Sunday, June 22, 2014

अहवाल आला, पण....




सिंचन घोटाळा विषयक विशेष चौकशी समितीचा अहवाल नुकताच विधान मंडळात मांडण्यात आला. त्यामुळे साहजिकच राज्यात सध्या गदारोळ माजला आहे. उलटसुलट मते व्यक्त होता आहेत. आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. हे सर्व काही अंशी काही काळ अपरिहार्य असले तरी पाणी-प्रश्नाच्या गंभीर अभ्यासकांनी अनावश्यक घाई न करता जास्त तपशीलात जाऊन शांतपणे अभ्यास करून मगच समितीच्या अहवालाबद्दल योग्य ती भूमिका घेतली पाहिजे. त्या दृष्टीने समितीची गृहिते, समितीने वापरलेल्या व्याख्या, समितीच्या माहितीचा स्त्रोत व संकलनाची पद्धत, समितीने ग्राह्य मानलेले संदर्भ, इत्यादी बाबी तपासल्या जाणे अगत्याचे आहे. तसा एक प्राथमिक प्रयत्न या लेखात केला आहे. विस्तारभयास्तव ‘सिंचन क्षेत्राचा हिशोब’ या पहिल्या प्रकरणावरच फक्त लक्ष केंद्रित केले आहे.

पहिल्या प्रकरणाची सुरूवात काही मूलभूत व्याख्यांनी होते. एकूण लाभक्षेत्र, लागवडीयोग्य लाभक्षेत्र, प्रत्यक्ष सिंचनक्षम क्षेत्र व निव्वळ सिंचित भूक्षेत्र या संज्ञांच्या ज्या व्याख्या देण्यात आल्या आहेत त्या जुन्या आहेत. त्यापेक्षा जास्त चांगल्या प्रचलित व्याख्या चौकट - १ मध्ये दिल्या आहेत. प्रत्यक्ष सिंचन व्यवस्थापन त्या प्रमाणे झाल्यास गुणात्मक फरक संभवतो. मात्र दोन्ही प्रकारच्या व्याख्या या फक्त प्रवाही सिंचनाचा विचार करतात ही त्यांची मर्यादा आहे. बदललेली परिस्थिती व विशेषत: उपसा सिंचन लक्षात घेता नव्या व्याख्या करणे उचित होईल.
__________________________________________________
चौकट क्र.-: प्रवाही सिंचना संबंधित महत्वाच्या व्याख्या
) एकूण क्षेत्र (ग्रॉस एरिया): सिंचन प्रकल्पाचे ढोबळ भौगोलिक क्षेत्र. म्हणजे धरण, कालवा, नदी व प्रस्तावित सिंचन क्षेत्राच्या सीमेवरचा नाला या चतु:सीमांमधील सर्व क्षेत्र.
) एकूण लाभक्षेत्र (ग्रॉस कमांड एरिया, जी.सी..): एकूण क्षेत्र वजा प्रवाही सिंचनाने न भिजणारे उंचावरील क्षेत्र
) वहिती योग्य लाभक्षेत्र (कल्चरेबल कमांड एरिया,सी.सी..): जी.सी.. वजा वहितीखाली नसणारे क्षेत्र (उदाहरणार्थ, गावठाण, रस्ते, पोटखराबा, कालवे, रेल्वे मार्ग, विहिरी,वस्त्या, इत्यादि खालील क्षेत्र)
) सिंचनीय लाभक्षेत्र (इरिगेबल कमांड एरिया, आय.सी..): सी.सी.. गुणिले सिंचन घनता
) सिंचन घनता (इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन): आय.सी.. भागिले सी.सी..
) वार्षिक सिंचित पिक घनता(अ‍ॅन्युअल इरिगेटेड क्रॉपींग इंटेन्सिटी):विविध पिकांखाली वर्षभरात भिजवायचे प्रस्तावित क्षेत्र भागिले सिंचनीय लाभक्षेत्र.
) हंगामनिहाय सिंचित पिक घनता(सिझनल इरिगेटेड क्रॉपींग इंटेन्सिटी): विविध पिकांखाली विशिष्ट हंगामात भिजवायचे प्रस्तावित क्षेत्र भागिले सिंचनीय लाभक्षेत्र.
____________________________________

