Tuesday, June 26, 2018

जल नियमनाच्या उंबरठ्यावर - प्रदीप पुरंदरे





जलक्षेत्री शुभ वर्तमान आहे. दुष्काळ आणि जलसंघर्षांनी बेजार असलेल्या महाराष्ट्र देशी एकात्मिक राज्य जल आराखडयाची चाहूल लागली आहे. तो प्रत्यक्षात आला आणि त्याची खरेच अंमलबजावणी झाली तर  जल नियमनाबाबत बरेच काही नवीन आणि चांगले घडवण्याची ती एक सुरूवात असु शकते. बारा वर्षे उशीरा येत असलेल्या जल आराखड्याच्या आजवरच्या प्रवासाचा हा तपशील.

 भूपृष्ठावरील पाणी व भूजल यांचा एकत्रित विचार करून, सर्व प्रकारच्या पाणी वापराचे (पिण्याचे, शेतीचे व उद्योगांसाठीचे पाणी) खोरे/उपखोरे निहाय  एकात्मिक नियोजन म्हणजे एकात्मिक राज्य जल आराखडा! प्रथम गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा आणि पश्चिम वाहिनी नद्या असे एकूण पाच मसुदे तयार व्हावेत. त्या पाच मसुद्यांआधारे राज्य जल मंडळाने एकात्मिक पद्धतीने  संपुर्ण राज्यासाठी  जल आराखड्याचा एकच मसुदा तयार करावा.   राज्य जल परिषदेने त्याला मंजुरी दिल्यावर  मजनिप्राने त्या मंजुर जल आराखड्यात समाविष्ट असलेल्या प्रकल्पांना विहित प्रक्रियेद्वारे  मंजु-या द्याव्यात अशी एकूण रचना व कार्यपद्धती कायद्यास अभिप्रेत आहे. मजनिप्रा अधिनियम अंमलात आल्याच्या दिनांकापासून साधारण एका वर्षात ही प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे.   असे झाल्यास  वाट्टेल ते करून प्रकल्प खेचून आणणे आणि त्यात मनमानी बदल करणे या प्रकाराला आळा बसेल. जलक्षेत्रातील अनागोंदी व अराजक कमी होईल  असा आशावाद आहे. हेतू उदात्त आहे. पण  प्रत्यक्ष व्यवहार काय आहे?

  एकीकडे एकात्मिक राज्य जल आराखडा  तयार व्हायला अक्षम्य उशीर झाला तर दुसरीकडे मजनिप्राने जल आराखडा तयार नसताना २००७ ते २०१३ या कालावधीत १८९ प्रकल्पांना मान्यता दिली.  प्रस्तुत लेखकाने ऑक्टोबर २०१४ मध्ये एका जनहित याचिकेद्वारे या प्रकारास आक्षेप घेतला. त्या संदर्भात उच्च न्यायालयाने  आदेश दिले की, एकात्मिक राज्य जल आराखडयास जो पर्यंत राज्य जल परिषद रितसर मान्यता देत नाही तो पर्यंत राज्यात नवीन जलसंपदा प्रकल्पांना  यापुढे मंजु-या देऊ नयेत. 
       
