Saturday, February 9, 2013

Letter to Sh.Sharad Pawar & CM, Maharashtra


                                                                                                              औरंगाबाद
९ फेब्रुवारी २०१३
प्रति,
मा.श्री. शरदरावजी पवार,
केंद्रिय कृषि मंत्री,
 आणि
मा.श्री. पृथ्वीराजजी चव्हाण,
महाराष्ट्र शासन

 स.न.वि.वि.
 सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय लघु, मध्यम व मोठया सिंचन प्रकल्पांचा दुष्काळाच्या  पार्श्वभूमिवर  गंभीर व प्रसंगी कठोर आढावा घेण्याची गरज आहे याकडे आपले लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. तसा आढावा घेण्याचा एक मर्यादित प्रयत्न  सूत्ररूपाने येथे केला आहे.  त्याचा विचार व्हावा ही नम्र विनंती.

(१) चितळे आयोगाने केलेल्या व्याख्येनुसार पाहिले तर तथाकथित "पूर्ण" प्रकल्प हे ख-या अर्थाने पूर्ण नाहीत. फक्त बांधकामे नव्हे तर प्रकल्पांशी संबंधित सर्व तांत्रिक-सामाजिक-आर्थिक-कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असते. त्या मूलभूत प्रक्रिया बहूसंख्य प्रकल्पात पूर्ण झालेल्या नाहीत.  बांधकामे झाली पण प्रकल्प पूर्ण नाहीत अशी अवस्था असल्यामूळे सिंचन प्रकल्पांचे सर्व अपेक्षित लाभ सर्वांना मिळालेले नाहीत.

(२) कालवा व वितरण व्यवस्थेची कामे आणि विशेषत: शेतचा-यांची कामे  मोठया प्रमाणावर अर्धवट असताना किंबहुना, झालेलीच नसताना  अमूक एवढी सिंचन क्षमता निर्माण झाली असे फक्त घोषित करण्यात येते. प्रत्यक्षातील निर्मित सिंचन क्षमता लक्षणीयरित्या कमी असण्याची शक्यता आहे. तीस तीस वर्षे रेंगाळलेले / रखडलेले बांधकामाधीन प्रकल्प वेळीच पूर्ण झाले असते तर जल साठयात लक्षणीय भर पडली असती. दुष्काळाची तीव्रता कमी झाली असती.

(३) दैनंदिन सिंचन व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने व कायदेशीरपणे करण्यासाठी ज्या दर्जाचे तपशीलवार आणि अद्ययावत नकाशे आवश्यक असतात तसे नकाशे बहूसंख्य प्रकल्पात उपलब्ध नाहीत. अनेक प्रकल्पात प्रत्यक्ष लागवडीयुक्त  लाभक्षेत्र (सी.सी.ए.) हे घोषित क्षेत्रापेक्षा कमी असण्याचीच शक्यता दाट आहे.

 (४) जल संपदा विभागातर्फे दरवर्षी प्रकाशित होणा-या सिंचन स्थितीदर्शक, जल-लेखा व बेंचमार्किंग इत्यादि अहवालातून जलक्षेत्राचे पूर्ण व खरे चित्र उभे राहत नाही. कारण  उपलब्ध व विविध हेतूंकरिता वापरलेले पाणी, बाष्पीभवन व कालव्यातील वहनव्यय, आणि भिजलेले  क्षेत्र  प्रत्यक्ष मोजले जात नाही. काही जलाशयातील गाळाच्या अतिक्रमणाचा अभ्यास झाला असला तरी त्याचीसुद्धा दखल घेण्यात येत नाही. पाणी चोरीचे प्रमाण भयावह असूनही त्याची अधिकृत नोंद होत नाही.

(५) खरीप व रब्बी पिकांऎवजी उन्हाळी व बारमाही पिकांखालचे क्षेत्र वाढल्यामूळे - त्यांना जास्त पाणी लागत असल्यामूळे - एकूण सिंचित क्षेत्र कमी होते. राज्यातील उसाखालील एकूण क्षेत्रापैकी सरासरी ५४% क्षेत्र सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात असल्यामूळे विषमता प्रचंड वाढली आहे. पाण्याच्या बेसुमार व गैरवापरामूळे दुष्काळाला  आपण जणू कायमस्वरूपी आमंत्रणच दिले आहे.

(६) लाभक्षेत्रातील जमीनी अ-कृषि ( एन.ए.) होण्याचे आणि सिंचनाचे पाणी बिगर सिंचनाकडे वळवण्याचे  प्रकार मोठया प्रमाणावर होत असले तरी सिंचन क्षमतेचे वास्तववादी पुनर्विलोकन केले जात नाही.

(७)  जायकवाडीसाठी वरच्या धरणातून पाणी सोडण्या संदर्भात एक जनहित याचिका करण्यात आली आहे. पाणी उपलब्धतेच्या सुधारित अंदाजानुसार गोदावरी खो-यात पैठण धरणापर्यंत पूर्वी गृहित धरल्यापेक्षा ४० टि.एम.सी. पाणी "आता" कमी उपलब्ध आहे असे  विधान त्या प्रकरणी शासनाने प्रतिज्ञापत्राद्वारे केले आले आहे असे म्हटले जाते. ते खरे असेल तर त्याच तर्काने महाराष्ट्रातील अन्य नदी खो-यातील पाणी उपलब्धतेबाबतही साहजिकच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते.

(८) महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ चे नियम अद्याप केले गेलेले नाहीत. त्या कायद्यान्वये नदीनाल्यांचे व लाभक्षेत्राचे तसेच उपसा सिंचन योजनांचे अधिसूचितीकरण सर्वत्र पूर्ण झालेले नाही. कालवा अधिकारी म्हणून अभियंते कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत. पाणीचोरी बद्दल कोठेही रितसर गुन्हे दाखल होत नाहीत. उपसा व बिगर सिंचना संदर्भात जे करारनामे केले पाहिजेत ते अनेक प्रकल्पात केले गेलेले नाहीत. जेथे केले आहेत तेथे त्यांची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. ७६चा कायदा आज ख-या अर्थाने अंमलात नाही. त्यामूळे सिंचन व्यवस्थापन करण्याच्या जल संपदा विभागाच्या कायदेशीर अधिकारासच आव्हान दिले जाऊ शकते. तसे झाल्यास, जलक्षेत्रातील  अनागोंदी व यादवीस अधिकृत स्वरूप प्राप्त होईल.

(९) ७६च्या कायद्या बाबत अशी उद्वेगजनक परिस्थिती असताना तो अंमलात आहे असे गृहित धरून  जलक्षेत्राची पुनर्रचना करण्याच्या  हेतूने अजून दोन नवीन कायदे करण्यात आले आहेत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम,२००५ (म.ज.नि.प्रा.) आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम,२००५ (मसिंपशेव्य- पाणी वापर संस्थांसाठीचा कायदा) हे ते दोन कायदे. मजनिप्रा कायद्यानुसार २००५ साली राज्य जल परिषद व राज्य जल मंडळ अस्तित्वात आले आहे. त्यांनी म.ज.नि.प्रा. अधिनियम अंमलात आल्या पासून (जून२००५) महिन्यात एकात्मिकृत राज्य जल आराखडा तयार करणे आणि म.ज.नि.प्रा.ने त्या चौकटीत प्रकल्पांना मान्यता देणे कायद्याने अपेक्षित आहे. आज ८ वर्षांनंतर देखील एकात्मिकृत राज्य जल आराखडा तयार नाही. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्य जल परिषद व मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्य जल मंडळ यांची स्थापनेपासून बैठकच झालेली नाही. अणि तरीही म.ज.नि.प्रा. नवीन प्रकल्पांना मान्यता देत आहे. जसे जल संपदा विभागाच्या कायदेशीर अधिकारासच आव्हान दिले जाऊ शकते तसे म.ज.नि.प्रा.बाबतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(१०) कालवा देखभाल-दुरूस्तीच्या निधीचे सुधारित मापदंड २००८ साली वाल्मीने नेमलेल्या समितीने प्रस्तावित केले होते. पाणीपट्टीचे नवीन निकष ठरवताना म.ज.नि.प्रा.ने त्यांचा वापरसुद्धा केला आहे. पण जल संपदा विभागाने ५ वर्षे झाली तरी अद्याप सुधारित निकष अधिकृतरित्या स्वीकारलेलेच नाहीत. तेव्हा त्या निकषांप्रमाणे प्रत्यक्ष निधी मिळण्याचा प्रश्नच येत नाही. पुरेशा व नियमित देखभाल-दुरूस्ती अभावी कालवे व वितरण व्यवस्थेची पार वाट लागली आहे. कालव्यांच्या प्रत्यक्ष वहन क्षमता कमी झाल्या आहेत. वहन व्यय प्रमाणाबाहेर वाढले आहेत. प्रकल्पांची कार्यक्षमता २०-२५ टक्क्यांवर आली आहे.

