महाराष्ट्र वार्षिकी -२०१३ च्या
प्रकाशना निमित्त "धोरणांचा दुष्काळ नित्याचा" विषयावर युनिक अकादमी
व परिवर्तनाचा वाटसरु आयोजित परिसंवाद, लोकमान्य सभागृह, पुणे, ३० जानेवारी २०१३
___________________________________________________________________________-
लाभक्षेत्रे
समन्यायी पाणी वाटपासाठीची कुरूक्षेत्रे व्हावीत
-
प्रदीप पुरंदरे *
जायकवाडी व उजनी प्रकल्पातील
जल संकट, सिंचनाचा प्रादेशिक अनुशेष, सिंचन घोटाळा, श्वेतपत्रिका, विशेष तपास पथक आणि
या सर्वांशी जैविक संबंध असणारा दुष्काळ या पार्श्वभूमिवर आजचा परिसंवाद होतो आहे.
दुष्काळ ही एक इष्टापत्ती मानून पाणी प्रश्नाबाबत नवीन रणनीती विकसित करण्याची एक प्रक्रिया
या परिसंवादात सुरु होईल अशी मला आशा आहे.
पाणी-प्रश्नाचे स्वरूप फार मोठे
व गुंतागुंतीचे आहे. त्याकडे अनेक अंगांनी पाहता येते. पर्यावरणाचे संवर्धन, विस्थापितांचे
पुनर्वसन, मृद व जल संधारण, जल व अन्न सुरक्षा,
उपजीवीके करिता शेती विरूद्ध बाजारासाठी शेती, कोरडवाहू विरूद्ध सिंचित शेती,
स्थानिक जल स्त्रोतांचा विकास विरूद्ध बाहेरून पाणी आणणे, छोटे विरूद्ध मोठे सिंचन
प्रकल्प, नदी जोड प्रकल्प अशा अनेक अंगांनी पाणी-प्रश्नावर सुटीसुटी वा एकत्रित चर्चा
होऊ शकते. व्हावी. समग्रतेने व साकल्याने प्रश्नाचे आकलन होण्यासाठी ती आवश्यकही असते.
पण त्यातून कधी कधी छान छान आणि म्हणून ‘अजातशत्रू’
भूमिका पुढे येण्याचा धोका असतो. म्हणून परिवर्तन
घडवून आणण्याकरिता कळीचा मुद्दा हुडकणे व त्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे.
मुख्य प्रश्नावर हल्लाबोल केला आणि तो काही अंशी जरी सुटला तरी तुंबलेल्या मोरीतील
बोळा काढल्यासारखे होते. पाणी प्रवाही होते. इतर प्रश्न सुटायला मदत होते. माहोल बदलतो.
सार्वजनिक क्षेत्रातील
राज्यस्तरीय लघु, मध्यम व मोठे सिंचन प्रकल्प - म्हणजे सिंचन घोटाळ्याची विषयवस्तु
- हा तो कळीचा मुद्दा आहे. "सिंचन प्रकल्पांतून
फार तर २०% क्षेत्र ओलिताखाली येईल. बाकीच्या ८०% क्षेत्राचे काय?" ही भूमिका पूर्ण वस्तुस्थिती लक्षात घेत नाही. आपल्या सिंचन प्रकल्पांचे स्वरूप बदलून जमाना झाला आहे.
