Monday, August 11, 2014

नदीखोरेनिहाय जल व्यवस्थापन आणि मेंढेगिरी समितीचा अहवाल


प्रास्ताविक:
नदीखोरेनिहाय जल व्यवस्थापनाची संकल्पना तशी जुनीच आहे. महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाने १९९९ साली  त्याबद्दल सूस्पष्ट शिफारशी केल्या आहेत. सन २००३ साली राज्याने स्वीकारलेल्या जलनीतीत त्याबाबत  नेमक्या तरतुदी आहेत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (मजनिप्रा) अधिनियमात २००५ साली  जरुर ती कलमेही आता आली आहेत. पण दुर्दैवाने हे सगळं कागदावरच राहिलं. जल संपदा विभागाने (जसंवि) जलनीती व कायदा अंमलात आणण्यासाठी आपणहून काहीच पावले टाकली नाहीत. सुट्या सुट्या प्रकल्पनिहाय जल व्यवस्थापनाकडून समष्टीचा विचार करणा-या नदीखोरेनिहाय जल व्यवस्थापनाकडे जाण्याकरिता नियम, अधिसूचना, शासन निर्णय, परिपत्रके, हस्तपुस्तिका, आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार, प्रशिक्षण, वगैरे आवश्यक ती तयारी केली नाही. आणि शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. सन २०१२ साली दुष्काळ पडला. जायकवाडी धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला. साहजिकच उर्ध्व गोदावरी खो-यातील जायकवाडीच्या वरच्या धरणातून पाणी सोडा अशी मागणी मराठवाड्यातून केली गेली. त्या मागणीच्या पुष्ठ्यर्थ मजनिप्रा कायद्यातील कलम क्र. १२ (६) (ग) चा दाखला दिला गेला. पाण्यासाठी आंदोलने व्हायला लागली. प्रकरण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात गेलं. अनेक याचिका केल्या गेल्या. सिंचन घोटाळ्यामूळे अगोदरच हवालदिल झालेल्या जसंवि पुढे नवं संकट उभं राहिलं. कायदा तर करून बसलो पण तो अंमलात आणण्यासाठी नियमच नाहीत. कार्यपद्धती नाही. कोणत्या धरणातून किती पाणी, केव्हा व कसे सोडायचे या तपशीलाचा पत्त्या नाही. काय  करावे? कोठे जावे? तिकडे न्यायालयाने दणका दिला.मजनिप्रा कायद्याचे नियम विशिष्ट मुदतीत  करा असा आदेश दिला. जसंवि अगदी रंगेहाथ पकडले गेले. मग अशा अडचणीच्या प्रसंगी वेळ मारुन नेण्यासाठी शासन जे नेहेमी करतं ते केलं गेलं. मेंढेगिरी समिती नेमली गेली. आग लागल्यावर विहिर खोदण्याचाच तो प्रकार होता. या खेदजनक पार्श्वभूमिवर नेमल्या गेलेल्या मेंढेगिरी समितीनं शासनाला आपला अहवाल सादर केला आहे. काय आहे त्या अहवालात? या लेखात त्याचा तपशील मांडायचा प्रयत्न केला आहे. हेतू हा की, आज काळाची गरज बनलेल्या खोरेनिहाय जल व्यवस्थापनाबद्दल  साधकबाधक चर्चा व्हावी. नदीखो-यातील खालच्या प्रकल्पांना जल-न्याय मिळावा.

समितीचे गठन व मर्यादा:
‘गोदावरी अभ्यास गट’ हे मेंढेगिरी समितीचे अधिकृत शासकीय नाव. शासन निर्णयाद्वारे हा गट  दि.२९ जानेवारी २०१३ रोजी गठीत करण्यात आला. दि.३१ मार्च २०१३ पर्यंत या गटाने आपला अहवाल सादर करणे अपेक्षित होते. पण विहित मुदतीत काम संपले नाही. गटाला दोन वेळा मुदतवाढ घ्यावी लागली. शेवटी, ऑगस्ट २०१३ मध्ये गटाने (लेखात यापुढे समिती असे संबोधले आहे) आपला अहवाल शासनास सादर केला. मजनिप्रा ने आता प्राधिकरणापुढील याचिकांची सुनावणी करताना मेंढेगिरी समितीच्या अहवालावर संबंधितांच्या प्रतिक्रिया व मते मागवली आहेत. जायकवाडीसाठी वरच्या धरणातून पाणी सोडण्याबाबत मजनिप्रा आपला निवाडा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात देण्याची शक्यता आहे.

दोन महिन्यात अहवाल देणे अपेक्षित असताना समितीने एकूण सात महिने का घेतले? गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (गोमपाविमं) आवश्यक ती माहिती व आकडेवारी - तपासून योग्य त्या प्रमाणपत्रासह (डाटा व्हॅलिडेशन सह) - दि.२१ मे २०१३ रोजी म्हणजे समितीच्या स्थापनेनंतर चार महिन्यांनी दिली हे विलंबाचे प्रमुख कारण दिसते. अहवालातील प्रकरण क्र.२ मध्ये समितीच्या प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त थोडक्यात दिले आहे. त्यावरून असे जाणवते की, समितीला आकडेवारी व माहितीच्या एकूण गुणवत्तेबाबत अनेक शंका होत्या. त्यांचे निराकरण सहजसाध्य नव्हते. सिंचन घोटाळ्यासंदर्भात नेमलेल्या चितळे समितीने महामंडळांच्या कारभाराचा जो धक्कादायक तपशील उघड केला आहे तो पाहता गोमपाविमं ने  मेंढेगिरी समितीला  दिलेल्या माहिती व आकडेवारीच्या विश्वासार्हतेबाबत खात्री देणे अवघड आहे. समितीने केवळ सौजन्याचा भाग म्हणून तसे स्पष्टपणे  म्हटले नसावे एवढेच!

समितीची दूसरी मर्यादा म्हणजे समितीवरील इतर सदस्यांच्या नेमणूका. खोरेनिहाय जल व्यवस्थापन हा खरेतर आंतरशाखीय विषय आहे. त्याला न्याय द्यायचा असेल तर समितीत कृषी, सामाजिक शास्त्रे व जल-कायदा या विषयांचे जाणकारही असायला हवे होते. मात्र समितीत फक्त  अभियंते होते.  समिती गठीत करताना नाशिक, नगर व मराठवाडा या विभागांना रितसर  व पुरेसे प्रतिनिधित्व द्यायला हवे होते. शेवटी, जायकवाडी वरून निर्माण झालेल्या प्रश्नाला प्रादेशिकवादाचे कंगोरे आहेत हे कसं विसरता येईल?

समिती नेमण्यामागे कालापव्यय करणे हा जसंवि चा प्रमुख हेतू होता. त्यामूळे समितीचे काम नीट होऊ नये अशीही व्यवस्था करण्यात आली.  मेंढेगिरींना समितीचे अध्यक्ष केले आणि त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या श्री.आ.भ. पाटील, कार्यकारी संचालक, गोमपाविमं यांना विशेष निमंत्रित म्हणून नेमले. साहजिकच अपेक्षेप्रमाणे समितीत गैरसमज निर्माण झाले. समितीने जेव्हा पहिला अहवाल शासनाला सादर केला तेव्हा मेंढेगिरी विरूद्ध बाकी सर्वजण असा प्रकार झाला. मेंढेगिरीनी  समन्यायी पाणीवाटपाची व्यापक भूमिका घेऊन कायद्याची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरला तर इतर सदस्यांनी वादग्रस्त नियमांच्या आधारे (जे नंतर शासनाला रद्द करावे लागले) वकिली भूमिका घेत ‘आपल्याला एवढेच सांगितले आहे. तेवढे बास. बाकीचं आपल्याला काय करायचं आहे?’ असा सूर लावला. वाद शासना पर्यंत गेला. शासनाने एकमताचा अहवाल द्या म्हणून सांगितले. शेवटी, तडजोड करून दुसरा व अंतिम अहवाल दिला गेला. ताबडतोबीचा भाग इतर सदस्यांच्या म्हणण्यानुसार तर दीर्घपल्ल्याचा भाग  मेंढेगिरी म्हणतात त्याप्रमाणे (काही प्रमाणात) असा समेट झाला.

समितीची तिसरी मर्यादा म्हणजे समितीने तिच्या कामाशी संबंधित अशा राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय साहित्याचा अभ्यासात्मक आढावा  घेतला नाही. आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय नद्यांबाबत अनेक कायदे, नियम, करारनामे व त्याआधारे दिले गेलेले न्यायालयीन निवाडे उपलब्ध आहेत. पाणीवाटपाचा जटिल प्रश्न कशाप्रकारे हाताळला जाऊ शकतो हे अशा अभ्यासातून पुढे आले असते. त्यातून कदाचित काही तत्वे व त्या आधारे रणनीती सूचित करता आली असती. समितीची रचना व तिला मिळालेला वेळ पाहता हा अभ्यास शक्य झाला नसावा.

समितीच्या कार्यकक्षा व शिफारशी:
समितीच्या कार्यक्षेतील पहिली बाब पुढील प्रमाणे होती: "गोदावरी खॊ-यातील जायकवाडी धरणाच्या उर्ध्व बाजूस खोरे/ उपखो-यातील सर्व जलाशयांचे एकात्मिक पद्धतीने, पावसाळ्यात धरणे भरताना, जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयात टंचाई परिस्थिती न उदभवण्यासाठी प्रचलन करणे बाबत मार्गदर्शक विनियम तयार करणे". ही कार्यकक्षा फक्त टंचाईचा विचार करते कारण मजनिप्रा अधिनियमांचे नियम बनवताना म्हणजे एप्रिल २०१३मध्ये कायद्याशी सुसंगत नियम केले गेले नाहीत. कायदा उपलब्ध पाण्याचे समन्यायी वाटप करा असे म्हणतो. तर खालच्या जलाशयात ३३% पाणीसाठा होईपर्यंतच वरच्या धरणातून पाणी सोडा असे नियम म्हणतो. मेंढेगिरी समन्यायी पाणीवाटपाचा आग्रह धरत होते. तर इतर सदस्य ३३% या मर्यादेत राहू इच्छित होते. मराठवाड्यात या ३३% तरतुदीला मोठा विरोध झाला. मराठवाड्यातील आमदारांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. शासनाला शेवटी ते अन्याय्य नियम १८ फेब्रुवारी २०१४ रोजी रद्द करावे लागले. एका अर्थाने मेंढेगिरींच्या भूमिकेला पाठिंबा मिळाला. पण ते नियम रद्द होण्यापूर्वीच समितीने आपला अहवाल ऑगस्ट २०१३ मध्ये सादर केला होता. "कायदा समन्यायी पाणी वाटपाचा म्हणून जलाशयांचे प्रचालनही समन्यायी पद्धतीने" हेच तत्व योग्य आहे. पण अहवाल सादर करण्याच्या तारखे पर्यंत चुकीचा नियम अद्याप अधिकृतरित्या रद्द झाला नव्हता म्ह्णून समितीने शिफारशींच्या भाग क्र.१ मध्ये (तातडीचे उपाय) जायकवाडीत १५ ऑक्टोबर पर्यंत किमान ३३% साठा  हॊईल अशाप्रकारे वरच्या धरणातून सप्टेंबर महिन्यापासून (तक्ता क्र.६ / रणनीती क्र.१प्रमाणे) पाणी सोडावे अशी शिफारस केली. ज्या नियमाआधारे ही शिफारस केली तो नियमच आता रद्द झाला असल्यामूळे त्या शिफारशीला अर्थ राहत नाही. तीही आपोआपच रद्दबातल ठरते.