(११)  पाणी वापर संस्थांसाठीच्या नवीन कायद्यान्वये उपसा सिंचना करिता पाणी वापर संस्था स्थापन करणे आवश्यक असताना कायदा होऊन ८ वर्षे झाली तरी त्या संस्था स्थापन झालेल्या नाहीत. ७६च्या कायद्यान्वये देखील गेल्या ३७ वर्षात उपसा सिंचन योजनांच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामूळे राज्यातील उपसा सिंचन हे सिंचन-कायद्याच्या कक्षेत ख-या अर्थाने अद्याप आलेलेच नाही. प्रवाही विरूद्ध उपसा सिंचन या प्रकल्पा प्रकल्पातील संघर्षात त्यामूळे प्रवाही सिंचनावर अवलंबून असलेले शेतकरी व त्यांच्या पाणी वापर संस्था जलाशयात पुरेसे पाणी असलेल्या वर्षातही पाण्यापासून वंचित राहतात. दुष्काळी वर्षात तर त्यांना कोणीच वाली राहणार नाही.

(१२) पाण्याचे अंदाज पत्रक म्हणजे प्राथमिक सिंचन कार्यक्रम (पी.आय.पी.), पाणी-पाळ्यांचे नियोजन, पाणी वाटपाचे कार्यक्रम व वेळापत्रके, संनियंत्रण व मूल्यमापन आणि पाण्याचे हिशेब/जल-लेखा याकडे सातत्याने अक्षरश: गुन्हेगारी स्वरूपाचे दूर्लक्ष झाले आहे. सर्वसामान्य पर्जन्यमानाच्या वर्षात जलाशय पूर्ण भरले असतानाही लाभक्षेत्रातील ५०-६० टक्के भागाला धड  पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. जल संकटाच्या काळात त्यांचे काय होईल याची कल्पनाही करवत नाही.

(१३) अशा एकूण विदारक स्थितीमूळे, मोजके अपवाद वगळता, बहूसंख्य पाणी वापर संस्था अयशस्वी ठरल्या आहेत. "मोजून मापून, पाणी-वापर-हक्कांनुसार, घनमापन पद्धतीने वेळेवर पाणी पुरवठा" हा शासकीय दावा हास्यास्पद ठरला आहे. पाणी वापर संस्थांना पाण्याऎवजी मोठ्ठे पुरस्कार देऊन गप्प केले जात आहे. जलक्षेत्रात लोकसहभाग वाढावा म्हणून गेली २-३ दशके प्रामाणिक व मूलभूत स्वरूपाचे काम करणा-या एका महत्वाच्या संस्थेने अलिकडेच राज्यातील पाणी वापर संस्थांचा एक व्यापक अभ्यास केला. तो बोलका आहे. त्यातून वस्तुस्थिती पुरेशी स्पष्ट झाली आहे. म.ज.नि.प्रा.ला तो अहवाल सादर करून पाणी वापर संस्थांची संयुक्त पाहणी करण्याचे उघड आव्हानही देण्यात आले आहे.  ते अद्याप स्वीकारले गेलेले नाही.

 सिंचन व्यवस्थापनाची राज्यात अशी एकूण दारूण अवस्था असताना आणि त्यामूळे दुष्काळ असताना म.ज.नि.प्रा.मात्र पाण्याचा व्यापार करण्याच्या मागे लागले आहे. "काय करणार? कायद्यात आहे ना - पाण्याचा व्यापार! आमचा नाईलाज आहे. आम्ही कायद्याप्रमाणे जाणार" अशी म.ज.नि.प्रा.ची भूमिका दिसते. म.ज.नि.प्रा. कायद्यात समन्यायी पाणी वाटप व सिंचनाच्या प्रादेशिक समतोलासाठीही तरतुदी आहेत! त्यांचे काय? जायकवाडीसाठी वरच्या धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात म.ज.नि.प्रा.ने घेतलेली निव्वळ वकिली भूमिकाही कायद्याच्या मूळ हेतूला चक्क काळिमा फासणारी आहे.
    
आज खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचा जमाना आहे. शेतीचे कंपनीकरण होऊ घातले आहे. एफ डी आय, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, इत्यादी गोष्टी येता आहेत. पण चेल्याचपाट्यांची (क्रोनी) भांडवलशाही एकीकडे जोरात आहे तर दुसरीकडे सरंजामशाही अजून संपलेली नाही. जल व कृषी क्षेत्र एका संक्रमणावस्थेतून जात आहे.  या सर्व पार्श्वभूमिवर सिंचन घोटाळ्याचे व त्यातून उदभवलेल्या दुष्काळाचे सखोल व समग्र  सामाजिक- राजकीय विश्लेषण होणे गरजेचे आहे.

जलक्षेत्रातील  परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनाने नवीन जलनीती आणली. त्यानुसार कायदे केले. पाणी वापर हक्कांची संकल्पना मांडली. पाणी वापर हक्क हस्तांतरणीय व विक्रीयोग्य केले. राज्य जल मंडळ, राज्य जल परिषद, नदी खोरे अभिकरणे आणि महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरण अशा नवीन व्यासपीठांची   विधिवत स्थापना केली. एकात्मिकृत राज्य जल आराखड्याच्या आदर्श गप्पा मारल्या. जलक्षेत्रात सुधारणा करणारे पहिले राज्य म्हणुन डांगोरा पिटला. हे सगळे करणार असे सांगून जागतिक बॅंकेकडून निधी मिळवला. आणि एकदा निधी मिळाल्यावर काहीही केले नाही. सुधारणा अर्धवट सोडल्या. जलनीती व सुधारित अग्रक्रम कागदावरच राहिले. नियमांविना कायदे अंमलात आले नाहीत. राज्य जल मंडळ व राज्य जल परिषद यांची एकही बैठक गेल्या आठ वर्षात झाली नाही. नदी खोरे अभिकरण म्हणून पाटबंधारे विकास महामंडळे कार्यरत झाली नाहीत.   सहा महिन्यांचा वायदा असताना  एकात्मिकृत राज्य जल आराखडा आठ वर्षे झाली तरी अद्याप अवतरलेला नाही. जलविकास व व्यवस्थापनाची घॊषित कायदेशीर चौकट  आकारालाच आली नाही.  सिंचन घोटाळा या पार्श्वभूमिवर झाला आहे. दुष्काळाचे  सुलतानी कारण हे असे आहे.

 जलक्षेत्रातील अभियांत्रिकी व व्यवस्थापकीय वास्तव एकविसाव्या शतकाला साजेसे नाही. अठराव्या शतकातील तंत्रज्ञान व मानसिकता या आधारे आपले आजचे पाणी प्रश्न सुटणार नाहीत.  सिंचन घोटाळ्यातून व दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर जलक्षेत्रात आज  कायद्याच्या राज्याची, आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापनाची आणि  सक्षम व कठोर  नियमनाची गरज आहे. समन्यायी जल विकास व वाटपाची आवश्यकता आहे. अन्यथा, पाण्यासाठी दाही दिशा उध्वस्त फिरणा-या  जलवंचितांचेच नव्हे  तर शेतकरी, शहरी व ग्रामीण नागरिक व उद्योजक असे सर्वांचेच जल-भविष्य धोक्यात आहे.