‘लाभक्षेत्रातील जमीन’ या संज्ञेची व्याख्या महाराष्ट्र कमाल जमीन धारणा कायदा १९६१ अन्वये का देण्यात आली हे समजत नाही.  खरे तर महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम क्र.३ नुसार ‘कालव्याच्या जलप्रदाय क्षेत्राखालील जमिनी’ ही व्याख्या जलसंपदा विभागाच्या जल व्यवहारासाठी जास्त उपयोगी व कायद्याने बंधनकारक आहे.  त्यासाठी लाभक्षेत्र रितसर अधिसूचित करावे लागते. पण राज्यातील अनेक सिंचन प्रकल्पात ही लाभक्षेत्र अधिसूचित करण्याची प्रक्रिया फार काळापासून अर्धवट आहे.  अनधिसूचित लाभक्षेत्रात जल संपदा विभागास काहीही करण्याचा कायदेशीर अधिकार पोहोचत नाही. किंबहुना, हे लाभक्षेत्र ‘आमचे’ आहे असा कायदेशीर दावाही त्या विभागास करता येणार नाही. या मूलभूत कायदेशीर बाबीबाबत प्रस्तुत अहवाल  मौन पाळतो. पाटबंधारे महामंडळांचे कायदे आहेत पण नियम नाहीत या वस्तुस्थितीवर योग्य ताशेरे ओढणारी चितळे समिती त्या महामंडळांचे कायदे मुळात महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ वर आधारित आहेत आणि त्या मुळ कायद्याचे नियम ३८ वर्षे झाली तरी अद्याप तयार करण्यात आलेले नाहीत हे मात्र सांगत नाही.

निर्मित सिंचन क्षमतेचा संबंध अर्थातच सिंचन प्रकल्प पूर्ण होण्याशी आहे. सिंचन प्रकल्प ख-या अर्थाने पूर्ण झाले तरच अपेक्षित सिंचन क्षमतेची निर्मिती झाली असे म्हणता येईल. महाराष्ट्र जल व सिंचन (चितळे) आयोगाने १९९९ साली ‘पूर्ण प्रकल्प’ या संज्ञेची व्याख्या (चौकट -२ ) केली आहे. चितळे आयोगाने १९९९ साली केलेल्या त्या व्याख्येची योग्य ती दखल २०१४ साली चितळे समिती मात्र घेताना दिसत नाही. चितळे आयोगाच्या व्याख्येनुसार काटेकोरपणे पाहिल्यास राज्यातील बहुसंख्य प्रकल्प अपूर्ण आहेत आणि दावा करण्यात येत असलेली सिंचन क्षमता मुळात निर्माणच झालेली नाही हे सुस्पष्ट आहे. प्रकल्प पुर्तता अहवाल देण्यात येत नाहीत असे फक्त म्हणणे पुरेसे नाही. त्याच्या परिणामांकडॆ व तात्विक परिणीतीकडेही जायला हवे.  समितीचा अहवाल तसे करत नाही.
____________________________________________________
चौकट -: केवळ बांधकामे नव्हे तर ‘प्रकल्प पूर्ण’ करणे महत्वाचे
प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे:
) बांधकाम व्यवस्थेकडून परिचालन व्यवस्थेकडे हस्तांतरण काटेकोरपणे प्रत्यक्षात पूर्ण होणे
) कालव्याच्या संकल्पित वहनक्षमतेबाबत प्रत्यक्ष प्रयोगावर आधारित अधिकृत प्रमाणपत्र दिले जाणे
) प्रकल्पाचे परिचालन सूयोग्य पद्धतीने होण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक-सामाजिक-आर्थिक-कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे
) प्रकल्प पूर्णत्व अहवाल शासनस्तरावर अधिकृतरित्या स्वीकारला जाणे
) वरील प्रकारे प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल पाटबंधारे विभागाने रितसर अधिसूचना काढणे व प्रकल्प समारंभपूर्वक राज्याला अर्पण करणे
एखादा पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाला याचा व्यापक दृष्टिकोनातून अर्थ असा घ्यायचा की, त्या प्रकल्पाची जी संकल्पित उद्दिष्टे होती ती पूर्णांशाने साध्य झाली. प्रकल्प नियोजनाचे वेळी प्रकल्प अहवालामध्ये आर्थिक व्यवहार्यतेच्या पुष्टयर्थ जी गृहिते/भाकिते धरलेली/केलेली असतात त्यांची पूर्तता झाल्यानंतरच प्रकल्पाचे इप्सित साध्य झाले असे म्हणता येईल.
संदर्भ: ..व सिं.आयोगाचा अहवाल, जून १९९९, खंड-, परिच्छेद ५.७ ‘अपूर्ण प्रकल्पांची पूर्तता’
__________________________________________________________________


