ज्योतिबा फुल्यांच्या सिंचननोंदी: सन १८८३
-प्रकरण क्र.८ (पृष्ठ क्र. ३६ ते ४१), "सिंचननोंदी", लेखक - प्रदीप पुरंदरे, प्रस्तावना - अण्णासाहेब शिंदे, प्रकाशक - एस.एम.जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन, पुणे, जुलै १९९२
(२७ ऑगस्ट १९८९ ते ४ मार्च १९९० या कालावधीत दै. मराठवाडयात लिहिलेल्या १२ लेखांचे संकलन) प्रस्तुत गद्य-पद्य लेख दि.३ डिसेंबर १९८९ रोजी दै. मराठवाडयात प्रसिद्ध झाला होता. अण्णासाहेब शिंदे यांनी या लेखाचा त्यांच्या प्रस्तावनेत विशेष उल्लेख केला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले,
माफ करा!
पण तुम्ही खरंच होऊन गेलात का हो?
नाही म्हणजे काय आहे
आम्ही काही तुम्हाला पाहिलं नाही
वाचलं आहे थोडंफार
ऎकलं सुद्धा बरंच आहे
ऑफिसात फोटो आहे
पण खरंच सांगतो
खरं काहीच वाटत नाही
***
तुम्ही म्हणे १८८३ साली
शेतक-यांचा आसूड फटकारला
बळीराजाचं गा-हाण मांडलं
आणि चक्क
सिंचनाबद्दल सुद्धा लिहिलंत
महात्मा ज्योतिबा फुले,
काय हा उद्धटपणा!
अहो,
सिंचनसंस्थानाबद्दल
आळीमिळी गुपचिळी धोरण
स्वीकारण्याची आजदेखील प्रथा असताना
तुम्ही सपशेल १०६ वर्षांपूर्वी सिंचनाबद्दल
‘धर की हाण’ पद्धतीनं लिहिलंत?
‘थ्रू प्रॉपर चॅनेल’ नाही,
‘आपला आज्ञाधारक’ नाही
काय म्हणावं तरी काय तुम्हाला?
तुम्हाला राव मेमो दिला पाहिजे
खरं तर स्पष्टीकरणच मागितले पाहिजे.
तुम्ही वापरलेली भाषा वगैरे जाऊ दे
पण तुमचे मुद्दे?
ज्योतिबा, त्याबद्दल तर तुम्हाला
सिंचन इतिहास कदापि क्षमा करणार नाही!
***
पाश्चिमात्यांच्या उदारतेबद्दल
आभार मानायच्या ऎवजी
तुम्ही त्यांचा उद्धार करता?
‘युरोपातील सावकारास महामर व्याज देण्याचा’
बाऊ करून तुम्ही कृतघ्नपणा करता
असं नाही वाटत तुम्हाला?
ज्योतिबा,
तुमची चूक आता आम्ही सुधारली आहे!
प्रत्येक प्रकल्पाचे भूमिपूजन करण्या अगोदर
पश्चिमेकडे तोंड करून आम्ही गुडघे टेकतो
‘आकाशातल्या बापा, दे दो साला छप्पर फाडके’
अशा मंत्रोच्चारात प्रार्थना करतो
भगीरथ आणि विश्वेश्वरय्या
फड पद्धत आणि पाणी पंचायत
आडगाव आणि बळीराजा धरण
यांच्या नावानं आंघोळ करून
चुल्लूभर पानीमे डॉलर्सच्या पॉप टाईममध्ये
‘फार्मर्स पार्टिसिपेशन यू नो’
असं तारस्वरात किंचाळत
आधुनिकतेवर लाईन मारतो.
ज्योतिबा,
इसको बोलते हिंदूस्तानकी प्रगती!
***
आणि हो,
‘शेतात वेळच्या वेळी पाणी देण्याचं’
हे काय खूळ काढलं होतंत तुम्ही?
अरे,महात्मा झालात म्हणून काय
वाट्टेल ती अपेक्षा करायची?