अधिक काय लिहावे? 

दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर आपण सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय लघु, मध्यम व मोठया सिंचन प्रकल्पांचा   गंभीर व प्रसंगी कठोर आढावा महाराष्ट्राच्या व्यापक जनहितास्तव घ्यावा ही नम्र विनंती.
धन्यवाद.
आदराने,
आपला नम्र,
- प्रदीप पुरंदरे
स्वेच्छा - सेवानिवृत्त प्राध्यापक,
वाल्मी, औरंगाबाद
[Published in Maharashtra Times, Aurangabad on 10 Feb 2013]




Thursday, February 7, 2013

पाहूण्या कडून साप मारुन घेणे योग्य नाही


६ फेब्रुवारी २०१३
प्रिय संपादक,

दुष्काळी परिस्थितीत जलाशयातील पाणीसाठ्याची चोरी होऊ नये आणि जलनीतीतील अग्रक्रमाप्रमाणे पिण्याचे पाणी जनतेस प्रथम देता यावे या हेतूने शासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यरत झाली आहे ही बाब अभिनंदनीय आहे. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम,१९७६(मपाअ ७६) मधील कलम क्र. ९७ अन्वये पाटबंधारे प्रकल्पातील अनधिकृत उपसा थांबवण्याची कायदेशीर जबाबदारी जल संपदा विभागाच्या कालवा अधिका-यांची आहे. ( ते कलम माहितीसाठी सोबत जोडले आहे.) मोटारी, इंजिन, पाईप,वगैरे जप्त करणे आणि वीज तोडणे ही कार्यवाही जल संपदा विभागाच्या पुढाकाराने व त्या विभागाच्या नेतृत्वाखाली होणे कायद्याने अपेक्षित आहे कारण मपाअ ७६ नुसार नदी व लाभक्षेत्राची अधिसूचना जल संपदा विभाग काढतो. जलाशयातील पाण्याच्या संरक्षणाची व त्याचा जललेखा देण्याची मूळ जबाबदारी त्या विभागाची आहे. महसूल व इतर विभागांनी मदत करणे वेगळे आणि मूळ जबाबदारी स्वत:वर घेणे वेगळे. पाहूण्या कडून साप मारुन घेणे योग्य नाही. जल संपदा विभागाच्या मुख्य अभियंत्याने मपाअ ७६ मधील कलम क्र.७ अन्वये मुख्य नियंत्रक प्राधिकारी म्हणून काम केल्यास महसूल वरचा भार कमी होईल आणि मुख्य म्हणजे जल संपदा विभागास स्वत:चा कायदा अंमलात आणायची सवय लागेल. विभागीय आयुक्तांनी विचार करावा ही विनंती.

-प्रदीप पुरंदरे,
निवृत्त प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद
(९८२२५६५२३२)

[Letter published in Divya Marathi, Aurangabad on 8 Feb 2013]

Tuesday, February 5, 2013

लाभक्षेत्रे समन्यायी पाणी वाटपासाठीची कुरूक्षेत्रे व्हावीत


महाराष्ट्र वार्षिकी -२०१३ च्या प्रकाशना निमित्त "धोरणांचा दुष्काळ नित्याचा" विषयावर युनिक अकादमी व परिवर्तनाचा वाटसरु आयोजित परिसंवाद, लोकमान्य सभागृह,  पुणे, ३० जानेवारी २०१३
___________________________________________________________________________-
लाभक्षेत्रे समन्यायी पाणी वाटपासाठीची कुरूक्षेत्रे व्हावीत
- प्रदीप पुरंदरे *
जायकवाडी व उजनी प्रकल्पातील जल संकट, सिंचनाचा प्रादेशिक अनुशेष, सिंचन घोटाळा, श्वेतपत्रिका, विशेष तपास पथक आणि या सर्वांशी जैविक संबंध असणारा दुष्काळ या पार्श्वभूमिवर आजचा परिसंवाद होतो आहे. दुष्काळ ही एक इष्टापत्ती मानून पाणी प्रश्नाबाबत नवीन रणनीती विकसित करण्याची एक प्रक्रिया या परिसंवादात सुरु होईल अशी मला आशा आहे.

पाणी-प्रश्नाचे स्वरूप फार मोठे व गुंतागुंतीचे आहे. त्याकडे अनेक अंगांनी पाहता येते. पर्यावरणाचे संवर्धन, विस्थापितांचे पुनर्वसन, मृद व जल संधारण, जल व अन्न सुरक्षा,  उपजीवीके करिता शेती विरूद्ध बाजारासाठी शेती, कोरडवाहू विरूद्ध सिंचित शेती, स्थानिक जल स्त्रोतांचा विकास विरूद्ध बाहेरून पाणी आणणे, छोटे विरूद्ध मोठे सिंचन प्रकल्प, नदी जोड प्रकल्प अशा अनेक अंगांनी पाणी-प्रश्नावर सुटीसुटी वा एकत्रित चर्चा होऊ शकते. व्हावी. समग्रतेने व साकल्याने प्रश्नाचे आकलन होण्यासाठी ती आवश्यकही असते. पण त्यातून कधी कधी  छान छान आणि म्हणून ‘अजातशत्रू’ भूमिका पुढे येण्याचा धोका असतो. म्हणून  परिवर्तन घडवून आणण्याकरिता कळीचा मुद्दा हुडकणे व त्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. मुख्य प्रश्नावर हल्लाबोल केला आणि तो काही अंशी जरी सुटला तरी तुंबलेल्या मोरीतील बोळा काढल्यासारखे होते. पाणी प्रवाही होते. इतर प्रश्न सुटायला मदत होते. माहोल बदलतो.

सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय लघु, मध्यम व मोठे सिंचन प्रकल्प - म्हणजे सिंचन घोटाळ्याची विषयवस्तु - हा तो  कळीचा मुद्दा आहे. "सिंचन प्रकल्पांतून फार तर २०% क्षेत्र ओलिताखाली येईल. बाकीच्या ८०% क्षेत्राचे काय?" ही भूमिका  पूर्ण वस्तुस्थिती लक्षात घेत नाही. आपल्या  सिंचन प्रकल्पांचे स्वरूप बदलून जमाना झाला आहे. ते आता फक्त सिंचन प्रकल्प राहिलेले नाहीत. शेतीबरोबरच पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी आणि औद्योगिक वापराचे पाणी याकरिता आपण आज त्या प्रकल्पांवर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबुन आहोत. लोकसंख्येच्या लक्षणीय टक्कयास त्यातून पाणी मिळते आहे. हे असे व्हावे का नाही हा मुद्दा आता गैरलागू आहे. पटो न पटो मोठे प्रकल्प ही आजची वस्तुस्थिती आहे. विकासाच्या ज्या टप्प्यावर आपण आज आहोत त्या टप्प्यावर मोठे प्रकल्प हे "आवश्यक सैतान"( नेसेसरी एव्हिल!) झाले  आहेत. जायकवाडीचे उदाहरण बोलके आहे. शेतीबरोबर फक्त औरंगाबाद शहरच नव्हे तर २०५ अन्य गावांचा पाणी पुरवठा,  मराठवाड्यातील महत्वाच्या औद्योगिक वसाहतींचा पाणी पुरवठा आणि परळीचे औष्णिक  वीज केंद्र जायकवाडी वर अवलंबून आहे.  जे जायकवाडी बद्दल खरे आहे तेच इतर अनेक प्रकल्पांबाबत खरे आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय सिंचन प्रकल्प हा प्रस्थापित विकास नीतीचा ग्रामीण व शहरी भागांना जोडणारा बालेकिल्ला आहे. तेथे पाणी वाटप व वापराबद्दलच्या मुद्यांना टोक येत आहे. अस्वस्थता  व असंतोष आहे. विसंगती तीव्र होता आहेत. अशावेळी पाणी प्रश्नाबाबत तेथे काही नवीन मांडणी केली तर प्रतिसाद मिळण्याची शक्यता तुलनेने जास्त आहे. सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात जाणीव जागृती झाली, जलवंचितांचे संघटन झाले आणि काही तपशीला आधारे प्रश्न विचारण्याची प्रक्रिया सुरू झाली तर एकूण जलक्षेत्रावर त्याचे चांगले व दूरगामी परिणाम संभवतात. सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय सिंचन प्रकल्प म्हणजे जलक्षेत्रातील "संघटीत क्षेत्र" आहे. तर जलक्षेत्रातील इतर भाग म्हणजे "असंघटीत क्षेत्र". असंघटीत क्षेत्राबद्दल संवेदनशील राहूनही संघटीत क्षेत्रातील लढा महत्वाचा मानण्यामागे जे तर्कशास्त्र आहे ते जलक्षेत्राबाबतही खरे आहे - त्यातील दृष्य विसंगती व अदृष्य सुसंगतींसह! सर्वसामान्य पावसाच्या वर्षात प्रकल्पा-प्रकल्पात पाणी असते. ते ज्यांना आज मिळाले आहे त्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो.. त्याच प्रकल्पातील जलवंचितांना तो फायदा समोर दिसतो. पाण्याचे महत्व त्यांना वेगळे सांगायची गरज नाही. गोष्टी सूस्पष्ट आहेत. लक्ष्य डोळ्यासमोर आहे. आज ते आवाक्यात नाही; पण येऊ शकते. त्यासाठी समन्यायी पाणी वाटपाचा  कार्यक्रम आवश्यक आहे. राज्याची जलनीती, सिंचन विषयक कायदे, व म.ज.नि.प्रा.सारखे व्यासपीठ यामुळे एक संदर्भ उपलब्ध आहे.खिळखिळी का होईना चौकट तयार आहे. पाणी वापर संस्था आज कार्यरत नाहीत. यशस्वी नाहीत. त्यांच्या ताकदीची जाणीव आज त्यांना नाही. मात्र त्यांची सुप्त शक्ती जागृत केली जाऊ शकते. सहकार क्षेत्राबाबत असे म्हणतात की, "सहकारी चळवळ पराभूत झालेली आहे, मात्र सहकार यशस्वी झालाच पाहिजे"(Co-operation has failed,but co-operation must succeed). हे सूत्र पाणी वापर संस्थांनाही लागू पडते. "शेतीला पाणी व शेतमालाला भाव मिळाला पाहिजे" या मागणी आधारे लक्षणीय गुणात्मक बदल होऊ शकतात. फेरमांडणी व नवीन जुळवाजुळव याची आज गरज आहे. सिंचन प्रकल्पांची  लाभक्षेत्रे समन्यायी पाणी वाटपासाठीची कुरूक्षेत्रे झाल्यास परिवर्तन होऊ शकते.

  या दृष्टिकोनातून सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय लघु, मध्यम व मोठया सिंचन प्रकल्पांचा - दुष्काळाच्या  पार्श्वभूमिवर - गंभीर व प्रसंगी कठोर आढावा घेण्याची गरज आहे. तसा एक मर्यादित प्रयत्न  सूत्ररूपाने येथे केला आहे.  पाऊस कमी पडणे आणि जलाशयात पुरेसा जलसाठा नसणे हा संकटाचा केवळ एक भाग आहे. सुलतानी संकट जास्त गंभीर आहे आणि ते गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र होत चालले आहे हे पुढील मुद्द्यांवरून स्पष्ट होईल.

(१) चितळे आयोगाने केलेल्या व्याख्येनुसार पाहिले तर तथाकथित "पूर्ण" प्रकल्प हे ख-या अर्थाने पूर्ण नाहीत. फक्त बांधकामे नव्हे तर प्रकल्पांशी संबंधित सर्व तांत्रिक-सामाजिक-आर्थिक-कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असते. त्या मूलभूत प्रक्रिया बहूसंख्य प्रकल्पात पूर्ण झालेल्या नाहीत. म्हणून बांधकामे झाली पण प्रकल्प पूर्ण नाहीत अशी अवस्था आहे. तीस तीस वर्षे रेंगाळलेले / रखडलेले बांधकामाधीन प्रकल्प वेळीच पूर्ण झाले असते तर जल साठयात लक्षणीय भर पडली असती. दुष्काळाची तीव्रता कमी झाली असती.

(२) कालवा व वितरण व्यवस्थेची कामे आणि विशेषत: शेतचा-यांची कामे  मोठया प्रमाणावर अर्धवट असताना किंबहुना, झालेलीच नसताना  अमूक एवढी सिंचन क्षमता निर्माण झाली असे फक्त घोषित करण्यात येते. प्रत्यक्षातील निर्मित सिंचन क्षमता लक्षणीयरित्या कमी असण्याची शक्यता आहे.

(३) दैनंदिन सिंचन व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने व कायदेशीरपणे करण्यासाठी ज्या दर्जाचे तपशीलवार आणि अद्ययावत नकाशे आवश्यक असतात तसे नकाशे बहूसंख्य प्रकल्पात उपलब्ध नाहीत.

 (४) जल संपदा विभागातर्फे दरवर्षी प्रकाशित होणा-या सिंचन स्थितीदर्शक, जल-लेखा व बेंचमार्किंग इत्यादि अहवालातून जलक्षेत्राचे पूर्ण व खरे चित्र उभे राहत नाही. कारण  उपलब्ध व विविध हेतूंकरिता वापरलेले पाणी, बाष्पीभवन व कालव्यातील वहनव्यय, आणि भिजलेले  क्षेत्र  प्रत्यक्ष मोजले जात नाही. काही जलाशयातील गाळाच्या अतिक्रमणाचा अभ्यास झाला असला तरी त्याची दखल घेण्यात येत नाही. पाणी चोरीचे प्रमाण भयावह असूनही त्याची अधिकृत नोंद होत नाही.

(५) खरीप व रब्बी पिकांऎवजी उन्हाळी व बारमाही पिकांखालचे क्षेत्र वाढल्यामूळे - त्यांना जास्त पाणी लागत असल्यामूळे - एकूण सिंचित क्षेत्र कमी होते. राज्यातील उसाखालील एकूण क्षेत्रापैकी सरासरी ५४% क्षेत्र सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात असल्यामूळे विषमता प्रचंड वाढली आहे. पाण्याच्या बेसुमार व गैरवापरामूळे दुष्काळाला  आपण जणू आमंत्रणच दिले आहे.

(६) लाभक्षेत्रातील जमीनी अ-कृषि ( एन.ए.) होण्याचे आणि सिंचनाचे पाणी बिगर सिंचनाकडे वळवण्याचे (खरे तर पळवण्याचे!) प्रकार मोठया प्रमाणावर होत असले तरी सिंचन क्षमतेचे वास्तववादी पुनर्विलोकन केले जात नाही.

(७) महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ चे नियम अद्याप केले गेलेले नाहीत. त्या कायद्यान्वये नदीनाल्यांचे व लाभक्षेत्राचे तसेच उपसा सिंचन योजनांचे अधिसूचितीकरण सर्वत्र पूर्ण झालेले नाही. कालवा अधिकारी म्हणून अभियंते कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत. पाणीचोरी बद्दल कोठेही रितसर गुन्हे दाखल होत नाहीत. उपसा व बिगर सिंचना संदर्भात जे करारनामे केले पाहिजेत ते अनेक प्रकल्पात केले गेलेले नाहीत. जेथे केले आहेत तेथे त्यांची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. ७६चा कायदा आज ख-या अर्थाने अंमलात नाही. त्यामूळे सिंचन व्यवस्थापन करण्याच्या जल संपदा विभागाच्या कायदेशीर अधिकारासच आव्हान दिले जाऊ शकते. तसे झाल्यास, जलक्षेत्रातील  अनागोंदी व यादवीस अधिकृत स्वरूप प्राप्त होईल.