समितीने पाणी उपलब्धतेच्या विविध  विश्वासार्हता (जायकवाडी हा संदर्भ धरून १००%, ९०%, ७५%,५०%, सरासरी आणि चांगली) गृहित धरून उर्ध्व गोदावरी खॊ-यात पाणीवाटपाच्या सहा पर्यायांचा  एक सैद्धांतिक स्वाध्याय करण्यावर अहवालात भर दिला आहे. विश्वासार्हता जास्त म्हणजे पाणी उपलब्धता कमी असे शास्त्र आहे. सहा पैकी फक्त एका पर्यायात म्हणजे ज्या वर्षी संकल्पित अपेक्षेपेक्षा जास्त पाणी उपलब्ध असेल त्या "चांगल्या वर्षी" खो-यातील सर्व प्रकल्पांच्या सर्व पाणीविषयक गरजा तीनही हंगामात पूर्ण भागवल्या जातील.  पण अन्यथा, एकूणच खो-यात पाणी टंचाई असल्यामूळे अन्य पाचही पर्यायांत घरगुती गरजा, औद्योगिक पाणीवापर आणि खरीपातील सिंचन यात प्रत्येकी २०% कपात सर्वत्र केली जाईल. आणि तरीही उन्हाळी हंगामासाठी खो-यात सिंचनासाठी पाणी देता येणार नाही. पाणी उपलब्धते नुसार रब्बी हंगामातील सिंचनासाठी एका पर्यायात ८०%,दुस-यात ७२%, तिस-यात ५२% ,चौथ्यात ३२% आणि पाचव्या पर्यायात शून्य टक्के पाणी देता येईल. समितीने केलेला हा अभ्यास (तक्ता क्र.५,६,७)  विशिष्ट गृहितांवर आधारित आहे. त्यामूळे गृहिते बदलली तर अर्थातच उत्तरेही वेगळी येतील. समितीने या स्वाध्यायात पाणीवापराचा अग्रक्रम प्रथम घरगुती, नंतर औद्योगिक व शेवटी शेती असा जुन्या जलनीतीनुसार घेतलेला दिसतो.  पाणीवापराचे अग्रक्रम २०११साली बदलले आहेत. आता शेती दुस-या व औद्योगिक पाणी वापर तिस-या स्थानावर आहे. सुधारित अग्रक्रमानुसार समितीने स्वाध्याय का केला नाही? शेतीला उन्हाळी हंगामात पाणी नाही आणि वर रब्बीतही कपात हे जितक्या सहजपणे सांगितले गेले तसे एखाद्या वर्षी औद्योगिक पाणी वापरासाठी पाणी नाही असे कधी सांगितले जाईल का? शेतकरी मग तो नाशिक-नगरचा असो वा मराठवाड्यातला ‘या हंगामात पाणी नाही’ हा जसंवि चा निर्णय आजवर गपगुमान स्वीकारत आला आहे. ही पराकोटीची सहनशीलता उद्योजक कधी दाखवतील?

वर नमूद केलेल्या तक्ता क्र.६ मध्ये एकूण सहा रणनीती सूचित केल्या आहेत. त्यातल्या रणनीती क्र.१ प्रमाणे जायकवाडीत जेव्हा ३७% साठा असेल तेव्हा जायकवाडीच्या वरील भागातील धरणांत ४९ ते ७३% साठा प्रस्तावित केला आहे . त्याच तक्त्यात रणनीती क्र. ६ अन्वये जायकवाडीच्या वाट्याला जेव्हा १०३% पाणी साठा येईल तेव्हा जायकवाडीच्या वरील भागातील धरणांत ११२ ते १७०% साठा प्रस्तावित केला आहे. ही क्र.६ची रणनीती दीर्घकालीन उपाय सूचवताना तक्ता क्र.७ मध्ये मात्र वगळण्यात आली आहे. जायकवाडीचा पाणीसाठा जास्तीतजास्त ८०% पर्यंत जाईल एवढीच तरतुद दिर्घकालीन उपाययोजनेत सूचित केली आहे. त्यामूळे समितीच्या विशिष्ट रचनेमूळे समिती  ख-या अर्थाने पाण्याचे समन्यायी वाटप करू शकली नाही असे म्हणावे लागते. नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणे खो-यातील वरच्या भागात आहेत, त्यातील काही धरणे जायकवाडीच्या तुलनेत जुनी आहेत आणि  खो-यातील येव्याचा (यिल्ड) मोठा भाग वरच्या भागातून येतो  म्हणून त्यांना शेवटी  झुकते माप मिळाले असे अहवालात म्हटले आहे. (तक्ता क्र ५, ६ व ७ मोठे असल्यामूळे या लेखात दिलेले नाहीत. हे तीनही तक्ते स्वयंस्पष्ट नाहीत. त्यातील आकडेमोड कशी केली आहे याचा सोदाहरण खुलासा अहवालात  नाही.)

मेंढेगिरी समितीने टप्पा क्र.१ मध्ये ज्या तातडीच्या उपाय योजनेबाबत शिफारशी केल्या आहेत त्या चौकट क्र.१ मध्ये दिल्या आहेत. त्यात अ. क्र.३ मध्ये कालवा व विहिर यांच्या संयुक्त वापराचा मुद्दा महत्वाचा आहे. पण  ‘पिकांच्या शास्त्रीय पद्धतीने काढलेल्या पाण्याच्या गरजा’ (क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट) असे म्हणण्याऎवजी ‘पिकांच्या शास्त्रीय पद्धतीने काढलेल्या सिंचनाच्या गरजा’ (नेट इरिगेशन रिक्वायरमेंट) असे म्हणणे जास्त योग्य झाले असते. त्याच प्रमाणे हा हिशोब करताना प्रकल्प अहवालातील पीकरचना असा काटेकोर उल्लेख हवा होता. अ.क्र. ४ ची शिफारस केल्याबद्दल समितीचे अभिनंदन करायला ह्वे. पण परिशिष्ट - १ (पृष्ठ १०१ ते १०३) मध्ये वारंवार ‘मान्यता प्राप्त प्रकल्प नियोजनाच्या तुलनेत जास्तीचा खरीप वापर’ असा  उल्लेख आहे. हा जास्तीचा खरीप वापर थांबवणे आवश्यक वाटते.

दीर्घकालीन उपाय योजनांसंदर्भात टप्पा क्र. २ मधील  शिफारशी चौकट क्र.२ मध्ये दिल्या आहेत.

जायकवाडीचा पाणीसाठा जास्तीतजास्त ८०% पर्यंत जाईल एवढीच तरतुद, आणि जायकवाडीच्या वरील धरणात उपयुक्त पाणीसाठा किमान ५३% झाल्याशिवाय जलाशय-नियमन करु नये म्हणजे जायकवाडीसाठी पाणी सोडू नये ही शिफारस  पाहता नाशिक-नगरला  मेंढेगिरी अह्वालानुसार नेहेमीच जास्त पाणी मिळणार आहे.

पाणी वाटपाची तत्वे परिणामकारक पद्धतीने अंमलात आणण्याकरिता यंत्रणा विकसित करण्यासाठी शिफारस करणे ही समितीची दुसरी कार्यकक्षा होती. समितीने ही अत्यंत महत्वाची बाब फार थोडक्यात गुंडाळली आहे. गोमपाविमं च्या कार्यकारी संचालकांना नाशिक-नगरचा साधा कार्यकारी अभियंताही तेथील राजकीय पाठिंब्यामूळे भारी पडतो हा नेहेमीचा अनुभव पाहता जलाशय-नियमन गट (पहा चौकट क्र.२/ मुद्दा क्र.६) हा त्याच त्या अधिका-यांचा गट काय आणि कसलं  नियमन करणार? मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समितीने सूचवल्याप्रमाणे बाभळी बंधा-याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या धर्तीवर कायदेशीर तरतुद केली आणि स्वतंत्र व सक्षम यंत्रणा उभी केली तरच जायकवाडीला थोडेफार पाणी मिळेल.

तिस-या कार्यकक्षेनुसार उपखोरेनिहाय पाणी वाटपाबाबत तांत्रिक, वित्तीय आणि व्यवस्थापकीय सुधारणा समितीने  सूचवणे  अपेक्षित होते. संगणकीय प्रणाली, रियल टाईम डाटा एक्विझिशन सिस्टीम (आणि त्याकरता  रु.५० कोटी फक्त) इत्यादिच्या अत्यंत त्रोटक उल्लेखांचा अपवाद वगळता मेंढेगिरी समितीने या कार्यकक्षेबाबतही  तपशील दिलेला नाही. माजलगाव प्रकल्पातला १९९० च्या दशकातला अत्याधुनिक कालवा स्वयंचलितीकरणाचा प्रयोग दोन तीन वर्षातच बंद पडला  आणि अलमट्टी पूर प्रकरणा नंतर वडनेरे समितीने केलेल्या अशाच प्रकारच्या सूचनांची  अद्याप अंमलबजावणी झालेली नाही या दुर्दैवी अनुभवाचा विचार समितीने केलेला नाही.

खोल खोल पाणी:
 मेंढेगिरी समितीच्या अहवालात आणि विशेषत: विवरणपत्रात खूप महत्वाचा तपशील आला आहे. पण समितीने त्याला योग्यरित्या अधोरेखित केलेले नाही आणि म्हणावा तसा न्याय दिलेला नाही. तो तपशील अभ्यासून त्याचा अन्वयार्थ काढायला जाणे म्हणजे खोल खोल पाण्यात उतरण्यासारखे आहे. ते ना नाशिक-नगरला आवडेल, ना मराठवाड्याला. पण पाणी-प्रश्नाचा तळ गाठायचा असेल तर अनेक बाबी स्पष्टपणे सांगितल्या पाहिजेत. या लेखाच्या उर्वरित भागात तसा प्रयत्न केला आहे.

  समितीने दिलेल्या आकडेवारी प्रमाणे ( तक्ता क्र.२, पृष्ठ २७) जायकवाडीचा संकल्पित उपयुक्त साठा ७६.६८ टिएमसी असताना जायकवाडीत येणारा ७५% विश्वासार्हतेचा नक्त येवा मात्र सद्यस्थितीत २३.७२ टिएमसी (३१ %) एवढाच आहे. या वास्तवामूळे आता जायकवाडी धरण सर्वसामान्य वर्षातदेखील पूर्ण भरण्याची सुतराम शक्यता नाही. अशा गंभीर परिस्थितीत उर्ध्व गोदावरी खो-यात यापूढे नव्याने कोणत्याही प्रकारची धरणे (उदा. उर्ध्व कादवा) बांधण्यावर बंदी घालणे, बांधकामाधीन प्रकल्पांबाबत (उदा. किकवी, भाम, वाकी) पुनर्विचार करणे, एकूण संकल्पित पाणी वापर (डिझाईन वॉटर युज) लक्षणीयरित्या कमी करणे आणि खो-यातील पाण्याची तूट सर्व धरणात समन्यायी प्रमाणात वाटली जाणे आवश्यक ठरते. अन्यथा, जायकवाडी धरण उत्तरोत्तर निरर्थक ठरत जाईल आणि जायकवाडीचे पाणी गृहित धरून झालेली वा भविष्यात होणारी गुंतवणूक (उदा. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर) वाढत्या प्रमाणात व्यर्थ ठरेल.  मराठवाडा विभागाच्या विकासाला फार मोठी खिळ बसेल. समितीने उर्ध्व गोदावरी खॊ-यात यापुढे भूपृष्ठावर नवीन जलसाठे करू नयेत असे म्ह्टले आहे पण बांधकामाधीन प्रकल्पांबाबत काही शिफारस केली नाही. ठिबक व तुषार पद्धतींचा अवलंब झाल्यास संकल्पित पाणी वापर कमी होऊ शकतो हे ही खरे. पण या फार दूरच्या गोष्टी आहेत. मजनिप्रा कायद्यात ठिबक बंधनकारक करण्याची तरतुद २००५ पासून आहे, पण ते कलम अद्याप अंमलात आलेले  नाही. आणि सध्या ठिबकच्या नावे वाढीव क्षेत्राला  परवानगी घेऊन परत मोकाट पद्धतीनेच ऊस घेतला जातो हे वास्तव आहे.

