प्रदीप पुरंदरे
९८२२५६५२३२, ८९८३५२८६४०,
०२४०-२३४११४२
pradeeppurandare@gmail.com
jaagalyaa-thewhistleblower.blogspot.in
www.irrigationmainsystem.com
_____________________________________________________________________
औरंगाबाद
दि. ३० सप्टेंबर २०१२
प्रति,
१) कालवा निरीक्षक, मोजणीदार,
दफ्तर कारकून, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
२) शाखा/उपविभाग/विभाग/मंडळ/प्रदेश/महामंडळ/विविध
संस्था/मंत्रालय अशा सर्व स्तरांवरील
अभियंते
जल संपदा विभाग, महाराष्ट्र शासन
विषय: सिंचन व्यवस्थापन
संदर्भ: श्री.विजय पांढरे, मुख्य अभियंता,
मेरी, नाशिक यांचे सिंचन घोटाळ्याविषयीचे पत्र
आणि
त्याचे परिणाम
प्रिय मित्रांनो,
स.न.वि.वि.
बरेच दिवस झाले. आपली भेट नाही.
तसे काहीजण अधुन मधुन फेसबुकवर भेटतात. क्वचित ई-मेल पाठवतात. ब्लॉग वाचून कधी दूरध्वनी
करतात. पण पूर्वीसारख्या गप्पा होत नाहीत. सर्व खबरबात कळत नाही. म्हणून आज पत्र लिहितो
आहे. मुद्दाम व सविस्तर.
दि. ३१ डिसेंबर २०११ रोजी मी वाल्मीतून
स्वेच्छा-सेवानिवृत्ती घेतली. बादलीत बसून बादली उचलता येत नाही याचा साक्षात्कार झाला
एकदाचा. म्हणून घेतला झालं निर्णय. अजून पाच वर्षे सेवा बाकी होती. लौकिक दृष्टया तसा यशस्वी होतो. बरं चाललं होतं.
पण बरं वाटत नव्हतं. जलक्षेत्रात कायद्याचं राज्य असावं व वाल्मीची पुनर्रचना व्हावी
असं काही तरी वाटायचं. सिंचन प्रकल्पांच्या व्यवस्थापनामूळे अस्वस्थ व्हायचं. शेतक-यांशी
बोलताना अपराधी वाटायचं. प्रशिक्षण वर्गात शिकवताना जाणवायचं की, आपण शिकवतो एक
आहोत आणि तिकडे सगळं "भलतंच" चाललय. व्याख्यानानंतर तुम्हीही नेहेमी म्हणायचात,
"सर, तुम्ही सांगता आहात ते बरोबर आहे. पण
व्यवहार असा नाही. आम्हाला प्रशिक्षण देऊन काहीही उपयोग नाही. आमच्या हातात आहे काय?
आम्ही हुकुमाचे ताबेदार. बस म्हटलं-बसा! उठ म्हटलं-उठा!!"
वाल्मी असो वा जल संपदा विभाग
- घालमेल, कोंडी,
मुस्कटदाबी - दोन्ही कडे होती. आहे. आपण तसे एकाच नावेत होतो. म्हणून
तर आपलं चांगलं जमायचं.
माझी परिस्थिती तुलनेनं बरी होती.
कौटुंबिक जबाबदा-या संपत आल्या होत्या. "विकासाला मर्यादा हवी" हे पटत होतं.
गोष्टी जुळून आल्या. व्यवहार जमला. तब्येतीनं साथ दिली. घेतली सेवानिवृत्ती. निरोप
समारंभात विद्या दोनच वाक्यं बोलली - "कायम बंदरात उभं राहण्यासाठी गलबताची निर्मिती
केलेली नसते. गलबतानं खोल समुद्रात जाणे अपेक्षित आहे."
आता ९ महिने झाले. मुक्त अभ्यासक
म्हणून काम करतोय. वाल्मी सुटली. आता वालेम - म्हणजे वाचन, लेखन, मनन! खोल समुद्रात जायची पूर्व तयारी!!
कोशातून बाहेर पडलो की गोष्टी वेगळ्या
दिसायला लागतात. एक दार बंद झालं की अनेक दारं उघडतात. नवी क्षितिजे साद घालतात. वेगळे
लोक भेटतात. त्यांची दु:खं, व्यथा, विवंचना बघितल्या की आपण स्वर्गात
आहोत हे लक्षात येतं. समोरच्याला पायच नाहीत हे पाहिलं की भारीपैकी बूट घ्यावेत या
इच्छेची लाज वाटते...तसं काही तरी.
सिंचन व्यवस्थापनाबद्दल खरं बोलायचा
प्रयत्न करतो आहे. वस्तुस्थिती सांगतोय - जी मला तुमच्याकडून कळाली. अगदी खरं सांगतो.