(८) ७६च्या कायद्या बाबत अशी उद्वेगजनक परिस्थिती असताना तो अंमलात आहे असे गृहित धरून  जलक्षेत्राची पुनर्रचना करण्याच्या "महान" हेतूने अजून दोन नवीन कायदे करण्यात आले आहेत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम,२००५ (म.ज.नि.प्रा.) आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम,२००५ (मसिंपशेव्य- पाणी वापर संस्थांसाठीचा कायदा) हे ते दोन कायदे. मजनिप्रा कायद्यानुसार २००५ साली राज्य जल परिषद व राज्य जल मंडळ अस्तित्वात आले आहे. त्यांनी म.ज.नि.प्रा. अधिनियम अंमलात आल्या पासून (जून२००५) ६ महिन्यात एकात्मिकृत राज्य जल आराखडा तयार करणे आणि म.ज.नि.प्रा.ने त्या चौकटीत प्रकल्पांना मान्यता देणे कायद्याने अपेक्षित आहे. आज ७ वर्षांनंतर देखील एकात्मिकृत राज्य जल आराखडा तयार नाही. राज्य जल परिषद व राज्य जल मंडळ यांची स्थापनेपासून बैठकच झालेली नाही. अणि तरीही म.ज.नि.प्रा. नवीन प्रकल्पांना मान्यता देत आहे. जसे जल संपदा विभागाच्या कायदेशीर अधिकारासच आव्हान दिले जाऊ शकते तसे म.ज.नि.प्रा.बाबतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(९) कालवा देखभाल-दुरूस्तीच्या निधीचे सुधारित मापदंड २००८ साली वाल्मीने नेमलेल्या समितीने प्रस्तावित केले होते. पाणीपट्टीचे नवीन निकष ठरवताना म.ज.नि.प्रा.ने त्यांचा वापरसुद्धा केला आहे. पण जल संपदा विभागाने ४ वर्षे झाली तरी अद्याप सुधारित निकष अधिकृतरित्या स्वीकारलेलेच नाहीत. तेव्हा त्या निकषांप्रमाणे प्रत्यक्ष निधी मिळण्याचा प्रश्नच येत नाही. पुरेशा व नियमित देखभाल-दुरूस्ती अभावी कालवे व वितरण व्यवस्थेची पार वाट लागली आहे. कालव्यांच्या प्रत्यक्ष वहन क्षमता कमी झाल्या आहेत. वहन व्यय प्रमाणाबाहेर वाढले आहेत. प्रकल्पांची कार्यक्षमता २०-२५ टक्क्यांवर आली आहे.

(१०)  पाणी वापर संस्थांसाठीच्या नवीन कायद्यान्वये उपसा सिंचना करिता पाणी वापर संस्था स्थापन करणे आवश्यक असताना कायदा होऊन ७ वर्षे झाली तरी त्या संस्था स्थापन झालेल्या नाहीत. ७६च्या कायद्यान्वये देखील गेल्या ३६ वर्षात उपसा सिंचन योजनांच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामूळे राज्यातील उपसा सिंचन हे सिंचन-कायद्याच्या कक्षेत ख-या अर्थाने अद्याप आलेलेच नाही. प्रवाही विरूद्ध उपसा सिंचन या प्रकल्पा प्रकल्पातील संघर्षात त्यामूळे प्रवाही सिंचनावर अवलंबून असलेले शेतकरी व त्यांच्या पाणी वापर संस्था जलाशयात पुरेसे पाणी असलेल्या वर्षातही पाण्यापासून वंचित राहतात. दुष्काळी वर्षात तर त्यांना कोणीच वाली राहणार नाही.

(११) पाण्याचे अंदाज पत्रक म्हणजे प्राथमिक सिंचन कार्यक्रम (पी.आय.पी.), पाणी-पाळ्यांचे नियोजन, पाणी वाटपाचे कार्यक्रम व वेळापत्रके, संनियंत्रण व मूल्यमापन आणि पाण्याचे हिशेब/जल-लेखा याकडे सातत्याने अक्षरश: गुन्हेगारी स्वरूपाचे दूर्लक्ष झाले आहे. सर्वसामान्य पर्जन्यमानाच्या वर्षात जलाशय पूर्ण भरले असतानाही लाभक्षेत्रातील ५०-६० टक्के भागाला धड  पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. जल संकटाच्या काळात त्यांचे काय होईल याची कल्पनाही करवत नाही.

(१२) अशा एकूण विदारक स्थितीमूळे, मोजके अपवाद वगळता, बहूसंख्य पाणी वापर संस्था अयशस्वी ठरल्या आहेत. "मोजून मापून, पाणी-वापर-हक्कांनुसार, घनमापन पद्धतीने वेळेवर पाणी पुरवठा" हा शासकीय दावा हास्यास्पद ठरला आहे. पाणी वापर संस्थांना पाण्याऎवजी मोठ्ठे पुरस्कार देऊन गप्प केले जात आहे. जलक्षेत्रात लोकसहभाग वाढावा म्हणून गेली २-३ दशके प्रामाणिक व मूलभूत स्वरूपाचे काम करणा-या एका महत्वाच्या संस्थेने अलिकडेच राज्यातील पाणी वापर संस्थांचा एक व्यापक अभ्यास केला. तो बोलका आहे. त्यातून वस्तुस्थिती पुरेशी स्पष्ट झाली आहे. म.ज.नि.प्रा.ला तो अहवाल सादर करून पाणी वापर संस्थांची संयुक्त पाहणी करण्याचे उघड आव्हानही देण्यात आले आहे.  ते अद्याप स्वीकारले गेलेले नाही.

 सिंचन व्यवस्थापनाची राज्यात अशी एकूण दारूण अवस्था असताना आणि त्यामूळे दुष्काळ असताना म.ज.नि.प्रा.मात्र पाण्याचा व्यापार करण्याच्या मागे लागले आहे. "काय करणार? कायद्यात आहे ना - पाण्याचा व्यापार! आमचा नाईलाज आहे. आम्ही कायद्याप्रमाणे जाणार" अशी म.ज.नि.प्रा.ची भूमिका दिसते. म.ज.नि.प्रा. कायद्यात समन्यायी पाणी वाटप व सिंचनाच्या प्रादेशिक समतोलासाठीही तरतुदी आहेत! त्यांचे काय? जायकवाडीसाठी वरच्या धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात म.ज.नि.प्रा.ने घेतलेली निव्वळ वकिली भूमिका कायद्याच्या मूळ हेतूला चक्क काळिमा फासणारी आहे.
    
आज खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचा जमाना आहे. शेतीचे कंपनीकरण होऊ घातले आहे. एफ डी आय, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, इत्यादी गोष्टी येता आहेत. पण चेल्याचपाट्यांची (क्रोनी) भांडवलशाही एकीकडे जोरात आहे तर दुसरीकडे सरंजामशाही अजून संपलेली नाही. जल व कृषी क्षेत्र एका संक्रमणावस्थेतून जात आहे.  या सर्व पार्श्वभूमिवर सिंचन घोटाळ्याचे व त्यातून उदभवलेल्या दुष्काळाचे सखोल व समग्र  सामाजिक- राजकीय विश्लेषण होणे गरजेचे आहे.