जायकवाडीच्या वर एकूण १३ मोठे व मध्यम प्रकल्प असे आहेत की, त्या प्रकल्पांच्या सांडव्यांवर दारे आहेत. जलाशयातील पाणी पातळी सांडवा पातळीच्या वर असेल तर दारे उचलून या धरणांच्या सांडव्यावरून पाणी सोडता येते. त्या तेरा प्रकल्पात उपयुक्त साठा सांडवा पातळीच्या वर किती आणि सांडवा पातळीच्या खाली किती याचा तपशील विवरणपत्र १ (पृष्ठ ६२) मध्ये दिला आहे. प्रत्येक धरणात सांडवा पातळीच्या खाली किती  उपयुक्त साठा आहे याच्या टक्केवारीची  सरासरी ५३% येते. त्या ५३ टक्के उपयुक्त साठ्याला  समिती बंधनकारक साठा (मॅनडेटरी स्टोरेज) असे म्हणते. म्हणजे त्या तेरा धरणात प्रत्येकी उपयुक्त साठा जो पर्यंत ५३ % होत नाही तो पर्यंत त्या धरणातून खाली पाणी सोडले जाणार नाही. समितीची ही शिफारस मान्य होण्यासारखी नाही. ‘सरासरीचा आकडा’ या पलिकडे ५३% या विशिष्ट आकड्याला काहीही शास्त्रीय आधार नाही. एकूण तेरा पैकी सांडवा पातळीच्या वर (स्टोरेज अगेन्स्ट गेट) किमान ४०% ते कमाल ८९% उपयुक्त साठा असलेले ९ प्रकल्प आहेत. जायकवाडीचा उपयुक्त साठा किमान ५०% होत नाही तो पर्यंत या ९ प्रकल्पांची दारे बंद करू नका असे का नको? ते समन्यायाला व ‘टेल टू हेड’ या तत्वाला जास्त धरून होणार नाही का? समितीचा ५३% चा आग्रह उलट भंडारदरा,निळवंडे, गौतमी व कश्यपी या धरणांना महागात पडेल कारण समितीच्या शिफारशी प्रमाणे येणारा बंधनकारक साठा या प्रकल्पांच्या सांडवा पातळी खालील उपयुक्त साठ्यापेक्षाही कमी येतो. सांडवा पातळीच्या खालील पाणी सोडायचे झाल्यास ते कालव्यातून सोडावे लागेल. ते व्यवहार्य होईल का? आणि उत्तर जर हो असेल तर मग सांडव्यावर दारे नसलेल्या इतर धरणांतूनही जायकवाडीसाठी पाणी सोडा! समितीने मग सांडव्यावर दारे नसलेल्या प्रकल्पांना प्रचालन रणनीती सुचवताना का वगळले? 

बिगर सिंचनाचा (पिण्याचे व औद्योगिक वापराचे पाणी)  तपशील विवरणपत्र क्र.२ (पृष्ठ ६३) मध्ये दिला आहे. त्यावरून पुढील निष्कर्ष निघतात. उर्ध्व गोदावरी खो-यातील जायकवाडीसह १८ मोठ्या व मध्यम प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पांच्या (५०%)  मूळ नियोजनात बिगर सिंचनाची तरतुद केलेली नव्हती. अठरा प्रकल्पांचा एकत्रित विचार केल्यास बिगर सिंचनाची मूळ नियोजनातील एकूण तरतुद फक्त ७.१५ टिएमसी होती. सिंचनाकडे दुर्लक्ष करून काळाच्या ओघात आत्तापर्यंत जसंवि ने बिगर सिंचनासाठी एकूण ३४.५ टिएमसी पाण्याचे (म्हणजे मूळ नियोजनाच्या ४.८ पट ) आरक्षण केले आहे. सन २०११-१२ मधील बिगर सिंचनाचा प्रत्यक्ष वापर १९.३ टिएमसी ( म्हणजे मूळ नियोजनाच्या २.७ पट) आहे. पिण्याकरिता व औद्योगिक वापराकरिता मूळ नियोजनात तरतुद न करणे किंवा फार कमी तरतुद करणे आणि म्हणून लाभक्षेत्र खूप मोठे होणे व कालवे खूप लांबवर नेले जाणे ही पहिली गंभीर चूक. सिंचनाचे पाणी बिगर सिंचनाकडे वळवल्यावर (की पळवल्यावर?) सिंचन क्षमतेचे वास्तववादी पुनर्मूल्यांकन करून लाभक्षेत्र त्या प्रमाणात कमी न करणे ही दुसरी गंभीर चूक.  कमी झालेल्या पाण्यात मूळ नियोजनाप्रमाणेच लाभक्षेत्र सिंचित करण्यासाठी कालव्यांची चांगली देखभाल-दुरूस्ती करून सिंचन कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ न करणे ही तिसरी गंभीर चूक. या एक से एक भारी चूकांची फळे आपण आज भोगतो आहोत. नाशिक-नगर विरूद्ध मराठवाडा हा संघर्ष तुलनेने सोपा आहे. भोळाभाबडा शेतकरी त्यासाठी प्यादं म्हणून वापरला जाईल. सिंचन विरूद्ध बिगर सिंचन हा संघर्ष मात्र खूप अवघड व महत्वाचा आहे. समिती त्याबद्दल काहीही उपाय योजना सूचवित नाही. अडाणी, गरीब व चहूबाजूने नाडलेल्या शेतक-याने लोडशेडिंगला तोंड देत पिकांना किफायतशीर बाजारभाव मिळत नसताना ठिबक वापरावे अशी सूचना करणारी समिती बिगर सिंचनाची पाणी मागणी कमी व्हावी किंवा बिगर सिंचनाचा वापर कार्यक्षम व्हावा म्हणून काहीही सूचवित नाही हे चांगलेच खटकते. (बिगर सिंचनाची मागणी कमी करण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. विस्तारभयास्तव त्याची चर्चा येथे केलेली नाही.)

संकल्पित उपयुक्त साठा आणि संकल्पित पाणी वापर याची ‘धरण-समूह’वार (कॉम्प्लेक्सवाईज) आकडेवारी समितीने विवरणपत्र क्र. ५ (पृष्ठ ६६ ते ६८) मध्ये दिली आहे. त्यावरून असे दिसते की, जायकवाडी प्रकल्पापर्यंत उर्ध्व गोदावरी खो-यातला संकल्पित पाणी वापर हा संकल्पित उपयुक्त साठ्यापेक्षा एकूण ३८ टक्क्यांनी जादा आहे. प्रवरा व गोदावरी-दारणा या दोन धरण-समूहात ही टक्केवारी खूपच जास्त म्हणजे अनुक्रमे ५३ % व ६९% आहे. पाण्याची कमी व मर्यादित उपलब्धता पाहता संकल्पित पाणी वापर कमी करणे आवश्यक नाही का? त्याबद्दल समितीने काही भाष्य केलेले नाही. प्रत्यक्ष पाणी वापराची आकडेवारी (मूळ संकलित स्वरूपात - ‘रॉ’ डाटा) अहवालातील परिशिष्टात उपलब्ध आहे परंतू त्याचे विश्लेषण आणि संकल्पित पाणी वापराशी तुलना करून  काढलेले निष्कर्ष प्रस्तुत लेखकाला अहवालात आढळले नाहीत. प्रकल्पवार, पीकवार, हंगामवार सिंचित पिकांचे क्षेत्र, मंजूर प्राथमिक सिंचन अहवाल (पी.आय.पी.) आणि जललेखा व बेंचमार्किंग अहवाला आधारे प्रत्यक्ष पाणी वापराचे विश्लेषण केले असते तर एकूण परिस्थितीवर पुरेसा प्रकाश पडला असता. हा अभ्यास सहज साध्य असताना का केला गेला नाही? पीकरचनेत बदल करून पाणीवापरावर निर्बंध आणणे हा एक महत्वाचा उपाय होऊ शकतो.  खरीप व रब्बी हंगामातील भुसार पिकांसाठी सर्वांना पाणी मिळणे श्रेयस्कर नाही का? किंबहूना, असे किमान दोन हंगामात पाणी देता आले तरच त्याला सिंचित क्षेत्र म्हणावे असे चितळे आयोगाने १९९९ साली सांगून ठेवले आहे.

मुळा आणि मंधोल  प्रकल्प हे आठमाही सिंचन प्रकल्प आहेत असे  पहिल्या प्रकरणात म्हटले आहे. पण इतर प्रकल्पांबाबत मात्र तसा काही विशेष उल्लेख केलेला नाही. परिशिष्ट क्र.७ (पृष्ठ १४५ व१४६) मध्ये प्रकल्पवार उन्हाळी हंगामातला नियोजित सिंचन वापर व ५ वर्षांचा  प्रत्यक्ष वापर याचा तपशील दिला आहे. त्यावरून असे दिसते की, मुळा,मंधोल, निळवंडे, भोजापुर,आळंदी, भाम, वाकी, करंजवण, वाघाड, पुनेगाव,ओझरखेड,तिसगाव, मुकणे व वालदेवी या प्रकल्पात उन्हाळी हंगामात सिंचनाकरिता नियोजित पाणी वापर शून्य  आहे.  पण निळवंडे, भाम,वाकी व तिसगाव प्रकल्पांचा अपवाद वगळता इतर सर्व प्रकल्पात सिंचनासाठी उन्हाळ्यात प्रत्यक्ष वापर मात्र दिसतो. ज्या प्रकल्पांत उन्हाळ्यात सिंचनासाठी पाणी वापर नियोजित नाही ते प्रकल्प जर उन्हाळ्यात पाणी वापर करत असतील तर त्यांच्या खालच्या प्रकल्पांचे तर ते पाणी वापरत नाहीत ना? वर नमूद केलेल्या प्रकल्पांपैकी जे प्रकल्प आठमाही सिंचनाचे प्रकल्प आहेत त्यांचा तर स्वतंत्रच विचार व्हायला हवा. उदाहरणार्थ, मुळा आठमाही सिंचन प्रकल्प आहे. मग त्या प्रकल्पात उन्हाळी सिंचनाकरिता ९.६ टिएमसी वापर का? याचा सूस्पष्ट  खुलासा व्हायला हवा.

अनेक प्रकल्पांत जलाशयांच्या उपयुक्त साठ्यात गाळाचे लक्षणीय प्रमाणात अतिक्रमण झाले आहे असे परिशिष्ठ १ (पृष्ठ १०१ ते १०३) मधील तपशीलावरून दिसते. समितीने या वस्तुस्थितीचा प्रकल्पनिहाय पाणी उपलब्धतेच्या संदर्भात  कसा विचार केला हे  नीट कळत नाही. गंगापूर धरणात गाळ साठला म्हणून त्याची भरपाई करण्याकरिता  किकवी धरण बांधले जाता असताना हा मुद्दा जास्तच महत्वाचा ठरतो. हा ‘किकवी पॅटर्न’ इतर धरणांनाही जसंवि लागू करणार का?  जायकवाडी प्रकल्पासंदर्भात बाष्पीभवनाच्या पूर्वी झालेल्या अभ्यासात (समितीने केलेल्या अभ्यासात नव्हे) पुणे येथील हवामान केंद्राची माहिती (पृष्ठ ३७) कशी काय वापरली गेली असाही  प्रश्न साहजिकच पडतो.

सिंचन घोटाळ्या संदर्भात चितळे समितीने आपल्या अहवालात अनेक अनियमितता उघडकीस आणल्या आहेत. त्यामध्ये पाणी उपलब्धतेची विश्वासार्हता ७५% ऎवजी ५०% धरून प्रकल्पाचा साठा वाढवणे आणि जुन्या प्रकल्पात नवीन घटक जोडणे याचा समावेश आहे. मेंढेगिरी समितीने उर्ध्व गोदावरी खो-यातील सर्व मोठ्या व मध्यम प्रकल्पांबाबत काही अपवाद वगळता (उदा. निळवंडे) विश्वासार्हतेचा तपशील दिलेला नाही. तो तपासला जाणे उचित होईल. तसेच जुन्या प्रकल्पात नवीन घटक जोडले गेले आहेत का (उदा. वांबोरी व भागडा चा-या) याचाही खुलासा होणे आवश्यक आहे. कारण त्यामूळे पाणी वापराचे गणित व तर्कशास्त्र बदलते. खालच्या प्रकल्पांवर त्याचा निश्चितच परिणाम होतो. उर्ध्व गोदावरी खो-यातील सर्वच प्रकल्पांबद्दल प्रथम श्वेतपत्रिकेत आणि नंतर चितळे समितीच्या अहवालात नक्की काय तपशील आला आहे हे नीट तपासून मगच पाणी वाटपाबद्दल मजनिप्रा व न्यायालयाने निर्णय घेणे उचित होईल असे वाटते.