आम्ही ठरवू ते शेत
आणि
आम्ही ठरवू ती वेळ
असंच आम्ही पाणी देणार
मग भले कोणी काहीही म्हणोत.
शेवटी आम्हाला काही अस्मिता आहे की नाही?
***
‘धरणातील पाण्याची मोजदाद करून
जेवढया जमिनीस पुरेल
तितक्याच जमिनीच्या मालकांस पाण्याचे फर्मे द्यावेत’
असं जेव्हा ज्योतिबा तुम्ही सूचवता
तेव्हा तुम्ही तुमचं अज्ञान दाखवता
तुम्हाला पी.आय.पी. नावाचं प्रकरण
कळलं नाही हेच खरं.
ज्योतिबा,
दुसरं तिसरं काही नाही
तुम्हाला
पी.आय.पी.च्या प्रशिक्षण वर्गालाच पाठवलं पाहिजे
***
ज्योतिबा,
एक वेळ उद्धटपणा समजू शकतो
पण कांगावखोरपणासुद्धा करायचा?
‘पाण्यासाठी आर्जव करिता करिता (म्हणे)
शेतक-यांच्या नाकास नळ येतात’
ज्योतिबा,
हे मात्र लै झालं
शुद्ध आक्रस्ताळेपणा आहे हा!
तुम्हाला माहित नाही ज्योतिबा
आम्ही किती प्रयत्न करतो ते!
पाणी वाटपा साठी
किती पाणी पंचायती आम्ही दणादण
स्थापन केल्या आहेत
पण काही खोडसाळ लोक
त्यांना "कागदी पंचायती" म्हणतात
ख-याचे दिवस राहिले नाहीत ज्योतिबा
केलेल्या कामाचं चीज नाही बघा
म्हणजे आम्ही मरमर मरायचं
आणि हे म्हणणार
कोणी सांगितल्या होत्या "नसत्या पंचायती"?
म्हणे "कालवा धड चालवा,
पाण्याची हमी द्या,
शेतक-यांना निर्णय प्रक्रियेत सामील करा,
मग सगळं आपोआप होतंय"
तुम्हाला सांगतो ज्योतिबा
या खोडसाळ नतद्रष्टांना
सिंचन व्यवस्थापनाचा अज्याबात
अनुभव नाही
(अर्थात, ती ही आमचीच धूर्त योजना!)
वाट्टेल ते बोलत असतात
आपली उचलली जीभ अन लावली टाळ्याला
तशातला प्रकार
अशा पुस्तकी किडयांना
आम्ही बघा अनुल्लेखानं मारतो
त्यांच्याकडे चक्क दूर्लक्ष करतो
पण तुम्हाला म्हणून सांगतो ज्योतिबा,
अंदरकी बात ऎसी है
बडे शेतकरी आम्हालाच गुंडाळून ठेवतात
पोस्टिंगसाठी, बदलीसाठी
आम्हीच त्यांची आर्जवं करतो
राजे, नाकास नळ आमच्या येतात!
आणि छोटे शेतकरी?
ते समजूतदार असतात
सहनशील असतात
"आपल्या पायरीने" राहतात
पाणी बहुदा मिळणारच नाही
किंवा मिळेल तेव्हा मिळेल तसं घ्यायचं
हे त्यांनी मान्यच केलेलं असतं
मग आता सांगा ज्योतिबा,
प्रश्न येतोच कोठे शेतक-यांनी आर्जवं करायचा?
आणि
आमची नवीन अफलातून आयडिया
तुम्हाला कोठे माहित आहे?
आता आम्ही काय करतो
जेथे पाऊस भरवशाचा व भरपूर आहे
खोल काळ्या जमिनी आहेत
तेथेच बघा कालवे काढतो
आणि काय सांगू ज्योतिबा
‘शेतक-यांचा’ बेजबाबदारपणा
वट्टात पाणीच घेत नाहीत हो!
म्हणजे दारात गंगा आणून द्यायची
आणि वर पुन्हा आम्हीच आर्जवं करायची
‘पाणी घ्या हो पाणी’
काही राष्ट्रवाद वगैरे राहिलाच नाही बघा
ज्योतिबा!
