Wednesday, May 3, 2023

आहे कटू तरीही .. सिंचन प्रकल्पांबाबत बोलू काही

 

Series of 4 articles published in Agrowon

आहे कटू तरीही .. सिंचन प्रकल्पांबाबत बोलू काही

प्रदीप पुरंदरे

हत्ती आणि सात आंधळे: 

सिंचन प्रकल्पाशी  संबंधित  प्रत्येक घटकाचे प्रकल्पाबाबतचे मत वेगळे असते.  बाई मी धरण धरण बांधिते, माझे मरण मरण कांडिते” असे विस्थापितांना वाटते. तर कालवा मुखाजवळच्या  आणि  जलाशयावरून उपसा करणा-या  शेतक-यांसाठी   सिंचन प्रकल्प ही   `आधुनिक भारतातील मंदिरे’ आहेत.  कालव्याच्या शेपटाकडचे शेतकरी `आम्ही  लाभक्षेत्रातील `कोरडवाहू’ बागाईतदार  झालो अशी तक्रार करतात. धरणांजवळच्या  काही गावांचा “धरण उशाला अन कोरड घशाला” असा आक्रोश असतो. उ्द्योजक, मध्यमवर्गीय आणि  नवश्रीमंत `शेतकरी पाणी वाया घालवतात’ अशी टीका करत पाण्याचा “मूल्य” दायी वापर करा असा उपदेश करतात. टोकाचे पर्यावरणवादी धरणच नको;  धरणांचे डिकमिशनिंग करा अशी भूमिका घेतात. तर अभियंत्यांना नदी-जोड प्रकल्प हा रामबाण उपाय वाटतो.  प्रत्येक घटक त्याच्या परीने  बरोबर ! पण आपण सगळे मिळून काही तरी चुकतो आहोत का? शेवटी, वस्तुस्थिती काय आहे? तर, धरणेही  आहेत आणि  सिंचन प्रकल्पही!!  त्यांचे काय करायचे? सोडले तर पळते, धरले तर चावते! या बाबत अंतर्मुख होऊन विचार करण्याची  आणि काही महत्वाचे  निर्णय घेण्याची व पथ्ये पाळण्याची तातडीची  गरज आहे.  खरे तर, उशीरच झाला आहे! राज्याचे भले किंवा वाईट करण्याची अफाट क्षमता असलेल्या  सिंचन प्रकल्पांची सद्यस्थिती आणि  त्यांच्या संदर्भात काही  निर्णयांचा प्रस्ताव मांडणे हा या लेखमालेचा उद्देश आहे. या पहिल्या  लेखात राज्यस्तरावरील एकूण सिंचनचित्र मांडले आहे. दुस-या लेखात, जलाशय व कालवा प्रचलन:  तीस-या लेखात, जल-कारभार (water governance) आणि शेवटी, चौथ्या लेखात,  महत्वाच्या निर्णयांचे प्रस्ताव  अशी एकूण रचना आहे.       

राज्यस्तरावरील सिंचनचित्र:

सिंचन स्थितीदर्शक आणि  जललेखा या अधिकृत शासकीय अहवालातून दिसणारे राज्यस्तरीय सिंचन-चित्र खालील प्रमाणे आहे.  

·         रू ,२२,७९३ कोटी गुंतवणूक (मार्च २०१८), ३८७७ पूर्ण राज्यस्तरीय प्रकल्प, ५३.०४३ लक्ष हेक्टर  सिंचन क्षमता (तक्ता – १) आणि ३५.२३ लक्ष हेक्टर (६६.४ टक्के) प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र हे महाराष्ट्राचे   आजमितीचे  सिंचन चित्र आहे.

·         वार्षिक बजेट १०-१५ हजार कोटी रुपये असणा-या जल संपदा विभागाच्या  बांधकामाधीन प्रकल्पांची (१एप्रिल २०१८ रोजीची) उर्वरित किंमत  रू ८३६६४ कोटी एवढी आहे.

·         पाझर तलाव; गाव तळी; भूमिगत / कोल्हापूर पद्धतीचे / वळवणीचे बंधारे अशी  एकूण  ,०६,२६९  लघु प्रकल्प (स्थानिक स्तर) कामेही झाली असली तरी त्यांच्या प्रत्यक्ष सिंचनाची माहिती उपलब्ध नाही.

·         २००८-०९ ते २०१७-१८ या कालावधीत धरणे पूर्ण भरली नाहीत. सरासरी प्रकल्पीय उपयुक्त साठा ३८२७१ दलघमी असला तरी सरासरी प्रत्यक्ष उपयुक्त साठा २५६५० दलघमी (६७%)एवढाच होता. त्यातून सिंचन १५९२२ दलघमी (५८%), बिगर सिंचन ६६६६ दलघमी (२४%) आणि बाष्पीभवन ४७२२ दलघमी (१७%) असा  सरासरी पाणी वापर झाला.  

 

                    महाराष्ट्रातील पूर्ण सिंचन प्रकल्प (३० जून २०१९ अखेर)

प्रकल्प 

संख्या

निर्मित सिंचन क्षमता (लक्ष हेक्टर)

राज्यस्तरीय प्रकल्प

 

 

मोठे

८७

२७.४२६

मध्यम

२९७

९.४५९

लघु

३१५९

१३.४९४

उपसा योजना

३३४

२.६६४

एकूण

३८७७

५३.०४३

लघु पाटबंधारे (स्थानिकस्तर)

 

 

   लघु तलाव

२९६०

१८.९

   अन्य बांधकामे $

,०१,८७१

            $ को.प.बंधारे (१२९४५), उपसा योजना (२८९८), पाझर तलाव (२४२१२) वळवणीचे

              बंधारे, भूमिगत बंधारे अशी इतर बांधकामे ५८८५६    

·         राज्यातील ऊसाच्या एकूण क्षेत्रापैकी सरासरी ५८ टक्के  क्षेत्र सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात असून  खरीप, रब्बी आणि  दुहंगामी क्षेत्रात लक्षणीय घट तर  उन्हाळी बारमाही क्षेत्रात ते पटीने वाढ झाली आहे. सिंचन आणि बिगरसिंचन पाणीपट्टी वसुलीची टक्केवारी अनुक्रमे  ९.४३५ असून रू. १८४९.१९ कोटी थकबाकी आहे. देखभाल-दुरूस्तीचा खर्च  पाणीपट्टी वसुली पेक्षा जास्त आहे. पाणी वापर संस्था बहुतांशी कागदावर आहेत.

 

जल व्यवस्थापन:

जल संपदा विभागाच्या २०१७-१८ सालच्या अधिकृत जलेखातून दिसणारी जल व्यवस्थापनाची खालील सद्यस्थिती केवळ निराशाजनक नव्हे तर चिंताजनक  आहे.

·         ६४ मोठ्या प्रकल्पांपैकी १९ प्रकल्पांनी (३०%) आणि २५४ मध्यम प्रकल्पांपैकी ९५ प्रकल्पांनी (३७%) पाण्याचे अंदाजपत्रक (प्रिलिमिनरी इरिगेशन प्रोग्रॅम, पीआयपी) केले नव्हते.

·          ९ मोठया व ३२ मध्यम प्रकल्पांची पीआयपीच्या तुलनेतील कामगिरी ५०% पेक्षा कमी होती.

·         १३० हेक्टर / दलघमी या निकषानुसार  २० मोठया व ४२ मध्यम प्रकल्पांची कामगिरी  ६० टक्क्यांपेक्षा कमी होती.  ४ मोठ्या व ३३ मध्यम प्रकल्पात काहीच ताळमेळ लागला नाही.

·         कालव्यांची वहनक्षमता २०१७-१८ साली १६ मोठया प्रकल्पात ५० टक्क्यांपेक्षा कमी होती तर १२ मोठया प्रकल्पात ती अवास्तव दाखवण्यात आली आहे.

·         २०१७-१८ साली २२३६ दलघमी पाणी सिंचन वर्ष अखेर विना वापर शिल्लक राहिले.  ते वापरले असते तर १३० हेक्टर / दलघमी या निकषानुसार  ,९०,६८० हेक्टर  क्षेत्राला  पाणी देता आले असते.

·         पाणी-चोरी खुलेआम मोठ्या प्रमाणावर होत असताना तीचा उल्लेख अहवालात नाही.

परिस्थिती वर नमूद केल्याप्रमाणे असताना प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र (२१.२८ लक्ष हेक्टर) मात्र पीआयपीतील गृहितापेक्षा (१८.३२ लक्ष हेक्टर) जास्त आहे!

हे झाले   राज्य पातळीवरील  सरासरी चित्र! परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट व्हावे म्हणून कुकडी प्रकल्पाचे उदाहरण पाहणे उद्बोधक ठरावे.

कुकडी प्रकल्प

·         सन १९६४-६५ साली प्रशासकीय मान्यता (प्रमा) मिळालेल्या या बारमाही पीक रचनेवर आधारित प्रकल्पाची मूळ  किंमत, सिंचन क्षेत्र आणि उपयुक्त जलसाठा अनुक्रमे रु ३१.१८ कोटी, ७४४९४ हेक्टर आणि ७८९ दलघमी होता.   द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) देताना  आठमाही पीक रचनेचा अंगिकार केला गेला. तृतीय सुप्रमेला २०१६-१७ साली मान्यता मिळाली असून प्रकल्पाची  किंमत, सिंचन क्षेत्र आणि उपयुक्त जलसाठा आता अनुक्रमे रु ३९७७.८५ कोटी (मूळ किंमतीच्या १२८पट), १४४९१२ हेक्टर(मूळ सिंचन क्षेत्राच्या दुप्पट) आणि ८४६.८९  दलघमी (मूळ उपयुक्त साठयाच्या १.१ पट)आहे.

·         तृतीय सुप्रमेनुसार  प्रकल्पाचे लाभ-व्यय गुणोत्तर (BC Ratio)  आणि अंतर्गत परतावा दर (IRR) अनुक्रमे ०.९० आणि  १०.१४% (तक्ता-२) असल्यामुळे प्रकल्प मापदंडात बसत नाही.

·         प्रकल्पावर मार्च २०१७ अखेर रू २२१७.२३ कोटी खर्च झालेला असून प्रकल्पाची उर्वरित किंमत रु.१७६०.६२ कोटी आहे. सन १९६४-६५ साली प्रशासकीय मान्यता (प्रमा) मिळालेला हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. १४८२० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अजून बाकी आहे.

·         २०१४-१५ ते २०१९-२० या कालावधीतील  प्रत्यक्ष सिंचन पाणी वापर   हा प्रकल्पीय सिंचन वापराच्या  सरासरी  ६० टक्के (किमान २१ %,  कमाल ८४ %)

·          प्रकल्पीय सिंचन क्षेत्राच्या  तुलनेत प्रत्यक्ष सरासरी सिंचन क्षेत्र ८३५१८ (५८%).

·         साधारणत: खरीप मध्ये एक, रब्बी मध्ये २ व उन्हाळी  हंगाममध्ये एक आवर्तन देण्यात येतात. कालवा व प्रकल्पस्तरीय  पाणी वापर संस्था अद्याप झालेल्या नाहीत

समृद्धीचा महामार्ग:

काळाचा महिमा अगाध असतो हेच खरे! कालवा आणि नदी या मधील प्रवाही पद्धतीने भिजणारी   चिंचोळी पट्टी  हा एके काळी कृषि क्षेत्रातील समृद्धीचा महामार्ग समजला जायचा. पण नदी, जलाशय आणि कालवा यावरून उपसा सिंचन आणि बिगर सिंचन सुरू झाले आणि समृद्धीच्या  महामार्गाने यू टर्न घेत लाभक्षेत्राचे चक्क अपहरण केले. ते आता जलाशयाभोवती  आणि कालव्याच्या मुखांजवळ सरकले. “खाईन तर उसाशी”, ठिबक वापरलच तर ते ही मोकाट पद्धतीने, पाणी मोजायचे नाही, वीज-बील व पाणी पट्टी देणार नाही,  पाणी वापर संस्था करणार नाही अशी एकूण भूमिका घेत तेथील शेतकरी  प्रचंड उपसा व  अफाट पाणीवापर करता आहेत. आणि `काहीही  न करणे हे सर्वोत्तम धोरण’  अशी भूमिका घेत शासन गप्प बसून आहे.  पाणी या सामाईक संसाधनाच्या  शोकांतिकेचे (Tragedy of Commons)  आपण साक्षीदार आहोत! काय करणार आहोत आपण? असो! नूतन वर्षाच्या शुभेच्छा – वाचकांना आणि जलवंचितांना देखील!!

लेख क्र २ - जलाशय प्रचलन

जलाशय प्रचलनाचा  संबंध महापुराशी आणि  महापुराचा संबंध हवामान बदल आणि टोकाच्या घटनांशी  असल्यामुळे जलाशय प्रचालनाचा एक धावता आढावा या लेखात घेतला आहे.

जलाशयातील उपयुक्त व मृत पाणी साठा, या दोन्ही वरील  गाळाचे अतिक्रमण, बाष्पीभवन, गळती, इत्यादी बाबी  लक्षात घेऊन सिंचन व बिगर सिंचनाची मंजूर पाणी-मागणी पूर्ण करण्यासाठी तसेच प्रसंगी पूर नियमन व धरण-सूरक्षेसाठी  जलाशयातील पाणी-साठयाचे नियमन करणे या प्रक्रियेला जलाशय प्रचलन असे म्हणतात. त्यासाठी आरओएस (Reservoir Operation schedule,) आणि जीओएस (Gate Operation schedule) हे  दोन शास्त्रीय दस्तावेज आणि ते अंमलात आणण्यासाठी  दारे असलेला सांडवा (Gated Spillway) यांची आवश्यकता असते. यापूर्वी धरण कसे भरले या माहितीच्या संख्याशास्त्रीय विश्लेषणातून विशिष्ट कालावधीत कोणत्या पाणी पातळी पर्य़त किती जलसाठा करायचा, धरणातून किती पाणी कधी  सोडायचे, इत्यादी  ठरविण्याची पद्धत म्हणजे आरओएस! आणि आरओएस अंमलात आणण्यासाठी  सांडव्यावरील कोणती दारे, कधी, किती व कोणत्या क्रमाने उघडायची वा बंद करायची याचा कार्यक्रम म्हणजे जीओएस. वडनेरे समितीने  २००७ साली  कोयना प्रकल्पासाठी सुधारित आरओएस सुचवला. शासनाने तो २०११ साली स्वीकारला. पण तेव्हा पासून २३ ऑगस्ट २०१९ पर्यंत म्हणजे दुसरी वडनेरे समिती स्थापन होईपर्यंत तब्बल आठ वर्षे त्याची अंमलबजावणी झाली नाही. कोयने बाबत असे घडत असेल तर इतरत्र काय होत असेल यांची कल्पनाच केलेली बरी.

 

             दारे असलेला सांडवा                नदी विमोचक

ज्या धरणांवर दारे असलेले सांडवे आहेत त्याच धरणात फक्त पूर-नियमन करता येते. राज्यात एकूण ६५०३ प्रकल्प (३५४३ राज्यस्तरीय प्रकल्प आणि  ल. पा. (स्थानिक स्तर) चे २९६० लघु तलाव)  असले तरी त्यापैकी फक्त ८७ मोठ्या प्रकल्पांच्या धरणांवर(१.३४ टक्के) दारे असलेले सांडवे आहेत.  उर्वरित ९८.६६ टक्के सिंचन प्रकल्पात दारे  असलेले सांडवे नसल्यामुळे  तेथे विशेष असे पूर नियमन करता येत नाही. त्या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष साठवण क्षमते एवढे पाणी अडून जे काही पूर नियमन होईल तेवढेच!

नदी-पात्रात पाणी सोडण्यासाठी  अनेक  धरणात नदी-विमोचके (River Sluices) नसल्यामुळे जलाशयातील  पाणी-पातळी सांडवा पातळीपेक्षा जास्त होईपर्यंत प्रचलन असे  काहीच करता येत नाही. कालवा आणि विद्युत गृहामार्गे पाणी सोडता येते पण पूराच्या तुलनेत ते खूपच कमी असते.

 

मुक्त पाणलोटातून येणा-या पूराचे नियमन कोणी व कसे करायचे याबाबत स्पष्टता नाही. जलसंपदा विभागाच्या म्हणण्यांनुसार तो विभाग फक्त धरणांच्या पाणलोटातून येणा-या पूराचे नियमन करू शकतो; मुक्त पाणलोटातून येणा-या पूराचे नाही. कृष्णा खो-यात २०१९ साली जो महापूर आला त्यात ७५ टक्के वाटा मुक्त पाणलोटाचा होता असा त्या विभागाचा दावा आहे! परंतू  जलसंपदा विभागानेच आपल्या एका परिपत्रकात (क्र सिंमव १०००/(४८४/२००२) सिं. व्य. (धो) दि. ९ जून २००४) पुढील  व्याख्या दिली  आहे. “मुक्त पाणलोट क्षेत्राची व्याख्या धरणा खालील नदीचा असा भाग जेथे नैसर्गिक प्रवाह अडविण्याची कोणतीही संरचनात्मक व्यवस्था नाही, अथवा असे पाणी जे खालील भागातील कोणत्याही प्रकल्पात हिशेबात धरले जात नाही, अशी केली आहे”. एवढेच नव्हे, तर “कोकणातील विशिष्ट भौगोलिक रचना व तेथील पर्जन्यमानामुळे उपरोक्त व्याख्येत  बसणारे धरणाच्या खालील मुक्त पाणलोट क्षेत्र केवळ कोकणात असल्याचे दिसून येते“ असा खुलासाही केला आहे.

राज्यस्तरीय ३८७७ सिंचन प्रकल्प, ल.पा.(स्थानिक स्तर) चे २९६० लघु तलाव आणि अन्य एक लक्ष बांधकामे, लक्षावधी शेततळी, जलयुक्त शिवार मधील हजारो बंधारे आणि शेकडो बांधकामाधीन प्रकल्प या सगळ्यांचा एकत्रित  विचार केला तर मुक्त पाणलोट आता आहे तरी कोठे असा प्रश्न पडतो. आणि समजा तो असलाच तर त्याचे नियमन करण्यासाठी आता अजून  कोणती नवीन  संरचनात्मक व्यवस्था कोणी, कुठे आणि कधी करायची?

पूर-नियमनाची तरतुद आपल्या धरणात नाही.  दर वर्षी वापरासाठी  पुरेसे पाणी मिळावे म्हणून पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच जलाशयात जास्तीत जास्त जल-साठा केला जातो. पूर आला तर  जादाचे पाणी धरणातून सोडावे लागते.   पूर येईल असे गृहित धरून  जलाशयात त्यासाठी जागा असावी म्हणून  पावसाळ्याच्या सुरूवातीपासून धरणात पुरेसा साठा न करता आलेले पाणी सोडून दिले आणि गृहित धरलेला पूर आलाच नाही तरीही  पंचाईत होऊ शकते. तात्पर्य, धरण कधी व किती  भरायचे हा पेच कायमचा  आहे

धरणांच्या सुरक्षितेकरिता नद्यांत  पाणी सोडायचे झाल्यास नद्यांची  पूराचे पाणी वाहून नेण्याची क्षमता उत्तरोत्तर  कमी होते आहे! त्यांची सर्वज्ञात कारणे पुढील प्रमाणे - लाल व निळ्या पूर रेषांच्या मर्यादांचे उल्लंघन करून झालेली अतिक्रमणे व त्यांना असलेला राजकीय वरदहस्त,  जलगतीशास्त्राचा (Hydraulics) विचार न करता  नदी-प्रवाहाला अडथळा  निर्माण करणारी  शासनानेच केलेली बांधकामे (उदा, को.प.बंधारे, रस्ता व रेल्वे पूल), दीत गाळ साठणे आणि झाडेझुडपे वाढणे, इत्यादी!  अतिक्रमणे काढण्याची कायदेशीर जबाबदारी जलसंपदा विभागाची आहे पण तो विभाग तसे मानत नाही. नदी-प्रवाहाला अडथळा  निर्माण करणारी  शासकीय  बांधकामे दुरुस्त करण्याबाबत ही अनास्था आहे.   

महापूर एखाद्या धरणापुरता आला तरी त्याचे परिणाम गंभीर होतात. नदीखॊ-यातील अनेक धरणांबाबत एकाच वेळी असे झाले तर? तसे होऊ नये म्हणून प्रत्येक धरणाचा सुटा सुटा विचार न करता नदीखॊरे/उपखॊरे स्तरावर एकात्मिक पूर नियंत्रण केले पाहिजे हे १९८४ पासून तत्वत: सर्वमान्य आहे परंतु हा प्रकार `काशीस जावे नित्य वदावे’ या स्वरूपाचा आहे!.

कार्यक्षम पूर–व्यवस्थापनासाठी  अनेक अभियांत्रिकी बाबींची अद्ययावत स्वरूपात सुनिश्चिती करण्यासाठी बरेच काही तातडीने  करण्याची  गरज आहे. उदाहरण म्हणून त्या पैकी काही बाबी खाली दिल्या आहेत

(१) धरणातील गाळाचे अतिक्रमण व  सुधारित पाणीसाठा दर्शवणारे आलेख व तक्ते 

(२) आरओएस आणि जीओएस

(३) नदी-प्रवाह-मापन केंद्राच्या ठिकाणी   विशिष्ट पाणी पातळीला नदीत सरासरी किती विसर्ग आहे हे दर्शवणारे आलेख

(४) पाऊस, नदीतील प्रवाह, जलाशयातील पाणी पातळ्या, इत्यादी  माहितीचे Real Time (घटना 

   घडत असताना तात्काळ)  संकलन, वहन  व विश्लेषण

(५) लाल व निळ्या पूर-रेषा, विविध पुर -विभाग  आणि अतिक्रमणे दर्शवणारे  नकाशे;

(६) नदीखोरेनिहाय एकात्मिक जलाशय प्रचलन आराखडे

(७) उपग्रहाद्वारे संनियंत्रण, हवामान-पूर्वानुमान आणि पुर परिस्थितीचे संनियंत्रण या करिता ISRO,

   MRSAC, IMD, IITM, CWC सारख्या संस्थांबरोबर संपर्क व समन्वय

कृष्णा महापूर २०१९ अभ्यास (वडनेरे) समितीने ३३ शिफारशी केल्या होत्या. त्याबाबत निर्णय घेताना शासनाने त्या   शिफारशींची पुनर्रचना १८ शिफारशीत केली. काही शिफारशींची दखलच  घेतली  नाही.  उदाहरणार्थ, शासन निर्णयात अलमटीचा उल्लेख देखील नाही. उपरोक्त  समितीची नियुक्ती होण्यापूर्वी `एगरोवन’ ला दिलेल्या मुलाखतीत श्री वडनेरे अलमटीच्या बॅकवॉटरचा संबंध महापुराशी जोडतात. त्यानंतर वडनेरे समिती अलमटी ला क्लीन चिट देते. आणि आता परत वडनेरे शासनाला पत्र लिहून `नवीन बाबी लक्षात’ घेता महापूरा संदर्भात अलमटी बाबत अजून अभ्यास केला पाहिजे असे म्हणतात.

तात्पर्य, जल-प्रचलना संदर्भात सद्यस्थिती खालील प्रमाणे आहे:

कोयनेच्या सुधारित शासन मान्य `आरओएस’ ची अंमलबजावणी आठ आठ वर्षे होत नाही; दारे असलेले  सांडवे आणि नदी विमोचक अशी व्यवस्था फार कमी ठिकाणी असल्यामुळे  जलाशय प्रचलनाला मर्यादा आहेत; मुक्त पाणलोटातून येणा-या पूराचे नियमन कोणी व कसे करायचे याबाबत स्पष्टता नाही; पूर-नियमनाची तरतुद नसल्यामुळे  धरण कधी व किती  भरायचे हा पेच कायमचा  आहे; अतिक्रमणे काढण्याची कायदेशीर जबाबदारी जलसंपदा विभागाची आहे पण तो विभाग तसे मानत नाही; नदी-प्रवाहाला अडथळा  निर्माण करणारी  शासकीय  बांधकामे दुरुस्त करण्याबाबत  अनास्था आहे; एकात्मिक पूर नियंत्रण केले पाहिजे हे तत्वत: सर्वमान्य आहे परंतु अंमलबजावणी नाही. कार्यक्षम पूर–व्यवस्थापनासाठी  अनेक अभियांत्रिकी बाबींची अद्ययावत स्वरूपात सुनिश्चिती करण्यासाठी बरेच काही तातडीने  करण्याची  गरज आहे; आणि अलमटी बाबत अजून अभ्यास चालू आहे!

लेख क्र ३ - कालवा सिंचनाचा अंत अटळ आहे का?

जुनाट व मागासलेले तंत्र:

जीवनाच्या  अनेक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान व  स्वयंचलितीकरण येऊन जमाना झाला असला तरी राज्यातील  कालवा प्रचलनाचे तंत्र मात्र  जुनाट व मागासलेले राहिले.  सिंचन प्रकल्पात आजही पाणी-पातळी आणि विसर्ग यांच्या नियमनाची व प्रवाह-मापनाची व्यवस्था नाही. सिंचन प्रकल्पातील  सत्य कल्पितापेक्षाही  विचित्र आहे (चौकट)

सिंचन प्रकल्प: सत्य कल्पितापेक्षा विचित्र  

१.    मूळ नियोजन फक्त प्रवाही सिंचनासाठी. उपसा सिंचन आणि बिगर सिंचन  यांची तरतुद नाही. त्यामुळे कालवे फार  लांब व लाभक्षेत्र खूप मोठे झाले.

२.    उपसा सिंचन आणि बिगर सिंचन या करिता प्रवाही सिंचनाचे पाणी कमी केले; पण त्या प्रमाणात प्रवाही सिंचनाचे लाभक्षेत्र कमी केले नाही. कार्यक्षमतेतही वाढ नाही.

३.    पाण्याचा स्त्रोत एक पण वापर तीन हेतूंसाठी या रचनेमूळे जल संघर्ष वाढले

४.    कालवा व वितरण व्यवस्था अर्धवट.  अनेक प्रकल्प अपूर्ण. देखभाल-दुरुस्ती दुर्लक्षित

५.    अधिकृत लाभक्षेत्र कोरडे; अनधिकृत लाभक्षेत्र  हिरवेगार. कायद्याची अंमलबजावणी नाही.

६.    लाभक्षेत्रात विहिरी, को प / उच्च पातळी बंधा-यांचे पाणी. एकाच क्षेत्राला दोन स्त्रोतातून पाणी

७.    खालच्या प्रकल्पांचे पाणी वरच्या प्रकल्पांनी अडवले

८.    उस बाधा आणि साखर करणी मुळे इतर पिकांना पाणी मिळत नाही.

 

आधुनिकीकरण, व्यवस्थापन आणि समन्याय

सिंचन  प्रकल्पांचे आधुनिकीकरण केले, व्यवस्थापनाकडॆ लक्ष दिले आणि समन्यायी पाणी वाटप चळवळीचा अंकुश निर्माण झाला तर फार मोठे सामाजिक आर्थिक बदल संभवतात. अन्यथा, सामूहिक कृतीला  वाव देणा-या सोप्या, स्वस्त सार्वजनिक कालवा सिंचनाचा अंत आणि वैयक्तिकतेला व खासगीकरणाला प्रोत्साहन देणा-या खर्चिक व ऊर्जा-पिपासू उपसा सिंचनाची  सार्वभौम राजवट  अटळ आहे. 

अभियांत्रिकी दृष्ट्‍या सक्षम कालवे ही पूर्व अट:

धरणातील  पाणी शेतक-यांच्या शेतापर्यंत नेण्यासाठी कालवे, शाखा कालवे, वितरिका, लघु वितरिका इत्यादींचे भले मोठे जाळे लागते. संकल्पनातील गृहितां प्रमाणे कालव्यातून पाणी वाहण्यासाठी   हे माध्यम अभियांत्रिकी दृष्ट्‍या सक्षम असणे आवश्यक आहे. नव्हे, कार्यक्षम कालवा प्रचलनाची ती एक महत्वाची पूर्व अट आहे.   हे अभियांत्रिकी माध्यम  एकविसाव्या शतकातील आधुनिक संकल्पनांना किती अनुरूप आहे यावर  पाणी वाटपातील पारदर्शकता, जबाबदेही, लोक सहभाग व समन्याय अवलंबून असतो. 

कालवा प्रचलन म्हणजे काय?

पाणी वापर संस्थांना किंवा वैयक्तिक शेतक-यांना धरणातील पाणी विहित पद्धतीने  वेळापत्रकानुसार देण्यासाठी कालवा व वितरण व्यवस्थेत पाण्याचा विसर्ग (Discharge) आणि पातळी (Water Level) यांचे नियमन करणे; प्रवाहमापन करणे; पाणी-पाळी व हंगामनिहाय पाण्याचा हिशेब ठेवणे या प्रक्रियेला कालवा प्रचलन असे म्हणतात.

कालवा प्रचालनासाठी काय आवश्यक आहे?

कालवा प्रचालनासाठी पूढील बाबी  आवश्यक असतात – (१) पाणी सोडणे, कमी जास्त करणे आणि बंद करणे या करिता कालवे, शाखा कालवे, वितरिका, लघु वितरिका  इत्यादींच्या मुखाशी हेड रेग्युलेटर्स (एचआर) (२) पाणी-पातळी नियमनासाठी कालवा व वितरण व्यवस्थेत क्रॉस रेग्युलेटर्स (सीआर), (३) आवश्यकतेनुसार एचआर व सीआर खालीवर करणे, (४) पाणी मोजण्यासाठी प्रवाह मापक, (५) कालवा प्रचालन करताना पाणी केव्हा व किती सोडायचे, किती काळ  सोडायचे, विसर्गात केव्हा  व किती बदल करायचे, वगैरे निर्णय घेण्यासाठी विविध  ठिकाणी पाणी पातळी किती आहे, कोणती दारे किती उघडी आहेत आणि कोठे किती विसर्ग चालू आहे  याची रियल टाईम  माहिती व तीचे विश्लेषण

 

कालवा प्रचलनात अडचणी काय आहेत?

वर्तमान व्यवस्था अक्षरक्ष: उघड्यावर पडलेली असल्यामुळे  ऊन, वारा, पाऊस, उंदीर, घुशी, खेकडे आणि पाणी  चोरी करण्यासाठी कालव्यांवर विध्वंस व मोडतोड करणा-या व्यक्ती या पासून तीचे संरक्षण करणे अवघड आहे.  सब घोडे बारा टक्के पद्धतीने (चौकट) ठोकताळ्यांवर  आधारित असल्यामुळे तीचा  भर व्यवस्थापना ऐवजी  प्रशासनावर जास्त आहे.

सब घोडे बारा टक्के – विविधतेमुळे तडजोड

·         कमी-जास्त जमीन धारणा, साक्षर-निरक्षर, गरीब-श्रीमंत, अनुभवी-अनुनभवी, वयोगट, सिंचन पद्धत, पाण्याचा  स्त्रोत, भिन्न भिन्न सिंचन-वर्तणूक(irrigation behaviour)

·         शेत-जमीनीचे उतार, मातीचे प्रकार व खोली, पिकांचे वाण व पेरणीच्या तारखा, पीक-कालावधी, सिंचन गरजा,  पाणी देण्याच्या पद्धती,

 

पाणी पातळी आणि विसर्ग यातील बदल विलंबाने का होतात?

एचआर व सीआर ही  अगडबंब दारे  प्रत्यक्ष त्या दारांपाशी  जाऊन  मानवी हस्तक्षेपाने (manual)  वर-खाली करणे  हे काम दमछाक करणारे  आणि वेळ खाऊ आहे. त्यामुळे दारांची हालचाल फार सावकाश होते. विशिष्ट वेळेवर पटकन ती  दारे हलवता येत नाहीत. कालव्यातील पाणी पातळी आणि विसर्ग यातील बदल विलंबाने होतात.

जलगतीशास्त्राचा आदर का होत नाही?

बहुसंख्य एचआर, सीआर आणि प्रवाह मापक  नादुरुस्त तरी आहेत किंवा ते जागेवर नाहीत / चोरीला गेले आहेत. काही मोठ्या प्रकल्पातील  मुख्य कालवे सोडल्यास इतरत्र सीआर ची तरतूद मुळात केलेलीच नाही. त्यामुळे, विसर्ग व पाणी-पातळी नियमना अभावी जलगतीशास्त्राचा आदर करेल असे अभियांत्रिकी स्वरूपाचे  कालवा प्रचलन होत नाही ही वस्तुस्थिती आहे.     

व्यक्तीवादाला उधाण का येते?

बांधकामातील त्रुटी व दोषांमुळे  कालवा व वितरण  व्यवस्थेची  प्रत्यक्ष वहन-क्षमता ही संकल्पित क्षमतेपेक्षा पहिल्यापासूनच  कमी असते. देखभाल-दुरुस्तीचा  अभाव आणि  पाणी-चोरीसाठी केलेले हस्तक्षेप यामूळे वहनव्ययात वाढ   वहनक्षमतेत उत्तरोत्तर घट होते. परिणामी, पाणीपाळ्यांच्या  कालावधीत वाढ व संख्येत घट होते.  कालवा व वितरण व्यवस्थेतील व्ययामुळे लाभक्षेत्रातील विहीरींचा  लाभ होतो; त्यांच्या पाणी पातळीत वाढ होते.  कालव्यावरून मिळणा-या पाणीपाळ्यांच्या दरम्यान भूजलाआधारे सिंचन केले जाते. कालवा व विहीर अशा दोन्ही स्त्रोतातून होणा-या पाणी वापराने विहीर मालकांचे  कालव्यावरील आणि पाणी वापर संस्थेवरील अवलंबत्व संपते. सामुहिकतेचा अंत होतो. व्यक्तीवादाला उधाण येते. अगोदरच कुपोषित असलेल्या “नकोशी” पाणी वापर संस्थांची भ्रूणहत्या होते. 

आधुनिक व्यवस्था कशी असेल?

आधुनिक कालवा व वितरण व्यवस्था अनेक प्रकारच्या असू शकतात. उदाहरणार्थ, एक पर्याय पूढील  स्वरूपाचा असू शकतो – (१) रिमोट कंट्रोल पद्धतीने विजेवर चालणारी एचआर व सीआर दारे; (२) पाणी पातळी  दर्शवणारे  वॉटर लेव्हल सेन्सर्स, (३) दारे किती उघडी आहेत हे दर्शवणारे गेट पोझिशन सेन्सर्स, (४) प्रवाह मापनासाठी   वॉटर मीटर्स  (५) Supervisory Control & Data Acquisition (SCADA) यंत्रणा, (६) रियल टाईम (जे घडते आहे त्याची माहिती त्याच वेळी मिळणे) स्वयंचलित यंत्रणा.  

वरील पर्यायात अनेक सुधारणा करता येतात. उदाहरणार्थ, सर्व सीआर  एकाच वेळी एकाच वेगाने सारख्या प्रमाणात खाली अथवा वर करणे (सायमलटेनियस गेट ऑपरेशन) किंवा   सर्व सीआर  एकाच वेळी परंतु वेगवेगळ्या वेगाने, वेगवेगळ्या प्रमाणात खाली अथवा वर करणे (टाईम्ड गेट ऑपरेशन). मोठ्या प्रकल्पातील मुख्य कालव्यावर  अशा प्रकारचे डायनामिक रेग्युलेशनच करावे लागेल.

  

            डकबिल  विअर                         डिस्ट्रिब्युटर

विशिष्ट पाणी पातळी कायम राखण्यासाठी डकबिल  विअर आणि विसर्ग-नियमन व मापन एकत्रित करून स्वतंत्र प्रवाह मापकाची  गरज भासू नये  म्हणून डिस्ट्रिब्युटर अशा प्रकारचे Hydraulic पद्धतीचे स्वयंचलितीकरण लघु व मध्यम सिंचन प्रकल्पात आणि मोठ्या प्रकल्पात वितरिकांवर उपयोगी पडेल.

देखभाल-दुरुस्ती आणि शिस्तीला  पर्याय नाही

कालवा व वितरण व्यवस्थेची वेळीच व पुरेशी देखभाल-दुरूस्ती होणे; HR CR यांची दारे तसेच  प्रवाह-मापनाची अचूक व्यवस्था कार्यरत असणे;  वहन-क्षमता, वहन व्यय, कालवा भरायला लागणारा वेळ, पाणी पातळी, आवर्तन पूर्ण व्हायला लागणारा वेळ, इत्यादी घटक  संकल्पनेतील गृहितांच्या जवळपास असणे या सर्व बाबींवर शेतक-याला कधी, किती, किती वेळ, किती वेळा पाणी मिळणार हे अवलंबून असते. हे गृहित धरून चालत नाही. त्याची सुनिश्चिती करावी लागते. आधुनिक तंत्रज्ञान हा काही देखभाल-दुरुस्ती आणि शिस्तीला  पर्याय नाही!

 

लेख क्र ४ - पाणी या सामाईक संसाधनाची  शोकांतिका होऊ नये म्हणून

प्रास्ताविक:

आहे कटू तरीही.. सिंचन प्रकल्पाबद्दल  बोलू काही” या लेख मालिकेतील हा चौथा व अंतिम लेख. महाराष्ट्राचे आजमितीचे  सिंचन चित्र, पाणी या सामाईक संसाधनाची  शोकांतिका, जलाशय प्रचलनाच्या मर्यादा, पूर–व्यवस्थापनासाठी अभियांत्रिकी बाबींची अद्ययावत स्वरूपात सुनिश्चिती, कालवा प्रचलनाच्या जुनाट तंत्रज्ञानाचे तोटे, आधुनिक व्यवस्थेची झलक, इत्यादी मुद्दे आपण पहिल्या तीन लेखात   पाहिले. पाणी या सामाईक संसाधनाची  शोकांतिका होऊ नये म्हणून काही  प्रस्ताव या लेखात मांडले आहेत.

जलाशय प्रचलन:

१.        कृष्णा-खो-यात वारंवार येणा-या महापुराचा अलमट्टीशी काही संबंध आहे का याचा अभ्यास आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी, रूरकी या संस्थेला देण्यात आला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. जलसंपदा विभागात जल-वैज्ञानिकांची नियुक्ती करण्या संदर्भातील शिफारसही आता  अंमलात आणावी.

२.        राज्यातील पूर-प्रवण क्षेत्रात  पूढील बाबी कराव्यात- दारे असलेल्या सांडव्यांची आणि नदी विमोचकांची संख्या वाढवणे; वारंवार पुर येणा-या जलाशयात पूर-आरक्षण करणे; रब्बी हंगाम सुरू होण्याची तारीख पुढे ढकलणे; सिंचन स्थिती दर्शक  आणि जल-लेखा अहवालात पुर नियमनासाठी सोडलेले  एकूण पाणी, तसेच  जीवीत व मालमत्तेची  हानी व  नुकसान भरपाईचा तपशील देणे

३.        मुक्त पालोटातून येणा-या पुराचे नियमन कोणी व कसे करावे या बद्दल मार्गदर्शक तत्वे तयार करणे

४.        पुर रेषांमधील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी निश्चित करणे

५.        अभियांत्रिकी बाबींची अद्ययावत स्वरूपात सुनिश्चिती करणे

कालवा प्रचलन:

१.        प्रत्येक महामंडळाच्या कार्यक्षेत्रात किमान एका सिंचन प्रकल्पात कालव्याच्या मूळ  संकल्पनेप्रमाणे   कालवा प्रचलन करता येईल अशी व्यवस्था करणे  

२.        Self Regulating Outlets, Distributors, Duckbill weirs इत्यादीचा वापर वितरण व्यवस्थेत  करण्याबद्दल   मार्गदर्शक तत्वे प्रसृत करणे

३.         प्रत्येक महामंडळाच्या कार्यक्षेत्रात किमान एका सिंचन प्रकल्पात रिमोट कंट्रोल पद्धतीने विजेवर चालणारी एचआर व सीआर दारे;  वॉटर लेव्हल सेन्सर्स, गेट पोझिशन सेन्सर्स, आधुनिक वॉटर मीटर्स, SCADAअशी व्यवस्था उभी करणे  

जल-व्यवस्थापन

१.    बेबंद उपशाचे नियंत्रण व नियमन करायचे असेल तर पूढील उपाय योजना तातडीने करणे आवश्यक आहे - उपसा सिंचन कायद्याच्या कक्षेत आणणे; उपसाचं पाणी मोजलं जाणं; उपसा सिंचनाकरिता वापरलेले पाणी व त्याने भिजलेले सर्व क्षेत्र जललेखात स्वतंत्र  दाखवणे; उपसा सिंचनाकरता नवीन कायद्या आधारे पाणी वापर संस्था स्थापन करणं; त्या संस्थांना प्रकल्पस्तरीय संस्थेचा अविभाज्य भाग मानणं;  उपसाचं क्षेत्र अधिसूचित होणं

२.    जलसंपदा विभागाची  विहित कार्यपद्धती अंमलात न आणणा-या तसेच सुमार कामगिरी असणा-या प्रकल्पांची माहिती सिंचन स्थिति दर्शक, जललेखा  आणि Benchmarking या अहवालात उपलब्ध आहे. त्याची दखल घेऊन उचित कारवाई करावी.

३.    पाणी टेल ला गेलं पाहिजे हे उद्दिष्ट ठेऊन कालवा देखभाल-दुरुस्तीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्यासाठी, अधिका-यांनी कालव्यांची तपशीलवार पाहणी करून  पाहणी–टिपणे आणि   Systematic Plan for Regular Maintenance & Repair वर आधारित (Page -511, Integrated State Water Plan for Godavari Basin ,Vol II, Part I, June 2017)समयबद्ध योजना तयार करावी. कालव्यातील सर्व प्रकारचे अडथळे/ अतिक्रमणे /  कालव्याला इजा करणा-या सर्व बाबी उदाहरणार्थ,  कालव्याच्या भरावात खड्डे खोदून बसवलेल्या मोटारी, डेंगळे, तुंब, बेकायदेशीर  पूल,   इत्यादी काढून टाकण्यावर भर असावा.

४.    कालव्यांवरील दारांची देखभाल दुरुस्ती त्वरित व्हावी म्हणून M & R Mobile Units स्थापन करावीत.   

५.    सर्व पिकांना योग्य पाणीपट्टी आकारली गेली आणि ती काटेकोरपणे वसूल केली गेली तर जलसंपदा विभागाला देखभाल-दुरुस्ती करिता जास्त निधी उपलब्ध होऊ शकतो. २०१७-१८ साली  राज्यातील उसाचे एकूण क्षेत्र ९०२ हजार हेक्टर होते. त्यापैकी  लाभक्षेत्रातील ऊसाचे  क्षेत्र तब्बल  ८१८.१९६ हजार हेक्टर (९१%) होते. त्याच्या पाणीपट्टीची आकारणी अंदाजे रू ५२२  कोटी होणे अपेक्षित असताना  जलसंपदा विभागाने सर्व पिकांच्या एकूण सिंचित क्षेत्राकरिता केलेली पाणीपट्टीची आकारणी होती फक्त रू ९३.७२ कोटी! मागील थकबाकी (रु ६९४.५८ कोटी) विचारात घेता  प्रत्यक्ष वसूली झाली रु ७४.३० कोटी म्हणजे ९.४ टक्के फक्त!

६.    कालवा देखभाल-दुरुस्ती चांगली व्हावी, पाणी `टेल’ ला जावे, विविध पिकांचा अंतर्भाव असलेले सिंचनक्षेत्र वाढावे आणि पाणीपट्टीची वसूली वाढावी  या हेतूने जलसंपदा विभागाने  विधान सभा मतदार संघांच्या स्तरावर पुढील  पुरस्कार दरवर्षी द्यावेत - थकबाकी मुक्त मतदार संघ; सर्वात जास्त पाणीपट्टी आकारणी व वसूली करणारा मतदार संघ; जल लेखा व benchmarking अहवालानुसार सर्वोत्कृष्ट सिंचन प्रकल्पांची  संख्या सर्वात  जास्त असणारा मतदार संघ; राज्यातील सिंचना बद्दल विधान सभेत सर्वोतकृष्ट चर्चा  घडवणारा आमदार; राज्यातील सिंचना बद्दल विधान परिषदेत सर्वोतकृष्ट चर्चा  घडवणारा आमदार

जल कारभार (water governance)

महाराष्ट्रातील सिंचन विषयक कायद्यांच्या अंमलबजावणीचा (चौकट) आढावा विधिमंडळाने घ्यावा.  सिंचन कायद्यांचे नियम न करून विधिमंडळाचा व  जनतेचा अवमान करणा-यांवर कारवाई करावी. जल कायद्यांचे नियम त्वरित करण्यात यावेत.

चौकटीत दिलेल्या प्रक्रिया पूर्ण केल्या  आणि सिंचन विषयक कायद्यांची अंमलबजावणी झाली

तर खालील बाबी शक्य व्हायला मदत होईल.

(१)   अतिक्रमण, पाणी चोरी, प्रदूषण तसेच पाणीपट्टीच्या थकबाकी बद्दल कारवाई  करता येईल

(२)  पर्यायी व्यवस्था न करता शेतीचे पाणी बिगर सिंचनासाठी वळवण्या/ पळवण्यावर  बंधने येतील

(३)   सिंचन व्यवहारास कायद्याचे अधिष्ठान प्राप्त होईल.

(४) समन्यायी पाणी वाटपाच्या लढाईसाठी एक आवश्यक हत्यार मिळेल.

(५) शेतीचे पाणी बिगर सिंचनासाठी वळवण्या/ पळवण्यावर बंधने येतील

 

 

 

महाराष्ट्रातील सिंचन विषयक कायद्यांची सद्यस्थिती -एका दृष्टिक्षेपात

·       सिंचन विषयक नऊ कायद्यांपैकी आठ कायद्यांना नियम नाहीत.

·       राज्यातल्या सिंचन प्रकल्पांच्या व्यवस्थापनाची मूळ कायदेशीर चौकट महाराष्ट्र

पाटबंधारे अधिंनियम १९७६ (.पा..७६) प्रमाणे  निश्चित होणे आवश्यक

·       कायद्यांचे नियम तयार करणे आणि नदीनाले, लाभक्षेत्र व कालवा अधिका-यांच्या नियुक्त्या    या संदर्भातील अधिसूचना काढणे  हा राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या  सिंचन-व्यवहाराचा पाया

·       .पा..७६ चे नियम नाहीत म्हणून जूने नियम वापरात - जूने नियम जून्या कायद्यांवर

आधारलेले - जूने कायदे तर निरसित(रिपेल) केलेले

·       खालील प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे  कायद्याची अंमलबजावणी अशक्य

  कालवा अधिका-यांच्या नियुक्त्या करणे, त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करणे, त्यांना अधिकार

  प्रदान करणे  आणि त्यांच्या कामाचे स्वरूप व जबाबदा-या  निश्चित   करणे, सिंचन

  प्रकल्पांशी  संबंधित  नदीनाले व लाभक्षेत्रे अधिसूचित करणे     

 

 

जल-नियमन:

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (मजनिप्रा) हे भारतातले अशा प्रकारचे पहिले अर्ध - न्यायिक स्वतंत्र जल नियमन प्राधिकरण आहे. जल-व्यवस्थापन, जल-कारभार व जल-नियमन सुधारण्याच्या क्षमता असलेल्या अनेक  तरतुदी मजनिप्रा कायद्यात आहेत. प्रस्तुत लेख मालिकेत  विशद केलेली परिस्थिती बदलण्यासाठी मजनिप्रा या व्यासपीठाची स्वतंत्रता जपली पाहिजे.  मजनिप्राच्या पुनरुज्जीवन आणि सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना केली पाहिजे. मजनिप्रा ला प्रशासकीय दृष्ट्या जल संपदा विभागापासून वेगळे करणे,  त्याचा कायदेशीर दर्जा उंचावणे, मजनिप्रा कायद्यात २०११ व २०१६  साली  केलेल्या सुधारणा रद्द करणे,  राज्याच्या अंदाजपत्रकातून त्याला सरळ  व स्वतंत्र निधी देणे आणि मजनिप्रा करिता मोठ्या रकमेचा corpus निर्माण करणे इत्यादी बाबी उपाय योजनेचा एक भाग असु शकतात या व तत्सम शिफारशी पुढील संदर्भात तपशीलाने दिल्या आहेत – Revisiting MWRRA, Para 25.11, Pages 307 to 309, Integrated State Water Plan for Godavari Basin ,Vol II, Part II, June 2017)

मजनिप्रा ने विविध उद्योगांच्या प्रक्रिया-जल (प्रोसेस वॉटर) गरजा निश्चित केल्या आहेत. त्या प्रमाणे औद्योगिक पाणी वापरासाठी च्या आरक्षणात सुधारणा करावी.

बिगर सिंचन पाणी वापरकर्त्यांनी वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया केल्यावर त्या  उपचारीत पाण्यास (treated water) तीसरा स्त्रोत असा अधिकृत दर्जा द्यावा आणि  त्यांची उपलब्धता  व वापर वाढावा या करिता मार्गदर्शक तत्वे तयार करावीत.