Tuesday, December 25, 2012

सिंचन श्वेतपत्रिका



जल वास्तव
सिंचन श्वेतपत्रिका
  सिंचन क्षेत्रातील भ्रष्टाचार, निकृष्ठ दर्जाची बांधकामे, प्रकल्प पूर्ण व्हायला होणारा उशीर, मारुतीच्या शेपटा प्रमाणे वाढत जाणारा प्रकल्पांवरचा खर्च या सर्वाचा परिणाम शेवटी सिंचन व्यवस्थापनावर होतो. शेतीला पाणी न मिळणे, कमी मिळणे, उशीरा मिळणे, पाणी वाटपात अकार्यक्षमता व विषमता असणे, समृद्धीची बेटे निर्माण होणे यामागे प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष्रितरित्या कोठेतरी सिंचन घोटाळा असतो. म्हणून शेतक-यांनी तो नीट समजाऊन घेतला पाहिजे. सिंचन श्वेतपत्रिकेचा तपशील त्या करिता या लेखात दिला आहे.

मे २०१२ पासून येणार येणार म्हणून गाजत असलेली सिंचन श्वेतपत्रिका शेवटी २९ नोव्हेंबर २०१२ रोजी शासनाने प्रसिद्ध केली. मंत्रीमंडळाने ती अद्याप अधिकृतरित्या स्वीकारलेली नाही. मुख्यमंत्री म्हणतात त्यांनी ती वाचलेली नाही. कोणी म्हणते श्वेतपत्रिका जल संपदा विभागाची तर कोणी म्हणते ती फक्त राष्ट्रवादीची. शासनाचा व्यवहार पारदर्शक आहे म्हणून ती शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली असा ही दावा करण्यात येतो आहे. खरे खोटे स्वर्गातून गंगा आणणा-या त्या भगीरथालाच माहित! उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा, ७२ दिवसांचा त्यांचा राजकीय वनवास,  त्यांना मिळालेली क्लिन चिट आणि त्यांचे मंत्री मंडळात पुनरागमन या सर्वालाही श्वेतपत्रिकेचा संदर्भ आहेच. शासनाची श्वेतपत्रिका, भाजपाची काळी पत्रिका आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आता राष्ट्रवादीची सत्य(!)पत्रिका.... या सर्वात मूळ सिंचनाचे काय होणार? उत्तर     अवघड आहे.
 
सिंचन श्वेतपत्रिकेचे अधिकृत नाव आहे "राज्यातील सिंचनाची प्रगती व भविष्यातील वाटचाल". तीचे दोन खंड आहेत. पहिला खंड १२९ पृष्ठांचा. त्यात मुख्य विवेचन व मांडणी आहे. दुसरा खंड ७९४ पृष्ठांचा. प्रकल्प पूर्ण करायला उशीर का झाला व त्यांचा खर्च का वाढला याची प्रकल्प निहाय माहिती दुस-या खंडात दिली  आहे.

भ्रष्टाचाराबद्दल श्वेतपत्रिकेत चक्क मौन पाळण्यात आले आहे. भ्रष्टाचार व अनियमितता या संदर्भात चौकशी करण्यासाठी शासनाने वडनेरे, मेंढेगिरी, उपासे व कुलकर्णी या समित्या नेमल्या. त्या बहुचर्चित समित्यांबद्दल श्वेत पत्रिकेत काहीही नाही. जणू सिंचन घोटाळा झालाच नाही! पण श्वेतपत्रिकेतील सबबी, खुलासे व अप्रत्यक्ष  कबुल्या पाहिल्या तर सिंचन घोटाळ्याचे "अद्दष्य"अस्तित्व सारखे जाणवत राहते. प्रकरण क्र.७ मध्ये "विभागाने गेल्या काही वर्षात घेतलेले महत्वाचे निर्णय व सुधारणा" यांचा तपशील दिला आहे. चौकट क्र.१ मध्ये वानगीदाखल काही निर्णय व सुधारणा दिल्या आहेत. घॊटाळा झालाच नसेल आणि सगळे आलबेल असेल तर मग "ते" निर्णय का घ्यावे लागले? "त्या" सुधारणा का कराव्या लागल्या?
_
____________________________________
चौकट क्र.१: सगळेच आलबेल! तर मग हे निर्णय का?
१) भूसंपादनाची रक्कम प्राधान्याने अदा करणे
२) प्रकल्पाचे काम निश्चित किंमतीत व कालावधीत पूर्ण करणे
३) क्षेत्रिय अधिका-यांनी सर्व कामांना नियमित भेटी देणे
४) कामाच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी देण्यास सक्षम असलेल्या अभियंत्यांनी संबंधित्त कामाच्या संकल्पन व रेखाचित्रास मान्यता देणे
५) महासंचालक, मेरी,नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती स्थापन करणे
६) सर्व  यांत्रिकी स्वरूपाची कामे यांत्रिकी संघटनेकडून करुन घेणे
७) सर्व नवीन प्रकल्पांचे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव म.ज.नि.प्रा. कडे आढावा व मान्यतेसाठी सादर करणे
८) प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण, अन्वेषण व संकल्प चित्र तयार झाल्यावरच त्याआधारे प्रशासकीय मान्यतेसाठी प्रकल्पाचे सविस्तर अंदाज पत्रक तयार करणे
९) जमिन ताब्यात मिळाल्याशिवाय संबंधित कामाची निविदा प्रक्रिया सुरू न करणे
१०) दर पृथ:करणास संबंधित महामंडळाच्या कार्यकारी संचालकांची मंजुरी घेणे
११) मोबीलायझेशन व मशिनरी डव्हान्स न देणे
१२) उपसा सिंचन योजनेअंतर्गत यांत्रिकी व विद्युत कामाची अंदाजपत्रके संबंधित यंत्रणेनेच करणे
१३) निविदा स्वीकृत करताना अंदाजपत्रक अद्ययावत करण्याची कार्यपद्धतीत सुधारणा करणे
१४) निविदा शर्त क्र.३८ च्या वापरावर निर्बंध लागू करणे
___________________________________________

तथ्यावर आधारित आरोप झाले असतील तर आरोपीची पंचाईत होते. ते स्वीकारताही येत नाहीत. नाकारणेही अशक्य होते. अशावेळी मग इतरेजनांशी तुलना करून आरोपांचे गांभीर्य कमी करण्याचे प्रयत्न केले जातात. श्वेत पत्रिकेत नेमके हेच केले गेले आहे. जल संपदा विभागाच्या दर सूची मधील दर महाराष्ट्रातील इतर विभागांच्या व अन्य काही राज्यांच्या तुलनेत कमी आहेत असा दावा करणे किंवा इतर राज्यात आपल्यापेक्षा जास्त मोठया उपसा सिंचन योजना हाती घेतल्या आहेत म्हणून आपल्या योजना शक्यकोटीतील आहेत असे सूचित करणे या प्रकारास अन्यथा काय म्हणायचे? फक्त आमच्याच का मागे लागता असे म्हणून लक्ष दूसरीकडे वळविण्याचाही हा प्रयत्न आहे.