हंगामाअखेरीस प्रत्यक्ष सिंचित क्षेत्राची पीकवार मोजणी केली जाते असे  चितळे समिती प्रथम पृष्ठ ८ वर म्हणते. तर पृष्ठ ३१वरील विधान मात्र पुढील प्रमाणे आहे - "प्रत्यक्ष चर्चेच्या वेळी महामंडळांच्या कार्यकारी संचालकांनी सांगितले की बहुतेक सर्व पूर्ण झालेल्या प्रकल्पावरील सिंचन व्यवस्थापनासाठी आकृतीबंधानुसार असलेल्या पदांच्या तुलनेत ४५-५५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे १०० टक्के सिंचित क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी करणे शक्य होत नाही. अशा वेळी काही क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी केली तरी उरलेल्या क्षेत्राबाबत शेतक-यांनी मागणी केलेल्या व मंजूर केलेल्या अर्जातील क्षेत्रफळानुसार पाणी वापर आकारणी केली जाते.."   या दोन्ही परस्पर विरोधी विधानांचा मतितार्थ एवढाच की, बहुसंख्य प्रकल्पात मोजणी होत नाही आणि म्ह्णून  भिजलेल्या क्षेत्राच्या आकडेवारीस तसा काहीही  आधार नाही. ती आकडेवारी तद्दन खोटी आहे. पिकवार मोजणीबाबत वस्तुस्थिती काय आहे याबाबत खुद्द चितळे आयोगाने १९९९ साली आपल्या अह्वालात जे सांगितले होते ते चौकट -३ मध्ये उधृत केले आहे. त्यावरून चितळे आयोग (१९९९) आणि चितळे समिती (२०१४) यातील  विरोधाभास पुढे येतो.  मोजणीबाबतची परिस्थिती १९९९ सालच्या तुलनेत अजूनच बिघडलेली असताना चितळे समिती त्याबद्दल रोखठोक भूमिका घेत नाही.
________________________________________________________
चौकट -३:  सिंचित क्षेत्राच्या मोजणीबाबतचा तपशील
              
१) ....हे काम तसे हाताळण्यास मोठे आहे. प्रकल्पनिहाय, गावनिहाय, पीकनिहाय व विखुरलेल्या सिंचित क्षेत्राची मोजणी, क्षेत्राची व्यापकता पाहता त्यात अचूकता व नियमितपणा राखण्यात उणीवा निर्माण झाल्या आहेत असे आयोगाच्या क्षेत्रीय भेटीत लक्षात आले. अपूरा व अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग हे ही एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे सिंचित क्षेत्राची मोजणी व आकारणी या बाबी वस्तुस्थितीला धरुन आहेतच असे म्हणता येत नाही ( परिच्छेद क्र.६.८.८ / पृष्ठ क्र.४५०)

२) सिंचनाच्या वार्षिक मोजणी अहवालाची प्रसिद्धी पाटबंधारे खात्यातर्फे केली जात नाही. तथापि सिंचनक्षेत्राच्या वार्षिक मोजणीचा अहवाल शासनस्तरावर प्रकल्पश: व उपखोरेश: संकलित करून नियमितपणे दरवर्षी प्रसिद्ध करण्याची गरज आहे........जमिनीच्या वापराचा एकंदर हिशोब ठेवण्याची अधिक चांगली व्यवस्था बसविण्याची गरज आहे (परिच्छेद क्र...१५ / पृष्ठ क्र.४५२)

३) हंगामवार सिंचित केलेल्या क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी होणे विद्यमान नियमांप्रमाणे आवश्यक आहे. पण या जबाबदारीची कारवाई  बहुसंख्य ठिकाणी व्यवस्थापन कर्मचा-यांकडून होताना दिसत नाही. विशेषत: जे क्षेत्र गेल्या २-३ दशकात नव्याने सिंचनाखाली आले तेथे मोजणीची पद्धत रूढ झालेली दिसत नाही. प्रत्यक्ष क्षेत्रीय मोजणीशिवायच आकडे कळवले जात असावेत अशी शंका अनेकदा व्यक्त करण्यात येत आहे (परिच्छेद क्र.७.३.६ / पृष्ठ क्र.५०२)

४) पाणीपट्टीची आकारणी योग्यरित्या होण्याच्या दृष्टीने शेतक-यांच्या खातेवह्या ठेवणे, तसेच पिकवार सिंचन केलेल्या क्षेत्राची नोंद मोजणी पुस्तकात ठेवणे आणि सिंचनाखालील पिकांच्या हंगामवार क्षेत्रापैकी किमान सात टक्के  तपासणी शाखा अभियंत्यांनी, दोन टक्के क्षेत्राची तपासणी उप विभागीय अधिका-यांनी तर एक टक्का क्षेत्राची तपासणी कार्यकारी अभियंत्याने करणे व तसा शेरा (प्रमाणपत्र) पिक मोजणी पुस्तकात देणे अशा  शासनाने सूचना दिलेल्या आहेत. मात्र शाखा अभियंत्याशिवाय इतर एकही अधिकारी याप्रमाणे तपासणी करत असल्याचे अभिलेखावरून आढळत नाही. तसेच काही ठिकाणी शेतक-यांच्या खातेवहीमध्ये अद्यावत नोंदी केल्या जात नाहीत आणि मोजणी पुस्तकही ठेवले जात नाही असे महालेखापालाच्या वर उल्लेख केलेल्या अहवालात नमूद केलेले आहे ( परिच्छेद क्र.९.९.७ / पृष्ठ क्र.६८१)