ते आता फक्त सिंचन प्रकल्प राहिलेले नाहीत. शेतीबरोबरच पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी
आणि औद्योगिक वापराचे पाणी याकरिता आपण आज त्या प्रकल्पांवर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबुन
आहोत. लोकसंख्येच्या लक्षणीय टक्कयास त्यातून पाणी मिळते आहे. हे असे व्हावे का नाही
हा मुद्दा आता गैरलागू आहे. पटो न पटो मोठे प्रकल्प ही आजची वस्तुस्थिती आहे. विकासाच्या
ज्या टप्प्यावर आपण आज आहोत त्या टप्प्यावर मोठे प्रकल्प हे "आवश्यक सैतान"(
नेसेसरी एव्हिल!) झाले आहेत. जायकवाडीचे उदाहरण
बोलके आहे. शेतीबरोबर फक्त औरंगाबाद शहरच नव्हे तर २०५ अन्य गावांचा पाणी पुरवठा, मराठवाड्यातील महत्वाच्या औद्योगिक वसाहतींचा पाणी
पुरवठा आणि परळीचे औष्णिक वीज केंद्र जायकवाडी
वर अवलंबून आहे. जे जायकवाडी बद्दल खरे आहे
तेच इतर अनेक प्रकल्पांबाबत खरे आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील
राज्यस्तरीय सिंचन प्रकल्प हा प्रस्थापित विकास नीतीचा ग्रामीण व शहरी भागांना जोडणारा
बालेकिल्ला आहे. तेथे पाणी वाटप व वापराबद्दलच्या मुद्यांना टोक येत आहे. अस्वस्थता व असंतोष आहे. विसंगती तीव्र होता आहेत. अशावेळी
पाणी प्रश्नाबाबत तेथे काही नवीन मांडणी केली तर प्रतिसाद मिळण्याची शक्यता तुलनेने
जास्त आहे. सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात जाणीव जागृती झाली, जलवंचितांचे संघटन
झाले आणि काही तपशीला आधारे प्रश्न विचारण्याची प्रक्रिया सुरू झाली तर एकूण जलक्षेत्रावर
त्याचे चांगले व दूरगामी परिणाम संभवतात. सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय सिंचन
प्रकल्प म्हणजे जलक्षेत्रातील "संघटीत क्षेत्र" आहे. तर जलक्षेत्रातील इतर
भाग म्हणजे "असंघटीत क्षेत्र". असंघटीत क्षेत्राबद्दल संवेदनशील राहूनही
संघटीत क्षेत्रातील लढा महत्वाचा मानण्यामागे जे तर्कशास्त्र आहे ते जलक्षेत्राबाबतही
खरे आहे - त्यातील दृष्य विसंगती व अदृष्य सुसंगतींसह! सर्वसामान्य पावसाच्या वर्षात
प्रकल्पा-प्रकल्पात पाणी असते. ते ज्यांना आज मिळाले आहे त्यांना त्याचा नक्कीच फायदा
होतो.. त्याच प्रकल्पातील जलवंचितांना तो फायदा समोर दिसतो. पाण्याचे महत्व त्यांना
वेगळे सांगायची गरज नाही. गोष्टी सूस्पष्ट आहेत. लक्ष्य डोळ्यासमोर आहे. आज ते आवाक्यात
नाही; पण येऊ शकते. त्यासाठी समन्यायी पाणी वाटपाचा कार्यक्रम आवश्यक आहे. राज्याची जलनीती, सिंचन विषयक
कायदे, व म.ज.नि.प्रा.सारखे व्यासपीठ यामुळे एक संदर्भ उपलब्ध आहे.खिळखिळी का होईना
चौकट तयार आहे. पाणी वापर संस्था आज कार्यरत नाहीत. यशस्वी नाहीत. त्यांच्या ताकदीची
जाणीव आज त्यांना नाही. मात्र त्यांची सुप्त शक्ती जागृत केली जाऊ शकते. सहकार क्षेत्राबाबत
असे म्हणतात की, "सहकारी चळवळ पराभूत झालेली आहे, मात्र सहकार यशस्वी झालाच पाहिजे"(Co-operation
has failed,but co-operation must succeed). हे सूत्र पाणी वापर संस्थांनाही लागू पडते.
"शेतीला पाणी व शेतमालाला भाव मिळाला पाहिजे" या मागणी आधारे लक्षणीय गुणात्मक
बदल होऊ शकतात. फेरमांडणी व नवीन जुळवाजुळव याची आज गरज आहे. सिंचन प्रकल्पांची लाभक्षेत्रे समन्यायी पाणी वाटपासाठीची कुरूक्षेत्रे
झाल्यास परिवर्तन होऊ शकते.
