सरासरी पाणी मागणी (दलघमी)
गेल्या पाच वर्षातील सरासरी प्रत्यक्ष पाणी वापर
(दलघमी)













      करारनामा न करणे/त्याचे नुतनीकरण न करणे वा थकबाकीदार असणे ही कारणे पाणी पुरवठा बंद करण्यासाठी पुरेशी आहेत. सामान्य शेतक-याला जो नियम लावला जातो तो उद्योजकांनाही लावला गेला पाहिजे. कायद्यापुढे सर्व समान असतात! पाणी टंचाई असेल तर कायदेकानू न पाळणा-यांना पाणी नाकारणे वैध ठरू शकते. नव्हे ते केलेच पाहिजे. अन्यथा, नियम पाळणा-यांवर अन्याय होईल. वरील तक्त्यात संकलित केलेली माहिती दर वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध झाल्यास आवश्यक तो सामाजिक दबाव निर्माण होईल.

       जल संपदा विभागाचे करारनाम्याचे मसुदे चांगले आहेत. त्यात अनेक अंगाने विचार झाला आहे. फक्त ते म्हणावे तसे अंमलात आणले जात नाहीत. अनेक वेळा ते मूळात केलेच जात नाहीत. पाणी चोरी काही फक्त शेतकरीच करत नाहीत. औद्योगिक क्षेत्राचे या बाबतीतले उद्योग अजून बाहेर आलेले नाहीत एवढेच.

       भविष्यातील गरज लक्षात घेऊन पाणी आरक्षित केले जाते. आज तेवढे पाणी लागतेच असे नाही. तेव्हा या वर्षी जेवढे पाणी लागेल तेवढेच पी.आय.पी.त धरता येईल.

       प्रवाह मापक/वॉटर मीटर मूळातच नसणे वा ते नादुरूस्त असणे हा प्रकार फार मोठया प्रमाणावर सर्वत्र आहे. पाणी देणारा जल संपदा विभाग बहुसंख्य प्रकरणी पाणी स्वत: प्रत्यक्ष मोजतच नाही. पाणी वापरणारा म्हणतो मी एवढे पाणी वापरले. ही पहा माझी नोंदवही. जल संपदा विभाग "तो" पाणी वापर ग्राह्य धरतो. पाण्याचे काटेकोर व विश्वासार्ह मोजमाप झाले तर अनेक धक्कादायक सत्ये उघडकीस येतील.

       ..नि.प्रा.ने आता प्रत्येक प्रकारच्या उद्योगाला किती पाणी लागते याचे निकष ठरवले आहेत. त्या निकषांनुसार औद्योगिक वापराचे पाणी प्रकल्पनिहाय नव्याने निश्चित केले पाहिजे. आरक्षणात त्याप्रमाणे सुधारणा केली पाहिजे. औद्योगिक क्षेत्राने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास औद्योगिक वापराची पाण्याची गरज मोठया प्रमाणावर कमी होऊ शकते हा तपशीलही आपण यापूर्वी (अंक २३, १२ ते १८ जुलै २०१२) पाहिला आहेच. या दोहोमूळे मूळे कदाचित शेती करिता जास्त पाणी उपलब्ध होऊ शकेल. कृषि क्षेत्रातील सजग नेतृत्वाने आता त्यासाठी आग्रह धरला पाहिजे.

 [ Published in Weekly "Aadhunik Kisan", Aurangabad,9 to 15 Aug 2012]

Tuesday, August 7, 2012

महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थापनाची दूर्दशा / राज्य जल मंडळ व राज्य जल परिषदेची बैठक बोलावण्याबाबत


