Saturday, October 27, 2012


आम्ही सांगत होतो...

नेमेचि येणारे जल संकट व पाण्यावरून होणारे महाभारत..
आम्हाला चाहूल लागली होती

लाभक्षेत्रे कुरूक्षेत्रे बनतील
अभिमन्यु, चक्रव्युह, अश्वथामा, जमीनीत रूतलेले रथचक्र,
वस्त्रहरण, लाक्षागृह, मायानगरी....सगळे कसे ओळखीचे
आत्ता आत्ताच पाहिलेले,
रिपिट टेलिकास्ट- खास लोकाग्रहास्तव

आम्ही सांगत होतो
लढाई जिंकणे पुरेसे नाही
तहात हरणे हे "विधिलिखित" आहे

आम्ही सांगत होतो
कायदे नाहीत, नियम नाहीत
जल क्षेत्रात कायद्याचे राज्य नाही
शमीवृक्षावर शस्त्रे गंजत ठेऊन
युद्ध जिंकता येत नाही

आम्ही सांगत होतो
"जल वास्तव "

जलाशयात गाळ, कालवे नादुरूस्त,
व्यवस्थापनाकडे दूर्लक्ष, नियोजनाचा दुष्काळ
जल संकट अंधारून येत आहे
कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे
वादळ आता येणार आहे


आम्ही सांगत होतो
अंतिम सिंचन क्षमतेच्या गुलाबाला काटे आहेत
निर्मित सिंचन क्षमता भ्रामक आहे
भिजलेले क्षेत्र फसवे आहे

म्ही सांगत होतो
लाभक्षेत्रातच कोरडवाहू आहेत
भारताचे पाणी इंडिया पळवतो आहे
खो-याखो-यात पाणी उकळते आहे
.....
......

आम्ही आजही सांगत आहोत
दुष्काळाला इष्टापत्ती माना
वेळ अजून गेलेली नाही
परतीच्या पावसाचा जुगार आणि
शकूनी मामाला नायकत्व
जलवंचितांना मान्य नाही

[Published in Weekly "Aadhunik Kisan", Aurangabad,11 Oct 2012]


No comments:

Post a Comment