·
पाणलोट क्षेत्रातला सर्वात खोलगट भाग म्हणजे नाले / नद्या.
·
पाणलोटाच्या पुनर्भरण क्षेत्रात द्वितीय व तृतीय श्रेणीच्या नाल्यांवर केलेल्या उपचारांमुळे (Catchment Area Treatment)
भूजलाचे पुनर्भरण( Ground Water Recharge) चांगले होते. पाणी मुरते. भूजलाची पातळी
वाढते.
·
पिक रचनेची पथ्ये पाळली, कमी पाणी लागणारी पिके
घेतली आणि पाणलोटातील विहिरी व बोअर मधील पाण्याचा उपसा संयमाने केला (खरे तर बोअर
घेतलेच नाहीत किंवा त्यातील पाणी फक्त पिण्याकरिताच वापरले) तर पावसाळ्या नंतर पाणलोट
क्षेत्रातील भूजल हळू हळू नाल्याकडे व नदीकडे वाहते. म्हणजे भूजलाचे सूयोग्य नियमन
(Ground Water Regulation) केले आणि पाणलोटात असे सर्वत्र झाले
तर नदीही पावसाळ्यानंतर वाहू लागते. पूर्वीपेक्षा तुलनेने जास्त काळ जास्त प्रवाह नदी
नाल्यात राहतो.
·
नदीनाल्यांचे प्रमाणापेक्षा
जास्त खोलीकरण झाले तर मात्र जलधर (Aquifer) उघडा पडतो. त्यातील पाणी नदीनाल्यात येते.
त्याचे बाष्पीभवन होते. तसेच पावसाचे गढूळ पाणी उघड्या पडलेल्या जलधरात गेल्यास तो
हळूहळू काम करेनासा होतो. त्याने पर्यावरणीय धोका निर्माण होतो. नदीनाल्यांचे प्रमाणापेक्षा जास्त खोलीकरण झाल्यास विहीरींना जादा पाणी लागण्याऎवजी
पाणलोटातील विहिरींमधील पाणी नदी नाल्यात येईल व त्या विहिरीं कोरड्या पडतील.
·
पाणलोटातील वनक्षेत्र वाढले व त्यायोगे जमीनीची धूप
कमी झाली तर नदीनाल्यात येणा-या गाळाचे प्रमाण कमी होईल.
·
नदी व नाला काठ यांचेवर गवत आणि वृक्ष लागवड करून
त्यांचे स्थिरीकरण करण्याने त्यांची धूप कमी होते आणि त्यातून वाहणा-या पाण्याची गुणवत्ताही
वाढते. नाला काठ स्थिरीकरणाचा स्पष्ट उल्लेख १९९६ च्या शासन निर्णयात आहे. नंतर मात्र
त्याचा कोठेही साधा उल्लेखदेखील नाही.
·
नदीनाल्यांनी वळणे वळणे घेत वाहणे
(Meandering) ही नैसर्गिक अवस्था आहे. त्यामूळे
नदीनाले संथ गतीने वाहतात आणि पाणी मुरण्याला जास्त काळ संधी मिळते. म्हणून नदीनाला
सरळीकरण करू नये. नदी नाला सरळीकरणाने प्रवाहाचा वेग वाढतो. पाणी पटकन
वाहून जाते. शहरात
साचलेल्या पावसाच्या पाण्याचा लवकर निचरा व्हावा म्हणून तेथे नाल्यांची बांधबंदिस्ती
(विशिष्ट आकार, उतार व अस्तरीकरण) व सरळीकरण
केले जाते. इतर ठिकाणी नदी नाल्यांचे अशा पद्धतीने कालव्यात रुपांतर करणे हे नदी पुनरुज्जीवनाला
घातक असते
·
नद्यांमध्ये
पर्यावरण संतुलनासाठी (Environmental flow) पाणी मुद्दाम सोडणे व नदीनाले वाहते राहणे
आवश्यक आहे.
·
शासन निर्णयात कोठेही नदी खॊलीकरणाचा उल्लेख नाही.
शासनाला फक्त काही मर्यादेपर्यत "नाला" खोलीकरण (तेही फक्त द्वितीय व तृतीय श्रेणीच्या
नाल्यांचे) अभिप्रेत आहे
·
नदी
नाल्यांचे रूंदीकरण ही शासनाला अपेक्षित नाही. किंबहूना, ते करू नये असेच शासननिर्णयात
स्पष्टपणे नमूद केले आहे.
·
नदी
/ उपनदी खॊ-यां मधील एकूण भौगोलिक परिस्थिती, हवामान व त्यातील बदल, पर्यावरणीय प्रवाह
इत्यादिंच्या एकत्रित परिणामामुळे निश्चित
होणारी पाणी उपलब्धता, पाण्याचा विविध गरजांसाठी होणारा वापर, वापरलेल्या पाण्याचा
फेरवापर इत्यादि अनेक घटकांवर नदी नाला पुनरुज्जीवनाच्या यशस्वीततेचे प्रमाण ठरते.
नदी पुनरुज्जीवनाचे सप्तर्षी
१.पुनर्भरण क्षेत्रात फक्त द्वितीय व तृतीय श्रेणीच्या नाल्यांवर उपचार करणे
२.‘नदी’ नव्हे तर फक्त नाला-खोलीकरण करणे
३. नाला रूंदीकरण न करणे. नाला काठ
स्थिरीकरण करणे
४. नदीनाला सरळीकरण न करणे. नदीनाल्यांना
वळणे घेत वाहू देणे.
५. पर्यावरणीय प्रवाह कायम ठेवणे
६. वनक्षेत्र वाढवणे
७. भूजलाचे पुनर्भरण व सूयोग्य नियमन करणे
|
No comments:
Post a Comment