प्रदीप पुरंदरे
BE (Civil) ME (WUM) स्वेच्छा-सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद.
                                  जलक्षेत्रातील मुक्त अभ्यासक, प्रशिक्षक व समुपदेशक
(सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन, पाणी वापर संस्था व सिंचन कायदे)
दूरध्वनी:०२४०-२३४११४२, मो. ९८२२५६५२३२, ८९८३५२८६४० ई-मेल: pradeeppurandare@gmail.com
बी-१२, प्राईड टॉवर्स, वेदांतनगर, तिवारी मंगल कार्यालयाजवळ, एम.आय.डी.सी. रेल्वे स्टेशन, औरंगाबाद ४३१००५
दिनांक ७ ऑगस्ट २०१२
प्रति,
) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य पदसिद्ध अध्यक्ष, राज्य जल परिषद
) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य पदसिद्ध अध्यक्ष, राज्य जल मंडळ

    विषय: महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थापनाची दूर्दशा /
          राज्य जल मंडळ व राज्य जल परिषदेची बैठक बोलावण्याबाबत

    संदर्भ: ) "सिंचन प्रकल्पांची दैना", दै.दिव्य मराठी, औरंगाबाद, दि...२०१२
         ) "फसवा जल लेखा", दै. लोकसत्ता, मुंबई, दि.२२..२०१२
         ) "काटेकोर व्यवस्थापनाची गरज", दै. महाराष्ट्र टाईम्स, औरंगाबाद, दि...२०१२
         ) "केवळ बंदोबस्त अन जुगाड", दै. महाराष्ट्र टाईम्स, औरंगाबाद, दि...२०१२
                ) "पी.आय.पी." संदर्भातील जल संपदा मंत्र्यांना लिहिलेले पत्र, दि...२०१२
         ) "पाण्याचे गौडबंगाल उघड करणारे गेज रजिस्टर गायब
                    ‘मांजरातील पाणीवाटप चौकशीचे प्रकरण", दै. सकाळ, औरंगाबाद, दि...२०१२
                 (सुलभ संदर्भाकरिता क्र.१ ते ६ च्या प्रती सोबत जोडल्या आहेत)
         ) "लाभक्षेत्रे-कुरूक्षेत्रे" या सदरातील माझी लेखमालासाप्ताहिक आधुनिक किसान
             औरंगाबाद, ९ फेब्रुवारी २०१२ पासून
         jaagalyaa-thewhistleblower.blogspot.in  या माझ्या ब्लॉग वरील लिखाण

 महोदय,

       प्रारंभिक सिंचन कार्यक्रम म्हणजे पी.आय.पी. संदर्भातील जल संपदा विभागाची मार्गदर्शक तत्वे, अद्ययावत टॅंक चार्ट, अद्ययावत कपॅसिटी टेबल, त्या त्या प्रकल्पात प्रत्यक्ष मोजलेले बाष्पीभवन-व्यय, जलाशय व वितरण व्यवस्थेच्या त्या त्या प्रकल्पात प्रत्यक्ष मोजलेल्या कार्यक्षमता, अधिकृत करारनाम्यांवर आधारित बिगर सिंचनाची मागणी, अधिकृतरित्या मंजूर केलेला पीआयपी, स्थळ, काळ व परिस्थितीला न्याय देणारे पाणी-पाळीचे कार्यक्रम, प्रामाणिक जल लेखा आणि सिंचन कायदा या सर्वांआधारे आधारे राज्यातील बहूसंख्य सिंचन प्रकल्पात सिंचन व्यवस्थापन कसे होत नाही यावर संदर्भीय लेख, पत्र, बातमी, लेखमाला व ब्लॉग पुरेसा प्रकाश टाकतात असे वाटते. महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थापनाची आज दूर्दशा झाली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. राज्य दुष्काळाच्या सावटाखाली असताना सिंचन व्यवस्थापनाची ही दशा मन विषण्ण करणारी आहे.
      २००५ साली विधिवत अस्तित्वात आलेल्या राज्य जल मंडळ व राज्य जल परिषदेची बैठक बोलावून पाणी प्रश्नावर एका व्यापक व सखोल विचार विनिमयाची प्रक्रिया वरील पार्श्वभूमिवर नव्याने सुरू करावी ही नम्र विनंती.