पाटबंधारे प्रकल्प अहवाल तयार करणे व अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धत प्रकरण क्र.३ मध्ये अति तपशीलाने देण्यात आली आहे. प्रसार माध्यमे, कार्यकर्ते व टीकाकार यांना ती प्रथमपासूनच चांगली माहित आहे. किंबहुना, त्यांना ती जास्त चांगली माहित आहे म्हणून तर घोटाळे उघड झाले. प्रश्न कार्यपद्धती प्रामाणिकपणे काटेकोररित्या अंमलात आणायचा होता व आहे. त्याबद्दल जल संपदा विभाग केवळ बचावात्मक भूमिकेत गेला असे नव्हे तर सर्व मांडणी अपराधी भावनेतून केल्याचे स्पष्ट जाणवते. नेहेमीचे अभियांत्रिकी व प्रशासकीय औद्धत्य श्वेतपत्रिकेत अभावानेच दिसते. हा नम्रपणा खोट्या विनयातून आला नसेल अशी आशा आहे. तसे खरेच असल्यास जलक्षेत्राकरिता तो शुभशकुन आहे.

दुस-या खंडात प्रकल्प निहाय तपशील दिला आहे. त्याच्या अचूकतेबद्दल / विश्वासार्हतेबद्दल गंभीर आक्षेप घ्यायला लगेच सुरुवात झाली आहे. माहितीच्या अधिकारात तो तपशील खरेच आक्षेपार्ह ठरल्यास जल संपदा विभागाचा खोटेपणा अजूनच जास्त उघडा पडणार आहे. २५% च्या आत खर्च असेल तर तो प्रकल्प सध्या स्थगित करावा ही शिफारस होण्याची शक्यता लक्षात घेऊन काही चलाख अधिकारी व हुषार पुढा-यांनी आपल्या प्रकल्पाचा खर्च २५% पेक्षा थोडा जास्त दाखविण्याची युक्ती केली आहे असे अनेक जाणकार सांगतात. ते तपासून पाहणे उचित होईल.

जल संपदा विभागाच्या संघटनात्मक रचनेचा तपशील प्रकरण क्र.२ मध्ये दिला आहे. त्यावरून असे दिसते की ही संघटना ‘टॉप-हेवी’ आहे. तीन कॅबिनेट मंत्री, ३ राज्य मंत्री, २ सचिव, ५ कार्यकारी संचालक, २ महासंचालक, २१ मुख्य अभियंते आणि ६७ अधीक्षक अभियंते असा एकूण थाट या विभागाचा आहे. या विभागाचे काही अधिकारी अन्य विभागातही आहेत. उदा. जल संधारण, एम.एम.आर.डी.ए. इत्यादी. पण ती आकडेवारी श्वेतपत्रिकेत नाही. कार्यकारी अभियंता व इतर अभियंते आणि अन्य प्रवर्गातील कर्मचारी याबद्दलही माहिती देण्यात आलेली नाही. सर्व आस्थापनेवरचा एकूण वार्षिक खर्च आणि त्या तुलनेत प्रत्यक्ष कामावरचा खर्च असा तपशील खरेतर यायला हवा होता. तो का टाळण्यात आला हे समजत नाही. सरळ सेवा प्रविष्ठ (वर्ग १) अधिका-यांकडे सर्व अधिकार केंद्रित झाले आहेत पण काही सन्माननीय अपवाद वगळता त्यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव नाही आणि इतर अभियंत्यांकडे अनुभव आहे तर त्यांना काही अधिकारच नाहीत असे विश्लेषण अनेक निरीक्षक करतात. त्यांचे असेही म्हणणे आहे की मंत्री, ठेकेदार असलेले आमदार आणि सरळ सेवा प्रविष्ठ अधिका-यांपैकी मंत्री व ठेकेदारांचे नातेवाईक हे सर्व घोटाळ्यास जबाबदार आहेत. प्रस्तावित विशेष तपास पथकाने (एस.आय.टी.) या अंगानेही अभ्यास करावा अशी मागणी आता होत आहे.

सिंचन व्यवस्थापनाबाबत श्वेत पत्रिकेत केलेले दावे वस्तुस्थितीला धरून नाहीत. वापरलेले पाणी व भिजलेले क्षेत्र दोन्हीही प्रत्यक्ष न मोजता दिलेली आकडेवारी विश्वासार्ह नाही. त्या आकडेवारीला कोणताही शास्त्रीय आधार नाही. सिंचित क्षेत्रात वाढ झाली का घट झाली हे नेमकेपणाने सांगणे अवघड आहे. पाणीपट्टीतून देखभाल-दुरुस्तीचा खर्च भागवला जातो हे विधान दिशाभूल करणारे आहे. देखभाल-दुरूस्ती करिता गरजेप्रमाणे / मापदंडानुसार निधीच उपलब्ध करून दिला नाही तर खर्च कमीच दिसणार. सिंचन प्रकल्पांची एकूण प्रकल्पीय कार्यक्षमता २०-२५% च आहे हे लक्षात घेतले तर परिस्थितीची विदारकता जाणवेल. जलनीती, पाणी वापराचे अग्रक्रम, नवीन कायदे आणि म.ज.नि.प्रा. याबाबत लाभक्षेत्रे-कुरूक्षेत्रे या सदरात या पूर्वी तपशीलाने मांडणी झाली आहे. त्याबद्दल द्विरूक्ती न करता एवढेच म्हणता येईल की आत्मवंचना किती करायची याला मर्यादा हवी. शेवटी सर्वांना सर्वकाळ फसवता येत नाही.