ऎतिहासिक संधी:
सिंचन श्वेतपत्रिका, चितळे समितीचा (एस.आय.टी.) अहवाल,  कॅगने ओढलेले ताशेरे आणि मेंढेगिरी समितीचा अहवाल असा एकत्रित अभ्यास केला तर असे वाटते की, आभाळच फाटले आहे!  कोठे कोठे ठिगळं लावणार? या सगळ्यातून एकच निष्कर्ष निघतो - महाराष्ट्रातील जल विकास व व्यवस्थापनाला कोणतीही शिस्त नाही. चक्क अनागोंदी माजलेली आहे. येन केन प्रकारेण फक्त जलसाठे वाढवत न्यायचे. ते वाढवताना शास्त्र गुंडाळून ठेवायचे, तारतम्य आणि शहाणपण बाजूला सारायचे आणि  निव्वळ व्यवहार व स्वार्थ पहायचा असा एकूण उद्वेगजनक व शिसारी आणणारा प्रकार आहे. आपण कधी अंतर्मुख होणारच नाही का? सर्व परिस्थितीचा एकत्रित, काटेकोर व प्रामाणिक आढावा कधी घेणारच नाही का? प्रत्येक समिती तिच्या कार्यकक्षेचे कारण देत सुटासुटा व मर्यादितच अभ्यास करणार का? मजनिप्रा ला जायकवाडी-प्रकरणाच्या निमित्ताने नवा, वेगळा व सम्यक विचार करण्याची एक ऎतिहासिक  संधी मिळाली आहे. मजनिप्रा त्या संधीचे सोने करेल का? की केवळ वकिली पवित्रा घेत वेळ मारून नेईल? जलक्षेत्रातल्या पहिल्यावहिल्या नियामक प्राधिकरणाचा (रेग्युलेटरी एथॉरेटी) नियामक (रेग्युलेटर) रामशास्त्री बाणा दाखवेल का? मजनिप्रा चे  अध्यक्ष, सदस्य व सचिव अनुक्रमे  बुद्धीराजा, चित्कला झुत्शी व कुलकर्णी यांची जलक्षेत्रातील पाटी कोरी आहे. ते त्या को-या पाटीवर निर्भिड व स्वायत्त जल नियमनाचा श्रीगणेशा करतील का? आशानाम मनुष्याणाम.......

- प्रदीप पुरंदरे 
* निवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद. संयोजक, मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समिती.


____________________________________________________________
चौकट क्र.१:  तातडीच्या उपाय योजना
१)  दरवर्षी ऑगस्ट महिना अखेरीस पावसाबद्दलचे अंदाज, पाण्याची प्रत्यक्ष उपलब्धता व उपयुक्त साठा लक्षात घेऊन सप्टॆंबर महिन्याच्या सुरुवातीपासून १५ ऑक्टोबर पर्यंत  जायकवाडीत किमान ३३% साठा  हॊईल अशाप्रकारे वरच्या धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडावे.
२)  विविध धरणातून पाणी सोडण्यासाठी तक्ता क्र ६ मधील रणनीती क्र.१ प्रमाणे प्रचालन करावे
३)  पिकांच्या शास्त्रीय पद्धतीने काढलेल्या पाण्याच्या गरजा आणि कालवा व विहिर यांचा संयुक्त पाणी वापर विचारात घेऊन खरीप हंगामात  प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात पाणीवापर करता येईल.
४)  शेततळी भरून घेणे, लाभक्षेत्राच्या बाहेर सिंचन करणे वगैरे हेतूंसाठी वरच्या धरणातील पाणी कालव्यात, पुर कालव्यात आणि नदीनाल्यात  सोडणे वगैरे बाबी जायकवाडी धरण पूर्ण भरल्यानंतरच करण्यास परवानगी देण्यात येईल.
५) उर्ध्व गोदावरी खो-यात यापुढे भूपृष्ठावर कोणत्याही प्रकारे पाणी साठे करु नयेत.
_______________________________________________________________



______________________________________________________________________________
चौकट क्र.२: दीर्घकालीन उपाय योजना
१) उपखो-यातील पाण्याच्या तूटीचे व्यवस्थापन जलनीती व मजनिप्रा कायद्याप्रमाणे समन्यायी पद्धतीने करावे.
२) राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संस्था व सल्लागारांच्या मदतीने जलाशयांचे प्रचालन  व पुराचे नियमन संगणक व रियल टाईम डाटा एक्विझिशन सिस्टीम वापरून विकसित करावे.त्यासाठी अंदाजे ५०कोटी रूपये लागतील.
३) वर नमूद केलेले प्रचालन तक्ता क्र. ७ मधील रणनीती क्र.१ ते ५ वापरून करावे.दर ५ वर्षांनी रणनीतीचा आढावा घ्यावा व त्यात आवश्यक असल्यास बदल करावा.
४) दरवर्षी ऑगस्ट महिना अखेरीस पावसाबद्दलचे अंदाज, पाण्याची प्रत्यक्ष उपलब्धता व उपयुक्त साठा लक्षात घेऊन सप्टॆंबर महिन्यापासून १५ ऑक्टोबर पर्यंत धरणांचे प्रचालन करावे
५) जायकवाडीच्या वर असलेल्या धरणातील (सांडव्यावर दारे असलेल्या) उपयुक्त पाणीसाठा किमान ५३% झाल्याशिवाय जलाशय-नियमन करु नये.
६) गोदावरी जलाशय नियमन गट कायम स्वरूपी स्थापन करावा. गोमपाविमं चे कार्यकारी संचालक त्या गटाचे मूख्य असावेत. संबंधित अधिकारी त्या गटाचे सदस्य असावेत.
७) चौकट क्र. १ मधील अटी क्र. ३ व ४ पाळल्या जाव्यात.
८)निभावणीचा साठा (कॅरी ओव्हर) चांगल्या पाऊसमानाच्या वर्षात / सर्वसाधारण वर्षात वापरू नये
९) पूर्ण उर्ध्व गोदावरी उपखो-यात ठिबक व तुषार सिंचनाचा पथदर्शी प्रकल्प घेतला जावा आणि येत्या ५ वर्षात या आधुनिक सिंचन पद्धती बंधनकारक केल्या जाव्यात.
१०)उपखो-यातील सर्व मोठ्या व मध्यम धरणांमध्ये रिव्हर स्लुयिसची व्यवस्था (नदीत पाणी सोडण्याकरिता विमोचक) करावी
______________________________________________________________________________



Monday, July 21, 2014

SIT- Chitale Commission report

अभ्यास उत्तम, तपशील स्फोटक आणि तरीही....
-प्रदीप पुरंदरे

               " केवळ महामंडळांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांच्यावर निर्णयाचे  अधिकार केंद्रित झाले व व्यवस्थेतील सामुहिक कार्यपद्धती नष्ट झाली".

                 "प्रकल्पावर झालेला खर्च मंजुरीपेक्षा अधिक झाला आहे आणि म्हणून कार्यकारी संचालकांना सुप्रमा देण्याचे अधिकार नाहीत, ही बाब नियामक मंडळाच्या नजरेस न आणल्याबाबत कॅफो आणि कार्यकारी संचालक जबाबदार आहेत.  ज्या प्रकरणी नियामक मंडळाच्या नजरेस ही बाब आणून सुध्दा मंजुरी दिली गेली आहे, अशा प्रकरणी मंडळाच्या बैठकीस उपस्थित असणारे सदस्य आणि अध्यक्ष यांच्यावर जबाबदारी येते. संबंधितांबाबत शासनाने उचित निर्णय घ्यावा."

सिंचन घोटाळ्या संदर्भात सारवासारव करण्यासाठी चितळे समिती नेमली गेली असा सर्वसाधारण समज आहे. चितळे समितीच्या अहवालाचा संक्षिप्त परिचय आणि शासनाचा कार्यपालन अहवाल वाचूनच फक्त  आपण जर थांबलो तर तो समज अजूनच दृढ होतो. पण अहवालाच्या  पहिल्या खंडाचा नेटाने अभ्यास केला तर असे लक्षात येते की, समितीने सखोल, समग्र व दर्जेदार अभ्यास केला आहे. एवढेच नव्हे तर खूप मोठा स्फोटक तपशीलही अहवालात दिला आहे. लेखाच्या वर उधृत केलेले अहवालातील ताशेरे  त्याची साक्ष देतात.   कदाचित म्हणूनच अहवाल सादर केल्यावर माध्यमांना मुलाखत देताना चितळे म्हणाले होते की, ‘त्यांच्या समितीने कोणालाही क्लिन चिट दिलेली नाही!’  प्रश्न असा आहे कीअहवालातील तपशीलाला साजेशा कारवाईच्या शिफारशी समितीने का केल्या नाहीत? जलसंपदा मंत्री, मुख्य सचिव व जलसंपदा विभागाचे दोन्ही सचिव  यांना स्पष्टपणे जबाबदार का पकडले नाहीमहामंडळांचे अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य म्हणून त्यांनी काय केले? या प्रश्नांची उत्तरे मिळायला कदाचित काही काळ जावा लागेल. तूर्तास समितीने उघड केलेल्या तपशीलातील काही निवडक भागाबद्दल या लेखात चर्चा केली आहे.

 ‘सिंचन क्षेत्राचा हिशोब’ या पहिल्या प्रकरणात समितीने आठमाही सिंचन धोरणाचा उहापोह केला आहे. अवर्षण प्रवण असलेल्या लाभक्षेत्रात जास्तीसजास्त शेतक-यांना सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी  राज्यातील सर्व नवीन प्रकल्पांवर आठमाही पाणी पुरवठा पद्धत सुरू करण्याचा निर्णय १९८७ साली घेण्यात आला. समितीच्या मात्र असे निदर्शनास आले कीसन १९८७ नंतर प्रकल्पांना दिलेल्या प्रशासकीय मान्यता (प्रमा) व सुधारित प्रशासकीय मान्यतांमध्ये (सुप्रमा) आठमाही सिंचन धोरणाचा काटेकोर अवलंब केला गेला नाही. उलट  अनेक प्रकल्पांत बारमाही पिकांनाही मंजूरी देण्यात आली. त्यामूळे अर्थातच सिंचनात समन्याय प्रस्थापित होऊ शकला नाही.  एकूण सिंचित क्षेत्र आक्रसले.  शासनाच्या अधिकृत धोरणाची पायमल्ली झाली.

 ‘प्रकल्पांच्या किंमतीतील वाढ’ या दुस-या प्रकरणात समितीने प्रमा व सुप्रमा संदर्भात एकूण काय प्रकार झाला त्याचा तपशील दिला आहे. तो थोडक्यात पुढील प्रमाणे: नदीखो-याचा बृहत आराखडा नसताना प्रकल्पांना मंजू-या दिल्या गेल्या. नदीखोरेनिहाय बृहत आराखडे अद्याप केलेले नाहीत. सिंचन प्रकल्पांना प्रमा,सुप्रमा व तांत्रिक मान्यता देताना सार्वजनिक बांधकाम खात्याची १९८४ सालची नियमावली वापरण्यात आली. जलसंपदा विभागाकडे स्वत:ची अशी स्वतंत्र नियमावली अद्याप नाही. पाटबंधारे विकास महामंडळे १९९६ ते १९९८ या कालावधीत ज्या अधिनियमांद्वारे अस्तित्वात आली त्या अधिनियमांचे नियम अद्याप केलेले नाहीत. नवीन प्रकल्पांना अथवा ज्या प्रकल्पांच्या व्याप्तीत लक्षणीय बदल झाला त्या प्रकल्पांना २००५ नंतर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची (मजनिप्रा) मान्यता घेणे कायद्याने बंधनकारक असताना तशी मान्यता घेतली नाही. काही प्रकल्पांना तर  केंद्रिय जल आयोगाचीही मान्यता प्राप्त नव्हती. प्रमा / सुप्रमा मंजूरीचे अधिकार वेगवेगळ्या वेळी निरनिराळ्या प्रदेशात वेगवेगळ्या अधिका-याकडे होते. विहित केलेल्या अटी व शर्ती सुद्धा वेगवेगळ्या होत्या. कृष्णा व तापी महामंडळांच्या अधिनियमात तरतुद करून त्यांना प्रमाचे अधिकार देण्यात आले. इतर महामंडळांना ते देण्यात आले नाहीत. हा भेदभाव का केला याचे स्पष्टीकरण शासन समितीस देऊ शकले नाही. महामंडळांनी प्रकल्पनिहाय  निधीचे वितरण, प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवणे आणि लाभव्ययाचे मापदंड पाळले जातील याची शाश्वती देणे याबाबत कोणतेही नियम व विनियम केले नाहीत. निधीची उपलब्धता आणि भावी दायित्वाचा विचार न करता प्रकल्पास मान्यता दिल्या. राज्यपालांच्या सूचना अथवा मजनिप्रा चा संदर्भ न देता अनेक महत्वाचे आदेश काढण्यात आले. वित्त विभाग व जलसंपदा विभाग यांनी एकमेकांना विश्वासात न घेता काही आदेश परस्पर काढले.  अधिकार नसताना महामंडळांनी सुप्रमा देणे, आवश्यक ती प्रकरणे "व्यय अग्रक्रम" समितीकडे न पाठवणे, सुप्रमा दिल्यामूळे निर्माण झालेले दायित्व हे महामंडळांच्या अर्थसंकल्पीय अनुदानापेक्षा जास्त होणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) यांची सहमती न घेता मान्यता देणे असे प्रकार झाले. समितीने निदर्शनास आणलेल्या  अन्य काही  गंभीर अनियमितता वानगीदाखल येथे दिल्या आहेत.  चुकीच्या/ अपु-या अन्वेषणावरून अंदाजपत्रके केल्यामूळे काम सुरू झाल्यावर त्यात मोठ्या प्रमाणावर बदल करणे व किंमती वाढवणे, तांत्रिक मान्यता हा केवळ औपचारिक कार्यालयीन उपचार मानून निविदा काढण्याची घाई करणे, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र न घेता धरणांची उंची वाढवणे किंवा जुन्या प्रकल्पात बॅरेजेसचा नव्याने समावेश करणे, प्रकल्पाच्या व्याप्तीबदलास शासनाची मान्यता न घेणे, स्वतंत्ररित्या लाभव्यय गुणोत्तर बसत नसल्यास नव्या प्रकल्पांचा जुन्या प्रकल्पात समावेश करून लाभ आजच्या दराने तर खर्च जुन्या दराने घेणे, पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापकांच्या नोंदीऎवजी लाभक्षेत्रातील पर्जन्यमापकांच्या नोंदी वापरून जलसाठ्याचे संकल्पन करणे, वगैरे, वगैरे. व्याप्तीबदल आणि नियोजनाअभावी झालेला विलंब यामूळे साहजिकच किंमतवाढ झाली. समितीच्या अभ्यासानुसार १०० प्रकल्पांची भाववाढीचा घटक वगळता येणारी वास्तविक किंमतवाढ  रू.३१७१४ कोटी एवढी असून २५ वर्षांपूर्वीच्या मूळ किंमतीच्या ती ३.८ पट आहे. 

