परिवर्तनाचा वाटसरु १ एप्रिल २०२३ च्या अंकात प्रसिद्ध
ऊस ”बाधा” आणि
साखर “करणी” चा `रौंदळ” आवश्यक
प्रदीप पुरंदरे
`रौंदळ’ या नवीन मराठी चित्रपटाने मला चांगलेच अस्वस्थ केले. मनात उलटसुलट विचारांचे काहूर उठले. या
चित्रपटामुळे मला पडलेले प्रश्न या परिक्षणवजा लेखात मांडले आहेत. वाचकांनी चित्रपट
पाहिला असेलच असे गृहित न धरता त्या चित्रपटाच्या आशया बद्दल प्रथम काही तपशील सांगणे
उचित होईल. या चित्रपटातील पात्रे,
त्यांनी वठवलेल्या भूमिका, कलाकारांची नावे, कथा, गाणी, पार्श्वसंगीत व दिग्दर्शन
इत्यादी तपशील चौकट-१ व २ मध्ये दिला आहे.
चौकट – १ भूमिका [पात्राचे चित्रपटातील नाव
(भूमिका) – कलाकाराचे नाव] ·
शिवा (नायक) - भाऊ शिंदे; (मित्र त्याला मेजर म्हणतात.) ·
नंदा (नायिका) - नेहा सोनावणे; ·
बिट्टूशेठ (चेअरमनचा मुलगा) - यशराज डिंबाले; ·
अण्णा (चेअरमन व बिट्टू शेठचे वडील) - शिवराज वाळवेकर; ·
गणपत मोरे (सरपंच) - विनायक पवार ·
पांडुरंग (शिवाचे आजोबा) - संजय लकडे; ·
गुलाबराव (शिवाचे वडील) - गणेश देशमुख, ·
शशीकला (शिवाची आई) - सुरेखा डिंबाले, ·
सचीन गायके (वार्ताहार) -गजानन पडोल |
चौकट – २: गाणी: ·
ढगान आभाळ दाटलया ग उरात
वादळ पेटलया ग · मन बहरलं,
बहरलं रान ग ·
झाड सावळीचं गेलं आता खेळ हा ऊन्हाशी झालं
रिकाम आभाळ बाप गेला
दूरदेशी ·
घे भलरी घे (श्रम गीत) गाण्याचे बोल / संहिता - डॉ विनायक
पवार रचना / संगीताचा साज: हर्षित
अभिराज पार्श्वसंगीत: रोहित नागभिडे, कथा व दिग्दर्शन: गजानन नाना पडोळ |
`रौंदळ’ या चित्रपटाची
सुरुवात होते ती शिवाच्या अपयशाने. त्याला जायचे असते सैन्यात पण त्यासाठीच्या
चाचणीत तो नापास होतो. सैन्यात जायची ही त्याची शेवटची संधी असते. निराश आणि हताश शिवाला त्याचे आजोबा
समजाऊन सांगतात, “घरी एवढी शेती आहे. पाण्याची सोय आहे. रानात उस उभा आहे. आणि हे सगळं सोडून तुला बाहेर कोठे
तरी नोकरी करायची आहे. अरे, कुठं हातचं सोडून पळत्याच्या मागे लागतोस,
खुळ्यावानी? देशाची सेवा करायला सैन्यातच जायला हवे आणि पराक्रम फक्त सीमेवरच दाखवता येतो
असे थोडेच आहे? शेती करून कर की काय देश सेवा करायची ती”. या पार्श्वभूमीवर पांडुरंग–आजोबांच्या `घे भलरी घे’ या
श्रम-गीताने फारच छान वातावरण निर्मिती झाली आहे.
तर
थोडक्यात, `मेजर’ शिवा शेती करायला लागतो आणि लवकरच त्याला कळून चुकते की, शेती
करणे म्हणजे `रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग!” आणि येथे शत्रू तर तुमच्या
गावातच आहे. कधी कोठून कसा हल्ला होईल काही सांगता येत नाही. कधी भेसळयुक्त खत तर कधी बोगस बियाणं .. किती
ठिकाणी गस्त घालणार? बाजारात मिरची विकायला गेलेला शिवा फार
कमी भावाने मिरची विकायला तयार होत नाही. तो मिरची चक्क घरी परत घेऊन येतो आणि बापाच्या मिरचीपेक्षाही तिखट अशा शिव्या खातो.