आर्थिक बाबींचा तपशील हे चौथे प्रकरण फक्त दोन पृष्ठांचे आहे. निविदा, भू संपादन, पुनर्वसन इत्यादी संदर्भातील प्रलंबित दायित्वा बाबत त्यात माहिती दिली आहे. त्यात खरेतर चौकट क.२ मध्ये उल्लेखिलेलेली माहिती यायला हवी होती. तसे झाले असते तर आर्थिक बाबींवर पुरेसा प्रकाश पडला असता.
____________________________
चौकट क्र.२: निधी व खर्चाचा तपशील का नाही?
१) राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक , केंद्र शासनाकडून प्राप्त निधी, जागतिक बॅंकेचे कर्ज, महामंडळांनी काढलेले कर्जरोखे अशा सर्व स्त्रोतातून जल संपदा विभागास मिळालेला निधी
२) क्र.१ नुसार प्राप्त निधी प्रत्यक्ष खर्च कसा झाला याचा तपशील
३) सिंचन क्षमता निर्मितीचे आर्थिक निकष (रू.प्रति हेक्टर , रू.प्रति द.ल.घ.मी.) आणि प्रत्यक्ष खर्च
४) वरील बाबींचा महामंडळ निहाय तपशील
__________________________________

सिंचन प्रकल्पांचा वाढता कालावधी व वाढत्या किंमतीबाबतची कारणमिमांसा प्रकरण क्र.६ मध्ये करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने पुढील कारणांचा समावेश करण्यात आला आहे- वैधानिक मान्यता, भूसंपादन, पुनर्वसन, पुरेसा निधी उपलब्ध न होणे,सविस्तर संकल्पचित्र होण्यास लागणारा कालावधी, प्रकल्पाच्या व्याप्तीतील बदल, दर सूचीतील वाढ,जमिनीच्या किंमतीतील वाढ,गौण खनिजांच्या स्वामित्व शुल्कातील वाढ, आस्थापना खर्चातील वाढ, इत्यादी. महालेखापालांच्या म्हणण्यानुसार आवश्यक त्या परवानग्या न घेता आणि जमीन ताब्यात नसताना प्रकल्पाचे काम सुरू करणेच मुळी बेकायदा आहे. कारणे अनेक सांगितली गेली असली तरी मूळ कारण जल संपदा विभागात सुशासन नसणे हे आहे हे आता स्पष्ट सांगायला हवे.

पाटबंधारे प्रकल्पांच्या नियोजनाची पुढील दिशा प्रकरण क्र.९ मध्ये मांडण्यात आली आहे. त्यात नवीन काही नाही. महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाने १९९९ साली अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्या संबंधी काही शिफारशी केल्या होत्या. राज्य नियोजन मंडळाने २००७ साली सल्ला दिला होता. दोन्ही कडे शासनाने दूर्लक्ष केले. मजनिप्रा ही ख-या अर्थाने कार्यरत होऊ शकले नाही. उसा सारख्या पिकांना ठिबक बंधनकारक करावे हे मजनिप्रा कायद्यात २००५ सालापसून आहे. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. महामंडळांचे आर्थिक अधिकार कमी करावेत एवढीच एक सूचना स्वागतार्ह आहे. आणि ती श्वेतपत्रिकेत करावी लागली ही वस्तुस्थिती खूप बोलकी आहे. सूज्ञांस सांगणे नलगे!

श्वेत पत्रिके मुळे एक झाले. सिंचनाबद्दल चर्चा व्हायला लागली. अरेबियन नाईटस सारख्या  सुरस कथा महाराष्ट् देशीही घडतात हे लक्षात आले. काळाचा महिमा अगाध असतो हेच खरे. महाराष्ट्र आता "ठेकेदारांच्या देशा"म्हणून ओळखला जाऊ लागला!

 [Published in Weekly "Aadhunik Kisan", Aurangabad,20.12.2012] 


श्वेतपत्रिकेबद्दल : थोडे वेगळे , थोडे मूलभूत



श्वेतपत्रिकेबद्दल : थोडे वेगळे , थोडे मूलभूत

काय निर्णय घेणार आहोत आपण इथं?
ही जीवघेणी घालमेल,
हा आयुष्यातील अंधातरी लटकता एकाकी क्षण.
रणांगणातून पळ काढून ह्या निसर्गाच्या
वेगवेगळ्या गतीत फिरणा-या अगणित चक्रांच्या चकव्यामध्ये
काय सत्य गवसणार आहे आपल्याला?

सिंचन श्वेतपत्रिकेवर लेख देतो असे मटा ला कबुल तर केले आणि प्रश्न पडला काय लिहायचे? सर्व सामान्य वाचकाला काय सांगायचे श्वेतपत्रिकेबद्दल? एकीकडे मनात लेखाची जुळणी चालली होती आणि दुसरीकडे फेसबुकवर टाईम पास करत होतो. नक्की काही गवसत नव्हते. आणि एवढ्यात दिनानाथ मनोहरांची वर दिलेली नवी पोस्ट फेस बुकवर झळकली आणि लेखाला एक दिशा मिळाली. अगणित चक्रे. प्रत्येकाची गती वेगळी. त्यातून निर्माण झालेला चकवा. सत्याचे हरवणे.... गवसणे...आणि सत्य खरेच कोणाला हवे आहे का?.....

जल संपदा विभागाने मूळ सिंचन श्वेतपत्रिका काढली. त्याला उत्तर म्हणून भाजपाने ‘काळी पत्रिका’ प्रसिद्ध केली. लगेच राजकीय प्रत्युत्तर देण्याकरिता राष्ट्रवादीने ‘सत्य पत्रिका’ प्रकाशित केली. ती अजुन प्रकाशित होते ना होते तो भाजपाने त्या ‘सत्यावर घाव’ घातला. दरम्यान, विदर्भाची बाजू मांडण्याकरिता किंमतकरांनी "पिवळी" पत्रिका पुढे आणली. आणि एवढे कमी होते म्हणून की काय शासनाच्याच कृषी विभागाने परत एकदा ज्या आकडेवारी वरून मूळ वाद पेटला त्या आकडेवारीचे समर्थन करण्याकरिता एक टिपणी (हरित पत्रिका असे तीचे नामकरण पत्रकारांनी केले) पूर्व प्रसिद्धीची पुरेपुर काळजी घेत मुख्यमंत्र्यांकडे पाठवली. विरोधकांनी विशेष तपास पथकाची (एस.आय.टी.)मागणी लावून धरली आहे. हिवाळी अधिवेशनाचा एक आठवडा सभागृहातील गोंधळाने वाया गेला आहे. आता न्यायालयीन चौकशीची चर्चा जोरात आहे. कोण खरे? कोण खोटे? पुढे काय होणार?

श्वेत, काळी, पिवळी, हिरवी अशा अनेक पत्रिका पाहिल्या की जाणवते ज्याचे त्याचे सत्य वेगळे आहे. कदाचित सत्य असे काही नसतेच. असतात ती फक्त आकलने. आपापल्या हितसंबंधां प्रमाणे लावलेले सोयीस्कर अर्थ. शासकीय विभाग व अधिकारी, राजकीय पक्ष व नेते, ठेकेदार व कार्यकर्ते आणि अर्थातच तज्ज्ञ यांनी आपापली बाजू मांडली आहे. अगणित चक्रे. प्रत्येकाची गती व हेतू वेगळे. या चकव्यातून सर्वसामान्य नागरिकाला काय मिळाले? मिळणार? अमूक एका व्यक्ती भोवती चर्चा फिरवत ठेऊन पाण्याचा प्रश्न सुटणार तरी कसा? अडचणीत जलवंचित आले आहेत, पुढारी व अधिकारी नाही. दिलासा जलवंचितांना हवा आहे, पुढारी व अधिका-यांना तो मिळणारच आहे. मग पाण्याविना तहानलेले मागास विभाग व एकूणच जलवंचित यांचे हितसंबंध काय आहेत? त्यांच्या तर्फे कोण उभे राहणार? सावधान! पुढे भोवरा आहे. एवढे तरी सांगायला हवे-रंगी बेरंगी पत्रिकांच्या निमित्ताने. या लेखात तो प्रयत्न केला आहे. लबाड, फसव्या व धूर्त अशा आकडेवारीत न अडकता.

महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा आणि शेतीला पाणी मिळावे हा मूळ हेतू. उदात्त व प्रामाणिक. त्या करिता सिंचन प्रकल्प उभारणे आवश्यक. मोठी शासकीय गुंतवणुक महत्वाची. पण काळाच्या ओघात हेतू बदलले. सत्ताधारी वर्गांनी पाण्यात राजकारण आणले. सिंचन प्रकल्प म्हणजे ए.टी.एम.असे मानले जाऊ लागले. राजकारणासाठी, पक्षासाठी पैसा हवा. कार्यकर्ते संभाळले पाहिजेत. मग सुरू करा सिंचन प्रकल्प. पैसा, जास्त पैसा, अमाप पैसा हा मुख्य हेतू बनला. तो साधता साधता जमले तर सिंचन. ते ही फक्त "आपल्या" लोकांसाठी. मूळ हेतूच दुय्यम झाला. अनागॊंदी, अराजक व यादवी यांचा जलक्षेत्रात महापूर आला. सिंचन श्वेतपत्रिकेत त्याचे प्रतिबिंब पडले आहे.

पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नाही. प्रकल्पस्थळी पाणी खरेच उपलब्ध होईल का याची खात्री नाही. पण विकास खेचून आणायचा आहे. ठेकेदार जगले पाहिजेत. बांधा प्रकल्प. काढा टेंडर. करा खरेदी. पाण्याचे बघु नंतर.

वीज उपलब्धता प्रमाण पत्र नाही. लाभधारकांना उपसा सिंचनाचे दर परवडतील का माहित नाही. आज पर्यंतच्या मोठ्या शासकीय उपसा योजना अयशस्वी ठरल्या म्हणून काय झाले? अपयश हीच यशाची पहिली पायरी असते! उचल पाणी. उठाव टेंडर. २००-३०० मीटर च्या वर उपसा असेल तरच बोलायचे. नाही तर फुटा. विकास कसा दमदार पाहिजे.

पाणी व मूळ योजना प. महाराष्ट्रात. त्यातून पाणी देणार मराठवाड्याला. मूळ योजनेची कामेच सुरू नाहीत. तरी मराठवाड्यात मात्र कामे सुरू. पाण्याचे काय घेऊन बसलात? पाणी मिळो न मिळो अनुशेष दूर करणार म्हणजे करणार. मग त्याला तुम्ही भौतिक अनुशेष म्हणा, आर्थिक म्हणा नाहीतर कोरडा अनुशेष म्हणा.

अशा तर्काने सध्या जल विकास व व्यवस्थापन महाराष्ट्रात चालू आहे. अनेक उदाहरणे देता येतील. वर नमूद केलेल्या रंगी बेरंगी पत्रिकांमध्ये ती दिलेली ही आहेत. हे तर्कशास्त्र एकदा स्वीकारले की मग पुरेशी आर्थिक तरतुद नसताना अनेक प्रकल्प सुरू करणे, ते प्रकल्प रेंगाळणे, अर्धवट राहणे (ठेवणे), प्रकल्पांचा खर्च अवाच्या सवा वाढणे या ‘वेडा’ मागची पद्धत लक्षात येते. हे सगळे अपघाताने घडलेले नाही. तर व्यवस्थेने ते जाणीवपूर्वक घडवले आहे. सखोल व समग्र सामाजिक-राजकीय विश्लॆषण कोणी विश्वासार्ह अभ्यासकाने केल्यास जल विकासाचे वर्गीय, जातीय व विभागीय राजकारण स्पष्ट होईल. खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाच्या पोटात असलेल्या विसंगती लक्षात येतील. चेल्याचपाट्यांची (क्रोनी) भांडवलशाही आणि सरंजामशाहीचे सह अस्तित्व जाणवेल. अन्यथा, श्वेतपत्रिकेतल्या सबबी ख-य़ा वाटु लागतील. तांत्रिक स्पष्टीकरणे व खुलासे अंतहीन असतात. राज्यकर्त्यानी ठरवले तर ते या अडचणी केव्हाही दूर करू शकतात. अणु-उर्जा विषयक करार, एफ.डी.आय., लवासा, मजनिप्रा कायद्यात बदल हे निर्णय कसे होतात? त्यावेळी यंत्रणा कशी कार्यक्षम बनते?

पाण्याचे राजकारण सत्ताधारी वर्ग हुषारीने करतो. भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून लक्ष हटविण्यासाठी २५% पेक्षा कमी काम झालेले प्रकल्प स्थगित करणार अशी आवई उठवून दिली गेली. मागास भागातले लोक त्याला बरोबर फसले. प्रकल्प व्यवहार्य आहेत का, पाणी उपलब्ध आहे का हा तपशील न पाहता आमचे प्रकल्प रद्द करू नका म्हणून मागण्या करू लागले. ठेकेदार-आमदारांना तेच हवे आहे. मागास भागांनी आता वेगळ्या प्रकारे हे सर्व प्रकरण हाताळले पाहिजे. नाहीतर सिंचन घोटाळ्यातून काहीच धडा घेतला नाही असे होईल.

काही प्रकल्प झाले. पाणी अडले. पण त्याचे वाटप  विषम झाले. वापर अकार्यक्षम झाला. समृद्धीची बेटे निर्माण झाली. विषमता व भ्रष्टाचार लपवता लपवता सिंचित क्षेत्राची आकडेवारी चुकली. विभागांतर्गत ही विषमता वाढली. पण त्याबद्दल बोलणे हे त्या विभागाच्या अस्मिते विरूद्ध आहे असे समजले जाऊ लागले. विभागांतर्गत समन्याय नसेल तर विभागा विभागांमधील समन्यायचा लढा कमकुवत होतो. कारण विभागीय मागण्यां मागे जन सामान्य नसतात. हे नीट समजावून घेऊन मागास भागांनी व जलवंचितांनी आपली रणनीती आखली पाहिजे. अन्यथा, तथाकथित स्थिरीकरण योजना अस्थिरीकरणास कारणीभूत ठरतील. श्वेत पत्रिकेने तसे संकेत दिले आहेत. नव्या पिढीने तरी आता नवा विचार धाडसाने केला पाहिजे.