 ‘प्रकल्पांतील विलंब’ या तिस-या प्रकरणात समितीने विलंबाच्या कारणांचा मागोवा घेतला आहे. त्या अनेक व्यवहार्य कारणात काही अंशी जरूर तथ्य असले तरी  समितीने निदर्शनास आणून दिलेली इतर  कारणे जास्त खरी आहेत. ज्या विभागाकडून मान्यता हवी त्या विभागांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जलसंपदा विभागाचा प्रस्ताव परिपूर्ण नसणे, त्या विभागाकडे आवश्यक त्या फी ची रक्कम वेळेवर  न भरणे, निधी उपलब्ध होणार नाही हे माहित असताना मोठ्या संख्येने कामे हाती घेणेकार्यक्रम पत्रिका (वर्क प्लॅन) तयार न करणे आणि प्रकल्प बाधितांना तसेच लाभधारकांना विश्वासात न घेणे ही ती कारणे आहेत. विलंब झालेल्या प्रकल्पांचा तपशील चक्रावून टाकणारा आहे. ६८ प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर प्रथम अनुदान  २ ते २६ वर्षे मिळाले नाही. तर  अनुदान मिळाल्यावर प्रत्यक्ष काम सुरू करायला ६२ प्रकल्पात २ ते १९ वर्षे लागली. व्याप्तीबदलामूळे ९५ प्रकल्पांत विलंब झाला.

 ‘प्रकल्पांमधील व्याप्तीबदल’ या चौथ्या प्रकरणातला तपशील देताना समिती म्हणते की, ज्या व्याप्तीबदलामूळे विलंब झाला आणि  कैकपटीने किंमतवाढ झाली त्या व्याप्तीबदलाची व्याख्याच १९९९ सालापर्यंत जलसंपदा विभागाने केली नव्हती. व्याप्तीबदल नक्की कशाला म्हणायचे आणि त्याबाबत नक्की काय करायचे याबद्दल मार्गदर्शक तत्वे उपलब्ध नव्हती. १९९९ ते २०१३ या काळात काही  सूचना दिल्या गेल्या पण समितीच्या मते त्या परिपूर्ण नव्हत्या. नियोजन विभाग व मजनिप्रा यांच्या सहमतीने जलसंपदा विभागाने १०.६.२०१३ रोजी प्रथम तपशीलवार मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. तो पर्यंत घोटाळा होऊन गेला होता!  समितीला नाईलाजाने २०१३ सालच्या तत्वांआधारे त्या पूर्वीच्या व्याप्तीबदलांचा अभ्यास करावा लागला.

‘उपसा सिंचन योजना’ या पाचव्या प्रकरणात समितीने राज्यातल्या उपसा योजनांचा काटेकोर व समग्र आढावा घेतला आहे. "उपसा सिंचन योजनेची सफलता ठरवीत असताना त्यावर होणारा विजेचा प्रत्यक्ष खर्च (सवलतीचे विशेष दर न घेता) विचारात घ्यावा व त्यानुसार योजनेचे लाभव्यय दर ठरवावेत" ही चितळे आयोगाने १९९९ साली केलेली शिफारस शासनाने अद्याप स्वीकारलेली नाही याबाबत खंत व्यक्त करून "उपसा सिंचन योजनांमध्ये तांत्रिक तपशीलासोबतच सामाजिक व आर्थिक भाग हा कळीचा मुद्दा आहे. त्याचा विचार न करता, उपसा योजना मंजूर होत आहेत" असे सूस्पष्ट विधान समितीने केले आहे.

 ‘भविष्यातील सिंचन क्षेत्रविस्तार’ या आठव्या प्रकरणात समितीने काही विशेष स्फोटक तपशील दिला आहे. महामंडळांच्या रचनेबाबत भाष्य करताना समितीने दिलेली पुढील माहिती धक्कादायक आहे. विदर्भ महामंडळामध्ये एकूण २२ सदस्य (९ शासकीय अधिकारी व १३ अशासकीय सदस्य) कायद्यानुसार अपेक्षित आहेत. पण  अशासकीय  सदस्यांची नेमणूक न केल्याने महामंडळाला केवळ शासनांतर्गत समिती असे औपचारिक रूप आले आहे. त्यातून परत महत्वाचे शासकीय सदस्य( वित्त, नियोजन व पुनर्वसन या विभागांचे सचिव) अनेक बैठकांना अनुपस्थित राहतात. त्यामूळे सामूहिक निर्णय प्रक्रिया होत नाही. बैठकांसाठी गणसंख्येचा (कोरम) नियम न करणे व महामंडळाचा आंतरिक वित्तीय सल्लागार म्हणून (मुख्य अभियंता दर्जाचा) लेखा सेवेतील ज्येष्ठ अधिकारी महामंडळाच्या रचनेत कायद्याने देण्यात आला असताना त्याच्या अनुपस्थितीत अधिक्षक अभियंत्यांना त्या पदाचा कार्यभार देणे अशा चलाख्या हवे ते निर्णय करून घेण्यासाठी कशा केल्या गेल्या हे समितीने उघड केले आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने तर कसा कहर केला त्याचा किस्सा समितीने याच प्रकरणात दिला आहे. मंडळाच्या विसाव्या बैठकीत दि.१३.८.२००४ रोजी  प्रकल्पांना प्रमा / सुप्रमा देण्याचे अधिकार नियामक मंडळाच्या वतीने अध्यक्षांना (म्हणजे जलसंपदा मंत्र्यांना) देण्यात आले. त्यामूळे सर्व अधिकार एकाच व्यक्तीच्या हातात केंद्रित झाले. धाडसाचा भाग  असा की, या बैठकीला फक्त तीन सदस्य (अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक  आणि कार्यकारी संचालक) आणि चार ‘निमंत्रित’ अधिकारी उपस्थित होते. गणसंख्येचा नियम नसल्यामूळे फक्त तिघांनी एवढा मोठा निर्णय घेतला. समितीचे पुढील विधान महामंडळांच्या  कारभाराबाबत खूप बोलके आहे. "महामंडळे जरी प्रदेशश: / खोरेश: निर्माण झालेली दिसत असली तरी व्यवहारात त्यांचे  निर्णय केंद्र हे कायम मंत्रालयातच राहिले. महामंडळांच्या मुख्यालयात केवळ अपवादात्मक बैठकी घेण्यात आल्या. त्यामूळे एका बाजूस विकेंद्रित सामुहिक चर्चा विनिमयातून व्हावयाच्या निर्णयांना प्रोत्साहन राहिले नाही व दुस-या बाजूस मंत्रालयामध्ये ज्या पद्धतीने धारिकांवर छाननी व निर्णय प्रक्रिया होते तिचाही वापर झाला नाही. व्यवहार व निर्णय प्रक्रिया ही केवळ अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांच्या हातात एकवटली गेली".

पहिल्या आठ प्रकरणात खूप मह्त्वाचा व स्फोटक तपशील दिल्यामूळे समिती आता शेवटी दणका देणार असे वाटायला लागते. अपेक्षा वाढतात. पण ‘अनियमिततांबद्दलची कारवाई’ या नवव्या प्रकरणात मात्र फार मोठा अपेक्षाभंग होतो.  अनियमिततांबद्दल कारवाईच्या शिफारशी करताना समितीने घेतलेली भूमिका थोडक्यात पुढील प्रमाणे - शासनाने समिती नेमण्याच्या आदेशामध्ये अनियमितता हा शब्द नियमबाह्यता या मर्यादित अर्थाने वापरला आहे.पुरेसे नियम व मार्गदर्शक रचना उपलब्ध नाही म्हणून अधिका-यांनी अतर्कसंगत व विसंवादी निर्णय घेतले.अनियमितता दोन प्रकारची असते. एक - व्यवस्था दोष. दोन - व्यक्ती निगडित दोष. व्यवस्था दोष, जे अनेक दशकांपासून जल संपदा विभागात आहेत, त्याबद्दल व्यक्तीला कसे जबाबदार धरणार? ४४ व्यवस्था दोषांच्या यादीसाठी विवरणपत्र क्र.९/१ पहावे. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा  जबाबदार आहे. बेचाळीस सुधारणांसाठी विवरण पत्र क्र. ९ /२ पहावे. जलसंपदा विभागाने गेल्या काही बर्षात आपणहून कितीतरी चांगले निर्णय घेतले की नाही? केवळ दंडात्मक कारवाई न करता शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी.  विवरणपत्र ९/४ पहावे. त्यात कारवाई बाबत वेगळा विचार मांडला आहे. अधिका-यांवर कारवाई केल्यास त्यांचे मनोधैर्य घटेल. वगैरे, वगैरे.  या भूमिकेतून समितीने विविध प्रकारची कारवाई सुचवली आहे. त्यात नोंद घ्या, खुलासा मागा, उचित निर्णय घ्या,वेगळा तपास करा, सखोल चौकशी करा, योग्य ती कारवाई करा, सौम्य / किरकोळ शिक्षा करा, कठोर कारवाई करण्यासाठी विभागीय चौकशी करा अशा "जबर शिक्षा" प्रस्तावित केल्या आहेत. समितीचे हे असे का झाले? कोणाच्या हेतूंवर शंका घेणे योग्य नाही पण  अहवालाच्या सुरूवातीला समितीची भूमिका स्पष्ट करताना तथाकथित ‘कार्यकक्षेबाहेरील’ अशासकीय निवेदनांसंदर्भात समितीनेच "हेतू"  हा तसा धूसर मुद्दा असल्याचे म्हटले आहे याची  नोंद मात्र घ्यायला हवी.
 
*******

* निवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद
Edited version of this article published in Loksatta dt 22.7.2014 under different title.



Sunday, June 22, 2014

अहवाल आला, पण....




सिंचन घोटाळा विषयक विशेष चौकशी समितीचा अहवाल नुकताच विधान मंडळात मांडण्यात आला. त्यामुळे साहजिकच राज्यात सध्या गदारोळ माजला आहे. उलटसुलट मते व्यक्त होता आहेत. आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. हे सर्व काही अंशी काही काळ अपरिहार्य असले तरी पाणी-प्रश्नाच्या गंभीर अभ्यासकांनी अनावश्यक घाई न करता जास्त तपशीलात जाऊन शांतपणे अभ्यास करून मगच समितीच्या अहवालाबद्दल योग्य ती भूमिका घेतली पाहिजे. त्या दृष्टीने समितीची गृहिते, समितीने वापरलेल्या व्याख्या, समितीच्या माहितीचा स्त्रोत व संकलनाची पद्धत, समितीने ग्राह्य मानलेले संदर्भ, इत्यादी बाबी तपासल्या जाणे अगत्याचे आहे. तसा एक प्राथमिक प्रयत्न या लेखात केला आहे. विस्तारभयास्तव ‘सिंचन क्षेत्राचा हिशोब’ या पहिल्या प्रकरणावरच फक्त लक्ष केंद्रित केले आहे.