गोदावरी मराठवाडा आणि विदर्भ पाटबंधारे महामंडळांतर्फे जल आराखडा तयार करण्याची प्रक्रिया खरे तर सन २००७ मध्येच सुरू करण्यात आली होती. पण ती पुढे सरकत नव्हती. जनहित याचिकेमुळे त्या प्रक्रियेला गती प्राप्त झाली.   पाटबंधारे महामंडळांनी  गोदावरीचा  जल आराखडा तयार केला. पण त्यावर असंख्य आक्षेप घेण्यात आले. त्यामूळे राज्य जल परिषदेच्या दु्स-या  बैठकीत दि. १९ नोव्हेंबर २०१५ रोजी जल आराखड्यात सुधारणा करण्याकरिता समिती नेमावी असे  आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.  दि. १२ एप्रिल २०१६ रोजी बक्षी समितीची नियुक्ती शासनाने केली.  प्रस्तुत लेखक त्या समितीचा एक सदस्य होता.  बक्षी समितीने गोदावरीचा एकात्मिक जल आराखडा जून २०१७ मध्ये शासनाला सादर केला. शासनाने तो ३०नोव्हेंबर २०१७ रोजी स्वीकारला आणि त्या धर्तीवर इतर नदीखो-यांनी जल आराखडे तयार करावेत असा आदेश दिला. त्या प्रमाणे तयार झालेल्या कृष्णा,तापी, नर्मदा आणि पश्चिम वाहिनी नद्यांच्या जल आराखड्यांना दि. २२ जून २०१८ रोजी जल परिषदेने मान्यता दिली आणि आता या सर्व जल आराखड्यांच्या आधारे राज्याचा एक जल आराखडा १५जुलै २०१८ पर्यंत तयार करण्याचे आदेश दिले.

 जलविकासाची सद्यस्थिती, नवीन जलसाठ्यांची निर्मिती, पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे व्यवस्थापन, सामाजिक-आर्थिक बाबी आणि  संस्थात्मक व कायदेविषयक रचना अशा ५ भागात गोदावरी  जल आराखड्याची रचना  करण्यात आली आहे.  जल आराखड्याचे मध्यवर्ती सूत्र रूढ संकल्पनांना छेद देणारे आहे. त्या अर्थाने जलक्षेत्रात या आराखड्याच्या निमित्ताने  प्रथमच काही बाबी स्पष्टपणे मांडल्या गेल्या असाव्यात. उदाहरणार्थ, जलविकास म्हणजे केवळ नवीन धरणे बांधणे नव्हे. पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे जल-व्यवस्थापन, जल-कारभार व जल-नियमन हे ही तितकेच महत्वाचे आहे. स्थानिक वैशिष्ट्यांचा आदर व पर्यावरण स्नेही विकास आवश्यक आहे,  आपल्या जलविकासाची पाटी कोरी नसल्यामूळे जलक्षेत्रात विसंगतींच्या व्यवस्थापनाला पर्याय नाही. प्रत्येक नदीउपखो-यातील जल विकासाचा टप्पा लक्षात घेऊन तेथे या पुढे नवीन जलसाठ्यांची निर्मिती व  पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे व्यवस्थापन यापैकी कशावर व किती भर द्यायचा हे निश्चित केले पाहिजे.  कायद्याचे राज्य मानणारा सर्व समावेशक, पारदर्शक, सहभागात्मक, सबलीकरण साधणारा `जबाबदारजल विकास अभिप्रेत आहे.

 गोदावरी जल आराखड्यातील ही तत्वे अन्य ४ जल आराखड्यात आहेत आणि शेवटी राज्याच्या जल आराखड्यातही ती राहतील अशी आशा आहे. हा मुद्दा आवर्जून तपासायला मात्र हवा. तसेच  जल आराखडा प्रत्यक्ष अंमलात येण्याकरिता गोदावरी जल आराखड्यात खालील पूर्व अटी नमूद केल्या आहेत हे ही आवर्जून  सांगणे आवश्यक आहे.
       १. पाटबंधारे विकास महामंडळांचे रुपांतर नदी खोरे अभिकरणांत होणे
       २. मजनिप्रा कायद्याचे नियम सत्वर केले जाणे
 ३. भूजल उपलब्धतेचे सुधारित व जास्त अचूक अंदाज बांधण्यासाठी पाणलोट क्षेत्रांचे  सीमांकन व क्षेत्र निश्चिती नव्याने करणे
४. भूपृष्ठीय जल वैज्ञानिक आकडेवारीची विश्वासार्हता वाढविण्याकरता संस्थात्मक बदल करणे

