जातजमात वाद व धार्मिक
उन्माद,
बलात्कार व भ्रष्टाचार,
राजकीय टगेगिरी व
चेल्याचपाट्यांची भांडवलशाही,
दुष्काळ, गारपिट आणि
शेतक-यांच्या आत्महत्या,
रोजगार हमीतील चो-यामा-या आणि भृणहत्या,
टॅंकरमागे धावणा-या
बायाबापड्या आणि ऊसबाधा झालेले मग्रुर पुढारी
आसारामी अध्यात्म
आणि सुदर्शन बाजार
असा विविधतेने नटलेला
भारत देश..मेरा प्यारा हिंदोस्ता!
जिन्हे नाझ है हिंदपर
वो कहां है ?
असा ‘प्यासा’ प्रश्न
पुन्हा एकदा आसमंतात आहे.
तो विचारण्याचे धाडस
दाखवणा-यांबरोबर आम्ही आहोत. तुम्ही?
मोलकरणी, हमाल – माथाडी,
कामगार, अंगणवाडी सेविका, शेतकरी, शेतमजुर,
दलित, आदिवासी, शुद्रातिशुद्र
आणि असहाय्य महिला
अशा असंघटितांच्या
बाजूने आयुष्यभर लढणा-या ‘माणसां’ बरोबर आम्ही आहोत. तुम्ही?
रेशन कार्ड, रोजगार,
पेन्शन, सर्वांना शिक्षण, साक्षरता,
प्यायला पाणी, दुपारला
भाकरी, रातच्याला वाईच अंथरूण पांघरूण.....
........... मागणं
लै नाही बाप्पा
मूलभूत मागण्यांसाठी
सतत आंदोलन करणा-या ‘साथी व कॉम्रेड’ बरोबर आम्ही आहोत. तुम्ही?
पर्यावरणस्नेही विकास
समन्यायी पाणीवाटप,
जलवंचितांच्या हक्काचं
पाणी,
सहकारी साखर कारखान्यांचे
खाजगीकरण,
बेछुट नागरिकरण व
चंगळवाद,
शहरातील खड्ड्यात
गेलेले रस्ते,
विस्थापितांचे पुनर्वसन,
छोट्या धरणांचा आग्रह,
एक ना दोन
असंख्य आघाड्यांवर
संघर्ष करणा-या ‘मित्रां’बरोबर आम्ही आहोत. तुम्ही?
ज्यांच्याकडे पैसा
नाही; चारित्र्य आहे
जमीन जुमला नाही;
माणुसकी आहे
सत्तेची मस्ती नाही;
दिनदुबळ्यांची साथ आहे
राणा भीमदेवी कंठाळी
नाही; आर्जवी सूर आहे
पोकळ आश्वासने नाहीत;
ठोस मागण्या आहेत
मृगजळ नाही; लॉंग
मार्चची खात्री आहे
‘त्या कार्यकर्त्यां’
बरोबर आम्ही आहोत. तुम्ही?
इतिहास कुस बदलतो
आहे!
आपले भविष्य आपल्या
हाती!!
आम्ही ‘आम आदमी’ बरोबर
आहोत. तुम्ही?
प्रदीप पुरंदरे
१९ मार्च २०१४