Monday, November 26, 2012

An appeal regarding white paper on irrigation in Maharashtra



            औरंगाबाद
२६.११.२०१२
महोदय,
           स.न.वि.वि.
बहुचर्चित सिंचन-श्वेतपत्रिका कदाचित दोन-एक आठवडयात काढली जाईल अशी सध्या चर्चा आहे. त्या श्वेत-पत्रिकेचे महत्व आपण जाणताच. महाराष्ट्रातील सिंचनाबद्दल वस्तुस्थिती मांडली गेल्यास चांगलेच होईल. पण वस्तुस्थिती खरेच मांडता येईल का? संबंधितांच्या इच्छा व हेतूंबद्दल शंका न घेताही असे वाटते की जल संपदा विभाग खरीखुरी माहिती देऊ शकणार नाही. कारणे खालील प्रमाणे:
१) महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाच्या व्याख्येनुसार एकही सिंचन प्रकल्प "पूर्ण" नसण्याची शक्यता दाट आहे.
२) बहुसंख्य सिंचन प्रकल्पांत ख-या अर्थाने सिंचन क्षमता निर्माण झाली नसताना ती झाली आहे असे घोषित करण्यात आले आहे.
३) निर्माण झालेली सिंचन क्षमता विविध कारणांमूळे प्रत्यक्षात कमी होत जाते. त्या संबंधीची आकडेवारी अद्ययावत केली जात नाही.
४) भिजलेले क्षेत्र प्रत्यक्षात मोजले जात नाही.
५)  पाणी चोरी व भ्रष्टाचार यामूळे भिजलेले सर्व क्षेत्र कागदावर येतेच असे नाही.
६) बहुसंख्य सिंचन प्रकल्पात  पाण्याचे मोजमाप करण्याची व्यवस्था उपलब्ध / कार्यरत नाही. भिजलेल्या क्षेत्राप्रमाणेच वापरलेल्या पाण्याच्या नोंदीही विश्वासार्ह नाहीत.
सिंचन प्रकल्पांशी ज्यांचा जवळून संबंध येत नाही त्यांना वर नमूद केलेल्या बाबी कदाचित धक्कादायक वाटतील. पण दूर्दैवाने त्या ख-या आहेत. त्यात अतिशयोक्ती नाही.

 फेब्रुवारी २०१२ पासून औरंगाबाद येथून प्रकाशित होणा-या "आधुनिक किसान" या साप्ताहिकात "लाभक्षेत्रे-कुरूक्षेत्रे" नावाच्या सदरात महाराष्ट्रातील एकूणच सिंचन व्यवहाराबाबत मी तपशीलवार मांडणी केली आहे. ती मांडणी व  शासनाशी वेळोवेळी केलेला पत्र व्यवहार  माझ्या  ब्लॉगवर [jaagalyaa-thewhistleblower.blogspot.in] उपलब्ध आहे.

SouthAsia Network on Dams, Rivers & People [SANDRP] या संस्थेच्या Dams, Rivers & People या नियतकालिकात मी या संदर्भात लिहिलेल्या लेखांच्या Links खाली दिल्या आहेत.
* Canal Irrigation in Maharashtra: Present Scenario
http://sandrp.in/drp/July_August_2012.pdf. ]

** Water Auditing of Irrigation Projects in Maharashtra: Myth & Reality
  http://sandrp.in/irrigation/Irrigation_Projects_Audit_Mah_Pradeep_Purandare_Nov2012.pdf
 [  http://sandrp.in/drp/Sept_Oct_2012.pdf ]

सिंचनाबद्दलची चर्चा फक्त भ्रष्टाचाराच्या अंगाने होणे योग्य नाही असे वाटते. त्या पलिकडे जाणारे अनेक गंभीर  मुद्दे आहेत. त्यावर  सखोल व समग्र चर्चा झाल्यास ती येथून पुढील वाटचालीसाठी उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो. जलक्षेत्राबाहेरील विचारवंतांनी जलक्षेत्रात हस्तक्षेप करण्याची नितांत गरज आहे. पाण्याबाबतीत अधिकारी, अभियंते व राजकीय नेतृत्वावर विसंबून राहणे धोक्याचे ठरेल. 
आपण कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
धन्यवाद.
आदराने,
आपला स्नेहांकित,

प्रदीप पुरंदरे
मो. ९८२२५६५२३२



No comments:

Post a Comment