५) ...पाणीपट्टी आकारणी व वसुलीसाठी स्वतंत्र कर्मचारी नसल्याने सिंचनाच्या बाबतीत सिंचित केलेले पिकनिहाय व हंगामवार क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी करुन आकारणी होत असेलच असे सांगणे कठिण आहे. हीच परिस्थिती वसूली बाबतही दृष्टीस पडते....(परिच्छेद क्र.९.९.११ / पृष्ठ क्र.६८५)

संदर्भ: महाराष्ट्र जल व सिंचन (चितळे) आयोग,१९९९, खंड - १ / तात्विक विवेचन (जाड ठसा लेखकाचा)
_______________________________________________________________

विशेष चौकशी समितीने निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचित क्षेत्राच्या पडताळणीसाठी सिंचन स्थिती दर्शक, जललेखा व स्थिर चिन्हांकन या जलसंपदा विभागाच्या तीन प्रकारच्या अहवालांचा  उपयोग केला आहे. जलसंपदा विभाग पाणी, भिजलेले क्षेत्र , बाष्पीभवन, गाळ ,वहनव्यय, इत्यादी अत्यंत महत्वाच्या बाबी सर्वत्र प्रत्यक्ष नेहेमी न मोजता (किरकोळ अपवाद वगळता) हे अहवाल बिनदिक्कत प्रकाशित करत होता. सन २००९-१० सालच्या जललेखा अहवालास प्रस्तुत लेखकाने रितसर आक्षेप घेतला. तो अहवाल केवळ चूकच नव्हे तर धडधडीत खोटा आहे हे तपशीलवार मांडले आणि जल संपदा विभागाने तो परत घ्यावा (विड्रॉ करावा) अशी मागणी केली. जलसंपदा विभागाने अर्थातच त्यास उत्तर दिले नाही. पण त्यानंतर, योगायोग म्हणा हवे तर, वर नमूद केलेले तिन्ही अहवाल प्रकाशित करणेच बंद झाले आहे.  समितीने त्या अहवालांच्या एकूण गुणवत्तेबाबत  तसेच ते अहवाल प्रकाशित करणे मध्येच का थांबवले गेले याबाबत स्वतंत्र पडताळणी गांभीर्याने केली नाही  असे सकृतदर्शनी दिसते. दुसरी आकडेवारी उपलब्ध नाही म्हणून नाईलाजाने आहे ती आकडेवारी वापरावी लागली हे समजू शकते. पण उपलब्ध आकडेवारी आम्ही तपासली आणि त्या आकडेवारीच्या (आणि म्हणून त्यावरून काढलेल्या निष्कर्षांना) अमूक अमूक मर्यादा आहेत असे वैज्ञानिक पद्धतीचे सूस्पष्ट विधान समिती करत नाही.  आकडेवारीमध्ये फरक येण्याची कारणे काय याबाबत समितीने ‘सखोल चिकित्सा’  केल्यावर समितीच्या ज्या बाबी निदर्शनास आल्या त्याचा तपशील पृष्ठ १९ वर दिलेला आहे. तो निव्वळ हास्यास्पद आहे. जलसंपदा विभागाच्या सांख्यिकी शाखेतील कर्मचा-यांना सिंचन विषयक काही संकल्पनांचा नीट खुलासा झाला नाही म्ह्णून चुका झाल्या असे विधान त्यात आहे. हे खरे मानायचे झाल्यास कर्मचा-यांनी अहवाल तयार केला आणि वरिष्ठ अधिका-यांनी तो  न अभ्यासता जसाच्या तसा मंजुर केला असे म्हणावे लागेल.  समिती म्हणते फक्त सिंचन स्थितीदर्शक अहवालांवर विसंबून न राहता आम्ही ८५ प्रपत्रांच्या आधारे महामंडळांकडून स्वतंत्ररित्या माहिती गोळा केली. ज्या महामंडळांकडे २००४ सालापासून सिंचन व्यवस्थापनाचे कामच नाही ते त्याबद्दल काय आकडेवारी देणार? त्यांनी कोठून आणली आकडेवारी? समितीला सादर केलेली आकडेवारी प्रत्यक्ष मोजणीप्रमाणे आहे आणि त्यासंबंधीचे सर्व दफ्तर तपासणीसाठी उपलब्ध आहे असे प्रमाणपत्र महामंडळांनी समितीला दिले आहे का? पंचनाम्यावरील क्षेत्राचा उल्लेख कोणत्याही माहितीत कसा काय नाही? ज्या  महामंडळांनी   सिंचन घोटाळा करुन ठेवला त्यांच्या सिंचन व्यवस्थापन विषयक आकडेवारीवर किती विश्वास ठेवायचा? जल संपदा विभागाचे अधिकारी कोणतीही आणि कितीही प्रपत्रे भरून देण्यात पटाईत आहेत.  कचरा आत - कचरा बाहेर (गार्बेज इन गार्बेज आऊट) असा तो प्रकार असतो. त्याला महत्व  देताना व त्याआधारे  फार मोठे निष्कर्ष काढताना तारतम्य  दाखवणे आवश्यक आहे.

