पाझर तलाव, गावतळे, कोल्हापुर पद्धतीचा
बंधारा, वळवणीचा बंधारा, भूमिगत बंधारा,
लघु प्रकल्प...या पैकी काही ना काही तुमच्या गावात वा गावाजवळ आहे. पण
जे आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. फक्त
जलसाठे निर्माण करून वा भूजल पातळीत वाढ होऊन जनसामन्यांना आपोपाप फायदा होत
नाही. पाणी तुमच्या गावात आहे. ते जलवंचितांच्या घरात व शेतात यायचे असेल तर फार वेगळे
कार्यक्रम घ्यावे लागतील.
तुमच्या गावात
/ गावाजवळ वरील पैकी कोणती कामे आहेत त्यांची यादी करा. मित्र-मैत्रिणींसह त्या कामांची
पहाणी करा. फोटो काढा. व्हिडिओ शुटिंग करा. whats app वर इतरांना पाठवा. एकूण परिस्थितीबाबत
ग्रामसभेत चर्चा करा. पाणी-संघर्ष समिती स्थापन करा. जमेल तेवढी कागदपत्रे, नकाशे
व आकडेवारी गोळा करा. परिस्थिती सुधारण्यासाठी तज्ञांच्या मदतीने काय करता येईल ते
ठरवा. आणि मग संबंधित अधिका-यांशी बोला. त्यांना
उपाययोजना सुचवा. पाठपुरावा करा. आमदार-खासदार निधीतून समाजमंदिरे बांधायच्या ऎवजी पाणीसाठ्यांची देखभाल-दुरूस्ती
करायचा आग्रह धरा. जिल्हा परिषद किंवा जलसंधारण विभागाची यंत्रणा कार्यरत करायला भाग
पाडा. अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींना कामाला लावा.
त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव
करून द्या.
पाण्याची व्यवस्था
कायम स्वरूपी नीट लागायची असेल तर शासकीय यंत्रणा हवी हे लक्षात घ्या. "शासन काय
काय करणार? आपणच पुढाकार
घेतला पाहिजे. चला, श्रमदान करू. निधी गोळा करु" ही मांडणी
फसवी आहे. हा उत्साह फार काळ टिकत नाही. पाण्याचे काम हे सतत चालणारे काम आहे. ते करायला
पैसा,वेळ व मनुष्यशक्ती लागते. त्याकरिता स्वतंत्र यंत्रणाच हवी.
पाणी संघर्ष समिती तर्फे गावातील तरूण-तरूणींसाठी प्रशिक्षण
वर्ग, शिबिरे व सहली
आयोजित करा. शासकीय यंत्रणेवर लक्ष ठेऊन प्रकल्पातील
पाण्याचे समन्यायी वाटप व कार्यक्षम वापर करण्यासाठी प्रकल्पस्तरावर परिणामकारक हस्तक्षेप
केला पाहिजे. त्यासाठी शासन व्यवस्थेबाहेर जल कर्मी व जल व्यवस्थापक तयार करा. पिक-नियमन व पाणी वाटपाच्या नियमांचा आग्रह धरा.
हे काम आज होत नाही. एन जी ओ पद्धतीने ते होणे नाही. ‘नाम’ वा ‘पाणी’ फाऊंडेशन यांच्या
पेक्षा जनसंघटनांचा कृती कार्यक्रम वेगळा असणे
आवश्यक आहे. अन्यथा, ’वॉटर कप’
जलवंचितांच्या ओठांपर्यंत कधी पोहोचणारच नाही. (There is many a slip between the cup and the lip)
[आंदोलन’ गणतंत्रदिन
विशेषांक]
Barobar ahe sir , vyavstha ubhi rahne garjeche ahe karan amhala pn lokani 2 varshe madat keli nantar te support karenase zale....
ReplyDelete