लोकं उद्धट व्हायला लागली आहेत
पाणी मागतात - पिण्याकरता, शेतीकरता
ठोकून काढलं पायजे साल्यांना
साहेबांनी म्हटलं- अहो, जलनीती घ्या
कायदे करू, नियम करु
येगळं प्राधिकरनच देतो की
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात ...च्यायला
सायबांनी असंबी म्हटलं
नदीजोड व्हायला पायजेल आहे
कोर्टाचा आदेशच आहे तसा
पश्चिमेच्या नद्या फिरवू की पुर्वेला
ह्ये अशी वळवायची नदी अन ह्यो उचलायची
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात ...च्यायला
कान इकडं करा तुमाला म्हणून सांगतो
साहेब म्हनाले- इनटरनल शिक्युरिटिला लै धोका आहे
आता टॅंकरवर काम भागणार नाही, राजेहो
साहेब तर म्हनतात- आता टॅंकच बोलवा
टॅंक. टॅक. रणगाडा ! धडाधडा....
पाणी मागतात ... च्यायला
साहेब जाऊन आले परवा चायनाला
केवढी प्रगती केली राव त्यांनी - थ्री गारजेस
सायबाला विचारलं एवढं सगळं जमवलं कसं त्यांनी?
साहेब म्हनले - पयले तियानमेन केलं. तियानमेन! ते मेन!!
आपण काहीच करत नाही. कशी होणार प्रगती?
पाणी मागतात ... च्यायला
प्रिय प्रदीप
ReplyDeleteतुम्ही मांडलेले मुद्दे अत्यंत महत्वाचे असून त्यावर प्रभावी जन आंदोलन करणे गरजेचे आहे !
प्रकल्प निहाय कृती कार्यक्रम हाती घेवून जन आंदोलना द्वारे पुढे जाता येईल !
आपल्या संकल्पना व शास्त्रीय दृष्टीकोन हा या जन आंदोलनाचा पाया असू शकतो !
आपल्या या ब्लॉग द्वारे आपण सर्वांना उपलब्ध झालात !
या बद्दल अभिनंदन !
-- राजन क्षीरसागर परभणी
"अरेच्चा...हे ही ब्लॉगर झाले!",[दैनिक क्लोक्सत्ता दि. २३ एप्रिल २०१२] मध्ये आपली कविता वाचायला भेटली. तुमचे अभिनंदन... कविता खूप छान आणि अर्थपूर्ण आहे.लिहित राहा...
ReplyDeleteअलीकडे तृणमूल आस्थांबाबत कुणी बोलताना दिसत नाही. आपलंच काही चुकतंय का अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती असताना तुमच्या ब्लॉग वरच्या नोंदी वाचून खूप बळ मिळाल्यासारख वाटलं. आंदोलनाचे दिवस नसतीलही पण या लेखनानं आमच्यासारखे अनेक आंदोलित झाले तरी विचार पसरेल. कृतीसाठी बळ मिळेल. मला 'लेक त्यापिंग' आणि 'पाणी मागतात' या दोन्ही कविता मनापासून आवडल्या. आधीच विनयानं ''पाणी मागतात च्यायला..'इ-मेल वर पाठवली होती.
ReplyDelete