अशा
रीतीने ठेचा खात, धडपडत, बरा-वाईट अनुभव
घेत मेजर शिवा शेतकरी व्हायला लागतो, गावात अन शेतीत तो रमण्याचे दुसरेही एक कारण असते. `भांग सरळ निष्पाप परंतु बटा घालती भूल’ अशी शेजारची `साधी भोळी’ खट्याळ नंदा ! `मन बहरलं, बहरलं
रान ग’ असं म्हणत साद देणा-या नंदाच्या प्रेमात शिवा पडतो. `ढगान आभाळ दाटलया ग,
उरात वादळ पेटलया ग’ असं त्यांच्या प्रेमाला उधाण आलेलं असताना कथानकात अचानक धोकादायक वळण येते.
सगळीकडे
उस तोडणीची कामे जोरात सुरू झालेली असतात. साखर कारखान्याला उस घालू, या वर्षी तरी
चांगला भाव मिळेल, पैका आला की घरात अमुक करू, शेतात तमुक करू अशी स्वप्ने
वातावरणात असत्तात. पण हिंगणी गावाला मात्र एका संकटाची चाहूल लागते. उस तोंडणी कामगारांची
एकही टोळी गावाकडे फिरकत नाही. मुकादम, सरपंच अशा सर्वांची वारंवार मनधरणी केली
जाते. पण पाहू, बघू, अडचण आहे, या वर्षी टोळ्याच कमी आल्या आहेत अशा सबबी सांगितल्या जातात.
शेतात उस वाळून चालला आहे. त्याच्या वजनात घट होते आहे. हिंगणीकर घायकुतीला
आले आहेत. शेवटी, काहीतरी जुगाड करत हिंगणीकर उस तोडणी करतात. ऊसाने भरलेले ट्रॅक्टर साखर कारखान्याकडे जाऊ लागतात. तेथे
त्यांना वेगळ्याच ठिकाणी उभे करून ठेवले जाते. ऊसाच्या तोडणीतील भानगडी, काटा मारणे, टोकन प्रमाणे उस न घेणे, इत्यादी प्रकार नेहमीचे. आजवर हिंगणीकरांना
त्याचा कधी त्रास झाला नाही. पण आज तेच जात्यात आहेत. आणि बिट्टू शेठ – साखर
कारखान्याच्या चेअरमनचा उध्दट चिरंजीव – खुले आम हिंगणीकरांना सांगून टाकतो, “तुमच्या
गावात आम्हाला मतदान कमी झाले. चेअरमनसाहेब विधानसभेच्या निवडणुकीत हरले. घेत नाही
जा तुमचा उस. काय करायचे ते करा”.
शिवावर
बिट्टू शेठचा विशेष राग आहे. कारण तो नम्र नाही.
जाता येता मुजरा करत नाही. आणि
मुख्य म्हणजे प्रश्न विचारतो. आम्ही साखर कारखान्याचे
शेअर होल्डर म्हणजे मालक आहोत अशी भाषा करतो. “जाळून टाका त्याचा उस. नष्ट करा
त्याला”. `रौंदळ’ म्हणजे नष्ट
करणे!
शिवा
दुस-याच्या नावाने उस घालण्याचा प्रयत्न करतो. बिट्टू शेठ ते होऊ देत नाही. शिवाचा
उसाने भरलेला ट्रॅक्टर जाळून टाकला जातो. टिव्ही चॅनलला बातमी देणा-या वार्ताहराचा
खून होतो. प्रशासन व पोलिस बघ्याची भूमिका घेतात.
शिवाच्या आजोबांना मारहाण होते. बाप मृत्युमुखी पडतो.
झाड सावळीचं गेलं, आता खेळ हा ऊन्हाशी
झालं रिकाम आभाळ, बाप गेला दूरदेशी
अशा परिस्थितीत शिवाचा संयम संपतो. अमिताब बच्चन स्टाईलने शिवा अन्याया विरुद्ध
एकटा लढतो. साखर कारखान्याच्या चेअरमनला आणि त्याच्या उद्दाम मुलाला `चुन चुन के’
मारतो आणि सहीसलामत साखर कारखान्यांतून बाहेर पडतो.