धन्यवाद.
आदराने,
आपला विश्वासू,


(प्रदीप पुरंदरे)
सोबत: वरील प्रमाणे

प्रत माहितीकरिता सविनय सादर

 मा. अध्यक्ष, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई
    

( All references are available on my blog. Hence, not given here again)
  






Monday, August 6, 2012

सिंचनाचा प्रादेशिक अनुशेष व कायदा


प्रदीप पुरंदरे
BE (Civil) ME (WUM) स्वेच्छा-सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद.
जलक्षेत्रातील मुक्त अभ्यासक, प्रशिक्षक व समुपदेशक
(सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन, पाणी वापर संस्था व सिंचन कायदे)
दूरध्वनी:०२४०-२३४११४२, मो. ९८२२५६५२३२, ८९८३५२८६४० ई-मेल: pradeeppurandare@gmail.com
बी-१२, प्राईड टॉवर्स, वेदांतनगर, तिवारी मंगल कार्यालयाजवळ, एम.आय.डी.सी. रेल्वे स्टेशन, औरंगाबाद ४३१००५
Blog: jaagalyaa-thewhistleblower.blogspot.in

दिनांक ६ ऑगस्ट २०१२
प्रति,
मा.राज्यपाल
महाराष्ट्र शासन,
राज भवन, मलबार हिल, मुंबई-४०००३५

विषय: सिंचनाचा प्रादेशिक अनुशेष व कायदा

संदर्भ: () माझे पत्र दि. १० एप्रिल २०१२
      () माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत म..नि.प्रा.कडे मागण्यात आलेली माहिती,  
          दि.१३ एप्रिल २०१२
      () ..नि.प्रा. चे पत्र क्र. MWRRA/IR/2012/255 dt.24 April 2012
           () "श्री.मधुकरराव किंमतकर यांचा दावा" दै.सकाळ मधील बातमी, दि.५ ऑगस्ट २०१२
     
महोदय,

() विधिमंडळाने नेमलेल्या अधिकृत विशिष्ट यंत्रणेने (म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, राज्य जल परिषद, राज्य जल मंडळ यांनी) सिंचनाच्या प्रादेशिक अनुशेषाबाबत आजवर आपली कायदेशीर जबाबदारी (..नि.प्रा, अधिनियम,२००५ मधील कलम क्र. ११(), १२(), १५, १६, २१ अन्वये) कशा रीतीने पार पाडली याचा तपशील कृपया सत्वर जाहीर करण्याची व्यवस्था करावी अशी नम्र विनंती मी आपणास संदर्भ क्र.१ अन्वये केली होती.

() विषयांकीत बाबतीत संदर्भ क्र.२ अन्वये मी माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत म..नि.प्रा.कडेही माहिती मागितली होती..नि.प्रा.ने संदर्भ क्र.३ अन्वये त्यास उत्तर दिले आहे.

() आता "मराठवाडा, विदर्भाचे ७० हजार कोटी पळविले!" असा श्री.मधुकरराव किंमतकर यांचा आरोप दै. सकाळ मध्ये प्रकाशित झाला आहे (संदर्भ क्र.).

संदर्भ क्र.१ ते ४ च्या प्रती सुलभ संदर्भा करिता सोबत सादर केल्या आहेत.

या एकूण पार्श्वभूमिवर सिंचनाच्या प्रादेशिक अनुशेषाबाबत आजवर आपली कायदेशीर जबाबदारी म..नि.प्रा.ने कशा रीतीने पार पाडली याचा तपशील कृपया सत्वर जाहीर करण्याची व्यवस्था करावी अशी नम्र विनंती मी पुन्हा एकदा आपणास करत आहे.

धन्यवाद.
आदराने,
आपला विश्वासू,


(प्रदीप पुरंदरे)

सोबत: वरीलप्रमाणे

प्रत माहिती करिता सविनय सादर

(१)      मा. अध्यक्ष, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई

(२)     मा. अध्यक्ष, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, औरंगाबाद

(३)     मा. अध्यक्ष, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपुर

   ()   मा. अध्यक्ष, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबई