औरंगाबाद
दि.९ मे २०१४
प्रिय संपादक,
दै. लोकसत्ता, मुंबई
महोदय,
‘माजलगावची उपेक्षा,
जायकवाडीवर झोत!’ या बातमीद्वारे (लोकसत्ता, ९ मे) एका महत्वाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल
लोकसत्ताचे अभिनंदन. माजलगाव प्रकल्प हा जायकवाडी प्रकल्पाचाच दुसरा टप्पा आहे. जायकवाडीचा
उजवा कालवा माजलगाव जलाशयातच संपतो. त्या कालव्याद्वारे माजलगाव प्रकल्पासाठी जायकवाडी
धरणातून पाणी सोडणे अभिप्रेत आहे. तेव्हा माजलगावचे पाणी हिशेबात धरून जायकवाडीकरिता
वरच्या धरणातून पाणी सोडा अशी मांडणी मराठवाड्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी करत असतील
तर ते योग्य व आवश्यकच आहे. खरे तर माजलगाव प्रकल्पातील लाभधारक (शेती, पेयजल व औद्योगिक
पाणीवापरकर्ते) व त्यांच्या नेत्यांनी ही
मागणी राजकीय स्तरावर लावून धरली पाहिजे. माजलगावच्या पाण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल
केल्या पाहिजेत. हे सर्व होत नाही ही अत्यंत
खेदाची बाब आहे. पण तरीही महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला त्याची स्वत:ची
न्यायिक जबाबदारी व व्यावसायिकता (प्रोफेशनॅलिझम) लक्षात घेता माजलगावसह जायकवाडीचा
आपणहून (सुओ मोटो) विचार करावा लागेल हे उघड आहे.
सिंचन प्रकल्पांचा
वाढता कालावधी व किंमतीबाबत सिंचन श्वेतपत्रिकेच्या दुस-या खंडात प्रकल्पनिहाय तपशील
देण्यात आला आहे. त्यात जायकवाडी (टप्पा-१) आणि त्यातून माजलगावसाठी पाणी सोडणे याचा अजिबात उल्लेख नाही ही बाब मात्र सकृतदर्शनी अनाकलनीय वाटते.
२००९ सालच्या चतुर्थ
सुधारीत प्रशासकीय मान्यतेप्रमाणे माजलगाव धरणाची उंची वाढवणे, माजलगाव उपसा योजना
पूर्ण करणे, मासोळी धरणाची उंची वाढवणे, मार्गस्थ जलाशयांची बांधकामे पूर्ण करणे, रोषणपुरी
उच्चपातळी व सिरसमार्ग निम्न पातळी बंधारे बांधणे ही कामे पूर्ण झाल्यावर सुमारे २८१
दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण होईल असे श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. हा पाणीसाठा
गृहित धरून १०१ ते १३४ किलोमीटर कालव्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असावी असे
दिसते. अन्यथा, माजलगावच्या पाणी उपलब्धतेबाबत एकोणीसशे ऎंशीच्या दशकापासून वाद आहेत.
बीड जिल्ह्यात अलिकडे
ज्या मह्त्वपूर्ण राजकीय घडामोडी झाल्या त्या घडवून आणण्यासाठी तर माजलगाव विषयक नवनवीन
प्रस्तावांना २००९साली मान्यता दिली गेली नाही ना असा प्रश्न बातमीतल्या ठेकेदारांच्या
उल्लेखामूळे पडतो. पाण्याच्या राजकारणा संदर्भात शोधपत्रकारितेस बराच वाव आहे!
माजलगाव प्रकल्पात
व्यवस्थापन यंत्रणेस कालव्याची (नवीकोरी!) कामे हस्तांतरित करण्यापूर्वीच "पुनर्स्थापनेची"
कामे केली आणि त्याकरिता अंदाजे १५३ कोटी रुपये खर्च करण्यात आले ही श्वेतपत्रिकेतील
माहिती पुरेशी बोलकी नव्हे काय? अस्तु!
-प्रदीप पुरंदरे
सेवानिवृत्त सहयोगी
प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद
Edited version published in Loksatta, 12.5.2014