या दृष्टिकोनातून सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय लघु, मध्यम व मोठया सिंचन
प्रकल्पांचा - दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर
- गंभीर व प्रसंगी कठोर आढावा घेण्याची गरज आहे. तसा एक मर्यादित प्रयत्न सूत्ररूपाने येथे केला आहे. पाऊस कमी पडणे आणि जलाशयात पुरेसा जलसाठा नसणे हा
संकटाचा केवळ एक भाग आहे. सुलतानी संकट जास्त गंभीर आहे आणि ते गेल्या अनेक वर्षांपासून
तीव्र होत चालले आहे हे पुढील मुद्द्यांवरून स्पष्ट होईल.
(१) चितळे आयोगाने
केलेल्या व्याख्येनुसार पाहिले तर तथाकथित "पूर्ण" प्रकल्प हे ख-या अर्थाने
पूर्ण नाहीत. फक्त बांधकामे नव्हे तर प्रकल्पांशी संबंधित सर्व तांत्रिक-सामाजिक-आर्थिक-कायदेशीर
प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असते. त्या मूलभूत प्रक्रिया बहूसंख्य प्रकल्पात पूर्ण
झालेल्या नाहीत. म्हणून बांधकामे झाली पण प्रकल्प पूर्ण नाहीत अशी अवस्था आहे. तीस
तीस वर्षे रेंगाळलेले / रखडलेले बांधकामाधीन प्रकल्प वेळीच पूर्ण झाले असते तर जल साठयात
लक्षणीय भर पडली असती. दुष्काळाची तीव्रता कमी झाली असती.
(२) कालवा व वितरण
व्यवस्थेची कामे आणि विशेषत: शेतचा-यांची कामे
मोठया प्रमाणावर अर्धवट असताना किंबहुना, झालेलीच नसताना अमूक एवढी सिंचन क्षमता निर्माण झाली असे फक्त घोषित
करण्यात येते. प्रत्यक्षातील निर्मित सिंचन क्षमता लक्षणीयरित्या कमी असण्याची शक्यता
आहे.
(३) दैनंदिन सिंचन
व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने व कायदेशीरपणे करण्यासाठी ज्या दर्जाचे तपशीलवार आणि
अद्ययावत नकाशे आवश्यक असतात तसे नकाशे बहूसंख्य प्रकल्पात उपलब्ध नाहीत.
(४) जल संपदा विभागातर्फे दरवर्षी प्रकाशित होणा-या
सिंचन स्थितीदर्शक, जल-लेखा व बेंचमार्किंग इत्यादि अहवालातून जलक्षेत्राचे पूर्ण व
खरे चित्र उभे राहत नाही. कारण उपलब्ध व विविध
हेतूंकरिता वापरलेले पाणी, बाष्पीभवन व कालव्यातील वहनव्यय, आणि भिजलेले क्षेत्र
प्रत्यक्ष मोजले जात नाही. काही जलाशयातील गाळाच्या अतिक्रमणाचा अभ्यास झाला
असला तरी त्याची दखल घेण्यात येत नाही. पाणी चोरीचे प्रमाण भयावह असूनही त्याची अधिकृत
नोंद होत नाही.
(५) खरीप व रब्बी
पिकांऎवजी उन्हाळी व बारमाही पिकांखालचे क्षेत्र वाढल्यामूळे - त्यांना जास्त पाणी
लागत असल्यामूळे - एकूण सिंचित क्षेत्र कमी होते. राज्यातील उसाखालील एकूण क्षेत्रापैकी
सरासरी ५४% क्षेत्र सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात असल्यामूळे विषमता प्रचंड वाढली
आहे. पाण्याच्या बेसुमार व गैरवापरामूळे दुष्काळाला आपण जणू आमंत्रणच दिले आहे.
(६) लाभक्षेत्रातील
जमीनी अ-कृषि ( एन.ए.) होण्याचे आणि सिंचनाचे पाणी बिगर सिंचनाकडे वळवण्याचे (खरे तर
पळवण्याचे!) प्रकार मोठया प्रमाणावर होत असले तरी सिंचन क्षमतेचे वास्तववादी पुनर्विलोकन
केले जात नाही.