पहिल्या प्रकरणाची सुरूवात काही मूलभूत व्याख्यांनी होते. एकूण लाभक्षेत्र, लागवडीयोग्य लाभक्षेत्र, प्रत्यक्ष सिंचनक्षम क्षेत्र व निव्वळ सिंचित भूक्षेत्र या संज्ञांच्या ज्या व्याख्या देण्यात आल्या आहेत त्या जुन्या आहेत. त्यापेक्षा जास्त चांगल्या प्रचलित व्याख्या चौकट - १ मध्ये दिल्या आहेत. प्रत्यक्ष सिंचन व्यवस्थापन त्या प्रमाणे झाल्यास गुणात्मक फरक संभवतो. मात्र दोन्ही प्रकारच्या व्याख्या या फक्त प्रवाही सिंचनाचा विचार करतात ही त्यांची मर्यादा आहे. बदललेली परिस्थिती व विशेषत: उपसा सिंचन लक्षात घेता नव्या व्याख्या करणे उचित होईल.
__________________________________________________
चौकट क्र.-: प्रवाही सिंचना संबंधित महत्वाच्या व्याख्या
) एकूण क्षेत्र (ग्रॉस एरिया): सिंचन प्रकल्पाचे ढोबळ भौगोलिक क्षेत्र. म्हणजे धरण, कालवा, नदी व प्रस्तावित सिंचन क्षेत्राच्या सीमेवरचा नाला या चतु:सीमांमधील सर्व क्षेत्र.
) एकूण लाभक्षेत्र (ग्रॉस कमांड एरिया, जी.सी..): एकूण क्षेत्र वजा प्रवाही सिंचनाने न भिजणारे उंचावरील क्षेत्र
) वहिती योग्य लाभक्षेत्र (कल्चरेबल कमांड एरिया,सी.सी..): जी.सी.. वजा वहितीखाली नसणारे क्षेत्र (उदाहरणार्थ, गावठाण, रस्ते, पोटखराबा, कालवे, रेल्वे मार्ग, विहिरी,वस्त्या, इत्यादि खालील क्षेत्र)
) सिंचनीय लाभक्षेत्र (इरिगेबल कमांड एरिया, आय.सी..): सी.सी.. गुणिले सिंचन घनता
) सिंचन घनता (इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन): आय.सी.. भागिले सी.सी..
) वार्षिक सिंचित पिक घनता(अ‍ॅन्युअल इरिगेटेड क्रॉपींग इंटेन्सिटी):विविध पिकांखाली वर्षभरात भिजवायचे प्रस्तावित क्षेत्र भागिले सिंचनीय लाभक्षेत्र.
) हंगामनिहाय सिंचित पिक घनता(सिझनल इरिगेटेड क्रॉपींग इंटेन्सिटी): विविध पिकांखाली विशिष्ट हंगामात भिजवायचे प्रस्तावित क्षेत्र भागिले सिंचनीय लाभक्षेत्र.
____________________________________

‘लाभक्षेत्रातील जमीन’ या संज्ञेची व्याख्या महाराष्ट्र कमाल जमीन धारणा कायदा १९६१ अन्वये का देण्यात आली हे समजत नाही.  खरे तर महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम क्र.३ नुसार ‘कालव्याच्या जलप्रदाय क्षेत्राखालील जमिनी’ ही व्याख्या जलसंपदा विभागाच्या जल व्यवहारासाठी जास्त उपयोगी व कायद्याने बंधनकारक आहे.  त्यासाठी लाभक्षेत्र रितसर अधिसूचित करावे लागते. पण राज्यातील अनेक सिंचन प्रकल्पात ही लाभक्षेत्र अधिसूचित करण्याची प्रक्रिया फार काळापासून अर्धवट आहे.  अनधिसूचित लाभक्षेत्रात जल संपदा विभागास काहीही करण्याचा कायदेशीर अधिकार पोहोचत नाही. किंबहुना, हे लाभक्षेत्र ‘आमचे’ आहे असा कायदेशीर दावाही त्या विभागास करता येणार नाही. या मूलभूत कायदेशीर बाबीबाबत प्रस्तुत अहवाल  मौन पाळतो. पाटबंधारे महामंडळांचे कायदे आहेत पण नियम नाहीत या वस्तुस्थितीवर योग्य ताशेरे ओढणारी चितळे समिती त्या महामंडळांचे कायदे मुळात महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ वर आधारित आहेत आणि त्या मुळ कायद्याचे नियम ३८ वर्षे झाली तरी अद्याप तयार करण्यात आलेले नाहीत हे मात्र सांगत नाही.

निर्मित सिंचन क्षमतेचा संबंध अर्थातच सिंचन प्रकल्प पूर्ण होण्याशी आहे. सिंचन प्रकल्प ख-या अर्थाने पूर्ण झाले तरच अपेक्षित सिंचन क्षमतेची निर्मिती झाली असे म्हणता येईल. महाराष्ट्र जल व सिंचन (चितळे) आयोगाने १९९९ साली ‘पूर्ण प्रकल्प’ या संज्ञेची व्याख्या (चौकट -२ ) केली आहे. चितळे आयोगाने १९९९ साली केलेल्या त्या व्याख्येची योग्य ती दखल २०१४ साली चितळे समिती मात्र घेताना दिसत नाही. चितळे आयोगाच्या व्याख्येनुसार काटेकोरपणे पाहिल्यास राज्यातील बहुसंख्य प्रकल्प अपूर्ण आहेत आणि दावा करण्यात येत असलेली सिंचन क्षमता मुळात निर्माणच झालेली नाही हे सुस्पष्ट आहे. प्रकल्प पुर्तता अहवाल देण्यात येत नाहीत असे फक्त म्हणणे पुरेसे नाही. त्याच्या परिणामांकडॆ व तात्विक परिणीतीकडेही जायला हवे.  समितीचा अहवाल तसे करत नाही.
____________________________________________________
चौकट -: केवळ बांधकामे नव्हे तर ‘प्रकल्प पूर्ण’ करणे महत्वाचे
प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे:
) बांधकाम व्यवस्थेकडून परिचालन व्यवस्थेकडे हस्तांतरण काटेकोरपणे प्रत्यक्षात पूर्ण होणे
) कालव्याच्या संकल्पित वहनक्षमतेबाबत प्रत्यक्ष प्रयोगावर आधारित अधिकृत प्रमाणपत्र दिले जाणे
) प्रकल्पाचे परिचालन सूयोग्य पद्धतीने होण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक-सामाजिक-आर्थिक-कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे
) प्रकल्प पूर्णत्व अहवाल शासनस्तरावर अधिकृतरित्या स्वीकारला जाणे
) वरील प्रकारे प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल पाटबंधारे विभागाने रितसर अधिसूचना काढणे व प्रकल्प समारंभपूर्वक राज्याला अर्पण करणे
एखादा पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाला याचा व्यापक दृष्टिकोनातून अर्थ असा घ्यायचा की, त्या प्रकल्पाची जी संकल्पित उद्दिष्टे होती ती पूर्णांशाने साध्य झाली. प्रकल्प नियोजनाचे वेळी प्रकल्प अहवालामध्ये आर्थिक व्यवहार्यतेच्या पुष्टयर्थ जी गृहिते/भाकिते धरलेली/केलेली असतात त्यांची पूर्तता झाल्यानंतरच प्रकल्पाचे इप्सित साध्य झाले असे म्हणता येईल.
संदर्भ: ..व सिं.आयोगाचा अहवाल, जून १९९९, खंड-, परिच्छेद ५.७ ‘अपूर्ण प्रकल्पांची पूर्तता’
__________________________________________________________________


हंगामाअखेरीस प्रत्यक्ष सिंचित क्षेत्राची पीकवार मोजणी केली जाते असे  चितळे समिती प्रथम पृष्ठ ८ वर म्हणते. तर पृष्ठ ३१वरील विधान मात्र पुढील प्रमाणे आहे - "प्रत्यक्ष चर्चेच्या वेळी महामंडळांच्या कार्यकारी संचालकांनी सांगितले की बहुतेक सर्व पूर्ण झालेल्या प्रकल्पावरील सिंचन व्यवस्थापनासाठी आकृतीबंधानुसार असलेल्या पदांच्या तुलनेत ४५-५५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे १०० टक्के सिंचित क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी करणे शक्य होत नाही. अशा वेळी काही क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी केली तरी उरलेल्या क्षेत्राबाबत शेतक-यांनी मागणी केलेल्या व मंजूर केलेल्या अर्जातील क्षेत्रफळानुसार पाणी वापर आकारणी केली जाते.."   या दोन्ही परस्पर विरोधी विधानांचा मतितार्थ एवढाच की, बहुसंख्य प्रकल्पात मोजणी होत नाही आणि म्ह्णून  भिजलेल्या क्षेत्राच्या आकडेवारीस तसा काहीही  आधार नाही. ती आकडेवारी तद्दन खोटी आहे. पिकवार मोजणीबाबत वस्तुस्थिती काय आहे याबाबत खुद्द चितळे आयोगाने १९९९ साली आपल्या अह्वालात जे सांगितले होते ते चौकट -३ मध्ये उधृत केले आहे. त्यावरून चितळे आयोग (१९९९) आणि चितळे समिती (२०१४) यातील  विरोधाभास पुढे येतो.  मोजणीबाबतची परिस्थिती १९९९ सालच्या तुलनेत अजूनच बिघडलेली असताना चितळे समिती त्याबद्दल रोखठोक भूमिका घेत नाही.
________________________________________________________
चौकट -३:  सिंचित क्षेत्राच्या मोजणीबाबतचा तपशील
              
१) ....हे काम तसे हाताळण्यास मोठे आहे. प्रकल्पनिहाय, गावनिहाय, पीकनिहाय व विखुरलेल्या सिंचित क्षेत्राची मोजणी, क्षेत्राची व्यापकता पाहता त्यात अचूकता व नियमितपणा राखण्यात उणीवा निर्माण झाल्या आहेत असे आयोगाच्या क्षेत्रीय भेटीत लक्षात आले. अपूरा व अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग हे ही एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे सिंचित क्षेत्राची मोजणी व आकारणी या बाबी वस्तुस्थितीला धरुन आहेतच असे म्हणता येत नाही ( परिच्छेद क्र.६.८.८ / पृष्ठ क्र.४५०)

२) सिंचनाच्या वार्षिक मोजणी अहवालाची प्रसिद्धी पाटबंधारे खात्यातर्फे केली जात नाही. तथापि सिंचनक्षेत्राच्या वार्षिक मोजणीचा अहवाल शासनस्तरावर प्रकल्पश: व उपखोरेश: संकलित करून नियमितपणे दरवर्षी प्रसिद्ध करण्याची गरज आहे........जमिनीच्या वापराचा एकंदर हिशोब ठेवण्याची अधिक चांगली व्यवस्था बसविण्याची गरज आहे (परिच्छेद क्र...१५ / पृष्ठ क्र.४५२)

३) हंगामवार सिंचित केलेल्या क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी होणे विद्यमान नियमांप्रमाणे आवश्यक आहे. पण या जबाबदारीची कारवाई  बहुसंख्य ठिकाणी व्यवस्थापन कर्मचा-यांकडून होताना दिसत नाही. विशेषत: जे क्षेत्र गेल्या २-३ दशकात नव्याने सिंचनाखाली आले तेथे मोजणीची पद्धत रूढ झालेली दिसत नाही. प्रत्यक्ष क्षेत्रीय मोजणीशिवायच आकडे कळवले जात असावेत अशी शंका अनेकदा व्यक्त करण्यात येत आहे (परिच्छेद क्र.७.३.६ / पृष्ठ क्र.५०२)

४) पाणीपट्टीची आकारणी योग्यरित्या होण्याच्या दृष्टीने शेतक-यांच्या खातेवह्या ठेवणे, तसेच पिकवार सिंचन केलेल्या क्षेत्राची नोंद मोजणी पुस्तकात ठेवणे आणि सिंचनाखालील पिकांच्या हंगामवार क्षेत्रापैकी किमान सात टक्के  तपासणी शाखा अभियंत्यांनी, दोन टक्के क्षेत्राची तपासणी उप विभागीय अधिका-यांनी तर एक टक्का क्षेत्राची तपासणी कार्यकारी अभियंत्याने करणे व तसा शेरा (प्रमाणपत्र) पिक मोजणी पुस्तकात देणे अशा  शासनाने सूचना दिलेल्या आहेत. मात्र शाखा अभियंत्याशिवाय इतर एकही अधिकारी याप्रमाणे तपासणी करत असल्याचे अभिलेखावरून आढळत नाही. तसेच काही ठिकाणी शेतक-यांच्या खातेवहीमध्ये अद्यावत नोंदी केल्या जात नाहीत आणि मोजणी पुस्तकही ठेवले जात नाही असे महालेखापालाच्या वर उल्लेख केलेल्या अहवालात नमूद केलेले आहे ( परिच्छेद क्र.९.९.७ / पृष्ठ क्र.६८१)

