जल वास्तव-१४
पी.आय.पी.- सिंचनासाठी पाणी
मागील लेखात आपण पी.आय.पी.
संदर्भात बिगर सिंचनाबद्दल चर्चा केली. आता या
लेखात सिंचनासाठी पाण्याचे नियोजन कसे केले जाते याबद्दल काही तपशील दिला आहे.
सर्वसामान्य पर्जन्यमानाच्या वर्षात १५ ऑक्टोबर रोजी जलाशय पूर्ण भरला असेल
असे गृहित धरले जाते. जलाशयातील एकूण पाण्यातून (ग्रॉस स्टोरेज) प्रथम मृत-साठा
(डेड स्टोरेज) वजा केला जातो. राहिलेल्या जलसाठयास उपयुक्त जलसाठा असे म्हणतात. १५
ऑक्टोबर नंतर येणारा मान्सूनोत्तर येवा (पोस्ट-मान्सून फ्लो); गाळाचे अतिक्रमण; जलाशयातून होणारे बाष्पीभवन व धरणातून होणारी गळती हा पाण्याचा व्यय
(लॉसेस); निभावणीचा साठा (कॅरी ओव्हर) आणि उपसा सिंचनाचे पाणी या व तत्सम बाबींचा
विचार करून शेवटी प्रवाही सिंचना करिता किती पाणी उपलब्ध होईल याचा अंदाज बांधला जातो.
त्या मर्यादेत मग हंगामातील पिकांचे नियोजन (विविध
पिके, पिकांखालचे क्षेत्र, एकूण पाणी-पाळ्या, दोन पाणी-पाळ्यातील अंतर,
वगैरे) केले जाते. हे सर्व
कळायला सोपे जावे म्हणून सोबत एक तक्ता दिला आहे. पाणी वापर संस्थांचे
पदाधिकारी व कालवा सल्लागार समितीचे सदस्य यांनी तो समजावून घेतला आणि बैठकांतून का?,
किती?, कशासाठी?, कोणासाठी?,
केव्हा? असे प्रश्न विचारायला सुरूवात केली तर
त्या जागृत लोकसहभागामूळे पी.आय.पी.जास्त चांगला होऊ शकतो. अधिका-यांनीही
पारदर्शकतेचे धोरण स्वीकारून सर्व प्रश्नांना व्यवस्थित उतरे दिली तर विश्वासाचे वातावरण
निर्माण होईल. त्यांच्या व्यावहारिक अडचणी व तांत्रिक मर्यादा
शेतक-यांनाही कळतील. गैरसमज दूर होऊन सिंचन
हंगाम व्यवस्थित पार पाडायला मदत होईल. लपवाछपवी व मोघमपणा यामूळे
शेवटी पाणी चोरांचे फावते हे लक्षात घेतले पाहिजे. पाण्यावरुन
होणारे संघर्ष, त्यातून होणारी जाणीव जागृती, माहिती अधिकार कायदा व प्रसार माध्यमे या सर्वामूळे आता परिस्थितीत बदल होत
आहेत याची जाणीव सर्वच संबंधितांनी ठेवणे उचित होईल.
पी.आय.पी.या पाण्याच्या अंदाज-पत्रकातून शेवटी उत्तर काय येणार
हे त्यात गृहित काय धरले यावर अवलंबून आहे. गृहितागणिक उत्तर
अर्थातच बदलते. म्हणून खालील गोष्टींचा आग्रह धरला गेला पाहिजे.
अन्यथा, "मोजून-मापून,
घनमापन पद्धतीने, पाणी-वापर
हक्क" ही संकल्पना कधीच प्रत्यक्षात येणार नाही.
१) गाळाच्या प्रत्यक्ष
अभ्यासावर आधारित अद्ययावत कपॅसिटी टेबल
२) पुर्वानुभव
व पाणलोट क्षेत्रातील प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन ठरवलेला मान्सूनोत्तर येवा
३) धरणावर प्रत्यक्ष
मोजलेले बाष्पीभवन
४) धरणावर प्रत्यक्ष
मोजलेली गळती
५) प्रत्यक्ष जलसाठा
व तारतम्य यावर आधारित निभावणीचा साठा
६) शासनाने अधिकृतरित्या
मान्य केलेले बिगर सिंचनाचे आरक्षण व त्यापैकी या वर्षी किती पाणी वापरणार याचा अंदाज
७) प्रत्यक्ष कार्यान्वित
उपसा योजनां करिता शासन धोरणाच्या मर्यादेत निश्चित केलेले उपसा सिंचनाचे पाणी
लोकाभिमूख व वैज्ञानिक दृष्टिकोनातून
पी.आय.पी. करणे शक्य व आवश्यक आहे. त्याचे
एक उदाहरण आपण पुढील लेखात पाहू. विविध पिके, पिकांखालचे क्षेत्र, एकूण पाणी-पाळ्या, दोन पाणी-पाळ्यातील अंतर,
वगैरे नियोजन कसे केले जाऊ शकते हे त्यातून स्पष्ट होईल.
अ.क्र
|
विवरण
|
द.ल.घ.मी.
|
१
|
एकूण साठा (ग्रॉस स्टोरेज)
|
|
२
|
मृत-साठा
(डेड स्टोरेज)
|
|
३
|
उपयुक्त साठा (लाईव्ह स्टोरेज)
[(१) वजा (२)]
|
|
४
|
मान्सूनोत्तर येवा (पोस्ट-मान्सून फ्लो)
|
|
५
|
एकूण [(३) अधिक (४)]
|
|
६
|
वजावट:
(१) गाळाचे अतिक्रमण
(२) बाष्पीभवन
(३) गळती
(४) एकूण वजावट
|
|
७
|
वापराकरिता उपलब्ध पाणी [(५) वजा (६)]
|
|
८
|
निभावणीचा साठा (कॅरी ओव्हर)
|
|
९
|
बिगर सिंचन:
(१) पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी
(२) औद्योगिक वापराचे पाणी
(३) इतर
(४) एकूण बिगर सिंचन
|
|
१०
|
सिंचना करिता उपलब्ध पाणी [(७) वजा (८) व (९)]
|
|
११
|
उपसा सिंचन:
(१) जलाशयावरुन
(२) कालव्यावरून
(३) इतर
(४) एकूण उपसा
|
|
१२
|
प्रवाही सिंचनाकरिता उपलब्ध पाणी
|
[Published in Weekly "Aadhunik Kisan", Aurangabad, 23 to 29 Aug 2012]
No comments:
Post a Comment