***
पण ज्योतिबा,
तुमचं नाही म्हटलं तरी चुकलंच
शेतक-याचा आसूड लिहायच्या अगोदर
जरा तरी कल्पना द्यायची आम्हाला
अहो,
आय.बी.मध्ये पार्टी केली असती
कारमधून कमांडमध्ये हिंडलो असतो
रंगीबेरंगी फायलीतल्या आकडेवारीत
सचैल स्नान केले असते
पढवून ठेवलेल्या कास्तकारांची
मुलाकत घेतली असती
सिंचनाबद्दलचे "तुमचे गैरसमज"
दूर झाले असते
पण तुम्ही म्हणजे
भलतेच अव्यवहारी निघालात
सिंचन व्यवस्थापनासाठी
एकदम मिसफिट
पुरते डेंजरस!
***
आणि ज्योतिबा,
शेवटी तर तुम्ही कहरच केलात
‘शेताच्या पाण्याच्या मानाप्रमाणे
प्रत्येकास एकेक तोटी करुन द्यावी’
ही कल्पना अहो, अगदी अलिकडच्या काळातली
प्रथम अमेरिकेत हे झालं
आणि नंतर चक्क
१९८० पासून (आय.पी.के.एफ.वाल्या)
श्रीलंकेत प्रयोग चालू
लिमिटेड रेट डिमांड शेडयूल
हे त्याचे भारदस्त नाव
संयुक्त नियंत्रणाचा हा एक प्रकार!
इतिहासात जे १०० वर्षांनी घडायचं होतं
ते अगोदरच सांगून
तुम्ही द्रष्टेपण दाखवलं
असा तुमचा समज असेल
तर आम्हाला तो मान्य नाही.
ज्योतिबा,
इतिहासाच्या क्रमात ढवळाढवळ करण्याचा
अधिकार तुम्हाला मूळात दिला कोणी?
आता चूकून तुम्ही म्हणता तेच बरोबर असेल
‘युरोपातील सावकारांनी’ सांगितलं म्हणून
आम्हाला ते भविष्यात करावंही लागेल
पण
आम्ही तुमचं अज्याबात ऎकणार नाही
कारण एक तर तुमची गावंढळ भाषा
म्हणे -‘तोटया करून द्या’
आनि दुसरं असं की,
आम्ही तुमचं का ऎकावं?
तुम्ही इंजिनियर नाही
शेतक-याचा आसूड मान्यताप्राप्त
आंतरराष्ट्रीय नियतकालिकात
प्रसिद्ध झालेला नाही
कोणत्याही परदेशी तज्ञानं
तुमच्या नावाची शिफारस आमच्याकडे केलेली नाही
तुम्ही जागतिक बॅंकेत कन्सलटंट नाही
यू.एस.एड. मध्ये तुम्हाला कोणी ओळखत नाही
तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले,
माफ करा
आम्ही तुम्हाला ओळखत नाही
आमच्यासाठी तुम्ही झालाच नाहीत
***
पण शेवटी ज्योतिबा,
खाजगीत तुमचे आभार मानले पाहिजेत
बरं झालं! तुम्ही पूर्वीच होऊन गेलात!!
आता हयात असता तर
नक्कीच शेतक-याचा आसूड लिहिला असतात
पेपरवाल्यांनीही तो छापला असता
त्यांना काय? काही पण छापतात
आणि मग
लोकांनी भंडावून सोडलं असतं
पाणी वाटपाची "फुले पद्धत" लागू करा म्हणून
पण आता काही प्रश्न नाही
पुन्हा ज्योतिबा फुले होणे नाही
तेव्हा आभार. ज्योतिबा,आभार.
मन:पूर्वक आभार.
***
टिप:
१. पी.आय.पी. म्हणजे पाण्याचे अंदाजपत्रक. प्रिलिमिनरी इरिगेशन प्रोग्रॅम.
२. आय.बी.म्हणजे इरिगेशन बंगला.
३. कमांड म्हणजे सिंचन प्रकल्पाचे लाभक्षेत्र
No comments:
Post a Comment