जलक्षेत्रात पुनरर्चना  व सुधारणा  करण्यासाठी   महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५  हा कायदा करण्यात आला. त्या कायद्यान्वये  जल प्राधिकरण (मजनिप्रा) अस्तित्वात आले. पण पाटबंधारे महामंडळांचे रुपांतर नदीखोरे अभिकरणात मात्र अद्याप झालेले नाही. जल संपदा विभागाने मजनिप्रा कायद्या करताना  शॉर्टकट घेतला. पाटबंधारे विकास महामंडळांचे रुपांतर नदीखोरे अभिकरणात करण्याऎवजी ती महामंडळे म्हणजेच नदीखोरे अभिकरणे अशी व्याख्या कायद्यात अत्यंत हुशारीने घालून टाकली.   प्रामुख्याने  स्थापत्य अभियंत्यांच्या नियंत्रणाखालील पाटबंधारे महामंडळे  भूपृष्ठावरील पाणी, सिंचन व जलविद्युत यांचाच  फक्त बांधकामाच्या  अंगाने विचार करतात. नदीखोरे अभिकरणात मात्र विविध विद्याशाखांचे, सर्व प्रकारच्या पाणीवापरकर्त्यांचे आणि पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी असतात. भूपृष्ठावरील पाणी आणि भूजल यांचा तसेच विविध प्रकारच्या पाणी वापरांचा बांधकाम व जल व्यवस्थापन या दोन्ही अंगाने एकात्मिक विचार ते करतात. त्यामूळे महामंडळांचे रुपांतर ख-या अर्थाने नदीखोरे अभिकरणात न झाल्यास मजनिप्रा कायद्यात सांगितलेली अभिकरणांची कर्तव्ये व्यवस्थित पार पाडली जाणार नाहीत. सिंचनविषयक बाबींची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाने तसेच सुरेशकुमार समितीने  नदीखोरे अभिकरणांची शिफारस केली आहे.

पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी, औद्योगिक वापराचे पाणी आणि शेतीचे पाणी अशा सगळ्याच पाण्याचे नियमन यापुढे म..नि.प्रा. कायद्याने होणार आहे.  पाणी-प्रश्नाबद्दल आस्था बाळगणा-या विविध क्षेत्रातील तज्ञांनी व लोकप्रतिनिधींनी जल आराखड्यांचा अभ्यास करून जलक्षेत्रात सकारात्मक हस्तक्षेप करण्याची नितांत गरज आहे. जल-पत्रकारिता आणि जल-वकिली करण्यासाठी अनुक्रमे पत्रकार व वकिलांनी आता विशेष लक्ष द्यायला हवे.

[Published in Sakal, 27 June 2018]





Sunday, June 3, 2018

सिंचनघोटाळा ते जलयुक्त शिवार





सिंचन घोटाळ्या संदर्भात कारवाई होणार आणि एक मोठा नेता अडचणीत अशा बातम्या अधुन मधुन तात्कालिक राजकीय गरजेनुसार येत असतात. भ्रष्टाचाराच्या अंगाने त्यावर थोडी फार चर्चा होते. आरोप प्रत्यारोप होतात. आणि  एक दोन दिवसात ते सगळे जिरून जाते. सिंचन घोटाळ्याचे नेमके परिणाम  काय झाले याबद्दल मात्र कोणीच काही बोलत नाही. सिंचन घोटाळ्यामूळे राज्यातील पाणी-व्यवस्थेला जीवघेणा धक्का बसला आणि  शेतीतील अरिष्ट अजून तीव्र झाले. अगोदरच तकलादू असलेली जलक्षेत्रातील  कायदेशीर चौकट उघडपणे उधळून लावणे, शेतीचे पाणी बिनदिक्कत बिगर सिंचनाकरिता  पळविणे, पाण्याचा हिशेब न देणॆ, जलविज्ञानात संदिग्धता राखणे, प्रकल्पांच्या देखभाल-दुरूस्तीकडे व व्यवस्थापनाकडे कमालीचे दुर्लक्ष होणे आणि त्यामूळे पाणी वाटपातील विषमतेत  वाढ होणे  हे सिंचन घॊटाळ्याचे परिणाम आहेत. 