-प्रदीप पुरंदरे

[Published in Maharashtra Times, Aurangabad 17.12.2012]




Saturday, December 8, 2012

MWIC on crop area measurement


महाराष्ट्र जल व सिंचन आयोग, १९९९
(अहवाल / खंड - १ / तात्विक विवेचन)
सिंचित क्षेत्राच्या मोजणीबाबत अहवालातील उतारे

१) परिच्छेद क्र.६.८.८ / पृष्ठ क्र.४५०

....हे काम तसे हाताळण्यास मोठे आहे. प्रकल्पनिहाय, गावनिहाय, पीकनिहाय व विखुरलेल्या सिंचित क्षेत्राची मोजणी, क्षेत्राची व्यापकता पाहता त्यात अचूकता व नियमितपणा राखण्यात उणीवा निर्माण झाल्या आहेत असे आयोगाच्या क्षेत्रीय भेटीत लक्षात आले. अपूरा व अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग हे ही एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे सिंचित क्षेत्राची मोजणी व आकारणी या बाबी वस्तुस्थितीला धरुन आहेतच असे म्हणता येत नाही.

२) परिच्छेद क्र.६.८.१३ / पृष्ठ क्र.४५१

सिंचित क्षेत्राच्या झालेल्या मोजणीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सुदूर संवेदन तंत्राचा वापर करणे देखील आवश्यक राहणार आहे. उपग्रहाद्वारे लाभक्षेत्रातील पीक पडताळणी ही एक शास्त्रीय अनुमानाची आधुनिक पद्धत आहे. ही पद्धत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये प्रायोगिक तत्वावर वापरण्यात आली असे आयोगाच्या लक्षात आणून देण्यात आले. हे काम महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने प्रादेशिक दूरसंवेदन केंद्र, नागपूर या संस्थेचे सहकार्य घेऊन केले. यावेळी असे आढळून आले की, सिंचनाच्या पाणीपट्टी वसुलीसाठी महामंडळाकडे नोंद झालेल्या क्षेत्रापेक्षा हे क्षेत्र अडीचपट जास्त आहे. या छायाचित्रांमधील माहितीवरून अचूक अनुमान काढण्यासाठी प्रत्यक्ष जमीन पडताळणी करणे आवश्यक आहे. लाभक्षेत्रातील योग्य त्या प्रमाणाचे गाववार नकाशे व जमिनीवरील प्रत्यक्ष माहितीद्वारे या क्षेत्र मोजणीमध्ये अचूकता येऊ शकते.

३) परिच्छेद क्र.६.८.१४ / पृष्ठ क्र.४५२

....ही पद्धत अचूक व स्वस्त असल्याने या पद्धतीच्या मोजणीची व्याप्ती वाढवावी व महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेस यासाठी लागणा-या सोयींची पूर्तता करावी........मह्सूल  विभागात सातबारा उता-यांचे संगणकाद्वारे संकलन चालू आहे. संगणकाच्या सहाय्याने गाववार नकाशा व मालकी ही माहिती संगणकावर संकलित करण्याचे तंत्र विकसित झालयावर आणि लहान शेतीची अचूक पीक पडताळणी क्षमता प्राप्त झाल्यावर या तंत्रज्ञानाचा उपयोग प्रभावी रीतीने करत येईल....

४) परिच्छेद क्र.६.८.१५ / पृष्ठ क्र.४५२

 सिंचनाच्या वार्षिक मोजणी अहवालाची प्रसिद्धी पाटबंधारे खात्यातर्फे केली जात नाही. तथापि सिंचनक्षेत्राच्या वार्षिक मोजणीचा अहवाल शासनस्तरावर प्रकल्पश: व उपखोरेश: संकलित करून नियमितपणे दरवर्षी प्रसिद्ध करण्याची गरज आहे........जमिनीच्या वापराचा एकंदर हिशोब ठेवण्याची अधिक चांगली व्यवस्था बसविण्याची गरज आहे.

५) परिच्छेद क्र.७.३.६ / पृष्ठ क्र.५०२

हंगामवार सिंचित केलेल्या क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी होणे विद्यमान नियमांप्रमाणे आवश्यक आहे. पण या जबाबदारीची कारवाई  बहुसंख्य ठिकाणी व्यवस्थापन कर्मचा-यांकडून होताना दिसत नाही. विशेषत: जे क्षेत्र गेल्या २-३ दशकात नव्याने सिंचनाखाली आले तेथे मोजणीची पद्धत रूढ झालेली दिसत नाही. प्रत्यक्ष क्षेत्रीय मोजणीशिवायच आकडे कळवले जात असावेत अशी शंका अनेकदा व्यक्त करण्यात येत आहे.

६) परिच्छेद क्र.९.९.७ / पृष्ठ क्र.६८१

पाणीपट्टीची आकारणी योग्यरित्या होण्याच्या दृष्टीने शेतक-यांच्या खातेवह्या ठेवणे, तसेच पिकवार सिंचन केलेल्या क्षेत्राची नोंद मोजणी पुस्तकात ठेवणे आणि सिंचनाखालील पिकांच्या हंगामवार क्षेत्रापैकी किमान सात टक्के  तपासणी शाखा अभियंत्यांनी, दोन टक्के क्षेत्राची तपासणी उप विभागीय अधिका-यांनी तर एक टक्का क्षेत्राची तपासणी कार्यकारी अभियंत्याने करणे व तसा शेरा (प्रमाणपत्र) पिक मोजणी पुस्तकात देणे अशा  शासनाने सूचना दिलेल्या आहेत. मात्र शाखा अभियंत्याशिवाय इतर एकही अधिकारी याप्रमाणे तपासणी करत असल्याचे अभिलेखावरून आढळत नाही. तसेच काही ठिकाणी शेतक-यांच्या खातेवहीमध्ये अद्यावत नोंदी केल्या जात नाहीत आणि मोजणी पुस्तकही ठेवले जात नाही असे महालेखापालाच्या वर उल्लेख केलेल्या अहवालात नमूद केलेले आहे.

७) परिच्छेद क्र.९.९.११ / पृष्ठ क्र.६८५

...पाणीपट्टी आकारणी व वसुलीसाठी स्वतंत्र कर्मचारी नसल्याने सिंचनाच्या बाबतीत सिंचित केलेले पिकनिहाय व हंगामवार क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी करुन आकारणी होत असेलच असे सांगणे कठिण आहे. हीच परिस्थिती वसूली बाबतही दृष्टीस पडते....

Lies! Damn lies!!And (Irrigation) Statistics!!!


Lies! Damn lies!!And (Irrigation) Statistics!!!
खोटे! धादांत खोटे!! आणि (सिंचन) संख्याशास्त्र!!!