प्रकल्पीय उपयुक्त साठा व प्रत्यक्ष उपलब्ध साठा याबद्दल समितीने तीन विविध ठिकाणांहून संकलित केलेली माहिती तक्ता -१.६ (महामंडळ, कालावधी २००१-०२ ते २०१०-११, महामंडळनिहाय माहिती), तक्ता-१.७ ( सिंचन स्थितीदर्शक अहवाल, २००१-०२ ते २०१०-११, प्रदेशनिहाय माहिती ) आणि तक्ता-१.८ (रंगनाथन समिती,१९९५-९६ ते २००५-०६,प्रदेशनिहाय माहिती विविध कारणांमुळे होणारी घट वजा जाता) मध्ये दिली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली माहिती (महामंडळ किंवा प्रदेश निहाय) आणि तीही प्रसंगी भिन्न कालावधीची असल्यामुळे तुलना व अर्थपूर्ण विश्लेषण अशक्य होते. हे उदाहरण केवळ वानगी दाखल आहे. अशी अनेक उदाहरणे संदर्भीय प्रकरणात आहेत.

तात्पर्य, जुन्या व्याख्या वापरणे, महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम क्र.३ चा उल्लेख टाळणे, प्रकल्प ख-या अर्थाने पूर्ण झालेले नसताना निर्मित सिंचन क्षमतेचे आकडे फसवे आहेत हे स्पष्टपणे निदर्शनास न आणणे, पिक -मोजणीबाबत वस्तुस्थिती न सांगणे,  सिंचन स्थिती दर्शक, जललेखा व स्थिर चिन्हांकन या धडधडीत खोटया अह्वालांवर अंधविश्वास ठेवणे आणि महामंडळांच्या अधिका-यांनी दिलेली माहिती तपासणी न करता स्वीकारणे  या सर्व बाबींमुळे समितीच्या अहवालातील पहिले प्रकरण सकृतदर्शनी वादाचे ठरेल असे वाटते. त्यामुळे अह्वाल  तर आला पण निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष भिजलेले क्षेत्र याबाबत पूर्ण व सूस्पष्ट उलगडा झाला नाही असे वाटते. तद्दन खोटी आकडेवारीच आपण प्रमाण मानत राहिलो तर तो कधी होणारही नाही. मग पुढे काय? खालील  प्रस्तावांवर महाराष्ट्राने विचार करावा.

१)  महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम क्र.७  अन्वये मुख्य अभियंत्यांनी मुख्य नियंत्रक प्राधिकारी म्हणून काम करणे १९७६ पासून अपेक्षित होते व आजही आहे. शासन निर्णय क्र. १०.०४ / (३०९/२००४) / सिं.व्य.(धो.) दि.३१ ऑगस्ट २००४ अन्वये त्याबद्दल सूस्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. पण तरीही कोणत्याही मुख्य अभियंत्याने आजवर ती कायदेशीर जबाबदारी पार पाडलेली नाही. त्यामुळे मुख्य अभियंत्यांवर तसेच त्यांच्याकडून ते काम करवून घेण्यात अक्षम्य कुचराई केली म्ह्णून जलसंपदा विभागाच्या   सचिवांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी. सिंचन व्यवस्थापन व त्यासाठीचा कायदा याकडे गुन्हेगारी स्वरूपाचे दुर्लक्ष केल्याबद्दल या सर्वांना कठोर शिक्षा व्हावी. 

 २) भिजलेल्या क्षेत्राची मोजणी हा सिंचन व्यवस्थापनाचा एक भाग आहे. मूळ सिंचन व्यवस्थापनच धड होत नसल्यामुळे मोजणीकडेही दुर्लक्ष करण्यात आले. तेव्हा सिंचन व्यवस्थापनात आमुलाग्र सुधारणा घडवून आणण्याकरिता समयबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात यावा.

मुलाच्या हितासाठी प्रसंगी लाड बाजूला ठेऊन मुलाचा कान आईला पकडावा लागतो. त्या कर्तव्यदक्ष कठोर आईची भूमिका बजावण्याची जबाबदारी नियतीने ज्यांच्यावर टाकली होती ती त्यांनी पार पाडली का ‘व्यवस्था दोष’ ही नवीन पळवाट आपल्या बाळ्याला उपलब्ध करून दिली असा प्रश्न अहवालातील प्रकरण -१ अखेरीस पडतो हे मात्र निश्चित.

********
* निवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद.
   तज्ञ सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ. (लेखातील मते वैयक्तिक)
   मो. ९८२२५६५२३२
   बी -१२, प्राईड टॉवर्स, वेदांत नगर, औरंगाबाद ४३१००५

Published in Saptrang, Sakal,dt 22 June 2014


नदीजोड प्रकल्प: उन्माद नको; तारतम्य हवे

नदीजोड प्रकल्प: उन्माद नको; तारतम्य हवे
-प्रदीप पुरंदरे
‘नद्या जोडण्यासाठी हवा जनमताचा रेटा’ या चेतन पंडितांच्या लेखासंदर्भात (सकाळ, १३ जून२०१४)  पाणी-प्रश्नाबद्दल प्रामाणिक आस्था असणारे जिज्ञासू नागरिक खालील मुद्यांचाही साकल्याने गंभीर विचार करतील अशी आशा आहे. जनमताचा रेटा नक्की कशासाठी हवा हे त्यातून स्पष्ट होईल.