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (मजनिप्रा) २००७ ते २०१३ या कालावधीत स्वत:च्या कायद्याचे उल्लंघन करून एकात्मिक राज्य जल आराखडा नसताना १८९ सिंचन प्रकल्प मंजुर केले.  उच्च न्यायालयाने ते सर्व प्रकल्प बेकायदा ठरवले एवढेच नव्हे तर जल आराखडा तयार होईपर्यंत कोणत्याही नवीन सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देऊ नये असे आदेश १३ जूलै २०१५ रोजी दिले. त्यामूळे तेव्हापासून एकही नवा प्रकल्प राज्यात घेता आलेला नाही. राज्यात वर्षानुवर्षे दुष्काळ असताना १८९ सिंचन प्रकल्प बेकायदा ठरावेत, नवीन प्रकल्प घेण्यावर बंधने यावीत आणि तरी कोणावरही त्याची जबाबदारे निश्चित केली जाऊ नये हा सिंचन घॊटाळ्याचा परिणाम आहे.

मजनिप्रा २००५ या कायद्यानुसार विविध वापरांसाठी पाणी वापर हक्क निश्चित करण्याचे अधिकार मजनिप्राला असताना जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच २०११ पर्यंत म्हणजे कायदा अंमलात आल्यावर तब्बल ६ वर्षे निर्णय घेत होती. त्या समितीने फार मोठ्या प्रमाणावर शेतीचे पाणी पळविले. सन २०११ साली मध्यरात्री मजनिप्रा कायद्यात बदल करून उच्चाधिकार समितीचे मनमानी निर्णय पूर्वानुलक्षी पद्धतीने वैध म्हणून घोषित करण्यात आले. राखणदाराने तळेच पिऊन टाकणे या प्रकाराला  सिंचन घोटाळ्यासाठी  वैधता प्राप्त करून देण्यात आली.

 राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात गेली अनेक वर्षे सिंचनाची माहिती उपलब्ध नाही असे  अधिकृतरित्या नमूद करण्यात येत आहे.  पाण्याच्या हिशेबातील विश्वासार्हता हा मुद्दा सिंचन घोटाळ्यामुळे निकाली निघाला.   आता मुळात हिशेबच दिला जात नाही.

 मुख्य अभियंता (जलविज्ञान) यांचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्याचे अधिकार कमी करून ते प्रादेशिक अभियंत्यांकडे सोपविण्यात आले. पाणी असो अथवा नसो जलविकासाचा वेग वाढला पाहिजे हे सिंचन घोटाळ्याचे एक प्रमुख सूत्र आहे. परिणाम? धरणेउदंड झाली; ती भरत नाहीत. कोरडा जलविकास!  

बांधकामातील सिंचन घोटाळ्यामूळे जलक्षेत्रातील भ्रष्टाचाराला नवे आयाम प्राप्त झाले. देखभाल-दुरूस्ती आणि सिंचन व्यवस्थापनातल्या  सनातन भ्रष्टाचार  अजूनच फोफावला.  परिणामी,  प्रवाही सिंचनावर अवलंबून असणा-या शेतक-याला जलाशयात पाणी असतानाही पाणी न मिळण्याचे प्रमाण वाढले. शेतीचे पाणी बिगर सिंचनाकडे वळविणे तर जल संपदा विभागातील अधिका-यांच्या पथ्यावरच पडले.  बिगरसिंचनाचे आरक्षण जेवढे जास्त तेवढे सिंचन व्यवस्थापनाच्या कटकटीतून सुटका असा नवीन फंडा निर्माण झाला. हा प्रकार अजून दोन तीन वर्षे चालू राहिला तर कालवे आणि वितरण व्यवस्था पार उध्वस्त होईल. लाभक्षेत्रातील "कोरडवाहूपण" वाढेल.  सिंचन प्रकल्पातील गुंतवणुक वाया जाईल. 