चित्रपट
शेतक-याची उघडपणे बाजू घेतो. जुलमी सरंजामशाहीचे वास्तव मांडतो. पण व्यक्तिगत / कौटुंबिकस्तरावर
थांबतो. जन संघटना व राजकीय पक्ष, सार्वत्रिक निषेध आणि मोर्चे, इत्यादीना चित्रपटात
स्थान नाही. महाराष्ट्रातील शेतीचे गहिरे
होत जाणारे संकट, प्राप्त परिस्थितीचे
विश्लेषण, तीचे सामाजिक आर्थिक पैलू, साखर
”करणी” आणि उस ”बाधे” ने पछाडलेल्या महाराष्ट्रातील पाण्याचे राजकारण या सर्वाबाबत चित्रपट चक्क मौन बाळगतो.
एखाद्या संवादातून किंवा गाण्यातून अप्रत्यक्षरीत्या देखील काही सूचित करत नाही. चित्रपटात मिडीया
आहे;`मास’ नाही! नंदा फक्त प्रेमिकाच राहते; रणरागिणी होत नाही!! शिवा हिरो होतो;
कार्यकर्ता नाही!!! चित्रपटाचं हे असं का झालं?
महाराष्ट्र
साखर ”करणी” आणि उस ”बाधा” या
दुर्धर रोगाने ग्रस्त झालेला आहे. ऊस
हे आता केवळ पीक राहिलेले नाही. ऊस एक प्रवृत्ती
बनला आहे. साखर कारखाना हा सत्तेचा सोपान झाला आहे. “पाण्यावर कब्जा – त्यातून सत्ताप्राप्ती -
सत्तेतून परत पाणी” हे उघड दिसते आहे. तालुक्या
तालुक्यातील पाणी-चोर घराण्यांना आणि त्यांच्या कौटुंबिक राजकीय पक्षांना ऊसाबद्दल
सर्व प्रकारची शासकीय कवच कुंडले
हवी आहेत. ऊसाला एफआरपी मागणारे इतर पिकांना मात्र पाणी नाकारतात. उसाला पर्यायच
ठेवत नाहीत. आणि मग प्राप्त परिस्थितीत ऊस
घेणेच कसे व्यवहार्य आहे याचा समन्यायी पाणी वाटपाच्या समर्थकांनाही (काही सन्माननीय अपवाद वगळता)
साक्षात्कार होतो.
ऊस
घ्यायला नकार देणे हा अन्याय आहे हे खरे. पण मुळात पाणीच नाकारले गेलेल्या
जलवंचितांचे काय? बिट्टू शेठ ने ऊस घेतला नाही म्हणून संघर्ष करणा-या मेजर शिवाला जलवंचितांचे दू:ख जाणवेल का? प्रकल्प
बाधितांना सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सामावून घ्याला तो मदत करेल का? ऊस शेती
आणि साखर उद्योग यांचा पुनर्विचार करत समन्यायी पाणी वाटप चळवळीत शिवा नंदासह सामील
होईल का? या प्रश्नांची उत्तरे `रौंदळ’ मध्ये
नाहीत. पण `रौंदळ’
मध्ये आज जे काही आहे त्यामुळे आशेचा किरण दिसतो आहे. `रौंदळ’
च्या मर्यादा स्पष्ट आहेत. पण तो प्रामाणिक आहे. वर उपस्थित केलेले मुद्दे आज
एकूणच दुर्लक्षित आहेत. त्याबद्दल जन आंदोलने होताना दिसत नाहीत. मग जे नाही
त्याचे प्रतिबिंब चित्रपटात कसे पडणार? एकीकडे, `रौंदळ’ला
संशयाचा फायदा देत असताना दुसरीकडे, मी म्हणेन ऊस ”बाधा” आणि साखर “करणी”चा `रौंदळ”
आवश्यक आहे! `रौंदळ” म्हणजे नष्ट करा!
****
No comments:
Post a Comment