१) नदीजोड ही केवळ एक संकल्पना आहे की प्रकल्प? पंडितांच्या विवेचनानुसार ती केवळ एक प्राथमिक संकल्पना आहे. जो पर्यंत विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार होत नाही तो पर्यंत नदीजोडाचे फायदे, खर्चाचे अंदाज, तसेच पर्यावरणावर परिणाम, बुडीत क्षेत्र व जंगलतोड, विस्थापन व पुनर्वसन या सगळ्या गोष्टी कळणार नाहीत हे लेखात स्वत:च मान्य करणारे पंडित नदीजोड बनविल्यास एकूण पाणी उपलब्धता, सिंचनक्षमता,विद्युतनिर्मिती, पुरग्रस्त क्षेत्रातील पुराची तीव्रता, दुष्काळ निवारण वगैरेबाबत किती फायदे होणार याची विशिष्ट आकडेवारी देऊन मोकळे होतात.जर डीपीआर च नाही तर ही नेमकी आकडेवारी आली कोठून? आणि जलक्षेत्रातील (वॉटर सेक्टर) निदान महाराष्ट्रातील अनुभव तरी असे सांगतो की, असले अंदाज प्रत्यक्षात खरे होत नाहीत. कामे दशकानुदशके सुखेनैव रखडतात. खर्च अफाट वाढतो. सिंचन घोटाळा होतो. नक्की किती क्षेत्र ओलिताखाली आले हे ही  धड सांगता येत नाही आणि शेवटी विधान मंडळाला सादर करावयाच्या आर्थिक सर्वेक्षणात सिंचनविषयक  माहितीच उपलब्ध नाही असे म्हणण्याची पाळी येते.

२)नदीजोडचे  डिपीआर तयार नाहीत. साहजिकच शासनाच्या विविध विभागांनी विविध कायद्यांन्वये नदीजोडला आवश्यक त्या मंजु-या दिलेल्या नाहीत. पंचवार्षिक योजनेत नदीजोडचा उल्लेख नाही. अंदाजपत्रकात नदीजोडसाठी तरतुद नाही. हाती घेतलेली पूर्वीची कामेच पूर्ण करायला शासनाकडे पैसा नाही. अशी एकूण परिस्थिती असताना मा. सर्वोच्च न्यायालयाची चक्क दिशाभूल केली जाते आणि मा. सर्वोच्च न्यायालयही उगीचच असे गृहित धरते की, नदीजोड बद्दल सर्व औपचारिकता पूर्ण झाली असूनही केवळ अंमलबजावणी होत नाहीये. न्यायालयाबद्दल आदर बाळगूनही हे नम्रपणे सांगायला हवे की, शासनाने पाणीप्रश्न नेमक्या कोणत्या विशिष्ठ मार्गाने सोडवावा हे न्यायालयाने सांगणे उचित नाही. तो शासनाच्या एकूण धोरणाचा भाग आहे. नदी जोड प्रकल्पाबाबत  एखाद्या नागरिकाचे /संघटनेचे प्रामाणिक मत वेगळे असू शकते. पण त्याबाबत न्यायालयात दाद मागणेही आता अवघड होऊन बसले. कारण शासन म्हणणार की, न्यायालयाने आदेश दिला म्हणून आम्ही नदीजोड प्रकल्प राबवतो आहोत! शासकीय निर्णयात ‘अशा प्रकारे’ प्रत्यक्ष सहभागी होऊन शासनाच्या त्या कृतीची न्यायालयीन तपासणी करण्याचा हक्क न्यायालयाने आपणहून गमावला तर नाही ना? न्यायालय व शासन यांच्यातल्या सीमारेषा अंधुक होणे लोकशाही रचनेत  योग्य आहे का?

३)  पाणी-प्रश्नाचे नेमके स्वरूप व व्याप्ती काय आहे? स्थानिक पातळीवर तसेच त्या त्या नदीखो-याच्या अंतर्गत पाणी-प्रश्न सोडविण्याच्या तुलनेने सुलभ व स्वस्त शक्यता सगळ्या संपल्या आहेत का? बाहेरून आणि लांबून पाणी आणणे एवढा एकच पर्याय शिल्लक राहिला आहे का? असे प्रश्न, नदीजोड प्रकल्पाबाबत वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले, तर पडतात. पण त्याबद्दल चर्चा होताना दिसत नाही. नद्या जोडण्याबाबत निर्णय जणू झालाच आहे आणि आता काही नतद्रष्टांना बाजूला करून ( एनजीओज ना परदेशी मदत !) खंबीर नेतृत्वाच्या आधारे तो अंमलात आणणे तेवढे बाकी आहे असा एकूण आर्विभाव दिसतो. सर्वसमावेशक व पर्यावरण-स्नेही जलविकासास तो घातक आहे. उत्तराखंडातील परवापरवाच्या हिमालयीन त्सुनामीपासून आम्ही काही धडा शिकणार आहोत की नाही?