सिंचन घॊटाळ्याबाबतीत कारवाई म्हणजे कायद्यांची अंमलबजावणी,  पाण्याचे हिशेब, शेतीचे पाणी बिगर सिंचनाकरिता वळविण्यावर निर्बंध, जलविज्ञानात सुधारणा, प्रकल्पांचे व्यवस्थापन आणि पाण्याचे समन्यायी वाटप अशा अनेक आघाड्यांवर जाणीवपूर्वक सुधारणा घडवून आणणे ! सिंचन घोटाळा उघडकीस आणणा-यांनी त्याबाबत काय केले?

 सिंचन घोटाळ्याला वैयक्तिक भ्रष्टाचार मानून पक्षीय राजकारण केले. घोटाळ्याच्या सुत्रधारांना सोडून  काही प्याद्यांना आरोपीच्या पिंज-यात उभे केले.  सिंचन व्यवस्था तशीच राहिली. दोन हजार तीन सालच्या जलनीतीत अद्याप बदल नाही. नऊ पैकी आठ सिंचन विषयक कायद्यांना आजही नियम नाहीत. एकात्मिक राज्य जल आराखडा नामक बिरबिलाची खिचडी अजून शिजतेच आहे. सिंचन घॊटाळ्याची कर्मभूमि असलेल्या पाटबंधारे महामंडळांचे रूपांतर नदीखॊरे अभिकरणात करण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. शेतीचे पाणी पळविण्याचा प्रकार पूर्वीसारखाच सुखेनैव चालू आहे. जललेखा, बेंचमार्किंग आणि सिंचन स्थितीदर्शक अहवाल प्रकाशित न करण्याची परंपरा आवर्जून जपली जात आहे. राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात सिंचन विषयक माहिती न देण्याचा प्रकार चालूच आहे. निधी व पाणी यांची उपलब्धता न पाहता हजारो कोटीच्या सुप्रमा (सुधारित प्रशासकीय मान्यता) देण्याचे प्रमाद घडतातच आहेत. जलविज्ञानात शास्त्र व शिस्त अभावानेच आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्याऎवजी मराठवाड्याचेच पाणी अन्यत्र पळवले जात आहे. मांजरा प्रकल्पातल्या उसाबद्दल चकार शब्द न काढता लातुरला रेल्वेने पाणी पुरवठा करणे ही बाब भूषणावह  मानली जात आहे. ..... बदलले तसे  काहीच नाही. ‘मंझिल वही है, राही बदल गये’!   जलनीतीत परिवर्तन केल्याचा आभास मात्र निर्माण केला गेला.  जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ हे दोन नवीन कात्रजचे घाट आहेत. पाण्याच्या अनधिकृत फेरवाटपाला त्यामुळे गती प्राप्त झाली आहे. जलविकासाची सद्यस्थिती पाहता जल-व्यवस्थापन, जल-कारभार व जल-नियमन  या त्रिसूत्रीवर म्हणजे मागणी व्यवस्थापनावर  भर देण्याची नितांत गरज आहे.  जलयुक्त शिवार मागेल त्याला शेततळे या दोन्ही योजना मात्र परत अजून जलसाठे वाढवा या पुरवठा व्यवस्थापनाच्या  संकल्पनेतून आल्या आहेत. एकूण नदी/उपनदी खॊ-यांतील जलविज्ञानावर आणि पाणी वाटपाच्या समीकरणावर त्यांचा घातक परिणाम होतो आहे.  जलयुक्त शिवार म्हणजे साखळी बंधा-यांसह अतिरेकी नाला खोलीकरण व रूंदीकरण असे समीकरण झाले आहे. त्यातून  जलधर  उघडा पडणे  व त्यात गाळ जाऊन त्याची क्षमता कमी होणे, पाणलोट क्षेत्रातील वरच्या भागातील  सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दूर्बळ घटकांच्या विहिरींचे पाणी कमी होणे  आणि  जलविज्ञानात (हायड्रॉलॉजी) हस्तक्षेप झाल्यामूळे खालील भागातील धरणे तेवढ्या प्रमाणात कमी भरण्यामूळे उर्ध्व विरूद्ध निम्न  असा जल संघर्ष निर्माण होणे हे धोके संभवतात. शेततळ्यांबाबतची परिस्थिती तुलनेने जास्त गंभीर आहे. सध्या शेततळ्यांच्या नावाखाली  साठवण तलाव बांधले जात आहेत. त्यामूळे पाण्याचे केंद्रिकरण व खाजगीकरण होत आहे. सुजाण महाराष्ट्राने पाण्याच्या या अनधिकृत फेरवाटपाचा गांभीर्याने फेरविचार केला पाहिजे.

