Tuesday, May 13, 2014

समन्यायी पाणीवाटपासाठी ५४ कोटींचा नवा प्रस्ताव

औरंगाबाद
दि. ५ मे २०१४
प्रिय संपादक,
दै. लोकसत्ता, मुंबई

महोदय,
‘समन्यायी पाणीवाटपासाठी ५४ कोटींचा नवा प्रस्ताव - ऑस्ट्रेलियाबरोबरच्या कराराचा दुसरा टप्पा’ ही बातमी (दै. लोकसत्ता, दि.५ मे २०१४) वाचून आनंद झाला. सिंचन प्रकल्पात कार्यक्षम व समन्यायी  पाणीवाटपासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अत्यंत गरज आहे हे खरेच. ती ओळखून जल संपदा विभागाने कालोचित निर्णय घेतल्याबद्दल त्या विभागाचे मन:पूर्वक अभिनंदन. एकोणिशे नव्वदच्या दशकात कालवा स्वयंचलितीकरणाचे दोन महत्वाचे प्रयोग महाराष्ट्र देशी झाले होते. त्याची या निमित्ताने आठवण झाली.

मराठवाड्यातील माजलगाव प्रकल्पात फ्रान्स मधील गर्सर कंपनीच्या मदतीने मुख्य कालव्यावर गतिशील नियमन हा कालवा स्वयंचलितीकरणाचा अत्याधुनिक संगणकीय प्रकार  सुरू करण्यात आला होता. तसेच माजलगाव प्रकल्पातील  गंगामसला शाखा कालव्यावर संगणक न वापरता अन्य सोप्या प्रकारे कालवा स्वयंचलितीकरण करण्यात आले होते. गतिशील नियमनाचा प्रयोग वर्ष दोन वर्षे यशस्वीही झाला होता. पण ‘टाळता येण्याजोग्या’ अडचणींकडे दुर्लक्ष झाल्यामूळे तो नंतर बंद पडला. गंगामसला कालव्यावरील प्रयोग मात्र आजही यशस्वीरित्या चालू आहे. खडकवासला कालव्यावरही रिअल टाईम डाटा सिस्टिम साधारण त्याच काळात राबवण्यात आली होती. ती ही पुढे बंद पडली.माजलगाव व खडकवासला कालव्यांवरील प्रयोग अयशस्वी का झाले? ते मध्येच का सोडून देण्यात आले? गंगामसला शाखा कालव्यावरील प्रयोग यशस्वी असतानाही तो गेल्या दोन दशकात इतर प्रकल्पात का राबवला गेला नाही? फ्रान्स मधील तज्ञ आणि वाल्मी यांनी कालवा स्वयंचलितीकरण या विषयावर संयुक्तरित्या तयार केलेली हस्तपुस्तिका  प्रकाशित का गेली नाही? वाल्मीने या विषयावर वर्षानुवर्षे घेतलेल्या प्रशिक्षण वर्गांचे फलित काय? पूर नियमना संदर्भात जलाशयांच्या कार्यक्षम प्रचालनासाठी वडनेरे समितीने आधुनिक तंत्रज्ञानाबाबत केलेल्या शिफारशींचे नक्की काय झाले? ऑस्ट्रेलियाचे अंधानुकरण करून सुरू केलेल्या जललेखा व बेंचमार्किंगचा बट्ट्याबोळ का झाला? या व तत्सम प्रश्नांची खरी उत्तरे जलसंपदा विभाग कधी देईल अशी भाबडी आशा अर्थातच नाही. आरंभशुरता आणि पुढचे पाठ मागचे सपाट ही जलसंपदा विभागाची व्यवच्छेदक लक्षणे फार पूर्वीपासून आहेत. इतरत्र यशस्वी होणारे तंत्रज्ञान जलक्षेत्रात मात्र हमखास अपयशी ठरते हा आजवरचा अनुभव आहे. नवा ‘कांगारू-प्रयोग’ हा अपवाद ठरल्यास अर्थातच आनंद होईल.

-प्रदीप पुरंदरे
सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद.
 Published in Loksatta, 6.5.2014




No comments:

Post a Comment