जल संपदा विभागातर्फे जललेखा, बेंचमार्किंग व सिंचन स्थितीदर्शक अहवाल प्रकाशित करण्यात येतात.
त्या अहवालांआधारे आता सिंचन श्वेतपत्रिकेत प्रत्यक्ष सिंचित क्षेत्राची आकडेवारी देण्यात आली आहे.
राज्यातील सिंचित क्षेत्राची आकडेवारी एकूणच प्रथम पासून प्रत्यक्ष मोजणीवर आधारित नाही
या दूर्दैवी, धक्कादायक व खेदजनक परिस्थितीकडे सुजाण, सजग व सुसंकृत महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यात येत आहे.

प्रत्यक्ष मोजणी होत नसल्यामुळे सिंचित क्षेत्रात नेमकी किती वाढ वा घट झाली
याबाबत कोणतेही शास्त्रीय विधान करणे अवघड आहे.

महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाने १९९९ सालीच आपल्या अहवालात
सिंचित क्षेत्राच्या प्रत्यक्ष मोजणीबाबत सत्यकथन केले आहे.
सोबत त्या अहवालातील संबंधित उतारे उधृत केले आहेत.
ते स्वयंस्पष्ट व पुरेसे बोलके आहेत.
त्या बद्दल जल संपदा विभागाने गेल्या बारा वर्षात काय केले?
अशा प्रश्नाचे ‘कमबॅक’ होऊ शकते!

सिंचन श्वेतपत्रिकेत खोटी माहिती देणे या प्रकारास
दिशाभूल करणे असे म्हणता येईल का?
त्याने विधान मंडळाचा अवमान होईल का?
दुष्काळी व मागास भागातील जलवंचितांना त्यातून काय मिळेल?
आणि मूळ सिंचन प्रश्नाचे काय होणार?
या व अशा प्रश्नांचा महाराष्ट्राच्या विधान मंडळाने गांभीर्याने विचार करावा ही नम्र विनंती.
,,

विधान मंडळाच्या सन्माननीय सदस्यांच्या सत्य- व न्याय-प्रियतेवर माझा विश्वास आहे.
त्यांना आदरपूर्वक शुभेच्छा!

- प्रदीप पुरंदरे
   (९ डिसेंबर २०१२)

सोबत: वरील प्रमाणे

Monday, November 26, 2012

An appeal regarding white paper on irrigation in Maharashtra



            औरंगाबाद
२६.११.२०१२
महोदय,
           स.न.वि.वि.
बहुचर्चित सिंचन-श्वेतपत्रिका कदाचित दोन-एक आठवडयात काढली जाईल अशी सध्या चर्चा आहे. त्या श्वेत-पत्रिकेचे महत्व आपण जाणताच. महाराष्ट्रातील सिंचनाबद्दल वस्तुस्थिती मांडली गेल्यास चांगलेच होईल. पण वस्तुस्थिती खरेच मांडता येईल का? संबंधितांच्या इच्छा व हेतूंबद्दल शंका न घेताही असे वाटते की जल संपदा विभाग खरीखुरी माहिती देऊ शकणार नाही. कारणे खालील प्रमाणे:
१) महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाच्या व्याख्येनुसार एकही सिंचन प्रकल्प "पूर्ण" नसण्याची शक्यता दाट आहे.
२) बहुसंख्य सिंचन प्रकल्पांत ख-या अर्थाने सिंचन क्षमता निर्माण झाली नसताना ती झाली आहे असे घोषित करण्यात आले आहे.
३) निर्माण झालेली सिंचन क्षमता विविध कारणांमूळे प्रत्यक्षात कमी होत जाते. त्या संबंधीची आकडेवारी अद्ययावत केली जात नाही.
४) भिजलेले क्षेत्र प्रत्यक्षात मोजले जात नाही.
५)  पाणी चोरी व भ्रष्टाचार यामूळे भिजलेले सर्व क्षेत्र कागदावर येतेच असे नाही.
६) बहुसंख्य सिंचन प्रकल्पात  पाण्याचे मोजमाप करण्याची व्यवस्था उपलब्ध / कार्यरत नाही. भिजलेल्या क्षेत्राप्रमाणेच वापरलेल्या पाण्याच्या नोंदीही विश्वासार्ह नाहीत.
सिंचन प्रकल्पांशी ज्यांचा जवळून संबंध येत नाही त्यांना वर नमूद केलेल्या बाबी कदाचित धक्कादायक वाटतील. पण दूर्दैवाने त्या ख-या आहेत. त्यात अतिशयोक्ती नाही.

 फेब्रुवारी २०१२ पासून औरंगाबाद येथून प्रकाशित होणा-या "आधुनिक किसान" या साप्ताहिकात "लाभक्षेत्रे-कुरूक्षेत्रे" नावाच्या सदरात महाराष्ट्रातील एकूणच सिंचन व्यवहाराबाबत मी तपशीलवार मांडणी केली आहे. ती मांडणी व  शासनाशी वेळोवेळी केलेला पत्र व्यवहार  माझ्या  ब्लॉगवर [jaagalyaa-thewhistleblower.blogspot.in] उपलब्ध आहे.

SouthAsia Network on Dams, Rivers & People [SANDRP] या संस्थेच्या Dams, Rivers & People या नियतकालिकात मी या संदर्भात लिहिलेल्या लेखांच्या Links खाली दिल्या आहेत.
* Canal Irrigation in Maharashtra: Present Scenario
http://sandrp.in/drp/July_August_2012.pdf. ]

** Water Auditing of Irrigation Projects in Maharashtra: Myth & Reality
  http://sandrp.in/irrigation/Irrigation_Projects_Audit_Mah_Pradeep_Purandare_Nov2012.pdf
 [  http://sandrp.in/drp/Sept_Oct_2012.pdf ]

सिंचनाबद्दलची चर्चा फक्त भ्रष्टाचाराच्या अंगाने होणे योग्य नाही असे वाटते. त्या पलिकडे जाणारे अनेक गंभीर  मुद्दे आहेत. त्यावर  सखोल व समग्र चर्चा झाल्यास ती येथून पुढील वाटचालीसाठी उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो. जलक्षेत्राबाहेरील विचारवंतांनी जलक्षेत्रात हस्तक्षेप करण्याची नितांत गरज आहे. पाण्याबाबतीत अधिकारी, अभियंते व राजकीय नेतृत्वावर विसंबून राहणे धोक्याचे ठरेल. 
आपण कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
धन्यवाद.
आदराने,
आपला स्नेहांकित,