(७) महाराष्ट्र पाटबंधारे
अधिनियम, १९७६ चे नियम अद्याप केले गेलेले नाहीत. त्या कायद्यान्वये नदीनाल्यांचे व
लाभक्षेत्राचे तसेच उपसा सिंचन योजनांचे अधिसूचितीकरण सर्वत्र पूर्ण झालेले नाही. कालवा
अधिकारी म्हणून अभियंते कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत. पाणीचोरी बद्दल कोठेही रितसर
गुन्हे दाखल होत नाहीत. उपसा व बिगर सिंचना संदर्भात जे करारनामे केले पाहिजेत ते अनेक
प्रकल्पात केले गेलेले नाहीत. जेथे केले आहेत तेथे त्यांची काटेकोर अंमलबजावणी होत
नाही. ७६चा कायदा आज ख-या अर्थाने अंमलात नाही. त्यामूळे सिंचन व्यवस्थापन करण्याच्या
जल संपदा विभागाच्या कायदेशीर अधिकारासच आव्हान दिले जाऊ शकते. तसे झाल्यास, जलक्षेत्रातील अनागोंदी व यादवीस अधिकृत स्वरूप प्राप्त होईल.
(८) ७६च्या कायद्या
बाबत अशी उद्वेगजनक परिस्थिती असताना तो अंमलात आहे असे गृहित धरून जलक्षेत्राची पुनर्रचना करण्याच्या "महान"
हेतूने अजून दोन नवीन कायदे करण्यात आले आहेत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण
अधिनियम,२००५ (म.ज.नि.प्रा.) आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-यांकडून व्यवस्थापन
अधिनियम,२००५ (मसिंपशेव्य- पाणी वापर संस्थांसाठीचा कायदा) हे ते दोन कायदे. मजनिप्रा
कायद्यानुसार २००५ साली राज्य जल परिषद व राज्य जल मंडळ अस्तित्वात आले आहे. त्यांनी
म.ज.नि.प्रा. अधिनियम अंमलात आल्या पासून (जून२००५) ६ महिन्यात एकात्मिकृत राज्य जल
आराखडा तयार करणे आणि म.ज.नि.प्रा.ने त्या चौकटीत प्रकल्पांना मान्यता देणे कायद्याने
अपेक्षित आहे. आज ७ वर्षांनंतर देखील एकात्मिकृत राज्य जल आराखडा तयार नाही. राज्य
जल परिषद व राज्य जल मंडळ यांची स्थापनेपासून बैठकच झालेली नाही. अणि तरीही म.ज.नि.प्रा.
नवीन प्रकल्पांना मान्यता देत आहे. जसे जल संपदा विभागाच्या कायदेशीर अधिकारासच आव्हान
दिले जाऊ शकते तसे म.ज.नि.प्रा.बाबतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(९) कालवा देखभाल-दुरूस्तीच्या
निधीचे सुधारित मापदंड २००८ साली वाल्मीने नेमलेल्या समितीने प्रस्तावित केले होते.
पाणीपट्टीचे नवीन निकष ठरवताना म.ज.नि.प्रा.ने त्यांचा वापरसुद्धा केला आहे. पण जल
संपदा विभागाने ४ वर्षे झाली तरी अद्याप सुधारित निकष अधिकृतरित्या स्वीकारलेलेच नाहीत.
तेव्हा त्या निकषांप्रमाणे प्रत्यक्ष निधी मिळण्याचा प्रश्नच येत नाही. पुरेशा व नियमित
देखभाल-दुरूस्ती अभावी कालवे व वितरण व्यवस्थेची पार वाट लागली आहे. कालव्यांच्या प्रत्यक्ष
वहन क्षमता कमी झाल्या आहेत. वहन व्यय प्रमाणाबाहेर वाढले आहेत. प्रकल्पांची कार्यक्षमता
२०-२५ टक्क्यांवर आली आहे.
