Monday, October 14, 2013

मराठवाड्याचे पाणी


"जनवादी, लोकवैज्ञानिक पाणी धोरण व कृति कार्यक्रम" निश्चिती शिबिर
मानवलोक, अंबेजोगाई, १२ व १३  नोव्हेंबर २०१३

सिंचन घोटाळा, श्वेतपत्रिका, विशेष चौकशी समिती, समतोल विकासासंदर्भातील केळकर समिती, मराठवाडयातील २०१२ सालचा दुष्काळ आणि जायकवाडी व नांदुर मधमेश्वर प्रकल्पांसाठी वरच्या धरणातून पाणी सोडण्यावरून सुरु असलेला नदीखोरेस्तरावरील वाद यामूळे जलक्षेत्र ढवळून निघाले. जल-विचारविश्वात नव्याने मंथन सुरु झाले. पाणी-प्रश्नावर  मराठवाडयात छोटी मोठी आंदोलने व्हायला लागली. या पार्श्वभूमिवर आता पाणी-प्रश्नासंबंधी जनवादी, लोकवैज्ञानिक पाणी धोरण, रणनीती व कृती कार्यक्रम जाणीवपुर्वक विकसित करण्याची गरज आहे. "मराठवाड्याचे पाणी" हे जनवादी, लोकवैज्ञानिक पाणी धोरण व कृति कार्यक्रम  निश्चिती शिबिर  त्या हेतूने आयोजित करण्यात येत आहे.

मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समिती (यापूढे फक्त समिती असे संबोधण्यात येईल) ही डाव्या व लोकशाही राजकीय पक्ष/संघटना व समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन पाणी-प्रश्ना विषयी प्रबोधन व जनआंदोलन करण्यासाठी  स्थापन केलेली  एक समिती आहे. सध्या समितीचे स्वरुप अनौपचारिक असून तीत समाजवादी जन परिषद, समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), लाल निशाण पक्ष (लेनिनवादी), जनता दल (सेक्युलर) व श्रमिक मुक्ती दल या पक्षांचा / संघटनांचा समावेश आहे. समितीचे काम वाढले की मग समितीच्या औपचारिक स्वरूपाबद्दल यथावकाश सर्वसंमतीने योग्य वेळी उचित निर्णय घेण्यात येतील. शिबिरात त्यावर चर्चा होईल.

 जायकवाडी जलाशयात वरच्या धरणातून पाणी सोडा या मागणी साठी वारंवार निदर्शने करणे व धरणे धरणं या सारखे कार्यक्रम आतापर्यंत समितीमार्फत घेण्यात आले आहेत. शासन दरबारी निवेदने देण्याचा व पाठपुराव्याकरिता संबंधित शासकीय अधिका-यांना भेटण्याचा उपक्रम ही चालू आहे. पाणी-प्रश्नाबद्दलचे समितीचे काम फक्त जायकवाडी प्रकल्पापुरते आणि प्रदेशाच्या बाहेरून  पाणी आणण्या पुरते मर्यादित राहू नये  असे समितीस वाटते. समन्यायी पाणी वाटप व कार्यक्षम पाणी वापर करण्याच्या दृष्टीने पूर्ण मराठवाड्याचा समग्र पाणी-प्रश्न हाती घ्यावा अशी समितीची भूमिका आहे. त्यादृष्टीने समितीने आजवर दोनदा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा केला आणि समविचारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या प्रक्रियेतून समितीने भूमिका व मागण्यांबाबत एक प्रस्ताव तयार केला आहे. संदर्भाकरिता तो सोबत जोडला आहे. प्रस्तावित शिबिरातील चर्चेकरिता एक प्राथमिक संदर्भ म्ह्णून तो उपयोगी पडेल असे वाटते. शिबिरात त्यात आवश्यक ती सुधारणा होऊन तो अंतिम होणे अपेक्षित आहे.

शिबिराची कार्यक्रम पत्रिका, गट चर्चेचे नियोजन आणि गट  चर्चेत सहभागी होणा-या व्यक्तीस आपली मते लेखी स्वरूपात नोंदवण्याकरिताचा एक नमूना सोबत जोडला आहे. पाणी-प्रश्नाच्या विविध पैलूंवर  सखोल व समग्र चर्चा शिस्तिने व्हावी आणि शिबिराचे फलित काही तरी ठोस स्वरूपाचे असावे असा  प्रयत्न राहिल.  गटचर्चेसाठी अध्यक्ष व संकलक, उदघाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उदघाटक, बीज भाषण देणारे तज्ञ तसेच समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमूख मार्गदर्शक यांची नावे निश्चित करण्यात येत आहेत. त्याबद्दल काही सूचना /प्रस्ताव आल्यास आयोजकांना मदत होईल. गट चर्चेकरिता विषयवार मुद्देही  सूचवावेत ही विनंती.

शिबिरास मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून २० कार्यकर्ते अपेक्षित आहेत. एकूण १६० कार्यकर्ते शिबिरात सामील होतील असे वाटते. सर्व सहभागी पक्ष /संघटनांनी प्रत्येक जिल्ह्यातून आपापले कार्यकर्ते शिबिरास आवर्जून उपस्थित राहतील याची काळजी घ्यावी. संभाव्य शिबिरार्थींची नावे, पत्ते, मोबाईल क्रमांक व ई-मेल आय डी इत्यादी तपशील आयोजकांस त्वरित कळविण्यात यावा. पाणी-प्रश्नाविषयी काम करणारे किंवा करू इच्छिणारे कार्यकर्ते शिबिरास आल्यास जास्त चांगले.  शिबिरार्थींच्या प्रवासाचा खर्च त्यांनी स्वत: करायचा आहे. शिबिराच्या कालावधीतील चहा, नाश्ता,भोजन व निवासाची व्यवस्था आयोजकांतर्फे सशुल्क (रू. १०० प्रति व्यक्ती ) करण्यात येईल. शिबिर १२.११.२०१३ रोजी सकाळी बरोबर १० वाजता सुरू होईल. सर्वांनी वेळेवर हजर रहावे ही विनंती.

शिबिराच्या ठिकाणाचा तपशील खालील प्रमाणे:
श्री. अनिकेत लोहिया, मानवलोक, अंबेजोगाई,
ई मेल:   manavlok2004@yahoo.com, मो:  ९८२३०३०००५ 

औरंगाबाद येथील संपर्कासाठी:
प्रा. प्रदीप पुरंदरे, बी-१२, प्राईड टॉवर्स, वेदांत नगर, तिवारी मंगल कार्यालयाजवळ, औरंगाबाद, 
 ई-मेल: pradeeppurandare@gmail.com                                                                                 मो: ९८२२५६५२३२, दूरध्वनी: ०२४०--२३४११४२                                                         


प्रदीप पुरंदरे,
मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समितीकरिता











No comments:

Post a Comment