[Edited version published in `Utsav supplement of  `Samana on 3 June 2018]







Friday, June 1, 2018

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा - अहवालाचे निष्कर्ष


"माहे मार्च २०१८ मधील निरिक्षण विहिरीतील भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास"
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा
अहवालाचे निष्कर्ष
१.     सप्टेंबर २०१७ आणि जून ते सप्टेंबर मधील सरासरी पर्जन्यमानाचा तुलनात्मक अभ्यास

पर्जन्यमानातील घट (%)
तालुके (%)
पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता
सरासरी अथवा त्यापेक्षा जास्त पर्जन्यमान
११२ (३२)
नाही
० -२०
९७ (२७)
नाही
२०-३०
४५ (१३)
आहे
३० - ५०
८० (२३)
आहे
५० पेक्षा जास्त
१९ (५)
आहे
एकूण तालुके (%)
३५३ (१००)


२.     राज्यातील  मार्च २०१८ मधील स्थिर भूजल पातळी व मागील ५ वर्षातील मार्च महिन्यातील सरासरी भूजल पातळी यांचा तुलनात्मक अभ्यास (एकूण निरीक्षण विहिरी ३९२०)
एकूण ३५३ तालुक्यांपैकी २५२ ( ७१%) तालुक्यातील १०५२१ गावात

१ मीटर पेक्षा जास्त भूजल पातळीतील घट

भूजल पातळीतील घट
गावे
३ मीटर पेक्षा जास्त
९७६
२ ते ३ मीटर
२६४९
१ ते २ मीटर
६८९६
१ मीटर पेक्षा जास्त (एकूण गावे)
१०५२१
० ते १ मीटर
उर्वरित गावे.1
1.    पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता कमी. परिस्थिती नियंत्रणात आहे

३. पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थिती
पर्जन्यमानातील घट २०% पेक्षा जास्त आणि भूजल पातळीतील घट १मीटर पेक्षा जास्त

भूजल पातळीतील घट
तालुके
गावे *
३ मीटर पेक्षा जास्त
६१
७१७
२ ते ३ मीटर
९२
१९६३
१ ते २ मीटर
१३०
४६४२
एकूण
१३०
७३२२
* फक्त अनुमान. सदर गावे टंचाई कृती आराखड्यामध्ये समाविष्ट केली जात नाहीत.

या अहवाला बाबत खालील मुद्दे विचारात घेण्याची गरज आहे.
१.     भूजल पातळीत  १ मीटर पेक्षा जास्त घट असलेल्या तालुक्यांचे व गावांचे  विभागवार विश्लेषण केले जावे.   तसे  केल्यास खालील निष्कर्ष निघतात

१ मीटर पेक्षा जास्त भूजल पातळीतील घट - विभागवार विश्लेषण

विभाग
पर्जन्यमानातील घट

घट नाही
० ते २०
२०% पेक्षा जास्त
एकूण
तालुके
गावे
तालुके
गावे
तालुके
गावे
तालुके
गावे
उर्वरित महा.
४७
५६३
१९
३२१
२०
४३७
८६
१३२१
मराठवाडा
१९८
१७
९०७
३१
१७६०
५५
२८६५
विदर्भ
२३०
२८
९८०
  ७९
५१२५
१११
६३३५
एकूण
५८
९९१
६४
२२०८
१३०
७३२२
२५२
१०५२१