प्रदीप पुरंदरे
मो. ९८२२५६५२३२



Wednesday, November 14, 2012

जल विकास व व्यवस्थापनाची शोकांतिका


जल विकास व्यवस्थापनाची शोकांतिका
जायकवाडी आज जात्यात आहे. इतर अनेक प्रकल्प सुपात आहेत. यापूर्वीच भरडून निघालेले असंख्य लघु कैक मध्यम सिंचन प्रकल्प तर कोणाच्या खिजगणीतही नाहीत. जायकवाडीच्या नशीबी पाणी नाही निदान चर्चा तरी आली. इतरांच्या बाबतीत तेही झाले नाही. चक्क आळीमिळी गुप्प चिळी! असे का झाले? असे का होते? जल विकास व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत त्याची कटु उत्तरे दडली आहेत. पारदर्शकता, लोकसहभाग जबाबदेही यांचा अभाव; सर्वसमावेशकतेला जाणीवपूर्वक नकार आणि पराकोटीचे अभियांत्रिकी औद्धत्य ही त्या कटु उत्तरांची अपूर्ण यादी. काहीही करू पण विकास खेचून आणू या आतताई वृत्तीमूळे आणि व्यवहारवादाच्या अतिरेकामूळे जलक्षेत्रात आता श्चातापाची वेळ आली आहे. प्रकल्प रेटून नेण्यासाठी तथाकथित विकास पुरूषांनी केलेले पराक्रम स्वीकारलेल्या तडजोडी आता अंगलट येता आहेत. येन केन प्रकारेण सतत पाणी उपलब्धता वाढवा या "सप्लाय साईड मॅनेजमेंटचा" दूराग्रह आणि उपलब्ध पाण्याच्या समन्यायी वाटप कार्यक्षम वापराकडे म्हणजेच "डिमांड साईड मॅनेजमेंटकडे" मात्र गुन्हेगारी स्वरूपाचे दूर्लक्ष ही आपल्या जल विकास व्यवस्थापनाची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. त्याचे परिणाम आपण भोगतो आहोत. विकास खेचून आणणे या प्रकारास एकदा कौतुकाचे स्वरूप प्राप्त झाले की मग नैसर्गिक मर्यादा काय आहेत, खोरेनिहाय नियोजन लक्षात घेता प्रकल्पस्थळी खरेच किती पाणी प्रत्यक्ष उपलब्ध होईल, धरणाची जागा कालव्यांच्या संरेखा (अलाईनमेंट) अभियांत्रिकी निकषानुसार योग्य आहेत ना, प्रस्तावित पीक रचना स्थानिक हवामान मातीच्या प्रकारास सुसंगत आहे का, गुंतवणुक लाभ यांचा काटेकोर विचार केला आहे ना, ज्या भागातून कालवे वितरिका जाणार आहेत त्या भागातील मातीचा विशिष्ट प्रकार लक्षात घेता तेथे बांधकाम करताना नेमकी काय काळजी घ्यावी लागेल, निर्माण होणा-या प्रकल्पाच्या प्रचालनाचे देखभाल-दुरूस्तीचे नक्की काय होणार आहे, वगैरे वगैरे मूलभुत प्रश्न मग चेष्टेचा विषय बनतात. चर्चासत्रे कार्यशाळांपुरते ते मर्यादित राहतात. नव्हे, मुद्दाम ठेवले जातात. परिणाम? अपंग आजारी प्रकल्पांची निर्मिती! जी अज्ञानापोटी आपल्याला अभिमानास्पद वाटते. अस्मितेचा ती एक विनाकरण भाग बनुन जाते. मूठभरांच्या करिता ती लॉटरी ठरते. तर बहुसंख्यांकरिता ती शोकांतिका असते. या परिप्रेक्ष्यात जायकवाडीचा विचार करणे योग्य होईल. कारण जायकवाडीच्या सद्य:स्थितीला ही एकूण पार्श्वभूमि जबाबदार आहे.

जायकवाडी प्रकल्प त्याचे लाभक्षेत्र निम्न गोदावरी खो-यात तर कॅचमेंट एरिया मात्र उर्ध्व गोदावरी     खो-यात आहे. "प्रकल्प खेचून आणणा-या" उर्ध्व भागातल्या "विकास पुरूषांनी" आपल्या भागात परवानगीपेक्षा जास्त क्षमतेची धरणे बांधली. ११५ टिएमसी पाणी अडविण्याची परवानगी असताना १९६ टिएमसी पाणी अडवण्याचा पराक्रम केला. त्यामूळे वरच्या भागात जास्त पाणी अडणार हे नाकारता येत नाही. वरची साठवण क्षमता आता कमी होणे नाही. वास्तव स्वीकारण्यावाचून पर्याय नाही. मराठवाडयातील राजकीय इच्छाशक्तीच्या सनातन अनुशेषाचा हा अपरिहार्य अटळ परिणाम आहे.

राज्यातील अनेक सिंचन प्रकल्पांच्या मूळ जल नियोजनातच गंभीर चूका झाल्या आहेत. जायकवाडीही त्यांस अपवाद नाही. बिगर-सिंचन (पिण्याचे, घरगुती वापराचे औद्योगिक वापराचे पाणी), जलाशय मुख्य कालव्यावरील उपसा सिंचन आणि उपयुक्त जल साठयातील गाळाचे अतिक्रमण यासाठी मूळ जल नियोजनात वट्टात तरतुद करणे महागात पडले आहे. बिगर सिंचन उपसा या तालेवार वाटेक-यांना आता अनुक्रमे १५४ १८० ...मी. पाणी द्यावे लागते. तर गाळामूळे उपयुक्त जलसाठा आत्ताच १२७ ...मी.ने कमी झाला आहे. जायकवाडीत कमी पाणी येण्यामूळे जलाशयातील गाळ वाहून जाणे थांबले आहे तर बिगर-सिंचन उपसा सिंचन यातील अधिकृत/अनधिकृ्त वाढीवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. पाण्याची अशी गंभीर बोंबाबोंब असताना आता दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉर मेगा सिटीचे भूत जायकवाडीच्या मानगुटीवर बसवण्याचे धोकादायक उद्योग केले जात आहेतदिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉर मेगा सिटी झाल्या नंतर या वर्षासारखे जलसंकट आले तरतारतम्य चक्क सोडले म्हणायचे, जल क्षेत्रातील  साहसवादाचा हा नवा अविष्कार मानायचा का एका नवीन जल अपराधाची सुरूवात?