४)निसर्ग निर्मित नद्या या पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत. आपल्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनात नद्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. नद्या म्हणजे काही नगरपालिकांच्या पाईपलाईन्स नाहीत की ज्या कोणीही कोठेही तोडाव्यात, पाहिजे तशा वळवाव्यात आणि वाट्टेल तेथे जोडाव्यात.

५) एखाद्या राज्यात अथवा नदीखो-यात अतिरिक्त पाणी  उपलब्ध आहे हे कोणी व कोणत्या सर्वमान्य निकषां आधारे ठरवले‘उदंड जाहले पाणी नदीजोड करावया; घेऊन जा पाहिजे तेवढे’ असे कोणी कधी आता म्हणणार आहे का? ममता आणि जयललितांसारख्या गरीब बिचा-या मुख्यमंत्री त्यांच्या थोरल्या बहिणीचे म्हणजे  मितभाषी व विनम्र जलसंपदा मंत्री साध्वी उमा भारतींचे ऎकणार असे गृहित तत्व असेल तर मग जलक्षेत्रात अच्छे दिन दूर नही! (बाकी, जलसंपदा मंत्री म्हणून उमा भारतींची नेमणूक म्हणजे अनाकलनीय व बेभरवशाच्या ‘अल-निनो’ला घरच्या हौदात बंद करतो असे म्हणण्यासारखे आहे! माननीय अल-नमोंना हार्दिक शुभेच्छा!!)

६) तुटीच्या व अतितुटीच्या विभागात / नदीखॊ-यात रेकॉर्डब्रेक उस घ्यायचा आणि प्यायला पाणी नाही हो असा गळा काढत पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवा या मागणीमागे जनरेटा उभा करण्यासाठी उस-बाधीत राजकारण करायचे हा काय प्रकार आहे? उधळ्या व बेजबाबदार बाळ्याच्या हातात कोरा धनादेश द्यायचा हे शतप्रतिशत चूक नव्हे काय? तथाकथित विपुलतेच्या व अतिविपुलतेच्या विभागात / नदीखो-यात सर्व ठिकाणी सर्वांना पाणी मिळते आणि  तेथे आता सर्व आलबेल आहे असे गृहित धरणे बरोबर आहे का? समुद्राला जाऊन मिळणारे पाणी ‘हे वाया जाते’ असे जलचक्राचा अभ्यास असणारा  अभियंता म्हणू शकेल का? पाणी वळविण्याच्या अतिरेकाने अरल समुद्र आटला आणि त्यातून गंभीर पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले  हे खोटे आहे का?

७) नदीजोड प्रकल्पामूळे पूरग्रस्त क्षेत्रात पुराची तीव्रता ३० टक्क्यांनी कमी होईल असे पंडित म्हणतात. म्हणजे  पुराचा प्रश्न नदीजोडमूळे  पूर्ण निकाली निघाला असे होणार नाही. रुडकी विद्यापीठातील   मानद प्राध्यापक  व सुप्रसिद्ध अभियंता श्री. भरत सिंग यांचे तर स्पष्ट मत आहे की, नदीजोड प्रकल्पामूळे पुर नियंत्रण /नियमन करण्याची कल्पना कोणताही जलसंपदा अभियंता त्वरित झिडकारेल.(एनी वॉटर रिसोर्सेस इंजिनियर विल इमिजिएटली डिसकार्ड द आयडिया ऑफ इंटरलिंकिग ऑफ रिव्हर्स एज ए फ्लड कंट्रोल मेझर) मोठ्या प्रकल्पांमूळे नेहेमीच सुयोग्य पुर नियमन होते असा आजवरचा आपला अनुभवही नाही. अलमट्टीचे प्रकरण आपण इतक्यात विसरलो की काय? जेथून पुराचे पाणी वळवायचे आणि जेथे ते घेऊन जायचे त्या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी नद्यांना पूर आला असेल तर काय करणार? काय होईल? अशा पाणी वळवण्यामूळे दोन्ही ठिकाणी पर्यावरणीय प्रश्न उभे राहतील त्याचे काय? दुष्काळी भागात जादाच्या पाण्याबरोबर प्रदुषणाचे प्रश्नही आयात होणार नाहीत का?