जलक्षेत्रातील  परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सत्ताधारी वर्गाने नवीन जलनीती आणली. त्यानुसार कायदे केले. पाणी वापर हक्कांची संकल्पना मांडली. पाणी वापर हक्क हस्तांतरणीय व विक्रीयोग्य केले. राज्य जल मंडळ, राज्य जल परिषद, नदी खोरे अभिकरणे आणि महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरण अशा नवीन व्यासपीठांची   विधिवत स्थापना केली. एकात्मिकृत राज्य जल आराखड्याच्या आदर्श गप्पा मारल्या. जलक्षेत्रात सुधारणा करणारे पहिले राज्य म्हणुन डांगोरा पिटला. हे सगळे करणार असे सांगून जागतिक बॅंकेकडून निधी मिळवला. आणि एकदा निधी मिळाल्यावर काहीही केले नाही. सुधारणा अर्धवट सोडल्या. जलनीती व सुधारित अग्रक्रम कागदावरच राहिले. नियमांविना कायदे अंमलात आले नाहीत. राज्य जल मंडळ व राज्य जल परिषद यांची एकही बैठक गेल्या सात वर्षात झाली नाही. नदी खोरे अभिकरण म्हणून पाटबंधारे विकास महामंडळे कार्यरत झाली नाहीत.   सहा महिन्यांचा वायदा असताना  एकात्मिकृत राज्य जल आराखडा सात वर्षे झाली तरी अद्याप अवतरलेला नाही. जलविकास व व्यवस्थापनाची घॊषित कायदेशीर चौकट  आकारालाच आली नाही. त्याचा फायदा सरंजामी टग्यांनी घेतला. मनमानी केली. सिंचन घोटाळा या पार्श्वभूमिवर झाला आहे. दुष्काळाचे  सुलतानी कारण हे असे आहे.

 जलक्षेत्रातील अभियांत्रिकी व व्यवस्थापकीय वास्तव एकविसाव्या शतकाला साजेसे नाही. अठराव्या शतकातील तंत्रज्ञान व मानसिकता या आधारे आपले आजचे पाणी प्रश्न सुटणार नाहीत.  सिंचन घोटाळ्यातून व दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर जलक्षेत्रात आज  कायद्याच्या राज्याची, आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापनाची आणि  सक्षम व कठोर  नियमनाची गरज आहे. समन्यायाचा लढा प्रस्थापित विकास नीतीच्या बाले किल्ल्यापर्यंत नेऊन  भिडवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, पाण्यासाठी दाही दिशा उध्वस्त फिरणा-या  जलवंचितांचे भविष्य धोक्यात आहे.

या पार्श्वभूमिवर - केवळ पहिले पाऊल म्हणून - मी एक साधा कृति कार्यक्रम सूचवेन. पाण्याबाबतचे वास्तव समजून घेण्यासाठी व "समजावून" देण्यासाठी आपण या दुष्काळात विविध सिंचन प्रकल्पात -बालेकिल्ल्यात- सिंचन प्रश्न शोध यात्रा काढु. कालव्या कालव्याने पायी चालू. परिस्थिती प्रत्यक्ष पाहू. शेतक-यांशी बोलु. पाणी वापर संस्थांबरोबर संवाद साधु.  When in doubt, go to people!! संभ्रमात असाल तर लोकांकडे जा!! कोणी सांगावे? ही एक नवीन सुरूवात असेल! जनवादी हस्तक्षेप व सामुदायिक शहाणपण कदाचित योग्य मार्ग दाखवेल.
______________________________________________________________________________
 * M : 9822565232, 8983528640  Ph: 0240-2341142  Resi.: B-12, Pride Towers, Vedant Nagar, Aurangabad 431005
   E mail : pradeeppurandare@gmail.com  Web site: www.irrigationmainsystem.com  Blog: jaagalyaa-thewhistleblower.blogspot.in


Saturday, January 19, 2013

Friday, January 18, 2013

"पाण्याचा सरकारी खाक्या"


औरंगाबाद
७ जानेवारी २०१३
प्रिय संपादक,
दै. लोकसत्ता, मुंबई,

"पाण्याचा सरकारी खाक्या" या अग्रलेखात (७ जानेवारी २०१३) कालव्यांऎवजी बंद नळाने पाणी वाटप करण्याच्या योजनेचा उल्लेख वाचून म. ज्योतिबा फुले आठवले. "दर एक शेतक-याच्या शेताच्या मानाप्रमाणे प्रत्येकास एकेक तोटी करून द्यावी...." हे ज्योतिबांनी शेतक-याचा आसूड मध्ये सांगितले होते. आज काही प्रकल्पांत बंद नळाने पाणी देण्याचा प्रयोग होतो आहे. पण तो खूप मर्यादित आहे. आणि हेतूंबद्दल शंका यावी असा प्रकार काही ठिकाणी आहे. उदाहरणार्थ, उर्ध्व मानार मध्यम प्रकल्पावरील अहमद्पूर उपसा सिंचन योजना. कालवा व वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण झाली. पण ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली. ते लपविण्यासाठी तेथे बंद नळाने पाणी पुरवठा प्रस्तावित केला गेला. आता कालव्यातून पाईपलाईन नेणार आणि कालवे बुजवणार! क्या आयडिया सरजी? अनुशेषग्रस्त मागास भागातील अशा खर्चातून दुष्काळ निर्मूलन होणार हा पाण्याचा सरकारी खाक्या! असो!!

-प्रदीप पुरंदरे
९८२२५६५२३२
 [Letter published in Loksatta, 8.1.2013]

जल स्वप्न -१


जल स्वप्न -१

        ९ फेब्रुवारी २०१२ पासून म्हणजे "आधुनिक किसान"च्या पहिल्या अंकापासून "लाभक्षेत्रे-कुरूक्षेत्रे"हे सदर सुरु झाले. पहिल्या "विधिलिखित" या भागात जल कायद्यांचा आढावा घेण्यात आला तर दुस-या "जल वास्तव" या भागात सिंचनाची वस्तुस्थिती मांडली गेली. त्या पार्श्वभूमिवर आता शेवटच्या भागात भविष्यात सकारात्मक काय होऊ शकते किंबहुना, काय व्हायला हवे हे सांगण्याचा प्रयत्न होईल. बदललेला काळ व संदर्भ आणि विज्ञान-तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या नव्या शक्यता याआधारे एक जल स्वप्न पाहिले जाईल.  ते वास्तवात उतरणे सहज शक्य नसले तरी अशक्यप्रायही नाही.