जल विज्ञान प्रकल्प, नाशिक, जल संपदा विभाग यांच्या तर्फे जायकवाडी संदर्भात नुकताच एक अहवाल तयार करण्यात आला आहे. त्या अहवालानुसार ३३ वर्षांपैकी १६ वर्षात जायकवाडी प्रकल्पात १३ ते ८३० ...मी.पाणी वर्ष अखेरीस वापरता (अनयुटिलाईज्ड) शिल्लक राहिले. निष्कर्ष? बिगर सिंचना मूळे जायकवाडीच्या सिंचनावर परिणाम झालेला नाही! पाणी जर खरेच अनयुटिलाईज्ड राहत असेल तर त्यातून अनेक अर्थ निघतात. पैकी एक धोकादायक अर्थ असाही काढला जाईल की जायकवाडीत आलेले पाणी पूर्ण वापरले जाणार नसेल तर जायकवाडीच्या वर अजून जास्त पाणी वापरले तरी चालेल! वापरत नाहीत-पाणीच कमी द्या!! उपरोक्त अहवाल जायकवाडीच्या सन्माननीय अधिका-यांच्या संमतीने तयार करण्यात आला आहे असे त्या अहवालात आवर्जून नमूद केले आहे हे विशेष! स्वत:च्या पायावर धोंडा पाडुन घेणारा अहवाल इतक्या सहजरित्या केवळ मराठवाडयातच स्वीकारला जाऊ शकतो!! [त्या अहवालाबद्दल जाहीर खुलासा गंभीर चर्चा होणे आवश्यक आहे]

बिगर सिंचन, उपसा सिंचन, उपयुक्त साठयातील गाळ आणि वर्ष अखेर शिल्लक राहणारे पाणी याचा एकत्रित विचार करुन त्यातून मार्ग काढण्यासाठी अधिका-यांनी कॅरि ओव्हरचे ३८२ ...मी. पाणीही वापरून टाकायला सुरूवात केली. त्याचा परिणाम असा झाला की खरीपात पावसाने दगा दिला तर एक दोन रोटेशनसाठी (वा अन्यथा) वापरता आला असता असा निभावणीचा साठा ही राहिला नाही. संकट जास्त गहिरे झाले. लवकर अंगावर आले.  

जायकवाडी वरून बिगर सिंचन उपसा सिंचनाकरिता जे पाणी दिले जाते ते सगळे  फक्त मराठवाडयातच वापरले जाते का? जायकवाडीसाठी म्हणून खास जे पाणी परवा सोडण्यात आले त्यापैकी किती पाणी परत वरच वापरले गेले? पण हे प्रश्न संतांच्या भूमित विचारले जात नाहीत.आणि वरची मंडळी अति धूर्त! पाणी दिले म्हणता म्हणता काढूनही घेतले. स्वार्थ परमार्थ दोन्ही साधले. [जललेखा बेंचमार्किंग या अहवालात "जायकवाडीच्या पाण्याचा" हिशेब नक्की कसा लावला ठेवला गेला आहे हे पाहणे उदबोधक ठरावे]

ठीक आहे. काळाच्या ओघात पूर्वी जे झाले ते झाले. आता पाणी वापरात तरी किमान समन्याय आणता येईल का? वरच्या धरणातून पुरेसे पाणी सोडायला भाग पाडता येईल का? खालच्या धरणात पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना वरच्या धरणातून होणा-या इतर पाणी वापरावर बंधने आणता येतील का? सिंचन आयोगाच्या शिफारशी, जलनीती महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (..नि.प्रा.) अधिनियम,२००५ यांच्या आधारे बरेच काही गेल्या सात वर्षात करता आले असते. पण त्याकडेही मराठवाडयातील धुरीणांनी दूर्लक्ष केले. उदाहरणे खाली नमूद केली आहेत.

) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ (गोमपाविम) हे कायद्यान्वये नदी-खोरे अभिकरण आहे. गोमपाविमने २००५ सालापासून आपल्या कार्यक्षेत्रात पाणी वापर हक्कांचे रितसर कायदेशीर वितरण करणे अपेक्षित होते आहे. तसे झाले असते तर मराठवाडयाचा सर्व सामान्य तसेच तुटीच्या वर्षातला पाणी वापर हक्क निश्चित झाला असता.त्या प्रमाणे मग शासनाला आपणहून पाणी सोडावे लागले असते अथवा पाणी सोडावयाला शासनाला कायद्याने बाध्य करता आले असते. पण गोमपाविम नदी-खोरे अभिकरण म्हणून कार्यरत नसल्यामूळे सगळेच मुसळ केरात गेले आहे. अमुक इतके टिएमसी पाणी सोडा या मागणीला आज कायद्यानुसार काहीही अर्थ नाही. न्यायालयात त्या मागण्या टिकणा-या नाहीत.

) ..नि.प्रा.कायद्यानुसार शासनाने प्राथमिक सिंचन कार्यक्रमा संदर्भातील (पीआयपी) शासन निर्णयात परिपत्रकात बदल केलेला नाही. त्यामूळे खोरेनिहाय जल व्यवस्थापनाची कार्यपद्धती/नियमावली अस्तित्वात नाही. उर्ध्व गोदावरी खो-यातील अधिका-यांनी प्रकल्प निहाय प्रचलित कार्यपद्धती वापरली आहे. त्या बाबत फारतर नैतिक प्रश्न उपस्थित करता येतील. कायदेशीर नाही.

) खोरेनिहाय जल व्यवस्थापन करायचे असेल तर पाणी वापर हक्क ठरविण्यासाठी कायद्यानुसार मान्यता प्राप्त एकात्मिक राज्य जलसंपत्ती आराखडा हवा. तो अद्याप तयार नाही. मग पाणी वापर हक्क देणार कशाच्या आधारावर? एकात्मिक राज्य जलसंपत्ती आराखडा तयार करण्याचे काम महाराष्ट्रात फक्त गोमपाविम मध्येच चालु आहे.(असे का?महित नाही!) ते सहा वर्षापूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते.ते अद्याप झालेले नाही. प्रस्तुत प्रकरणी मराठवाडयाला उपयोगी पडेल असे त्यात काय असेल याबद्दल अंदाज बांधणे अवघड आहे.

) प्रस्तुत प्रकरणी खरेतर ..नि.प्रा.कडे प्रथम याचिका दाखल करायला हवी होती. कारण वरच्या धरणातून पाणी सोडायची कायदेशीर जबाबदारी ..नि.प्रा.ची आहे. न्यायालय आता कदाचित अशी भूमिका घेईल की प्रथम ..नि.प्रा.कडे जा. त्यांनी न्याय दिला नाही तर आमच्याकडे या. आणि वर नमूद केलेल्या निराशाजनक परिस्थितीत न्यायालय फार तर असे म्हणेल की कायद्यानुसार प्रक्रिया पार पाडा. अमुक एवढे पाणी अमुक तारखेच्या आत सोडा असा निवाडा होणे अवघड वाटते.

वरील विवेचनातून जाणवणारी जल विकास व्यवस्थापनाची शोकांतिका सार्वत्रिक आहे. नदी-खो-यातील विशिष्ठ स्थानामूळे, ऎतिहासिक चूकांमूळे आणि या वर्षीच्या दुष्काळामूळे जायकवाडीत ती जास्त अंगावर येते एवढेच.
-प्रदीप पुरंदरे
[Published in Loksatta-Deepostav 2012-Marathwada vrutanat,14.11.2012]