८) वैश्विक तापमान वाढ आणि हवामानातील बदल हा काही केवळ बागुलबुवा राहिलेला नाही. त्यामूळे पाऊसमानात फरक पडणार आहे. पाण्याच्या उपलब्धतेचे अंदाज चुकणार आहेत. नदीजोड मागची गृहितेच उलटीपालटी होणार आहेत. नदीखो-यातील तथाकथित तूट व विपुलता यांचा नव्याने आढावा घ्यावा लागणार आहे.

९) नदीजोड प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय परिमाणदेखील आहे. इतर देशातून भारतात येणा-या नद्या व भारतातून इतर देशात जाणा-या नद्या याबाबत आपण एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही. ज्या नद्या परदेशातून भारतात येतात त्या नद्या संबंधित देशांनी त्यांच्या भागात वळवल्या किंवा फार मोठया पाणीवापराचे प्रकल्प त्यांनी उभे केले तर आज ज्या नद्यात ‘जादाचे’ पाणी आहे त्या नद्यातील जल प्रवाह लक्षणीयरित्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१०) मूळात विविध नदीखो-यातील पाणी उपलब्धतेचे अंदाज खरे आहेत का असाही प्रश्न आता पडायला लागला आहे. जायकवाडीच्या वर उर्ध्व गोदावरी खॊ-यात मूळ अंदाजापेक्षा आता ४० अब्ज घनफूट पाणी कमी आहे असे जल संपदा विभागाचे म्हणणे आहे. ते खरे असेल तर हा गंभीर मुद्दा आहे. पाण्याची खॊटी व अतिशयोक्त उपलब्धता दाखवून सिंचन घोटाळे करायचे ही बाब आता नव्याने उघडकीला येत आहे.

११) दुष्काळग्रस्त भागांना नदीजोड प्रकल्पामूळे पाणी मिळेल या विधानाबद्दलही तज्ञ साशंक आहेत. दुष्काळी भाग हे नद्यांपासून लांब अंतरावर व नद्यांपेक्षा खूप उंचावर असल्यामूळे नदीजोडचे जादा पाणी नदीत आल्यावर त्यांना ते आपोआप व सहज मिळणार नाही. त्यासाठी उर्जापिपासू महाकाय उपसा सिंचन योजना राबवाव्या लागतील. ते महाग पाणी सर्वसामान्य शेतक-याला परवडणार नाही.

१२) साध्या लघु सिंचन प्रकल्पांची सुद्धा आपण नीट देखभाल-दुरूस्ती आज  करु शकत नाही. कालव्यातून अमाप पाणी चोरी होते. नगर-नाशिक मधील तालेवार मंडळी दुष्काळातदेखील मराठवाड्यात पाणी येऊ देत नाहीत. अशा प्रकारचे प्रश्न नदीजोड प्रकल्पात आक्राळविक्राळ होतील. ते कोण व कसे सोडवणार? जल- कायद्यांचे तीन तीन चार चार दशके नियम न करणारे आपण कसे नियमन करणार आहोत प्रस्तावित महाकाय नदीजोडचे? आ बैल मार मुझे असे तर होणार नाही ना?

१३) दुष्काळाला सामोरे जाण्याचा खरा मार्ग मृद व जल संधारण, वर्षा जलसंचय, सिंचन प्रकल्पांचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि पाण्याचे समन्यायी वाटप यातून जातो. कालव्यांची वहनक्षमता वाढवणे, शेतावरील पाणीवापरात कार्यक्षमता आणणे, पिक रचनेत आमूलाग्र बदल करणे, उत्पादकता वाढवणे आणि जलक्षेत्रात कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे हे उपाय त्वरित अंमलात आणणे हा शहाणपणाचा मार्ग आहे. त्याला मागणीचे व्यवस्थापन (डिमांड साईड मॅनेजमेंट )असे म्हणतात. पण ते करायचे असेल तर स्वकीयांशी संघर्ष करावा लागतो. शिस्त पाळावी लागते. वाईटपणा घ्यावा लागतो. राजकीयदृष्ट्या अप्रिय गोष्टी (पोलिटिकली इनकरेक्ट!)बोलाव्या लागतात. त्या तुलनेत नदीजोड प्रकल्पाबाबत मोघम बोलून मृगजळ दाखवणे सोपे असते.  अभियंत्यांच्या व्यावसायिक अहंकाराला हवा देणे आणि राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली उन्माद निर्माण करणे हे ही त्यातून साध्य  होते.

 सैतान तपशीलात असतो म्हणून त्याकडे लक्ष वेधणा-या ‘थोर पर्यावरणवादी’ आणि ‘ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते’ यांची खिल्ली उडवायची की ‘नदीजोडच्या तुरी बाजारातच नव्हे तर शेतातही नसताना’ मोघमदाजींच्या भूलथाफांना बळी पडायचे हे जनतेने ठरवावे. उन्मादाने प्रश्न विकोपाला जातात. तारतम्य व संयम मानवी चेह-यासह सर्वसमावेशक विकासाची शक्यता निर्माण करतात हे लक्षात ठेवलेले बरे.
Edited version of this article was published in Sakal dt 18 June 2014