(१०) पाणी वापर संस्थांसाठीच्या नवीन कायद्यान्वये उपसा
सिंचना करिता पाणी वापर संस्था स्थापन करणे आवश्यक असताना कायदा होऊन ७ वर्षे झाली
तरी त्या संस्था स्थापन झालेल्या नाहीत. ७६च्या कायद्यान्वये देखील गेल्या ३६ वर्षात
उपसा सिंचन योजनांच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामूळे राज्यातील उपसा सिंचन
हे सिंचन-कायद्याच्या कक्षेत ख-या अर्थाने अद्याप आलेलेच नाही. प्रवाही विरूद्ध उपसा
सिंचन या प्रकल्पा प्रकल्पातील संघर्षात त्यामूळे प्रवाही सिंचनावर अवलंबून असलेले
शेतकरी व त्यांच्या पाणी वापर संस्था जलाशयात पुरेसे पाणी असलेल्या वर्षातही पाण्यापासून
वंचित राहतात. दुष्काळी वर्षात तर त्यांना कोणीच वाली राहणार नाही.
(११) पाण्याचे अंदाज
पत्रक म्हणजे प्राथमिक सिंचन कार्यक्रम (पी.आय.पी.), पाणी-पाळ्यांचे नियोजन, पाणी वाटपाचे
कार्यक्रम व वेळापत्रके, संनियंत्रण व मूल्यमापन आणि पाण्याचे हिशेब/जल-लेखा याकडे
सातत्याने अक्षरश: गुन्हेगारी स्वरूपाचे दूर्लक्ष झाले आहे. सर्वसामान्य पर्जन्यमानाच्या
वर्षात जलाशय पूर्ण भरले असतानाही लाभक्षेत्रातील ५०-६० टक्के भागाला धड पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. जल संकटाच्या
काळात त्यांचे काय होईल याची कल्पनाही करवत नाही.
(१२) अशा एकूण विदारक
स्थितीमूळे, मोजके अपवाद वगळता, बहूसंख्य पाणी वापर संस्था अयशस्वी ठरल्या आहेत.
"मोजून मापून, पाणी-वापर-हक्कांनुसार, घनमापन पद्धतीने वेळेवर पाणी पुरवठा"
हा शासकीय दावा हास्यास्पद ठरला आहे. पाणी वापर संस्थांना पाण्याऎवजी मोठ्ठे पुरस्कार
देऊन गप्प केले जात आहे. जलक्षेत्रात लोकसहभाग वाढावा म्हणून गेली २-३ दशके प्रामाणिक
व मूलभूत स्वरूपाचे काम करणा-या एका महत्वाच्या संस्थेने अलिकडेच राज्यातील पाणी वापर
संस्थांचा एक व्यापक अभ्यास केला. तो बोलका आहे. त्यातून वस्तुस्थिती पुरेशी स्पष्ट
झाली आहे. म.ज.नि.प्रा.ला तो अहवाल सादर करून पाणी वापर संस्थांची संयुक्त पाहणी करण्याचे
उघड आव्हानही देण्यात आले आहे. ते अद्याप स्वीकारले
गेलेले नाही.
सिंचन व्यवस्थापनाची राज्यात अशी एकूण दारूण अवस्था
असताना आणि त्यामूळे दुष्काळ असताना म.ज.नि.प्रा.मात्र पाण्याचा व्यापार करण्याच्या
मागे लागले आहे. "काय करणार? कायद्यात आहे ना - पाण्याचा व्यापार! आमचा नाईलाज
आहे. आम्ही कायद्याप्रमाणे जाणार" अशी म.ज.नि.प्रा.ची भूमिका दिसते. म.ज.नि.प्रा.
कायद्यात समन्यायी पाणी वाटप व सिंचनाच्या प्रादेशिक समतोलासाठीही तरतुदी आहेत! त्यांचे
काय? जायकवाडीसाठी वरच्या धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात म.ज.नि.प्रा.ने घेतलेली निव्वळ
वकिली भूमिका कायद्याच्या मूळ हेतूला चक्क काळिमा फासणारी आहे.
आज खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचा
जमाना आहे. शेतीचे कंपनीकरण होऊ घातले आहे. एफ डी आय, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, इत्यादी
गोष्टी येता आहेत. पण चेल्याचपाट्यांची (क्रोनी) भांडवलशाही एकीकडे जोरात आहे तर दुसरीकडे
सरंजामशाही अजून संपलेली नाही. जल व कृषी क्षेत्र एका संक्रमणावस्थेतून जात आहे. या सर्व पार्श्वभूमिवर सिंचन घोटाळ्याचे व त्यातून
उदभवलेल्या दुष्काळाचे सखोल व समग्र सामाजिक-
राजकीय विश्लेषण होणे गरजेचे आहे.