वाल्मीत प्रशिक्षणाला तुम्ही यायचात पण प्रशिक्षण मात्र माझं व्हायचं. विविध स्तरावरचे
अधिकारी व कर्मचारी. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले. प्रत्येकाचा अनुभव वेगळा.
तुम्ही भरभरून बोलायचात. मन मोकळं करायचात. खाचाखोचा समजावून द्यायचात. मला खरंच खूप
शिकायला मिळालं. सिंचन व्यवस्थापन समजायला लागले ते तुमच्यामूळे. मी तुमचा आभारी आहे.
शासनाच्या दहा-एक राज्यस्तरीय समित्यांवर काम करायची संधी मिळाली. भरपूर अभ्यास
व काम केलं. परिस्थितीचे मापन/आकलन जास्त चांगलं झालं. धोरण, नीती, कायदे.....सर्व किती अर्थहिन असतं हे पटलं. शब्द बापुडे केवळ वारा....
ज्यांना आपण मोठे समजत होतो ते
किती खुजे आहेत हे लक्षात आले. प्रशासकीय अधिकार भले कितीही मोठा असला तरी ज्ञानाचा
व नैतिकतेचा अधिकार नसेल तर काहीही चांगलं होत नाही हे जाणवलं.
आणि इकडे पांढरे माऊलींनी अचानक
दणका दिला. एकच खळबळ उडाली. भल्याभल्यांचे गर्वहरण झाले. आणि बाकी इतिहास तुम्ही जाणताच.
मित्रांनो, सांगायचा मुद्दा
असा की, दोर कापले गेले आहेत. परतीचा मार्ग बंद झाला आहे. लढयाशिवाय
आता मार्ग नाही. आणि हा लढा परदेशी शत्रू बरोबर नाही. स्वकीयांशी आहे. खरं म्हटलं तर
स्वत:शी आहे. आपण किती पाण्यात आहोत हे आता दाखवून द्यायची वेळ आली आहे.
पांढरे माऊलींनी बांधकामाबाबत मुद्दे
मांडले. ते चूकीचे नाहीत हे तुम्हीही कबूल कराल. किंबहूना, ह्याच प्रकारचे
मुद्दे तुम्हीही इतकी वर्षं - व्यवस्थापनाच्या अंगाने - मला सांगत होतात. प्रकल्पा
प्रकल्पात त्याचे पुरावेही मौजूद आहेत. उघड गुपितच आहे ते. पण बदली, बढती, ‘चांगल्या’ ठिकाणी नियुक्ती, वैयक्तिक प्रगती, कौटुंबिक स्वास्थ्य...अशा अनेक कारणांमूळे
मौन बाळगलं जात होतं. "बाकी आपल्याला काय करायचय? आपण बरे.
आपलं बरं. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. आणि नाही तरी आपलं कोण ऎकणार आहे?"
अशी एकूण भूमिका आपण आजवर घेतली. पण त्यानं काय होऊन बसलं हे पांढरे
माऊलींनी दाखवून दिलं. ते नाकारता येत नाही. अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं. विश्वेश्वरय्यांचे
वारस आपण! भगीरथाचे पुत्र आम्ही!! हे काय घडलं आपल्या हातून? असं नक्की वाटतय. मन खायला लागलं आहे. सिनेमातल्या अमिताब बच्चनच्या हातावर
गोंदलेले "मेरा बाप चोर है" हे वाचून उद्या आपल्या लहानीनं प्रश्न विचारला
तर काय उत्तर द्यायच तिला? मित्र, नातेवाईक,
ओळखीचे सर्वांची नजर आपण चुकवतो आहोत. जल संपदा विभागात नोकरी करतो असं
सांगायला लाज वाटते आहे. मन स्थिर नाही. बेचैनी वाढली आहे. विपश्यना, रामदेव बाबा, वाल्मीतील व्यक्तिमत्व विकासाचा मारा...काही
काही कामी येत नाहीये.
पण झाल्या प्रकाराला इष्टापत्ती
समजूयात. बेचैनीतच बदलाचे अंकूर असतात. अस्वस्थतेमूळे व्यवस्था बदलते. असंतोषातून परिवर्तन
होतं. एक क्षण असा येतो की फुलपाखरानं पंख हलवले तरी उलथापालथ होते. वादळ धडका द्यायला
लागतं. त्सुनामी येते. आपण तर अभियंते! सिंचन व्यवस्थापनाची खडानखडा माहिती असणारे
शासनाचे तळपाय!! आपल्याच जीवावर तर हा डोलारा उभारलाय. तो आता सावरायला हवा. आपलं घर
आपणच सांभाळायला हवं. जबाबदारी आपली आहे. चुका दुरूस्त करायच्या आहेत. सिंचन व्यवस्थापनाला
गतवैभव प्राप्त करून द्यायचं आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून परत एकदा झेप घेतली
पाहिजे.