५) ...पाणीपट्टी आकारणी व वसुलीसाठी स्वतंत्र कर्मचारी नसल्याने सिंचनाच्या बाबतीत सिंचित केलेले पिकनिहाय व हंगामवार क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी करुन आकारणी होत असेलच असे सांगणे कठिण आहे. हीच परिस्थिती वसूली बाबतही दृष्टीस पडते....(परिच्छेद क्र.९.९.११ / पृष्ठ क्र.६८५)

संदर्भ: महाराष्ट्र जल व सिंचन (चितळे) आयोग,१९९९, खंड - १ / तात्विक विवेचन (जाड ठसा लेखकाचा)
_______________________________________________________________

विशेष चौकशी समितीने निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचित क्षेत्राच्या पडताळणीसाठी सिंचन स्थिती दर्शक, जललेखा व स्थिर चिन्हांकन या जलसंपदा विभागाच्या तीन प्रकारच्या अहवालांचा  उपयोग केला आहे. जलसंपदा विभाग पाणी, भिजलेले क्षेत्र , बाष्पीभवन, गाळ ,वहनव्यय, इत्यादी अत्यंत महत्वाच्या बाबी सर्वत्र प्रत्यक्ष नेहेमी न मोजता (किरकोळ अपवाद वगळता) हे अहवाल बिनदिक्कत प्रकाशित करत होता. सन २००९-१० सालच्या जललेखा अहवालास प्रस्तुत लेखकाने रितसर आक्षेप घेतला. तो अहवाल केवळ चूकच नव्हे तर धडधडीत खोटा आहे हे तपशीलवार मांडले आणि जल संपदा विभागाने तो परत घ्यावा (विड्रॉ करावा) अशी मागणी केली. जलसंपदा विभागाने अर्थातच त्यास उत्तर दिले नाही. पण त्यानंतर, योगायोग म्हणा हवे तर, वर नमूद केलेले तिन्ही अहवाल प्रकाशित करणेच बंद झाले आहे.  समितीने त्या अहवालांच्या एकूण गुणवत्तेबाबत  तसेच ते अहवाल प्रकाशित करणे मध्येच का थांबवले गेले याबाबत स्वतंत्र पडताळणी गांभीर्याने केली नाही  असे सकृतदर्शनी दिसते. दुसरी आकडेवारी उपलब्ध नाही म्हणून नाईलाजाने आहे ती आकडेवारी वापरावी लागली हे समजू शकते. पण उपलब्ध आकडेवारी आम्ही तपासली आणि त्या आकडेवारीच्या (आणि म्हणून त्यावरून काढलेल्या निष्कर्षांना) अमूक अमूक मर्यादा आहेत असे वैज्ञानिक पद्धतीचे सूस्पष्ट विधान समिती करत नाही.  आकडेवारीमध्ये फरक येण्याची कारणे काय याबाबत समितीने ‘सखोल चिकित्सा’  केल्यावर समितीच्या ज्या बाबी निदर्शनास आल्या त्याचा तपशील पृष्ठ १९ वर दिलेला आहे. तो निव्वळ हास्यास्पद आहे. जलसंपदा विभागाच्या सांख्यिकी शाखेतील कर्मचा-यांना सिंचन विषयक काही संकल्पनांचा नीट खुलासा झाला नाही म्ह्णून चुका झाल्या असे विधान त्यात आहे. हे खरे मानायचे झाल्यास कर्मचा-यांनी अहवाल तयार केला आणि वरिष्ठ अधिका-यांनी तो  न अभ्यासता जसाच्या तसा मंजुर केला असे म्हणावे लागेल.  समिती म्हणते फक्त सिंचन स्थितीदर्शक अहवालांवर विसंबून न राहता आम्ही ८५ प्रपत्रांच्या आधारे महामंडळांकडून स्वतंत्ररित्या माहिती गोळा केली. ज्या महामंडळांकडे २००४ सालापासून सिंचन व्यवस्थापनाचे कामच नाही ते त्याबद्दल काय आकडेवारी देणार? त्यांनी कोठून आणली आकडेवारी? समितीला सादर केलेली आकडेवारी प्रत्यक्ष मोजणीप्रमाणे आहे आणि त्यासंबंधीचे सर्व दफ्तर तपासणीसाठी उपलब्ध आहे असे प्रमाणपत्र महामंडळांनी समितीला दिले आहे का? पंचनाम्यावरील क्षेत्राचा उल्लेख कोणत्याही माहितीत कसा काय नाही? ज्या  महामंडळांनी   सिंचन घोटाळा करुन ठेवला त्यांच्या सिंचन व्यवस्थापन विषयक आकडेवारीवर किती विश्वास ठेवायचा? जल संपदा विभागाचे अधिकारी कोणतीही आणि कितीही प्रपत्रे भरून देण्यात पटाईत आहेत.  कचरा आत - कचरा बाहेर (गार्बेज इन गार्बेज आऊट) असा तो प्रकार असतो. त्याला महत्व  देताना व त्याआधारे  फार मोठे निष्कर्ष काढताना तारतम्य  दाखवणे आवश्यक आहे.

प्रकल्पीय उपयुक्त साठा व प्रत्यक्ष उपलब्ध साठा याबद्दल समितीने तीन विविध ठिकाणांहून संकलित केलेली माहिती तक्ता -१.६ (महामंडळ, कालावधी २००१-०२ ते २०१०-११, महामंडळनिहाय माहिती), तक्ता-१.७ ( सिंचन स्थितीदर्शक अहवाल, २००१-०२ ते २०१०-११, प्रदेशनिहाय माहिती ) आणि तक्ता-१.८ (रंगनाथन समिती,१९९५-९६ ते २००५-०६,प्रदेशनिहाय माहिती विविध कारणांमुळे होणारी घट वजा जाता) मध्ये दिली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली माहिती (महामंडळ किंवा प्रदेश निहाय) आणि तीही प्रसंगी भिन्न कालावधीची असल्यामुळे तुलना व अर्थपूर्ण विश्लेषण अशक्य होते. हे उदाहरण केवळ वानगी दाखल आहे. अशी अनेक उदाहरणे संदर्भीय प्रकरणात आहेत.

तात्पर्य, जुन्या व्याख्या वापरणे, महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम क्र.३ चा उल्लेख टाळणे, प्रकल्प ख-या अर्थाने पूर्ण झालेले नसताना निर्मित सिंचन क्षमतेचे आकडे फसवे आहेत हे स्पष्टपणे निदर्शनास न आणणे, पिक -मोजणीबाबत वस्तुस्थिती न सांगणे,  सिंचन स्थिती दर्शक, जललेखा व स्थिर चिन्हांकन या धडधडीत खोटया अह्वालांवर अंधविश्वास ठेवणे आणि महामंडळांच्या अधिका-यांनी दिलेली माहिती तपासणी न करता स्वीकारणे  या सर्व बाबींमुळे समितीच्या अहवालातील पहिले प्रकरण सकृतदर्शनी वादाचे ठरेल असे वाटते. त्यामुळे अह्वाल  तर आला पण निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष भिजलेले क्षेत्र याबाबत पूर्ण व सूस्पष्ट उलगडा झाला नाही असे वाटते. तद्दन खोटी आकडेवारीच आपण प्रमाण मानत राहिलो तर तो कधी होणारही नाही. मग पुढे काय? खालील  प्रस्तावांवर महाराष्ट्राने विचार करावा.

१)  महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम क्र.७  अन्वये मुख्य अभियंत्यांनी मुख्य नियंत्रक प्राधिकारी म्हणून काम करणे १९७६ पासून अपेक्षित होते व आजही आहे. शासन निर्णय क्र. १०.०४ / (३०९/२००४) / सिं.व्य.(धो.) दि.३१ ऑगस्ट २००४ अन्वये त्याबद्दल सूस्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. पण तरीही कोणत्याही मुख्य अभियंत्याने आजवर ती कायदेशीर जबाबदारी पार पाडलेली नाही. त्यामुळे मुख्य अभियंत्यांवर तसेच त्यांच्याकडून ते काम करवून घेण्यात अक्षम्य कुचराई केली म्ह्णून जलसंपदा विभागाच्या   सचिवांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी. सिंचन व्यवस्थापन व त्यासाठीचा कायदा याकडे गुन्हेगारी स्वरूपाचे दुर्लक्ष केल्याबद्दल या सर्वांना कठोर शिक्षा व्हावी. 

 २) भिजलेल्या क्षेत्राची मोजणी हा सिंचन व्यवस्थापनाचा एक भाग आहे. मूळ सिंचन व्यवस्थापनच धड होत नसल्यामुळे मोजणीकडेही दुर्लक्ष करण्यात आले. तेव्हा सिंचन व्यवस्थापनात आमुलाग्र सुधारणा घडवून आणण्याकरिता समयबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात यावा.

मुलाच्या हितासाठी प्रसंगी लाड बाजूला ठेऊन मुलाचा कान आईला पकडावा लागतो. त्या कर्तव्यदक्ष कठोर आईची भूमिका बजावण्याची जबाबदारी नियतीने ज्यांच्यावर टाकली होती ती त्यांनी पार पाडली का ‘व्यवस्था दोष’ ही नवीन पळवाट आपल्या बाळ्याला उपलब्ध करून दिली असा प्रश्न अहवालातील प्रकरण -१ अखेरीस पडतो हे मात्र निश्चित.

********
* निवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद.
   तज्ञ सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ. (लेखातील मते वैयक्तिक)
   मो. ९८२२५६५२३२
   बी -१२, प्राईड टॉवर्स, वेदांत नगर, औरंगाबाद ४३१००५

Published in Saptrang, Sakal,dt 22 June 2014


नदीजोड प्रकल्प: उन्माद नको; तारतम्य हवे

नदीजोड प्रकल्प: उन्माद नको; तारतम्य हवे
-प्रदीप पुरंदरे
‘नद्या जोडण्यासाठी हवा जनमताचा रेटा’ या चेतन पंडितांच्या लेखासंदर्भात (सकाळ, १३ जून२०१४)  पाणी-प्रश्नाबद्दल प्रामाणिक आस्था असणारे जिज्ञासू नागरिक खालील मुद्यांचाही साकल्याने गंभीर विचार करतील अशी आशा आहे. जनमताचा रेटा नक्की कशासाठी हवा हे त्यातून स्पष्ट होईल.

१) नदीजोड ही केवळ एक संकल्पना आहे की प्रकल्प? पंडितांच्या विवेचनानुसार ती केवळ एक प्राथमिक संकल्पना आहे. जो पर्यंत विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार होत नाही तो पर्यंत नदीजोडाचे फायदे, खर्चाचे अंदाज, तसेच पर्यावरणावर परिणाम, बुडीत क्षेत्र व जंगलतोड, विस्थापन व पुनर्वसन या सगळ्या गोष्टी कळणार नाहीत हे लेखात स्वत:च मान्य करणारे पंडित नदीजोड बनविल्यास एकूण पाणी उपलब्धता, सिंचनक्षमता,विद्युतनिर्मिती, पुरग्रस्त क्षेत्रातील पुराची तीव्रता, दुष्काळ निवारण वगैरेबाबत किती फायदे होणार याची विशिष्ट आकडेवारी देऊन मोकळे होतात.जर डीपीआर च नाही तर ही नेमकी आकडेवारी आली कोठून? आणि जलक्षेत्रातील (वॉटर सेक्टर) निदान महाराष्ट्रातील अनुभव तरी असे सांगतो की, असले अंदाज प्रत्यक्षात खरे होत नाहीत. कामे दशकानुदशके सुखेनैव रखडतात. खर्च अफाट वाढतो. सिंचन घोटाळा होतो. नक्की किती क्षेत्र ओलिताखाली आले हे ही  धड सांगता येत नाही आणि शेवटी विधान मंडळाला सादर करावयाच्या आर्थिक सर्वेक्षणात सिंचनविषयक  माहितीच उपलब्ध नाही असे म्हणण्याची पाळी येते.