काळ बदलला. संदर्भ बदलले. जगाचे रुपांतर छोट्या खेड्यात झाले. माहितीचा स्फॊट झाला. संपर्क वाढला. जीवनाच्या सर्व क्षेत्रात संगणक घुसला. मोबाईल तर अन्न, वस्त्र, निवारा यांच्या पंक्तीत जाऊन बसला. विज्ञान व तंत्रज्ञानाने अशक्यप्राय गोष्टी सहज शक्य झाल्या. पण महाराष्टातले जल क्षेत्र मात्र ढिम्म बदललेले नाही. जल संपदा विभागात काळ जणू अठराव्या शतकातच गोठला आहे. जल व्यवस्थापनात आजही सरंजामशाही पद्धत सुखेनैव चालु आहे. पाणी वाटपात वसाहतवाद आहे. अंग्रेजोंके जमानेके जेलर माळकरी वारकरी बळीराजावर राज्य करता आहेत. चारी चारीवर शेवटापर्यंत पाणी न पोहोचण्याचे एक कारण जल क्षेत्राचे लोकशाही व विज्ञान-तंत्रज्ञानाशी असलेले हाडवैर हे ही आहे. हे सर्व बदलणे शक्य आहे. आवश्यक आहे. निकडीचे आहे.जल स्वप्न म्हणून तर पहायचे. विज्ञान-तंत्रज्ञान हे काही सामाजिक-राजकीय प्रश्नांना पूर्ण उत्तर नसले तरी त्या आधारे जटील प्रश्न सुटायच्या नवीन शक्यता निर्माण होतात हे खरे. त्या शक्यतांची एक यादी (एकमेव व परिपूर्ण नव्हे) आपण या लेखात पाहू आणि पुढील काही लेखात त्या बद्दल साधक बाधक चर्चा करू. मुद्यांचा विस्तार करू.
१) खोरे/उपखोरेनिहाय एकूण पाणी उपलब्धता नव्याने तपासणे.
२) पूर्ण, अपूर्ण, बांधकामाधीन व भविष्यातील अशा सर्व पाणी योजनांतील प्रत्यक्ष पाणी उपलब्धतेचा लेखाजोखा समाजापुढे मांडणे
३) जलाशयातील गाळाचे अतिक्रमण, बाष्पीभवन, गळती व पाझर यांचे प्रकल्पनिहाय अंदाज सुधारणे
४) नदीनाले तसेच कालवे व वितरण व्यवस्था यांच्या वहनक्षमता, त्यांत होणारे पाण्याचे व्यय आणि पाणी वाहण्याला लागणारा वेळ अभ्यासणे
५) पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी, शेतीचे पाणी व औद्योगिक वापराचे पाणी अशा सर्वच गरजा मू्ळात कमी करणे आणि पाणी वापरातील कार्यक्षमता वाढवणे. पाणी बचतीचे विविध उपाय जास्त व्यवहार्य व स्वस्त करणे,
६) सर्व प्रकारच्या पाणी वापरात स्वयंचलितीकरण व संगणकीकरण करून जल-नियंत्रण (वॉटर कंट्रोल) व जल-नियमन (वॉटर रेग्यूलेशन) आमूलाग्र सुधारणे. जल व्यवस्थापनात पारदर्शकता, जबाबदेही व लोकसहभाग आणणे,
७) आधुनिक जल व्यवस्थापनात दैनंदिन स्वरूपात उपयोगी पडतील असे लाभक्षेत्राचे नकाशे (स्मार्ट मॅपस) तयार करणे,
८) पाण्याची साठवणूक, वहन, वाटप व वापर याच्या पद्धती सुधारणे,
९) पाण्याचे व भिजलेल्या क्षेत्राचे मोजमाप करणे,
१०) पाणी उपलब्धता व वापर आणि भिजलेल्या क्षेत्राच्या विश्वासार्ह आणि अद्ययावत नोंदवह्या ठेवणे व त्या सर्वांना सहज उपलब्ध करून देणे
११) सर्व पाणी योजनांची नियतकालिक देखभाल-दुरूस्ती करण्याची व्यवस्था निर्माण करणे
१२) वर नमूद केलेल्या आणि तत्सम बाबी विचारात घेऊन राज्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करणे व त्यात वेळोवेळी सुधारणा करणे

पाण्याबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणा-या कोणाही सूज्ञ व्यक्तीस हे मुद्दे नवीन वाटणार नाहीत. जाणकारांमध्ये त्यावर चर्चाही खूप होतात. इतकेच नव्हे तर आता नवीन जल कायद्यात यातील काही बाबींबाबत तरतुदी देखील करण्यात आल्या आहेत. पण होत काहीच नाही. अत्यंत गावठी व रामभरोसे पद्धतीने सध्या जल व्यवस्थापन चालले आहे. जल संपदा विभाग व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण त्यात आपणहून बदल करेल याची शक्यता शून्य आहे. कारण तसे करण्याने त्यांचे हितसंबंध दुखावतात. जलक्षेत्राची पुनर्रचना हा म्हणूनच जल स्वप्नाचा एक भाग असायला हवा. त्याची सुरूवात खालील प्रमाणे करता येईल

१) भारताचे महालेखापाल व नियंत्रक (सीएजी), केंद्रिय दक्षता आयोग (सीव्हीसी) आणि सीबीआय या सारख्या वैधानिक संस्थांमार्फत सिंचन घोटाळ्याची चौकशी करून शुद्धीकरणाची मोहिम हाती घेणे,
२) नॅशनल इनस्टिट्युट ऑफ हायड्रॉलॉजी व आय.आय.टी. सारख्या संस्थांकडुन अभियांत्रिकी अभ्यास करून घेणे,
३) सिंचन प्रकल्पांचे अद्ययावत नकाशे (स्मार्ट मॅपस) तयार करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाचे मार्गदर्शन घेणे,
४) पाणी उपलब्धता व भिजलेले क्षेत्र निश्चित करण्यासाठी इस्त्रो ची मदत घेणे,
५) इंडियन इनस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट (आय आय एम) मध्ये जल व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम सुरू करून पाण्याच्या क्षेत्रात नवीन रक्त आणणे,
६) नॅशनल लॉ कमिशन / इनस्टिट्युट तर्फे जल कायद्यात सुधारणा करणे व कायदे विषयक प्रबोधन कार्यक्रम राबवणे,
७) आय.ए.स. च्या धर्तीवर इंडियन वॉटर सर्व्हिस सुरु करणे आणि राज्य स्तरावर जल व्यवस्थापनाकरिता स्वतंत्र केडर निर्माण करणे,
८) गोखले इनस्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स ड इकॉनॉमिक्स आणि टाटा इनस्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस सारख्या संस्थांकडून जल क्षेत्राचा सामाजिक-आर्थिक अभ्यास करुन घेणे,
९)  पाण्याबाबतच्या चर्चांचा एकूण दर्जा उंचावण्यासाठी लोक प्रतिनिधी व ओपिनियन मेकर्सना  यशदा व वाल्मीसारख्या संस्थांतून प्रशिक्षण देणे,
१०) जल पत्रकारिता स्वतंत्ररित्या सुरू करणे,
११) जल नियंत्रण व नियमनासाठी विविध प्रकारची द्वारे (गेटस) आणि प्रवाहमापक तयार करणे व त्यांची देखभाल-दुरूस्ती करण्याकरिता शासकीय व खाजगी जल उद्योगास प्रोत्साहन देणे
१२) जल न्यायालयांची संकल्पना प्रत्यक्षात आणणे

एका मोठ्या, गंभीर व अभूतपूर्व पेचप्रसंगाकडे जलक्षेत्राची अपरिहार्यपणे वाटचाल होत आहे. जायकवाडी व उजनी प्रकल्पातील जल संकट आणि राज्यातील दुष्काळ ही त्याची नांदी आहे. मोठ्या जनसमूहाचे संभाव्य स्थलांतर आणि पाण्यावरून होऊ घातलेल्या दंगली यांस बागुलबु्वा मानणे योग्य होणार नाही. ते दु:स्वप्न वारंवार प्रत्यक्षात येऊ नये म्हणून जलक्षेत्रात फार मोठा व फार वेगळा विचार आता करायला हवा. खरेतर त्यांस तसा उशीरच झाला आहे.

[Published in Weekly Aadhunik Kisan, Aurangabad ,17 Jan 2013]



Friday, January 4, 2013

प्रांजळ कबुल्या आणि दृढ संकल्प


प्रांजळ कबुल्या आणि दृढ संकल्प

जलक्षेत्रासाठी २०१२ हे वर्ष वाईट गेले. अस्मानीही झाली अन सुलतानीही. राज्यातील फार मोठ्या भागात दुष्काळ पडला. जलटंचाईचे संकट कमी होते की काय म्हणून सिंचन घोटाळ्याची त्सुनामी आली. जायकवाडीने  नगर व नाशिक जिल्ह्यांसमोर तर उजनीने पुणे जिल्ह्यासमोर समन्यायी पाणी वाटपाचे धर्मसंकट उभे केले. संयुक्त महाराष्ट्राचा भरजरी शेला विरायला तर लागला नाही ना असा प्रश्न पाण्यामूळे निर्माण झाला. भोळासांब "विनाअट" मराठवाडा कधी नव्हत कोर्टाची पायरी चढला. जलसंकटाचे तांत्रिक प्रश्न नजिकच्या भविष्यात कदाचित सोडवले जातीलही. पण एक फार मोठे नुकसान झाले. जलक्षेत्रातील विश्वासार्हतेचा "उपयुक्त साठा" संपला. आणि मृतसाठा तर गढुळ निघाला! त्यात पाणी किती आणि गाळ किती कोणास ठाऊक?