जलक्षेत्रातील परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सत्ताधारी वर्गाने
नवीन जलनीती आणली. त्यानुसार कायदे केले. पाणी वापर हक्कांची संकल्पना मांडली. पाणी
वापर हक्क हस्तांतरणीय व विक्रीयोग्य केले. राज्य जल मंडळ, राज्य जल परिषद, नदी खोरे
अभिकरणे आणि महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरण अशा नवीन व्यासपीठांची विधिवत स्थापना केली. एकात्मिकृत राज्य जल आराखड्याच्या
आदर्श गप्पा मारल्या. जलक्षेत्रात सुधारणा करणारे पहिले राज्य म्हणुन डांगोरा पिटला.
हे सगळे करणार असे सांगून जागतिक बॅंकेकडून निधी मिळवला. आणि एकदा निधी मिळाल्यावर
काहीही केले नाही. सुधारणा अर्धवट सोडल्या. जलनीती व सुधारित अग्रक्रम कागदावरच राहिले.
नियमांविना कायदे अंमलात आले नाहीत. राज्य जल मंडळ व राज्य जल परिषद यांची एकही बैठक
गेल्या सात वर्षात झाली नाही. नदी खोरे अभिकरण म्हणून पाटबंधारे विकास महामंडळे कार्यरत
झाली नाहीत. सहा
महिन्यांचा वायदा असताना एकात्मिकृत
राज्य जल आराखडा सात वर्षे झाली तरी अद्याप अवतरलेला नाही. जलविकास व व्यवस्थापनाची
घॊषित कायदेशीर चौकट आकारालाच आली नाही. त्याचा
फायदा सरंजामी टग्यांनी घेतला. मनमानी केली. सिंचन घोटाळा या पार्श्वभूमिवर झाला आहे.
दुष्काळाचे सुलतानी कारण हे असे आहे.
जलक्षेत्रातील अभियांत्रिकी व व्यवस्थापकीय वास्तव
एकविसाव्या शतकाला साजेसे नाही. अठराव्या शतकातील तंत्रज्ञान व मानसिकता या आधारे आपले
आजचे पाणी प्रश्न सुटणार नाहीत. सिंचन घोटाळ्यातून
व दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर जलक्षेत्रात आज कायद्याच्या राज्याची, आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापनाची
आणि सक्षम व कठोर नियमनाची गरज आहे. समन्यायाचा लढा प्रस्थापित विकास
नीतीच्या बाले किल्ल्यापर्यंत नेऊन भिडवण्याची
आवश्यकता आहे. अन्यथा, पाण्यासाठी दाही दिशा उध्वस्त फिरणा-या जलवंचितांचे भविष्य धोक्यात आहे.
या पार्श्वभूमिवर - केवळ पहिले
पाऊल म्हणून - मी एक साधा कृति कार्यक्रम सूचवेन. पाण्याबाबतचे वास्तव समजून घेण्यासाठी
व "समजावून" देण्यासाठी आपण या दुष्काळात विविध सिंचन प्रकल्पात -बालेकिल्ल्यात-
सिंचन प्रश्न शोध यात्रा काढु. कालव्या कालव्याने पायी चालू. परिस्थिती प्रत्यक्ष पाहू.
शेतक-यांशी बोलु. पाणी वापर संस्थांबरोबर संवाद साधु. When in doubt, go to people!! संभ्रमात असाल तर
लोकांकडे जा!! कोणी सांगावे? ही एक नवीन सुरूवात असेल! जनवादी हस्तक्षेप व सामुदायिक
शहाणपण कदाचित योग्य मार्ग दाखवेल.
______________________________________________________________________________
* M : 9822565232,
8983528640 Ph: 0240-2341142 Resi.: B-12, Pride Towers, Vedant
Nagar, Aurangabad 431005
E mail :
pradeeppurandare@gmail.com Web site:
www.irrigationmainsystem.com Blog:
jaagalyaa-thewhistleblower.blogspot.in
No comments:
Post a Comment