२)नदीजोडचे  डिपीआर तयार नाहीत. साहजिकच शासनाच्या विविध विभागांनी विविध कायद्यांन्वये नदीजोडला आवश्यक त्या मंजु-या दिलेल्या नाहीत. पंचवार्षिक योजनेत नदीजोडचा उल्लेख नाही. अंदाजपत्रकात नदीजोडसाठी तरतुद नाही. हाती घेतलेली पूर्वीची कामेच पूर्ण करायला शासनाकडे पैसा नाही. अशी एकूण परिस्थिती असताना मा. सर्वोच्च न्यायालयाची चक्क दिशाभूल केली जाते आणि मा. सर्वोच्च न्यायालयही उगीचच असे गृहित धरते की, नदीजोड बद्दल सर्व औपचारिकता पूर्ण झाली असूनही केवळ अंमलबजावणी होत नाहीये. न्यायालयाबद्दल आदर बाळगूनही हे नम्रपणे सांगायला हवे की, शासनाने पाणीप्रश्न नेमक्या कोणत्या विशिष्ठ मार्गाने सोडवावा हे न्यायालयाने सांगणे उचित नाही. तो शासनाच्या एकूण धोरणाचा भाग आहे. नदी जोड प्रकल्पाबाबत  एखाद्या नागरिकाचे /संघटनेचे प्रामाणिक मत वेगळे असू शकते. पण त्याबाबत न्यायालयात दाद मागणेही आता अवघड होऊन बसले. कारण शासन म्हणणार की, न्यायालयाने आदेश दिला म्हणून आम्ही नदीजोड प्रकल्प राबवतो आहोत! शासकीय निर्णयात ‘अशा प्रकारे’ प्रत्यक्ष सहभागी होऊन शासनाच्या त्या कृतीची न्यायालयीन तपासणी करण्याचा हक्क न्यायालयाने आपणहून गमावला तर नाही ना? न्यायालय व शासन यांच्यातल्या सीमारेषा अंधुक होणे लोकशाही रचनेत  योग्य आहे का?

३)  पाणी-प्रश्नाचे नेमके स्वरूप व व्याप्ती काय आहे? स्थानिक पातळीवर तसेच त्या त्या नदीखो-याच्या अंतर्गत पाणी-प्रश्न सोडविण्याच्या तुलनेने सुलभ व स्वस्त शक्यता सगळ्या संपल्या आहेत का? बाहेरून आणि लांबून पाणी आणणे एवढा एकच पर्याय शिल्लक राहिला आहे का? असे प्रश्न, नदीजोड प्रकल्पाबाबत वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले, तर पडतात. पण त्याबद्दल चर्चा होताना दिसत नाही. नद्या जोडण्याबाबत निर्णय जणू झालाच आहे आणि आता काही नतद्रष्टांना बाजूला करून ( एनजीओज ना परदेशी मदत !) खंबीर नेतृत्वाच्या आधारे तो अंमलात आणणे तेवढे बाकी आहे असा एकूण आर्विभाव दिसतो. सर्वसमावेशक व पर्यावरण-स्नेही जलविकासास तो घातक आहे. उत्तराखंडातील परवापरवाच्या हिमालयीन त्सुनामीपासून आम्ही काही धडा शिकणार आहोत की नाही?

४)निसर्ग निर्मित नद्या या पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत. आपल्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनात नद्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. नद्या म्हणजे काही नगरपालिकांच्या पाईपलाईन्स नाहीत की ज्या कोणीही कोठेही तोडाव्यात, पाहिजे तशा वळवाव्यात आणि वाट्टेल तेथे जोडाव्यात.

५) एखाद्या राज्यात अथवा नदीखो-यात अतिरिक्त पाणी  उपलब्ध आहे हे कोणी व कोणत्या सर्वमान्य निकषां आधारे ठरवले‘उदंड जाहले पाणी नदीजोड करावया; घेऊन जा पाहिजे तेवढे’ असे कोणी कधी आता म्हणणार आहे का? ममता आणि जयललितांसारख्या गरीब बिचा-या मुख्यमंत्री त्यांच्या थोरल्या बहिणीचे म्हणजे  मितभाषी व विनम्र जलसंपदा मंत्री साध्वी उमा भारतींचे ऎकणार असे गृहित तत्व असेल तर मग जलक्षेत्रात अच्छे दिन दूर नही! (बाकी, जलसंपदा मंत्री म्हणून उमा भारतींची नेमणूक म्हणजे अनाकलनीय व बेभरवशाच्या ‘अल-निनो’ला घरच्या हौदात बंद करतो असे म्हणण्यासारखे आहे! माननीय अल-नमोंना हार्दिक शुभेच्छा!!)

६) तुटीच्या व अतितुटीच्या विभागात / नदीखॊ-यात रेकॉर्डब्रेक उस घ्यायचा आणि प्यायला पाणी नाही हो असा गळा काढत पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवा या मागणीमागे जनरेटा उभा करण्यासाठी उस-बाधीत राजकारण करायचे हा काय प्रकार आहे? उधळ्या व बेजबाबदार बाळ्याच्या हातात कोरा धनादेश द्यायचा हे शतप्रतिशत चूक नव्हे काय? तथाकथित विपुलतेच्या व अतिविपुलतेच्या विभागात / नदीखो-यात सर्व ठिकाणी सर्वांना पाणी मिळते आणि  तेथे आता सर्व आलबेल आहे असे गृहित धरणे बरोबर आहे का? समुद्राला जाऊन मिळणारे पाणी ‘हे वाया जाते’ असे जलचक्राचा अभ्यास असणारा  अभियंता म्हणू शकेल का? पाणी वळविण्याच्या अतिरेकाने अरल समुद्र आटला आणि त्यातून गंभीर पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले  हे खोटे आहे का?

७) नदीजोड प्रकल्पामूळे पूरग्रस्त क्षेत्रात पुराची तीव्रता ३० टक्क्यांनी कमी होईल असे पंडित म्हणतात. म्हणजे  पुराचा प्रश्न नदीजोडमूळे  पूर्ण निकाली निघाला असे होणार नाही. रुडकी विद्यापीठातील   मानद प्राध्यापक  व सुप्रसिद्ध अभियंता श्री. भरत सिंग यांचे तर स्पष्ट मत आहे की, नदीजोड प्रकल्पामूळे पुर नियंत्रण /नियमन करण्याची कल्पना कोणताही जलसंपदा अभियंता त्वरित झिडकारेल.(एनी वॉटर रिसोर्सेस इंजिनियर विल इमिजिएटली डिसकार्ड द आयडिया ऑफ इंटरलिंकिग ऑफ रिव्हर्स एज ए फ्लड कंट्रोल मेझर) मोठ्या प्रकल्पांमूळे नेहेमीच सुयोग्य पुर नियमन होते असा आजवरचा आपला अनुभवही नाही. अलमट्टीचे प्रकरण आपण इतक्यात विसरलो की काय? जेथून पुराचे पाणी वळवायचे आणि जेथे ते घेऊन जायचे त्या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी नद्यांना पूर आला असेल तर काय करणार? काय होईल? अशा पाणी वळवण्यामूळे दोन्ही ठिकाणी पर्यावरणीय प्रश्न उभे राहतील त्याचे काय? दुष्काळी भागात जादाच्या पाण्याबरोबर प्रदुषणाचे प्रश्नही आयात होणार नाहीत का?

८) वैश्विक तापमान वाढ आणि हवामानातील बदल हा काही केवळ बागुलबुवा राहिलेला नाही. त्यामूळे पाऊसमानात फरक पडणार आहे. पाण्याच्या उपलब्धतेचे अंदाज चुकणार आहेत. नदीजोड मागची गृहितेच उलटीपालटी होणार आहेत. नदीखो-यातील तथाकथित तूट व विपुलता यांचा नव्याने आढावा घ्यावा लागणार आहे.

९) नदीजोड प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय परिमाणदेखील आहे. इतर देशातून भारतात येणा-या नद्या व भारतातून इतर देशात जाणा-या नद्या याबाबत आपण एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही. ज्या नद्या परदेशातून भारतात येतात त्या नद्या संबंधित देशांनी त्यांच्या भागात वळवल्या किंवा फार मोठया पाणीवापराचे प्रकल्प त्यांनी उभे केले तर आज ज्या नद्यात ‘जादाचे’ पाणी आहे त्या नद्यातील जल प्रवाह लक्षणीयरित्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१०) मूळात विविध नदीखो-यातील पाणी उपलब्धतेचे अंदाज खरे आहेत का असाही प्रश्न आता पडायला लागला आहे. जायकवाडीच्या वर उर्ध्व गोदावरी खॊ-यात मूळ अंदाजापेक्षा आता ४० अब्ज घनफूट पाणी कमी आहे असे जल संपदा विभागाचे म्हणणे आहे. ते खरे असेल तर हा गंभीर मुद्दा आहे. पाण्याची खॊटी व अतिशयोक्त उपलब्धता दाखवून सिंचन घोटाळे करायचे ही बाब आता नव्याने उघडकीला येत आहे.

११) दुष्काळग्रस्त भागांना नदीजोड प्रकल्पामूळे पाणी मिळेल या विधानाबद्दलही तज्ञ साशंक आहेत. दुष्काळी भाग हे नद्यांपासून लांब अंतरावर व नद्यांपेक्षा खूप उंचावर असल्यामूळे नदीजोडचे जादा पाणी नदीत आल्यावर त्यांना ते आपोआप व सहज मिळणार नाही. त्यासाठी उर्जापिपासू महाकाय उपसा सिंचन योजना राबवाव्या लागतील. ते महाग पाणी सर्वसामान्य शेतक-याला परवडणार नाही.

१२) साध्या लघु सिंचन प्रकल्पांची सुद्धा आपण नीट देखभाल-दुरूस्ती आज  करु शकत नाही. कालव्यातून अमाप पाणी चोरी होते. नगर-नाशिक मधील तालेवार मंडळी दुष्काळातदेखील मराठवाड्यात पाणी येऊ देत नाहीत. अशा प्रकारचे प्रश्न नदीजोड प्रकल्पात आक्राळविक्राळ होतील. ते कोण व कसे सोडवणार? जल- कायद्यांचे तीन तीन चार चार दशके नियम न करणारे आपण कसे नियमन करणार आहोत प्रस्तावित महाकाय नदीजोडचे? आ बैल मार मुझे असे तर होणार नाही ना?

१३) दुष्काळाला सामोरे जाण्याचा खरा मार्ग मृद व जल संधारण, वर्षा जलसंचय, सिंचन प्रकल्पांचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि पाण्याचे समन्यायी वाटप यातून जातो. कालव्यांची वहनक्षमता वाढवणे, शेतावरील पाणीवापरात कार्यक्षमता आणणे, पिक रचनेत आमूलाग्र बदल करणे, उत्पादकता वाढवणे आणि जलक्षेत्रात कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे हे उपाय त्वरित अंमलात आणणे हा शहाणपणाचा मार्ग आहे. त्याला मागणीचे व्यवस्थापन (डिमांड साईड मॅनेजमेंट )असे म्हणतात. पण ते करायचे असेल तर स्वकीयांशी संघर्ष करावा लागतो. शिस्त पाळावी लागते. वाईटपणा घ्यावा लागतो. राजकीयदृष्ट्या अप्रिय गोष्टी (पोलिटिकली इनकरेक्ट!)बोलाव्या लागतात. त्या तुलनेत नदीजोड प्रकल्पाबाबत मोघम बोलून मृगजळ दाखवणे सोपे असते.  अभियंत्यांच्या व्यावसायिक अहंकाराला हवा देणे आणि राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली उन्माद निर्माण करणे हे ही त्यातून साध्य  होते.

 सैतान तपशीलात असतो म्हणून त्याकडे लक्ष वेधणा-या ‘थोर पर्यावरणवादी’ आणि ‘ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते’ यांची खिल्ली उडवायची की ‘नदीजोडच्या तुरी बाजारातच नव्हे तर शेतातही नसताना’ मोघमदाजींच्या भूलथाफांना बळी पडायचे हे जनतेने ठरवावे. उन्मादाने प्रश्न विकोपाला जातात. तारतम्य व संयम मानवी चेह-यासह सर्वसमावेशक विकासाची शक्यता निर्माण करतात हे लक्षात ठेवलेले बरे.
Edited version of this article was published in Sakal dt 18 June 2014