आणि तुम्हीच ते करू शकता. कारण
पाणी कोठे तुंबले आहे? बिनअर्जी कोणाचे आहे? पाणीनाश कोण करतं?
तुम्हाला सगळं माहित आहे. आता तुमच्या कडून अपेक्षा आहेत. मला खात्री
आहे तुम्ही निराश होणार नाही आणि निराश करणारही नाही.
अपेक्षा अशी अजिबात नाही की तुम्ही
नोकरी सोडा, रस्त्यावर
उतरा, संघर्ष करा....नाही! तुम्ही असं काहीही करायची गरज नाही.
तुम्ही फक्त एकच करा प्रशासकीय सेवेत आपापल्या ठिकाणी मोर्चा संभाळा. सदविचारांचा किल्ला
लढवा. जलनीती, कायदे, शासन निर्णय,
परिपत्रके या सर्वांना अर्थ प्राप्त करून द्या. त्यांची अंमलबजावणी करा.
तुम्ही कालवा अधिकारी आहात. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे अधिकार दणकावून वापरा. शेषन
नाही तर निदान सिंघम तरी व्हा. अभियंते म्हणून व्यावसायिक दृष्टया एकत्र या. चांगल्याला
चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणा. नाठाळांना दूर ठेवा. बघा, काय
चमत्कार होतो ते! तुमची शक्ती अद्याप तुम्ही ओळखलेली नाही. ती ओळखा आणि करा सुरुवात.
साईटवर जा. कालव्या कालव्यानं हिंडा.
लाभधारकांना भेटा. पाणी वापर संस्थांना मदत करा. वाल्मीचं प्रशिक्षण अंमलात आणा. पीआयपी
आणि पाणी पाळ्यांचं नियोजन, कालवा देखभाल व दुरूस्ती, पाण्याचे नियमन
व मोजमाप, पाणीचोरी रोखण्यासाठी कायद्याचा वापर....तुम्ही हे
सर्व वाल्मीत शिकला आहात. वाल्मीची पुस्तक बाहेर काढा. माझ्या ब्लॉगवर ही तपशील उपलब्ध
आहे.
विस्थापितांचे पूर्ण व समाधानकारक
पुनर्वसन; बिगर-सिंचनावर
मर्यादा; पाणी उसाकडून हंगामी पिकांकडे; उन्हाळी हंगामाऎवजी खरीप व रब्बी हंगामांवर भर; आठमाही
सिंचनाचा आग्रह; उपसा सिंचनावर निर्बंध; पाणीचोरी व पाणीनाश टाळणे, वगैरे उपाय हेच तरे खरे उपाय
आहेत. शासनाचे अधिकृत धोरण हेच सांगते. शासकीय कर्मचारी म्हणून ते अंमलात आणणे हेच
तुमचे कर्तव्य आहे.आणि शासकीय कर्तव्य बजावलं की काय होऊ शकतं हे पांढरे माऊलींनी सोदाहरन
दाखवून दिले आहे. तेव्हा.....
मित्रांनो, काळाची पावले ओळखा.
पाण्यामूळे निर्माण झालेल्या असंतोषाची दखल
घ्या. आपल्या माळकरी शेतक-याची सहनशीलता आता संपत चालली आहे.तो आता प्रकल्पा-प्रकल्पात
पाण्यासाठी टेल टू हेड मोर्चे काढणार आहे. चारी चारीने पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी आता ज्ञानबा-तुकाराम
होणार आहे. पुढच्या आषाढी-कार्तिकीला तो कदाचित पंढरपुराऎवजी मंत्रालयावर दिंडी काढेल.
मजनिप्रात पुंडलिक वरदा हारी विठ्ठल करेल. त्याच्या संयमाचा बांध आता कधीही फुटु शकतो.
अधिक काय लिहावे? सूज्ञांस सांगणे
नलगे!
वाल्मीतील प्रत्येक प्रशिक्षणाच्या
सांगता समारंभात तुम्ही काय बोलला होतात याची आठवण करा. त्या प्रत्येक कार्यक्रमानंतर
तशी गरज नसताना तुम्ही मला माझ्या खोलीत येऊन भेटायचात. धन्यवाद म्हणून हस्तांदोलन
करायचात. त्यातली उब मला अजून जाणवते आहे. तुमच्या डोळ्यात त्या प्रत्येक वेळी मी आशा
पाहिली आहे. चांगुलपणा पाहिला आहे.
धन्यवाद.
काळजी घ्या.
,
शुभेच्छा!
भेटूयात....पाण्यासाठी...
चारीचारीवर!
आपला स्नेहांकित,
प्रदीप पुरंदरे.