Saturday, December 8, 2012

MWIC on crop area measurement


महाराष्ट्र जल व सिंचन आयोग, १९९९
(अहवाल / खंड - १ / तात्विक विवेचन)
सिंचित क्षेत्राच्या मोजणीबाबत अहवालातील उतारे

१) परिच्छेद क्र.६.८.८ / पृष्ठ क्र.४५०

....हे काम तसे हाताळण्यास मोठे आहे. प्रकल्पनिहाय, गावनिहाय, पीकनिहाय व विखुरलेल्या सिंचित क्षेत्राची मोजणी, क्षेत्राची व्यापकता पाहता त्यात अचूकता व नियमितपणा राखण्यात उणीवा निर्माण झाल्या आहेत असे आयोगाच्या क्षेत्रीय भेटीत लक्षात आले. अपूरा व अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग हे ही एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे सिंचित क्षेत्राची मोजणी व आकारणी या बाबी वस्तुस्थितीला धरुन आहेतच असे म्हणता येत नाही.

२) परिच्छेद क्र.६.८.१३ / पृष्ठ क्र.४५१

सिंचित क्षेत्राच्या झालेल्या मोजणीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सुदूर संवेदन तंत्राचा वापर करणे देखील आवश्यक राहणार आहे. उपग्रहाद्वारे लाभक्षेत्रातील पीक पडताळणी ही एक शास्त्रीय अनुमानाची आधुनिक पद्धत आहे. ही पद्धत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये प्रायोगिक तत्वावर वापरण्यात आली असे आयोगाच्या लक्षात आणून देण्यात आले. हे काम महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने प्रादेशिक दूरसंवेदन केंद्र, नागपूर या संस्थेचे सहकार्य घेऊन केले. यावेळी असे आढळून आले की, सिंचनाच्या पाणीपट्टी वसुलीसाठी महामंडळाकडे नोंद झालेल्या क्षेत्रापेक्षा हे क्षेत्र अडीचपट जास्त आहे. या छायाचित्रांमधील माहितीवरून अचूक अनुमान काढण्यासाठी प्रत्यक्ष जमीन पडताळणी करणे आवश्यक आहे. लाभक्षेत्रातील योग्य त्या प्रमाणाचे गाववार नकाशे व जमिनीवरील प्रत्यक्ष माहितीद्वारे या क्षेत्र मोजणीमध्ये अचूकता येऊ शकते.

३) परिच्छेद क्र.६.८.१४ / पृष्ठ क्र.४५२

....ही पद्धत अचूक व स्वस्त असल्याने या पद्धतीच्या मोजणीची व्याप्ती वाढवावी व महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेस यासाठी लागणा-या सोयींची पूर्तता करावी........मह्सूल  विभागात सातबारा उता-यांचे संगणकाद्वारे संकलन चालू आहे. संगणकाच्या सहाय्याने गाववार नकाशा व मालकी ही माहिती संगणकावर संकलित करण्याचे तंत्र विकसित झालयावर आणि लहान शेतीची अचूक पीक पडताळणी क्षमता प्राप्त झाल्यावर या तंत्रज्ञानाचा उपयोग प्रभावी रीतीने करत येईल....

४) परिच्छेद क्र.६.८.१५ / पृष्ठ क्र.४५२

 सिंचनाच्या वार्षिक मोजणी अहवालाची प्रसिद्धी पाटबंधारे खात्यातर्फे केली जात नाही. तथापि सिंचनक्षेत्राच्या वार्षिक मोजणीचा अहवाल शासनस्तरावर प्रकल्पश: व उपखोरेश: संकलित करून नियमितपणे दरवर्षी प्रसिद्ध करण्याची गरज आहे........जमिनीच्या वापराचा एकंदर हिशोब ठेवण्याची अधिक चांगली व्यवस्था बसविण्याची गरज आहे.

५) परिच्छेद क्र.७.३.६ / पृष्ठ क्र.५०२

हंगामवार सिंचित केलेल्या क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी होणे विद्यमान नियमांप्रमाणे आवश्यक आहे. पण या जबाबदारीची कारवाई  बहुसंख्य ठिकाणी व्यवस्थापन कर्मचा-यांकडून होताना दिसत नाही. विशेषत: जे क्षेत्र गेल्या २-३ दशकात नव्याने सिंचनाखाली आले तेथे मोजणीची पद्धत रूढ झालेली दिसत नाही. प्रत्यक्ष क्षेत्रीय मोजणीशिवायच आकडे कळवले जात असावेत अशी शंका अनेकदा व्यक्त करण्यात येत आहे.

६) परिच्छेद क्र.९.९.७ / पृष्ठ क्र.६८१

पाणीपट्टीची आकारणी योग्यरित्या होण्याच्या दृष्टीने शेतक-यांच्या खातेवह्या ठेवणे, तसेच पिकवार सिंचन केलेल्या क्षेत्राची नोंद मोजणी पुस्तकात ठेवणे आणि सिंचनाखालील पिकांच्या हंगामवार क्षेत्रापैकी किमान सात टक्के  तपासणी शाखा अभियंत्यांनी, दोन टक्के क्षेत्राची तपासणी उप विभागीय अधिका-यांनी तर एक टक्का क्षेत्राची तपासणी कार्यकारी अभियंत्याने करणे व तसा शेरा (प्रमाणपत्र) पिक मोजणी पुस्तकात देणे अशा  शासनाने सूचना दिलेल्या आहेत. मात्र शाखा अभियंत्याशिवाय इतर एकही अधिकारी याप्रमाणे तपासणी करत असल्याचे अभिलेखावरून आढळत नाही. तसेच काही ठिकाणी शेतक-यांच्या खातेवहीमध्ये अद्यावत नोंदी केल्या जात नाहीत आणि मोजणी पुस्तकही ठेवले जात नाही असे महालेखापालाच्या वर उल्लेख केलेल्या अहवालात नमूद केलेले आहे.

७) परिच्छेद क्र.९.९.११ / पृष्ठ क्र.६८५

...पाणीपट्टी आकारणी व वसुलीसाठी स्वतंत्र कर्मचारी नसल्याने सिंचनाच्या बाबतीत सिंचित केलेले पिकनिहाय व हंगामवार क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी करुन आकारणी होत असेलच असे सांगणे कठिण आहे. हीच परिस्थिती वसूली बाबतही दृष्टीस पडते....

No comments:

Post a Comment