नवीन वर्ष सुरू होताना आपण ब-यापैकी हळवे असतो. सरत्या वर्षात ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या त्याबद्दल मनात खंत असते. अनेक शल्ये उरात बाळगुन आपण नवीन वर्षाला सुरुवात करतो. शो मस्ट गो ऑन असे म्हणत नव्या उमेदीने नवा डाव टाकला जातो. कमॉन, लव्ह ऑल! हीच भावना प्रबळ असते.ती प्रामाणिकही असते. पण त्यात आरंभशूरतेचा भाग जास्त असतो. वैयक्तिक पातळीवर हा प्रकार हसण्यावारी नेला तरी चालण्यासारखा असतो. पण जलक्षेत्रात असे होऊन चालणार नाही. कारण २०१२ साल संपले असले तरी त्या वर्षात निर्माण झालेले प्रश्न आपल्याला यापुढेही छळणार आहेत. येते सहा सात महिने  पाण्याच्या दृष्टिने अवघड जाणार आहेत. पाण्याविना उध्वस्त झालेल्या फार मोठ्या जनसमूहाचे स्थलांतर हा केवळ बागुलबुवा न राहता ते दु:स्वप्न खरे ठरण्याचीच शक्यता जास्त आहे. अशा वेळी जलक्षेत्राने काही प्रांजल कबुल्या देणे आणि काही दृढ संकल्प करणे उचित होईल. जलपुरूषाने आता गंभीर व्हायला हवे. केवळ रात्र नव्हे हे वर्षच वै-याचे आहे!

जलनियोजनात ऎतिहासिक दृष्टया गंभीर चुका झाल्या हे नाकारून कसे चालेल? हायड्रॉलिजीची गृहिते साफ चुकली. पाणी उपलब्धतेचे अंदाज गंडले. त्यांचा पार पोपट झाला हे खोटे आहे का? १९७६ साली सिंचनाला सुरूवात करणा-या १०० टि.एम.सी. च्या जायकवाडीला २००४ साली सांगितले जाते "नाही हां,४० टि.एम.सी. ने अंदाज चुकला बरं का! सॉरी, कान्ट हेल्प." हा काय प्रकार आहे? मोठ्या प्रकल्पाची ही   त-हा. तर लघु व मध्यम प्रकल्पात काय झाले असेल? बहुसंख्य प्रकल्पांच्या मूळ नियोजनात पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी, औद्योगिक वापराचे पाणी आणि उपसा सिंचनाची गरज पकडली नाही म्हणून विसंगती वाढल्या. स्पर्धा जीवघेणी झाली. पाणी वळवणे आणि पळवणे सुरु झाले. परिणामी, प्रवाही सिंचन-शेतीचे पाणी कमी झाले. कमी पाण्याचे वाटप समन्यायाने झाले नाही. पाणी वापरात कार्यक्षमता कधी आलीच नाही. उसाकरिता इतर पिकांचा बळी देला गेला. या जगजाहीर गोष्टींबद्दल अवाक्षरही न काढता शिरपुर पॅटर्न बद्दल सिंचन अभियंत्यांनी बोलत राहणे यांस प्रामाणिकपणा म्हणायचे का? अशा असंख्य उदाहरणांची काळी यादी खूप मोठी आहे. त्याबद्दल एकदा जाहीर प्रांजळ कबुली का दिली जाऊ नये? जल टंचाईचा अस्मानी भाग आपण समजु शकतो. पण सुलतानी भागाकडे किती काळ आपण दुर्लक्ष करणार आहोत? श्वेतपत्रिका व विशेष तपास पथकाची भातुकली किती काळ पुरणार आहे? जलक्षेत्राबाहेरील इतरेजनांनी आता जलक्षेत्रात लक्ष घालायला ह्वे. अभियंते, ठेकेदार आणि तथाकथित विकासपुरूष यांचे वर अवलंबुन राहण्याचे परिणाम आपण आज भोगतो आहोत.

जलक्षेत्रात आता काही दृढ संकल्पही करण्याची नितांत गरज आहे. उदाहरण म्हणून काही संकल्पांचा येथे उल्लेख केला आहे. जलक्षेत्रात कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे ही प्राथमिक गरज आहे. पाणी चोरी हा केवळ दखलपात्र गुन्हा न ठेवता तो अजामिनपात्र गुन्हा व्हायला हवा. पाणीचोरीबद्दल आज गुन्हे दाखल होत नाहीत. सिंचन कायद्यातील विशिष्ट कलमाखाली एफ.आय.आर. दाखल झाला व प्रकरण न्यायालयात गेले असे आज  फारसे होत नाही. ते व्हायला हवे.

पिकांना सिंचनाकरिता लागणारे पाणी आणि पिण्याचे पाणी यांच्या गरजा शास्त्रीय पद्धतीने ठरविल्या गेल्या आहेत. औद्योगिक वापराच्या पाणी गरजा ( सध्याची आरक्षणे) मात्र अद्याप त्या त्या उद्योगातील विशिष्ठ प्रक्रिया लक्षात घेऊन निश्चित केलेल्या नाहीत. प्रक्रिया-जल (प्रोसेस वॉटर)  कमी लागणारे तंत्रज्ञान उद्योगांनी स्वीकारावे म्हणुन आता विशेष प्रयत्न करावे लागतील. अर्थात, गरज कोणतीही असो ती मोजून मापून भागविण्यासाठी सक्षम यंत्रणा हवी. पाणी मोजायची व्यवस्था हवी. जे मोजले जात नाही त्याचे नीट व्यवस्थापन होत नाही आणि अंतिमत: त्याचा नाश होतो. पाण्याबाबत आपण आज हे  अनुभवत आहोत.

कोणतीही व्यवस्था केवळ उभी करून भागत नाही.  तीची वेळेवर देखभाल-दुरुस्ती करून ती मूळ क्षमतेने कार्यरत ठेवणे हे जास्त आव्हानात्मक असते. अन्यथा, पुढचे पाठ मागचे सपाट अशी अवस्था होते. आपले सिंचन प्रकल्प व अन्य पाणी पुरवठा योजना यांत देखभाल-दुरूस्तीकडे गुन्हेगारी स्वरूपाचे दुर्लक्ष झाले आहे. पाणी नाश हे पाणी टंचाईचे एक महत्वाचे कारण आहे. ३६०० क्युसेक वहन क्षमतेच्या कालव्यातून रडतखडत २४०० क्युसेक पाणी वाहते आणि प्रकल्पाची एकूण कार्यक्षमता फक्त २०-२५ टक्के एवढीच असेल तर पाण्यावरून मारामा-याच होणार हे उघड आहे.

जल विकास व व्यवस्थापनात लोकसहभाग वाढविण्याकरिता पाणी वापर संस्था सक्षम करायला हव्यात.बहुसंख्य संस्था आज फक्त कागदावर कार्यरत आहेत. शासन या संस्थांचा वापर ढाल म्हणून करते. समन्यायासाठी आग्रह धरणा-यांनी त्या संस्थांचा वापर प्रबोधनाचे व्यासपीठ व परिवर्तनाचे हत्यार म्हणून केला पाहिजे. जायकवाडी असो की उजनी पाण्यावरून चाललेल्या संघर्षात पाणी वापर संस्था कोठेही नाहीत ही वस्तुस्थिती दूर्दैवी व घातक आहे.

मूळ तांत्रिक असलेल्या पाणी प्रश्नात सामाजिक, आर्थिक व राजकीय बाबींचेही प्रतिबिंब पडलेले असते. पाणी प्रश्न सोडवणे म्हणजे या सर्व बाबींना भिडणे. २०१३ सालात "प्रामाणिकपणा हेच उत्तम धोरण" (ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी) या तत्वाचा अवलंब करत आपण पाणी प्रश्नाला सामोरे जाऊयात. सर्वांना वेळेवर व पुरेसे पाणी मिळो हीच शुभेच्छा.
 [Published in Divya Marathi, 1 Jan 2013]