·         ‘पर्जन्यमानात घट नसतानाही  भूजल पातळीत मात्र  १ मीटर पेक्षा जास्त घट’ या प्रकारात  उर्वरित महाराष्ट्रातील तालुक्यांचे व गावांचे प्रमाण अनुक्रमे ८१% व ५७ %  आहे
·         ‘पर्जन्यमानात २०% पेक्षा जास्त घट आणि भूजल पातळीत १ मीटर पेक्षा जास्त घट’ या प्रकारात विदर्भ (विशेषत: अमरावती विभागात) व मराठवाड्यातील परिस्थिती तुलनेने जास्त गंभीर आहे.

२.     पर्जन्यमान व भूजल पातळीतील घट या दोन निकषांच्या बरोबरीने खालील निकष ही विचारात घ्यावेत
·         ‘जलयुक्त शिवार योजने अंतर्गत गाव जलयुक्त झाले आहे का?
·         ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेत गावात किती शेततळी पूर्ण झाली आहेत?
·         गावाच्या शिवारातील प्रमूख पिक कोणते?

३.     राज्यात सर्व प्रकारच्या विहिरींची संख्या किमान २१ लाख आहे असे मानले जाते. त्या तुलनेत निरीक्षण विहिरींची संख्या(३९२०) अक्षरश: नगण्य आहे. अशा नगण्य नमुन्या आधारे काढलेले   निष्कर्ष अवैज्ञानिक व अप्रातिनिधिक असण्याची शक्यता फार मोठी आहे. त्यातही परत या ३९२० विहिरी  उथळ जलधारकातील (शॅलो एक्विफर) साध्या उघड्या विहिरी (ओपन डग वेल्स) असण्याची शक्यता जास्त आहे. खोल अर्ध- बंदिस्त (डीप सेमी कन्फाईंड एक्विफर ) आणि बंदिस्त (कन्फाईंड एक्विफर) जलधरातील विंधन (बोअर वेल्स) आणि कुपनलिकांचा (ट्युब वेल्स) समावेश त्यात बहुदा नसावा असे वाटते.

४.     महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाने १९९९ साली आपल्या अहवालात निरीक्षण विहिरींच्या संख्येबाबत उहापोह केला असून त्यांची संख्या वाढविण्याची शिफारस केली आहे (खंड १, परिच्छेद २.९.५ ते २.९.८, पृष्ठ क्र १०३ ते ११०)

५.     जल-स्वराज्य २ या कार्यक्रमात राज्यातील तांत्रिक दृष्ट्या योग्य सर्व गावांमध्ये निरीक्षण विहिरी स्थापन करण्याचे तसेच औरंगाबाद व चंद्रपूर या दोन जिल्ह्यात ‘वेळ सापेक्ष भूजल पातळी संनियंत्रण (रियल टाईम ग्राऊंड वॉटर लेव्हल मॉनिटोरिंग) प्रस्तावित होते (संदर्भ: जल स्वराज्य संवाद वार्ता, अंक पहिला, नोव्हेंबर २०१५)

६.     शासनाने दुष्काळ घोषित करण्याबाबत जी नवीन कार्यपध्दती स्वीकारली आहे (शासन निर्णय़ क्रमांक :- संकिर्ण- 2017/प्र.क.173/2017/म-7 तारीख: 07 ऑक्टोबर, 2017) त्यात बदल झाले नसतील तर त्यात नमूद केलेला भूजल पातळी निर्देशांक ( ग्राऊंड वॉटर ड्राऊट इंडेक्स) आता वापरायला हवा असे सकृद्दर्शनी दिसते.